Sunday, December 18, 2011

मिसळ पाव आणि बरच काही....

मी मागच्या काही ब्लॉममध्ये विशेष मेनूवर भर दिला होता॥आज सर्वांच्या परिचयाचा आणि सर्वांनी ज्याची चव चाखलीय अशा मिसळ किंवा मिसळ पाव म्हणा, त्यावर थोडंसं लिहणाराय...पदार्थ छोटा, खाणं जेमतेम पण चव म्हणाल तर चटपटीत...आणि लज्जतदार...चला तर मग मिसळ पावबद्दल बोलूया...म्हणजे लिहूया....

मिसळ खाल्ली नाही असा माणूस शोधून सापडणार नाही...महाराष्ट्रातील गावातला माणूस असो की शहरातला, त्यानं मिसळची चव चाखली नाही असं म्हणता येणार नाही..गावातलं छोटं टपरी वजा हॉटेल असो वा आठवडी बाजारातल्या भेळवाल्याजवळची भेळ-मिसळ असो..आपण लहानपणापासून या मिसळबरोबर एवढे परिचित आहोत... त्यामुळे या मिसळची चव सर्वांनीच चाखलेली आहे.. खरं तर मिसळ हा गरिबांचा मेवाच..पण शहरात त्याला आता जास्तच भाव आलाय...एक दोन रुपयात मिळणारी गाड्यावरची ही मिसळही आता फारच भाव खाऊ लागलीय. आता कमीत कमी दहा रुपये तरी मोजावेच लागतात..अनेक ठिकाणी या मिसळचं, मिसळ पाव, सुकी मिसळ, ओली मिसळ, त्यात पुन्हा पुणेरी मिसळ, कोल्हापूरी मिसळ असे अनेक प्रकार आलेत..पण काही का असेना मिसळ पाव खाण्यात एक भलतीच मजा आहे..
खरं तर मिसळ काय किंवा मिसळ पाव काय हा साधा चुरमुरे, शेव, कांदा, कोथिंबीर थोडीशी भिजलेली मटकी वगैरेंचा एकत्र पदार्थ..ह्या सगळ्या पदार्थांना एखाद्या मसाल्यानं एकजीव केल्यामुळंच कदाचित त्याला मिसळ नाव पडलं असावं असं मला वाटतं...तर मिसळबरोबर पाव देण्याचा प्रघातही आहे.. काही ठिकाणी मिसळपाव बरोबर रस्साही दिला जातो.. मिसळ पाववर गरमागरम तर्रीचा रस्सा पडला कि खाताना जी मज्जा येते ती सांगण्यापेक्षा अनुभव घेणंच महत्वाचं.. सध्या अनेक शहरातले कोपरे म्हणजे चौपाट्याच म्हणा की गर्दीनं फुललेल्या असतात..त्यात मिसळ पाववर एक हात साफ करणाऱ्यांची संख्या जास्त आहे...
मी सुद्धा लहानपणापासून मिसळचा चाहता आहे...आठवी नववीला असताना मी गावातून तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेलो की हमखास मिसळ खायचोच...अर्थात कधी कधी मिरची भज्जी, कांदा भज्जी, बटाटा वडा यावरही हात साफ व्हायचा पण जेमतेम पैसे असल्यामुळे थोडक्यात आटपायला लागायचं....मिसळ पावसाठी एवढा तो काय खर्च... आता तो चिल्लर खर्च वाटतो..पण पैसे कमावत नव्हतो तेंव्हा दोन रुपयाची मिसळ खायचेही वांदे असायचे.. असो पण थोड्या पैशात आत्ताही मिसळ पाववर ताव मारतो येतो...मी कोल्हापूरात गेलो तेव्हा कोल्हापूरी मिसळ पाववर हात साफ केलाच...पुण्यातही पुणेरी मिसळ...सोलापूरातही ओली-सुकी मिसळ खाण्याचा मोह आवरत नाही...
मिसळ पावच्या भोवती अनेकांच्या काही आठवणी जोडलेल्या आहेत...कॉलेजच्या दिवसातील असतील किंवा नोकरीला लागल्यानंतरच्या असतील...मिसळ पावच्या निमित्तानं त्या आठवून बघाव्या... कोठे ना कोठे तरी मनाला हळूवार स्पर्श करुन जाणाऱ्या त्या घटना, किस्से तुम्हाला पुन्हा मिसळ पावची चव वाढवायला मदत करतील....आणि एखादी मनाला हळूवार मयुरपंखी स्पर्श करुन गेलेली घटना आठवलीच तर जावा की राव मिसळ पाववर ताव मारा आणि थोडा वेळ आठवणींच्या विश्वात रमा की.....

3 comments:

  1. nice blog...special misal pav is Maharashtra's very special lusty dish..

    ReplyDelete
  2. कॉलेज दिवसातली किवा बेकार असतानाची आठवण तर मस्तच आहे. आम्ही ३-४ मित्र मिळून मिसळची एक प्लेट घ्यायचो. तर्री फुकट असतेच. मग आमचे बिल म्हणजे १ मिसळ आणि २५-३० पाव असे. शिवाय हॉटेल वाला पण काही म्हणार नाही, रोजचीच पोरे. आता सगळी पांगापांग झालेली. कधी मधी जातो मिसळची आठवण झाली कि, पण सगळेच सोबत असतो अशातला भाग नाही.

    ReplyDelete
  3. Thanks a lot..remembering those days which smiles ..

    ReplyDelete