Tuesday, September 13, 2011

माझं शहर- सोलापूर




सोलापूर हा माझा जिल्हा, याच शहरात माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं, त्यानंतर छोट्या मोठ्या नोकरीसाठीही याच शहरानं मला हात दिला. आमचे सहकारीही ग्रामिण भागातूनच आलेले असल्याने दयानंद कॉलेज हे ग्रामिण भागातल्या विद्यार्थ्यांचे माहेरघरच..त्यामुळे तिथंच शिक्षण पूर्ण केलं. सायकल हेच सर्वांचं प्रवासाचं साधन. आमच्या ग्रुपमधलेही सर्वजण ग्रामिण भागातलेच. त्यावेळी आमचे प्राध्यापक सोलापूरचा उल्लेख हे शहर म्हणून न करता एक मोठं खेडं असाच करायचे...त्यावेळी या मोठ्या खेड्यात राहताना फारसा त्रास जाणवला नाही किंवा तेवढी प्रगल्भताही आमच्यात नसावी..पण नुकतच मी सोलापूरला जाऊन आलो..शहराची लोकसंख्या वाढलेली आहे. शहराचा आकार वाढलाय. सर्वच बाजूंनी शहर पसरलय. पुण्या मुंबईतली काही बिल्डरमंडळीही आता सोलापूरकडे वळलीत. तिथली जागा संपलीय. म्हणून त्यांना आता सोलापूर शहर त्यांच्या व्यवसायासाठी फायद्याचं ठरतय. कारण दोन तीन वर्षापूर्वी सोलापूरात ज्या जागेचा भाव हजार बाराशे रुपये होता, त्याचा भाव तीन हजारांच्यापुढे गेलाय. फ्लॅट संस्कृतीसुद्धा सोलापूरात फारशी रुजलेली नव्हती..पण या नव्या बिल्डर आक्रमणामुळे फ्लॅट संस्कृतीही वाढू लागलीय. विजापूर रोडवर आयटीआय नेहरुनगर म्हटलं कि जायला नको वाटायचं तर मजरेवाडी म्हटलं की सोलापूरचं दुसरं टोक वाटायचं..पुणे रोडवर तर बाळे गाव वगळलं तर फारसा विस्तार झालाच नव्हता..पण आत्ता याच महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या जागा मोठ्या मंडळींनी विकत घेतलेल्या आहेत..सोलापूर विद्यापीठ झाले. त्याच्या शेजारीच आता नवले सरांची सिंहगड संस्था आलीय. एमआयटीने जागा घेतलीय. दंतविद्यालय आहे. केगावच्याजवळच अभियांत्रिकी महाविद्यालय झालय. त्यातच काही वाहनांच्या कंपनींची मोठी शोरुम्स थाटलेली आहेत..ही यादी लांबतच जाणाराय..याच रस्त्यावर एका पुणेकर बिल्डरनं आपला प्रकल्प थाटलाय. तर जुन्या मिलच्या जागेवर भव्य व्यापारी संकुल साकारलं जातय...एवढा पसारा वाढत आहे..पण पायाभूत सुविधांच्या नावानं मात्र बोंबाबोंब आहे.. जुळे सोलापूर नावानं जो भाग विकसित झालाय. तिथं पिण्याच्या पाण्याची समस्या आहे हे वारंवार दिसून आलय. या भागात महापालिकेच्या ड्रेनेजची सोय नाही पण मागची दोन तीन वर्षे युवजर चार्जेसच्या नावाखाली महापालिकेनं सातशे रुपयाप्रमाणे लोकांकडून कर उकळला..आता निवडणुकीच्यातोंडावर तो रद्द करण्यात आलाय. शहरातले दोन तीन मुख्य रस्ते वगळता रस्त्यांची पूरती वाट लागलेली आहे..वाहन चालवताना कसरत नाही तर सर्कस करावी लागतेय. याची कमी की काय म्हणून रस्त्यात मोकाट जनावरं आपला संसार थाटून बसलेली असतात..गवळ्यांच्या म्हशी तर कधी तुम्हाला आडव्या येतील सांगता येत नाही..ह्या म्हशी कदाचित आमच्या सुशिलकुमार शिंदे किंवा शहराच्या दौऱ्यावर येणाऱ्या व्हि व्हीआयपींच्या गाड्यांच्या ताफ्याकडे येत नसाव्यात किंवा त्यांच्या बंदोबस्ताला आहेत असं तर त्यांना कुणीतरी सांगितलेलं असावं..कारण यापैकी कोणत्या म्हशीनं त्यांच्या गाडीचा ताफा अडवलेला नाही आणि मोकाट जनावरांची तर त्यांचा सवयच झाली असावी..त्यामुळे या सत्ताधारी मंडळींचं त्याकडे दुर्लक्ष होत असावं. कोणत्याही शहरात असा मोकाटपणा दिसत नाही.. दिसलाच तर पालिका त्याचा बंदोबस्त करते..आमच्या याच सोलापूरची आणखी एक खासियत म्हणजे पोस्टर्स...शहरातला एकही रस्ता नसावा जिथं पोस्टर नाही..ही पोस्टर्स नव्या नेत्यांची असल्याचं दिसतं म्हणजे उगवते तारेच...पोस्टरवरुन तरी ती कोणत्यातरी पक्षाची किंवा संघटनेची नेतेगिरी करत असावीत असंच दिसतय. त्यातल्या काही पोस्टरवर नजर टाकली तर मिसरुड न फुटलेली पोरं ठोरं कोणतंतरी मोठं सामाजिक कार्य केल्याचा आव आणताना दिसतात....त्यावरचा फोटो तर स्टाईलबाजच हवा..वरुन टोपण नावं हवंच..कारण आबा, दादा, अण्णा, महाराज, राजे, असं काहीतरी नाव असल्याशिवाय फोटोलाही वजन येत नसावं..अशा पोस्टर्सची संख्या महापालिकेला तरी मोजता येते का असा प्रश्न पडतो एवढी पोस्टर्स आहेत..आता पोस्टर हा शहरातला प्रकार वगळता बाकी सर्व मात्र एखाद्या गावाला शोभावं असचं आहे. हे सांगायचा माझा उद्देश एवढाच आहे की आम्हाला कॉलेजला असताना आमच्या प्राध्यापकांनी जे सांगितलं होतं त्यात आज पंधरा- सोळा वर्षानंतरही फारसा फरक पडलेला दिसत नाही..आपलं शहर, आपलं गाव स्वच्छ असावं, त्याची प्रगती व्हाही हे सर्वांनाच वाटतं. ते नावारुपाला यावं अशीच माझी आणि सोलापूरशी संबंधित असलेल्या सर्वांची इच्छा आहे..

Saturday, September 3, 2011

ईटीव्ही गणेशोत्सव मंडळ




दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही ईटीव्ही मराठीच्या हैदाराबदच्या डेस्कवर गणपती बाप्पांची स्थापना केली. मागच्या अकरा वर्षापासून आम्ही ही परंपरा जोपासत आलो आहोत. ईटीव्ही मराठीला सुद्धा मागच्या महिन्यात अकरा वर्ष पूर्ण झाली. पहिल्या गणपतीची स्थापना करताना व्यवस्थापनाच्या कडक नियमांचा नाही म्हटले तरी फटका बसलाच होता..कारण इतर भाषीक लोकही त्यांचे सण असेच कार्यालयात साजरे करायला लागले तर काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण त्यातून शेवटी निर्णय झाला. वरच्या पातळीवरुनही गणपती डेस्कवर बसवण्यास परगानगी मिळत गेली..या अकरा वर्षात अनेक सहकारी आले आणि गेले पण आम्ही आजही ही परंपरा जोपासत आहेत. आपल्या राज्यातून परराज्यात नोकरी करण्यास आलेल्यांना त्यांच्या सण उत्सव परंपरा याचा विसर पडू नये आणि अशा उत्सवाचा आनंदही मिळावा ही त्यामागची भावना..त्यातच महाराष्ट्राबाहेर हा गणेशोत्सव साजरा करण्याची मजा काही औरच आहे. दररोज दोनवेळा आम्ही या गणेशाची विधिवत पूजा करतो..जे सहकारी ईटीव्ही सोडून गेले त्यांना गणशोत्सवाची आठवण झाल्यानंतर त्यांना नक्कीच ईटीव्ही गणेशोत्सव आणि त्याच्याशी त्यांच्या जोडलेल्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. हैदराबादमध्ये काम करणारे अनेक सहकारी हे बॅचलर असल्यामुळे त्यांना होम सिक होऊ नये हासुद्धा त्यामागचा हेतू.. सुरवातीला हैदराबादमधलीच गणपतीची मूर्ती आम्ही घेत असू पण त्यामुर्तीत जी प्रसन्नता हवी ती दिसत नसावी..म्हणून नंतर पेणचा गणपती आणण्यास सुरवात झाली..मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही पर्यावरणाचा विचार करुन इको फ्रेंडली बाप्पाची मुर्ती मुंबईतूनच मागवतो..त्यामुळे आम्ही फक्त बातम्यातूनच पर्यावरणाचा संदेश देऊन थांबत नाही तर आमच्या कृतीतूनही आम्ही तो दाखवतो..हा आमचा बाप्पा सर्वांना आरोग्यमय आयुष्य देवो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना...

Friday, September 2, 2011

सलमानचा हिट बॉडीगार्ड




सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी २० कोटीचा धंदा करुन आत्तापर्यंतेच विक्रम मागे टाकले.. दर शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होतात पण सध्या सलमान त्याचा चित्रपट ईदच्या दिवशीच प्रदर्शित करतो..यापूर्वीचे त्याचे आलेले रेडी आणि दबंगनेही पहिल्याच दिवशी मोठा धंदा केला होता. हे तीनही चित्रपट ईदलाच प्रदर्शित करण्यात आले होते. कदाचित सलमानवर अल्ला जाम खूष असेल किंवा त्याची मन्नत अल्ला मान्य करत असावा..पण सलग तीन चित्रपट हिट देऊन सलमानने त्याच्या टीकाकारांची तोंडं बंद केलीत. आमिर, शाहरुख आणि सलमान हे तीन खान बॉलिवूडमध्ये मोठे स्टार. त्यात शाहरुख सलमानमध्ये ३६ चा आकडा पण आमिर आणि सलमानची चांगलीच जमते..या दोघांचे आतापर्यंत आलेले चित्रपटही हिट झाले. थ्री इटीयट असो किंवा कोणताही चित्रपट त्यांचा पहिल्या दिवसांचा गल्ला जेवढा होता त्याची सर्व रेकॉर्डस सलमानने मोडीत काढलीत.. सलमानच्याच दबंग, रेडी या हिट चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा हे कलेक्शन मोठे आहे..या दोन्ही चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन साडेबारा आणि साडेपंधरा कोटी होते... थ्री इडीयटचे कलेक्शन १७-१८ कोटी होते. त्यामुळे सलमान म्हणजे हिट हे समीकरण सध्या पक्क झालय. सलमान सध्या अमेरिकेत उपचार घेत आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीय. ज्यावेळी चित्रपट रिलीज झाला त्यावेळी सलमान भारतात नव्हता.. पण त्याच्या कामाने त्याने त्याच्या चाहत्यांना ईदची मोठी भेट दिली..आणि अर्थातच सलमानचा चित्रपट डोक्यावर घेऊन प्रेक्षकांनीही त्याला मोठी ईदी दिली असेच म्हणावे लागेल.. सलमान आणि हिट हे समिकरण का व्हावं. मुळात सलमानच्या चित्रपटात मसाला भरपूर असतो..गाणी, ऍक्शनचा भरपूर भरणा असतो यामुळे तो मास अपिल होतो..तर सध्या मार्केटींगचा फंडासुद्धा चित्रपटाच्या यशात महत्वाची भूमिका बजावतो..त्याचाही सलमान पुरेपुर वापर करतो.. त्यातच सलमानच्या यशाचे गमक आहे..या ठिकाणी एक गोष्ट सांगायला हवी की सलमान हा यारों का यार आहे. याचा प्रत्यय त्याने या चित्रपटावेळी पुन्हा दाखवून दिला.. सलमानचा बॉडीगार्ड शेरा हा सलमानचा विश्वासू आहे. शेरा तर सलमानच्या घरातलाच सदस्य झालाय. त्या शेराच्याच हस्ते सलमानने या चित्रपटाचे प्रोमो रिलीज केले..एवढेच नाही तर सलमानला या चित्रपटातील बॉडीगार्डचा युनिफॉर्म आपल्याचा कंपनीचा वापरावा म्हणून काही सुरक्षा संस्थांनी त्याला सात कोटीची ऑफर दिली होती. पण सलमानने त्याला लाथ मारुन त्याचा बॉडीगार्ड शेराच्याच कंपनीचा लोगो वापरला. याला म्हणतात यारों का यार..सलमानच्या चित्रपटाला असेच यश मिळत जावो हीच सलमानला ईदच्या शुभेच्छा..

सभ्य माणसाच्या खेळातील असभ्य प्राणी






इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने भारतीय खेळाडूंना गाढव म्हणून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिलीय. मुळात नासिर हुसेन हे महाभाग इंग्लंडविरुद्ध भारत टी- २० सामन्याचे समालोचक होते. त्यावेळी केविन पिटरसनचा एक झेल पार्थिव पटेलने सोडला..त्यावर काँमेंट्री करताना नासिर महाशहयांचा तोल गेला आणि त्यांनी भारतीय संघात दोन-तीन गाढव खेळाडू असल्याचे म्हटले.. मुळात नासिर महाशयांना हे माहित असायला हवे की त्यांनी सामन्याचे समालोचक म्हणून काम करत असताना काही पथ्ये पाळायला हवी. पण त्यांनी पाळली नाहीत.. भारतीय संघात गाढव असतील नाही तर आणखी कोणतेही प्राणी असतील.. हार जीत ही सामन्यात होत असतेच.. त्यातच भारतीय संघ सध्या फॉर्ममध्ये नाही..त्यामुळे त्यांच्याकडून सुमार दर्जाची कामगिरी झाली. इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतः भारतानं सपाटून मार खाल्ला. त्याची शहानिशा व्हायला हवी..पण समालोचकाने अशी भाषा वापरणे कितपत योग्य आहे..नासिर महाशयाच्या या पराक्रमानंतर त्याचे क्रिकेट जगतात पडसाद उमटणे साहिजक आहे.
अनेक माजी क्रिकेटपटूंनी नासिरची खरडपट्टी काढली तर बीसीसीआयनंही नासिरच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे..कदाचित नासिरला माफी मागावी लागेलही..पण गोऱ्यांचा तोरा मात्र काही जात नाही..मुळात ह्या महाभागाचा जन्म भारतातच चेन्नई शहरात झाला..पण त्याच्या बोलण्यात सभ्यता दिसली नाही..ऑस्ट्रेलियाच्या एका माजी खेळाडूने दक्षिण आफ्रिकेच्या हसिम आमलाचा अतिरेकी असा उल्लेख केला होता तोही समालोचक असताना, त्यानंतर त्याला माफी मागावी तर लागलीय पण ज्या चॅनलसाठी तो काँम्रेंट्री करायचा त्यांनी त्याला हाकलले..हा काही पहिला प्रसंग नाही..गोऱ्या लोकांचा खेळ असलेल्या क्रिकेटवर सध्या आशिया खंडांचे वर्चस्व आहे. त्यातच बीसीसीआय ही सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. आयसीसीवर सुद्धा बीसीसीआयच्याच धोरणांचा प्रभाव असतो..त्याचा अनेक गोऱ्या देशांना प्रंचड राग आहे. त्यांच्या मनातली खदखद अशी अधून मधून बाहेर येत असते. पण सभ्य माणसाच्या खेळात असे असभ्य प्राणी का असावेत नाही का..आणि जर असतील आणि त्यांच्यामुळे क्रिकेट बदनाम होत असले तर त्यांना खड्यासारखे बाहेर काढलेच पाहिजे...

Wednesday, August 31, 2011

पिस्ता हलिम




















हैदराबादची बिर्याणी हे या शहराच्या खाद्य संस्कृतीची ओळख आहे..मुंबई म्हटलं की जसा वडापाव समोर येतो तसं हैदराबाद म्हटलं की बिर्याणी ही आलीच. हैदराबादला कोणी आला आणि त्यानं बिर्याणीची चव चाखली नाही असं होत नाही.याच हैदराबादच्या खाद्य संस्कृतीत आणखी एका पदार्थाची भर पडलीय. ती म्हणजे हलीम..हैदराबादची बिर्याणी जशी लज्जतदार आहे तसच हलीम...हलीम हा फक्त रमजानच्या महिन्यातच मिळतो. हलीम चिकन किंवा मटनपासून बनवला जातो. याची पाककृती मोठी आहे..पण या हलिममध्ये तुप आणि सुकामेव्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. तो बनवायलाही खूप वेळ लागतो. विशेषतः जुन्या हैदराबाद शहरात जर तुम्ही रमजानच्या महिन्यात फेरफटका मारला तर तुम्हाला त्याची खाशियत कळेल..संध्याकाळ झाली रे झाली की हलीमसाठी उड्या पडतात. अनेक छोट्या मोठ्या हॉटेल आणि स्टॉलच्याबाहेर मोठी गर्दी लागलेली असते..पिस्ता हलिम हे हैदराबादच्या हलिमचा मोठा ब्रँड. ह्या ब्रँडचा हलीम अरब देशातही पाठवला जातो. शहरात अनेक छोट्या मोठ्या हॉटेलसह, चौका चौकात तुम्हाला पिस्ता हलिम मिळेल..पण त्याची किंमत थोडी जास्तच म्हणावी लागेल. साधारणपणे ३५० ग्रॅमच्या हलिमची किंमत ८० रुपये एवढी आहे. पण लज्जतदार हलिम खायचा तर खिशाला थोडा भार हा सोसावाच लागेल..शेजारचा हलिमचा फोटो पाहिला तर तुमच्या तोंडाला पाणी आलं नाही असं होणार नाही.. त्यामुळे एखादवेळी८० रुपये मोजायला हरकत नाही..यावर्षी मात्र हलिमची विक्री कमी झालीय. त्याचं कारण म्हणजे रमजान आणि श्रावण एकत्रच आले..श्रावणात बहुसंख्य हिंदू लोक मांसाहार करत नाहीत..कारण हलिम खाण्यात फक्त मुस्लीम बांधव आहेत असं नाही तर हलिम खाणाऱ्यांमध्ये जवळपास ४० टक्के लोक हे हिंदू आहेत आणि कितीही पट्टीचा मांसाहार करणारा असला तरी श्रावण पाळतोच...यापुढे जर हैदराबादला भेट देण्याची विचार झाला आणि रमजानचा महिना असेल तर जरुर एकदा हलिमची चव चाखाच..

Tuesday, August 30, 2011

अण्णा हजारेंवर टीका करणारे महाभाग




अण्णांनी जनलोकपालसाठी केलेल्या आंदोलावर आता टीका करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. केंद्रीय ग्रामिण विकासमंत्री जयराम रमेश यांनी आत्ता अण्णांवर टीका केलीय. काय तर म्हणे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालील एनआयए ही लोकपालवर काम करत होती. तेच विधेयक अण्णांनी जनलोकपाल म्हणून सादर केल्याचा जावई शोध या जयराम रमेश यांनी लावलाय. आता हे रमेश कोण हे सांगायला नको, हे महाशय काँग्रेसचे निष्ठावन. त्यांना दिल्लीच्या राजकारणात फारसं कोणी ओळखत नव्हते. पण पर्यावरण राज्यमंत्रीपदाचा कार्यभार मिळाल्यानंतर या महाशयांनी पर्यावरण बचावचा नारा देत अनेक मोठ्या प्रकल्पांची गोची केली. मोठा गाजावाजा करुन काही प्रकल्पाला स्थगिती दिली. अर्थात त्यात काँग्रेस विरोधी राज्यातील प्रकल्पांचीच संख्या जास्त होती..ओडीशातील पोस्को प्रकल्पाचे उदाहरण देता येईलं.. महाराष्ट्रातील प्रकल्पलाही ह्या महाशयांनी खो घातला. यात लवालाचे नाव घेता येईलं . नवी मंबई विमानतळालाही यांनी पर्यावरणाच्या नियमाखाली आणून परवानगी देण्यास टाळाटाळ केली.. पण शेवटी त्यांना परवानगी द्यावी लागली..पण लवासाचा प्रश्न थोडा वेगळा आहे. तो शरद पवार यांच्याशी निगडीत आहे म्हणून कदाचित त्यांनी लवासावर निर्बंध आणले..पण ह्याच महाशयांनी जैतापूरकडे कानाडोळा केला.. जयराम रमेश यांनी असा विरोधाचा धडाका लावला पण हायकमांडचे हितसंबंध असलेल्या प्रकल्पांना त्यांनी वाट मोकळी करुन दिली..जशी नवी मुंबई विमानतळ आणि जैतापूर..त्यातच भूसंपादन विधेयकही ह्या महाशयांनी राहुल गांधी यांना दाखवून संमत करण्याचा घाट घातला.. रमेश यांची ही पार्श्वभूमी देण्याचे कारण हे की जे विधेयक ते सोनिया गांधी यांच्या एनआयएचे आहे असं म्हणत आहेत. त्याची घटनात्मक वैध्यता काय. तीही एक सिव्हिल सोसायटीच आहे..मग अण्णांच्या सिव्हिल सोसायटीला विरोध का..आणि जर सोनियांकडून हे विधेयक येणार होते तर मग काँग्रेसवाल्यांनी अण्णांनी ते आणले म्हणून विरोध केला काय..शेवटी विधेयक हे महत्वाचे ना..सोनिया काय अण्णा काय, विधेयक कोणीही आणू..तेच विधेयक अण्णांनी आणले असा जर तुमचा दावा आहे तर काँग्रेसवाल्यांनी एवढं आकाश पाताळ एक का केलं..आम्हाला माहित आहे की अशा प्रकारची बाष्पळ बडबड करुन तुम्ही तुमच्या हायकमांची शाबासकी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे..असो..
आता पहा दुसरा विरोधक.. महेश भट्ट असं ह्या महाभागाचं नाव..ह्या महाभागाने अण्णांना हिंदुत्ववादी, गांधीशी तुलना कशाला वैगेरे म्हणून आपली अक्कल पाजळली..ह्या महाभाची अण्णा या विषयावर बोलण्याची लायकी तर आहे का..पण नाही उचलली जीभ लावली टाळ्याला...हा महेश भट्ट नावाचा माणूस कोणत्या तरी अंग्रेजी सिनेमाच्या सीडी पाहतो आणि त्याची नक्कल हिंदीत करतो तो महेश भट्ट.. ह्या महाभागाला अण्णांवर टीका करण्याचा मोह आवरला नाही..पण कमीत कमी टीकेची पातळी तर योग्य असावी..पण मानवी अधिकाराच्या नावाखाली तिस्ता सेटलवाड नावची बाई जो धिंगणा घालत असते तसाच धिंगाणा हा महेश भट्ट धालत असतो..या दोघांची नाळ एकच..हिंदुत्ववादी ठरवून एखाद्याला झोडपण्याचा धंदा मात्र या दोघांचा सारखाच.. वर परत अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा नारा करायला मोकळे...पण तुमच्या अशा बोंबलण्यानं अण्णांचे महत्व कमी होणार नाही..सुर्यावर थुंकल्याने सुर्याला काय फरक पडतो काय.. काय समजले ना खर्जुले महेश भट्ट आणि काँग्रेसचे पाळीव---- जयराम रमेश...

Monday, August 29, 2011

विलासरावांना अण्णांचा हात




विलासराव देशमुख यांनी राज्याच्या राजकारणात मोठा टप्पा गाठलेला आहे. सात वर्षे त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळेली आहे..पण मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्यांच्या राजकीय अस्तित्वाला उतरती लागली.. त्यांचे केंद्रात पुनर्वसन झाले पण ते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. सुरुवातीला मिळालेले अवजड उद्योग मंत्रालय फारसे महत्वाचे खाते नव्हते पण नंतर त्यांना ग्रामिण विकास मंत्रालय हे महत्वाचे खाते मिळाले पण काही करुन दाखवण्याच्या आतच ते काढून घेण्यात आले. त्यामानाने कमी महत्वाचे विज्ञान तंत्रज्ञान खाते देण्यात आले. विलासराव त्यावर नाराज असले तरी त्यांनी0 त्याची फारशी वाच्यता केली नाही. काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या विलासरावांनी नेहमीप्रमाणे सबुरीने घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना योग्य संधी मिळाली ती अण्णांच्या आंदोलनामुळे..सुरुवातीला जेंव्हा अण्णांनी दिल्लीत आंदोलनाचा बार उडवला तेव्हा दिल्लीत महाराष्ट्रातल्या कोणत्याच नेत्याना काडीचीही किंमत देण्यात आली नाही.. अण्णांशी वाटाघा़टी करण्यासाठी कपील सिब्बल, चिदंबरम या मंडळींना जबाबदारी दिली. ना विलासराव ना सुशिलकुमार. त्यानंतर अण्णांनी १६ ऑगस्टच्या उपोषणाची घोषणा केली तेव्हा काँग्रेस नेत्यांनी ते हाणून पाडण्याचाच प्रयत्न केला. पण अण्णांच्या निर्धार आणि त्यांचा अंदाजच काँग्रेसला आला नाही..त्यामुळे सुरवातीला दबावतंत्र त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन झाले पण अण्णा त्यांना बधले नाहीत. शेवटी त्यांना अटक केली. पण अण्णा मागे हटले नाहीत तर सरकारचीच छी थु झाली..तिहारमधून उपोषण करुन अण्णांनी सरकारची कोंडी केली. शेवटी रामलीला मैदान सरकारला द्यावं लागलं..
कपिल सिब्बल चिदंबरम या मंडळींना अण्णा प्रकरण हाताळता आले नाही. त्यामुळे सरकार आणि काँग्रेसची पुरती अब्रु केली. त्यातच अण्णांच्या अटेकमुळे त्यांच्याबद्दलची सहानुभुतीही वाढली. त्यांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद पाहून तर सरकारची आणि टीका करण्याऱ्यांची बोलतीच बंद झाली..जबाबदारी शेवटी विलासरावांकडे आली..ज्या संधीची विलासराव वाट पाहत होते ती त्यांच्याकडे चालून आली. त्यांनी थेट अण्णांशी चर्चा केली. सरकार आणि अण्णा यांच्यात मध्यस्थी करुन हे प्रकरण सोडण्यात विलासरावांना यश आलं. पंतप्रधानांचे दूत म्हणूनही तेच गेले आणि अण्णांनी उपोषण सोडले. अण्णांनी उपोषण सोडल्यामुळे सरकार आणि काँग्रेसचीही सुटका झाली..हा तिढा सोडवण्यात विलासरावांची भूमिका महत्वाची ठरली त्यामुळे दिल्लीत आता त्यांचे राजकीय वजन वाढले आहे त्याचा राजकीय वाटचालीत त्यांना फायदा होईल यात शंका नाहीच..