Tuesday, September 13, 2011

माझं शहर- सोलापूर
सोलापूर हा माझा जिल्हा, याच शहरात माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं, त्यानंतर छोट्या मोठ्या नोकरीसाठीही याच शहरानं मला हात दिला. आमचे सहकारीही ग्रामिण भागातूनच आलेले असल्याने दयानंद कॉलेज हे ग्रामिण भागातल्या विद्यार्थ्यांचे माहेरघरच..त्यामुळे तिथंच शिक्षण पूर्ण केलं. सायकल हेच सर्वांचं प्रवासाचं साधन. आमच्या ग्रुपमधलेही सर्वजण ग्रामिण भागातलेच. त्यावेळी आमचे प्राध्यापक सोलापूरचा उल्लेख हे शहर म्हणून न करता एक मोठं खेडं असाच करायचे...त्यावेळी या मोठ्या खेड्यात राहताना फारसा त्रास जाणवला नाही किंवा तेवढी प्रगल्भताही आमच्यात नसावी..पण नुकतच मी सोलापूरला जाऊन आलो..शहराची लोकसंख्या वाढलेली आहे. शहराचा आकार वाढलाय. सर्वच बाजूंनी शहर पसरलय. पुण्या मुंबईतली काही बिल्डरमंडळीही आता सोलापूरकडे वळलीत. तिथली जागा संपलीय. म्हणून त्यांना आता सोलापूर शहर त्यांच्या व्यवसायासाठी फायद्याचं ठरतय. कारण दोन तीन वर्षापूर्वी सोलापूरात ज्या जागेचा भाव हजार बाराशे रुपये होता, त्याचा भाव तीन हजारांच्यापुढे गेलाय. फ्लॅट संस्कृतीसुद्धा सोलापूरात फारशी रुजलेली नव्हती..पण या नव्या बिल्डर आक्रमणामुळे फ्लॅट संस्कृतीही वाढू लागलीय. विजापूर रोडवर आयटीआय नेहरुनगर म्हटलं कि जायला नको वाटायचं तर मजरेवाडी म्हटलं की सोलापूरचं दुसरं टोक वाटायचं..पुणे रोडवर तर बाळे गाव वगळलं तर फारसा विस्तार झालाच नव्हता..पण आत्ता याच महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या जागा मोठ्या मंडळींनी विकत घेतलेल्या आहेत..सोलापूर विद्यापीठ झाले. त्याच्या शेजारीच आता नवले सरांची सिंहगड संस्था आलीय. एमआयटीने जागा घेतलीय. दंतविद्यालय आहे. केगावच्याजवळच अभियांत्रिकी महाविद्यालय झालय. त्यातच काही वाहनांच्या कंपनींची मोठी शोरुम्स थाटलेली आहेत..ही यादी लांबतच जाणाराय..याच रस्त्यावर एका पुणेकर बिल्डरनं आपला प्रकल्प थाटलाय. तर जुन्या मिलच्या जागेवर भव्य व्यापारी संकुल साकारलं जातय...एवढा पसारा वाढत आहे..पण पायाभूत सुविधांच्या नावानं मात्र बोंबाबोंब आहे.. जुळे सोलापूर नावानं जो भाग विकसित झालाय. तिथं पिण्याच्या पाण्याची समस्या आहे हे वारंवार दिसून आलय. या भागात महापालिकेच्या ड्रेनेजची सोय नाही पण मागची दोन तीन वर्षे युवजर चार्जेसच्या नावाखाली महापालिकेनं सातशे रुपयाप्रमाणे लोकांकडून कर उकळला..आता निवडणुकीच्यातोंडावर तो रद्द करण्यात आलाय. शहरातले दोन तीन मुख्य रस्ते वगळता रस्त्यांची पूरती वाट लागलेली आहे..वाहन चालवताना कसरत नाही तर सर्कस करावी लागतेय. याची कमी की काय म्हणून रस्त्यात मोकाट जनावरं आपला संसार थाटून बसलेली असतात..गवळ्यांच्या म्हशी तर कधी तुम्हाला आडव्या येतील सांगता येत नाही..ह्या म्हशी कदाचित आमच्या सुशिलकुमार शिंदे किंवा शहराच्या दौऱ्यावर येणाऱ्या व्हि व्हीआयपींच्या गाड्यांच्या ताफ्याकडे येत नसाव्यात किंवा त्यांच्या बंदोबस्ताला आहेत असं तर त्यांना कुणीतरी सांगितलेलं असावं..कारण यापैकी कोणत्या म्हशीनं त्यांच्या गाडीचा ताफा अडवलेला नाही आणि मोकाट जनावरांची तर त्यांचा सवयच झाली असावी..त्यामुळे या सत्ताधारी मंडळींचं त्याकडे दुर्लक्ष होत असावं. कोणत्याही शहरात असा मोकाटपणा दिसत नाही.. दिसलाच तर पालिका त्याचा बंदोबस्त करते..आमच्या याच सोलापूरची आणखी एक खासियत म्हणजे पोस्टर्स...शहरातला एकही रस्ता नसावा जिथं पोस्टर नाही..ही पोस्टर्स नव्या नेत्यांची असल्याचं दिसतं म्हणजे उगवते तारेच...पोस्टरवरुन तरी ती कोणत्यातरी पक्षाची किंवा संघटनेची नेतेगिरी करत असावीत असंच दिसतय. त्यातल्या काही पोस्टरवर नजर टाकली तर मिसरुड न फुटलेली पोरं ठोरं कोणतंतरी मोठं सामाजिक कार्य केल्याचा आव आणताना दिसतात....त्यावरचा फोटो तर स्टाईलबाजच हवा..वरुन टोपण नावं हवंच..कारण आबा, दादा, अण्णा, महाराज, राजे, असं काहीतरी नाव असल्याशिवाय फोटोलाही वजन येत नसावं..अशा पोस्टर्सची संख्या महापालिकेला तरी मोजता येते का असा प्रश्न पडतो एवढी पोस्टर्स आहेत..आता पोस्टर हा शहरातला प्रकार वगळता बाकी सर्व मात्र एखाद्या गावाला शोभावं असचं आहे. हे सांगायचा माझा उद्देश एवढाच आहे की आम्हाला कॉलेजला असताना आमच्या प्राध्यापकांनी जे सांगितलं होतं त्यात आज पंधरा- सोळा वर्षानंतरही फारसा फरक पडलेला दिसत नाही..आपलं शहर, आपलं गाव स्वच्छ असावं, त्याची प्रगती व्हाही हे सर्वांनाच वाटतं. ते नावारुपाला यावं अशीच माझी आणि सोलापूरशी संबंधित असलेल्या सर्वांची इच्छा आहे..

No comments:

Post a Comment