Tuesday, September 13, 2011

माझं शहर- सोलापूर
सोलापूर हा माझा जिल्हा, याच शहरात माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं, त्यानंतर छोट्या मोठ्या नोकरीसाठीही याच शहरानं मला हात दिला. आमचे सहकारीही ग्रामिण भागातूनच आलेले असल्याने दयानंद कॉलेज हे ग्रामिण भागातल्या विद्यार्थ्यांचे माहेरघरच..त्यामुळे तिथंच शिक्षण पूर्ण केलं. सायकल हेच सर्वांचं प्रवासाचं साधन. आमच्या ग्रुपमधलेही सर्वजण ग्रामिण भागातलेच. त्यावेळी आमचे प्राध्यापक सोलापूरचा उल्लेख हे शहर म्हणून न करता एक मोठं खेडं असाच करायचे...त्यावेळी या मोठ्या खेड्यात राहताना फारसा त्रास जाणवला नाही किंवा तेवढी प्रगल्भताही आमच्यात नसावी..पण नुकतच मी सोलापूरला जाऊन आलो..शहराची लोकसंख्या वाढलेली आहे. शहराचा आकार वाढलाय. सर्वच बाजूंनी शहर पसरलय. पुण्या मुंबईतली काही बिल्डरमंडळीही आता सोलापूरकडे वळलीत. तिथली जागा संपलीय. म्हणून त्यांना आता सोलापूर शहर त्यांच्या व्यवसायासाठी फायद्याचं ठरतय. कारण दोन तीन वर्षापूर्वी सोलापूरात ज्या जागेचा भाव हजार बाराशे रुपये होता, त्याचा भाव तीन हजारांच्यापुढे गेलाय. फ्लॅट संस्कृतीसुद्धा सोलापूरात फारशी रुजलेली नव्हती..पण या नव्या बिल्डर आक्रमणामुळे फ्लॅट संस्कृतीही वाढू लागलीय. विजापूर रोडवर आयटीआय नेहरुनगर म्हटलं कि जायला नको वाटायचं तर मजरेवाडी म्हटलं की सोलापूरचं दुसरं टोक वाटायचं..पुणे रोडवर तर बाळे गाव वगळलं तर फारसा विस्तार झालाच नव्हता..पण आत्ता याच महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या जागा मोठ्या मंडळींनी विकत घेतलेल्या आहेत..सोलापूर विद्यापीठ झाले. त्याच्या शेजारीच आता नवले सरांची सिंहगड संस्था आलीय. एमआयटीने जागा घेतलीय. दंतविद्यालय आहे. केगावच्याजवळच अभियांत्रिकी महाविद्यालय झालय. त्यातच काही वाहनांच्या कंपनींची मोठी शोरुम्स थाटलेली आहेत..ही यादी लांबतच जाणाराय..याच रस्त्यावर एका पुणेकर बिल्डरनं आपला प्रकल्प थाटलाय. तर जुन्या मिलच्या जागेवर भव्य व्यापारी संकुल साकारलं जातय...एवढा पसारा वाढत आहे..पण पायाभूत सुविधांच्या नावानं मात्र बोंबाबोंब आहे.. जुळे सोलापूर नावानं जो भाग विकसित झालाय. तिथं पिण्याच्या पाण्याची समस्या आहे हे वारंवार दिसून आलय. या भागात महापालिकेच्या ड्रेनेजची सोय नाही पण मागची दोन तीन वर्षे युवजर चार्जेसच्या नावाखाली महापालिकेनं सातशे रुपयाप्रमाणे लोकांकडून कर उकळला..आता निवडणुकीच्यातोंडावर तो रद्द करण्यात आलाय. शहरातले दोन तीन मुख्य रस्ते वगळता रस्त्यांची पूरती वाट लागलेली आहे..वाहन चालवताना कसरत नाही तर सर्कस करावी लागतेय. याची कमी की काय म्हणून रस्त्यात मोकाट जनावरं आपला संसार थाटून बसलेली असतात..गवळ्यांच्या म्हशी तर कधी तुम्हाला आडव्या येतील सांगता येत नाही..ह्या म्हशी कदाचित आमच्या सुशिलकुमार शिंदे किंवा शहराच्या दौऱ्यावर येणाऱ्या व्हि व्हीआयपींच्या गाड्यांच्या ताफ्याकडे येत नसाव्यात किंवा त्यांच्या बंदोबस्ताला आहेत असं तर त्यांना कुणीतरी सांगितलेलं असावं..कारण यापैकी कोणत्या म्हशीनं त्यांच्या गाडीचा ताफा अडवलेला नाही आणि मोकाट जनावरांची तर त्यांचा सवयच झाली असावी..त्यामुळे या सत्ताधारी मंडळींचं त्याकडे दुर्लक्ष होत असावं. कोणत्याही शहरात असा मोकाटपणा दिसत नाही.. दिसलाच तर पालिका त्याचा बंदोबस्त करते..आमच्या याच सोलापूरची आणखी एक खासियत म्हणजे पोस्टर्स...शहरातला एकही रस्ता नसावा जिथं पोस्टर नाही..ही पोस्टर्स नव्या नेत्यांची असल्याचं दिसतं म्हणजे उगवते तारेच...पोस्टरवरुन तरी ती कोणत्यातरी पक्षाची किंवा संघटनेची नेतेगिरी करत असावीत असंच दिसतय. त्यातल्या काही पोस्टरवर नजर टाकली तर मिसरुड न फुटलेली पोरं ठोरं कोणतंतरी मोठं सामाजिक कार्य केल्याचा आव आणताना दिसतात....त्यावरचा फोटो तर स्टाईलबाजच हवा..वरुन टोपण नावं हवंच..कारण आबा, दादा, अण्णा, महाराज, राजे, असं काहीतरी नाव असल्याशिवाय फोटोलाही वजन येत नसावं..अशा पोस्टर्सची संख्या महापालिकेला तरी मोजता येते का असा प्रश्न पडतो एवढी पोस्टर्स आहेत..आता पोस्टर हा शहरातला प्रकार वगळता बाकी सर्व मात्र एखाद्या गावाला शोभावं असचं आहे. हे सांगायचा माझा उद्देश एवढाच आहे की आम्हाला कॉलेजला असताना आमच्या प्राध्यापकांनी जे सांगितलं होतं त्यात आज पंधरा- सोळा वर्षानंतरही फारसा फरक पडलेला दिसत नाही..आपलं शहर, आपलं गाव स्वच्छ असावं, त्याची प्रगती व्हाही हे सर्वांनाच वाटतं. ते नावारुपाला यावं अशीच माझी आणि सोलापूरशी संबंधित असलेल्या सर्वांची इच्छा आहे..

Saturday, September 3, 2011

ईटीव्ही गणेशोत्सव मंडळ
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही ईटीव्ही मराठीच्या हैदाराबदच्या डेस्कवर गणपती बाप्पांची स्थापना केली. मागच्या अकरा वर्षापासून आम्ही ही परंपरा जोपासत आलो आहोत. ईटीव्ही मराठीला सुद्धा मागच्या महिन्यात अकरा वर्ष पूर्ण झाली. पहिल्या गणपतीची स्थापना करताना व्यवस्थापनाच्या कडक नियमांचा नाही म्हटले तरी फटका बसलाच होता..कारण इतर भाषीक लोकही त्यांचे सण असेच कार्यालयात साजरे करायला लागले तर काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण त्यातून शेवटी निर्णय झाला. वरच्या पातळीवरुनही गणपती डेस्कवर बसवण्यास परगानगी मिळत गेली..या अकरा वर्षात अनेक सहकारी आले आणि गेले पण आम्ही आजही ही परंपरा जोपासत आहेत. आपल्या राज्यातून परराज्यात नोकरी करण्यास आलेल्यांना त्यांच्या सण उत्सव परंपरा याचा विसर पडू नये आणि अशा उत्सवाचा आनंदही मिळावा ही त्यामागची भावना..त्यातच महाराष्ट्राबाहेर हा गणेशोत्सव साजरा करण्याची मजा काही औरच आहे. दररोज दोनवेळा आम्ही या गणेशाची विधिवत पूजा करतो..जे सहकारी ईटीव्ही सोडून गेले त्यांना गणशोत्सवाची आठवण झाल्यानंतर त्यांना नक्कीच ईटीव्ही गणेशोत्सव आणि त्याच्याशी त्यांच्या जोडलेल्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. हैदराबादमध्ये काम करणारे अनेक सहकारी हे बॅचलर असल्यामुळे त्यांना होम सिक होऊ नये हासुद्धा त्यामागचा हेतू.. सुरवातीला हैदराबादमधलीच गणपतीची मूर्ती आम्ही घेत असू पण त्यामुर्तीत जी प्रसन्नता हवी ती दिसत नसावी..म्हणून नंतर पेणचा गणपती आणण्यास सुरवात झाली..मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही पर्यावरणाचा विचार करुन इको फ्रेंडली बाप्पाची मुर्ती मुंबईतूनच मागवतो..त्यामुळे आम्ही फक्त बातम्यातूनच पर्यावरणाचा संदेश देऊन थांबत नाही तर आमच्या कृतीतूनही आम्ही तो दाखवतो..हा आमचा बाप्पा सर्वांना आरोग्यमय आयुष्य देवो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना...

Friday, September 2, 2011

सलमानचा हिट बॉडीगार्ड
सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी २० कोटीचा धंदा करुन आत्तापर्यंतेच विक्रम मागे टाकले.. दर शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होतात पण सध्या सलमान त्याचा चित्रपट ईदच्या दिवशीच प्रदर्शित करतो..यापूर्वीचे त्याचे आलेले रेडी आणि दबंगनेही पहिल्याच दिवशी मोठा धंदा केला होता. हे तीनही चित्रपट ईदलाच प्रदर्शित करण्यात आले होते. कदाचित सलमानवर अल्ला जाम खूष असेल किंवा त्याची मन्नत अल्ला मान्य करत असावा..पण सलग तीन चित्रपट हिट देऊन सलमानने त्याच्या टीकाकारांची तोंडं बंद केलीत. आमिर, शाहरुख आणि सलमान हे तीन खान बॉलिवूडमध्ये मोठे स्टार. त्यात शाहरुख सलमानमध्ये ३६ चा आकडा पण आमिर आणि सलमानची चांगलीच जमते..या दोघांचे आतापर्यंत आलेले चित्रपटही हिट झाले. थ्री इटीयट असो किंवा कोणताही चित्रपट त्यांचा पहिल्या दिवसांचा गल्ला जेवढा होता त्याची सर्व रेकॉर्डस सलमानने मोडीत काढलीत.. सलमानच्याच दबंग, रेडी या हिट चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा हे कलेक्शन मोठे आहे..या दोन्ही चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन साडेबारा आणि साडेपंधरा कोटी होते... थ्री इडीयटचे कलेक्शन १७-१८ कोटी होते. त्यामुळे सलमान म्हणजे हिट हे समीकरण सध्या पक्क झालय. सलमान सध्या अमेरिकेत उपचार घेत आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीय. ज्यावेळी चित्रपट रिलीज झाला त्यावेळी सलमान भारतात नव्हता.. पण त्याच्या कामाने त्याने त्याच्या चाहत्यांना ईदची मोठी भेट दिली..आणि अर्थातच सलमानचा चित्रपट डोक्यावर घेऊन प्रेक्षकांनीही त्याला मोठी ईदी दिली असेच म्हणावे लागेल.. सलमान आणि हिट हे समिकरण का व्हावं. मुळात सलमानच्या चित्रपटात मसाला भरपूर असतो..गाणी, ऍक्शनचा भरपूर भरणा असतो यामुळे तो मास अपिल होतो..तर सध्या मार्केटींगचा फंडासुद्धा चित्रपटाच्या यशात महत्वाची भूमिका बजावतो..त्याचाही सलमान पुरेपुर वापर करतो.. त्यातच सलमानच्या यशाचे गमक आहे..या ठिकाणी एक गोष्ट सांगायला हवी की सलमान हा यारों का यार आहे. याचा प्रत्यय त्याने या चित्रपटावेळी पुन्हा दाखवून दिला.. सलमानचा बॉडीगार्ड शेरा हा सलमानचा विश्वासू आहे. शेरा तर सलमानच्या घरातलाच सदस्य झालाय. त्या शेराच्याच हस्ते सलमानने या चित्रपटाचे प्रोमो रिलीज केले..एवढेच नाही तर सलमानला या चित्रपटातील बॉडीगार्डचा युनिफॉर्म आपल्याचा कंपनीचा वापरावा म्हणून काही सुरक्षा संस्थांनी त्याला सात कोटीची ऑफर दिली होती. पण सलमानने त्याला लाथ मारुन त्याचा बॉडीगार्ड शेराच्याच कंपनीचा लोगो वापरला. याला म्हणतात यारों का यार..सलमानच्या चित्रपटाला असेच यश मिळत जावो हीच सलमानला ईदच्या शुभेच्छा..

सभ्य माणसाच्या खेळातील असभ्य प्राणी


इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने भारतीय खेळाडूंना गाढव म्हणून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिलीय. मुळात नासिर हुसेन हे महाभाग इंग्लंडविरुद्ध भारत टी- २० सामन्याचे समालोचक होते. त्यावेळी केविन पिटरसनचा एक झेल पार्थिव पटेलने सोडला..त्यावर काँमेंट्री करताना नासिर महाशहयांचा तोल गेला आणि त्यांनी भारतीय संघात दोन-तीन गाढव खेळाडू असल्याचे म्हटले.. मुळात नासिर महाशयांना हे माहित असायला हवे की त्यांनी सामन्याचे समालोचक म्हणून काम करत असताना काही पथ्ये पाळायला हवी. पण त्यांनी पाळली नाहीत.. भारतीय संघात गाढव असतील नाही तर आणखी कोणतेही प्राणी असतील.. हार जीत ही सामन्यात होत असतेच.. त्यातच भारतीय संघ सध्या फॉर्ममध्ये नाही..त्यामुळे त्यांच्याकडून सुमार दर्जाची कामगिरी झाली. इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतः भारतानं सपाटून मार खाल्ला. त्याची शहानिशा व्हायला हवी..पण समालोचकाने अशी भाषा वापरणे कितपत योग्य आहे..नासिर महाशयाच्या या पराक्रमानंतर त्याचे क्रिकेट जगतात पडसाद उमटणे साहिजक आहे.
अनेक माजी क्रिकेटपटूंनी नासिरची खरडपट्टी काढली तर बीसीसीआयनंही नासिरच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे..कदाचित नासिरला माफी मागावी लागेलही..पण गोऱ्यांचा तोरा मात्र काही जात नाही..मुळात ह्या महाभागाचा जन्म भारतातच चेन्नई शहरात झाला..पण त्याच्या बोलण्यात सभ्यता दिसली नाही..ऑस्ट्रेलियाच्या एका माजी खेळाडूने दक्षिण आफ्रिकेच्या हसिम आमलाचा अतिरेकी असा उल्लेख केला होता तोही समालोचक असताना, त्यानंतर त्याला माफी मागावी तर लागलीय पण ज्या चॅनलसाठी तो काँम्रेंट्री करायचा त्यांनी त्याला हाकलले..हा काही पहिला प्रसंग नाही..गोऱ्या लोकांचा खेळ असलेल्या क्रिकेटवर सध्या आशिया खंडांचे वर्चस्व आहे. त्यातच बीसीसीआय ही सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. आयसीसीवर सुद्धा बीसीसीआयच्याच धोरणांचा प्रभाव असतो..त्याचा अनेक गोऱ्या देशांना प्रंचड राग आहे. त्यांच्या मनातली खदखद अशी अधून मधून बाहेर येत असते. पण सभ्य माणसाच्या खेळात असे असभ्य प्राणी का असावेत नाही का..आणि जर असतील आणि त्यांच्यामुळे क्रिकेट बदनाम होत असले तर त्यांना खड्यासारखे बाहेर काढलेच पाहिजे...