Friday, April 6, 2012

सकाळचा नाष्टा- सांबर इडली

मागच्या अनेक दिवासापासून खाद्यपदार्थांवर काहीतरी लिहावं असं वाटत होतं. माझ्या मित्रांनीही मला काही विशेष भागातल्या मेनूबद्दल लिहण्याची विनंती केली होती. पण कोणत्या पदार्थावर लिहावं याचा विचार करत होतो. अनेक पदार्थ डोळ्यासमोरुन जात होते. आणि त्या पदार्थांची जशी आठवण होत होती तशी जिभ गप्प बसत नव्हती. काही पदार्थांचं नाव घेतलं तरी लाळ टपकायला सुरुवात होते..त्या सर्व पदार्थांबद्दल लिहण्याचा माझा प्रयत्न आहे..पण आज नेहमीच्याच एका पदार्थावर लिहण्याचा विचार केला..काल सकाळीच एका हॉटेलमध्ये इडली सांबरवर ताव मारला. मस्त मजा आली..मग म्हटलं इटली सांबर किंवा वडा सांबरवरच लिहूयात की..
इडली सांबर

हैदराबादमध्ये असल्यामुळे सकाळच्या नाष्ट्यात काय खायचं हा प्रश्न फारसा सतावत नाही..हॉटेलमधे नाष्टा करायचा तर कुठंही जा..इडली, वडा, उथ्थपा, दोसा आपली वाटच बघत असतात. त्यामुळे निवडीला तसा फारसा वावच नसतो..अगदी छोट्याशा टपरीपासून मोठ्या स्टार रेस्टॉरंटमध्ये जा हेच पदार्थ आपली वाट पहात असतात.. बाकी आपल्याकडे नाष्टा म्हटलं तरी काय खाऊ एवढे पदार्थ निवडीसाठी समोर येतात..पण हैदराबाद काय आणि एकूणच दक्षिण भारत काय..आपल्याला याच पदार्थांतून निवड करावी लागते..मागच्या अनेक वर्षांपासून हैदराबादमध्ये असल्यामुळे मलाही आता त्याची सवय झालीय. पण मी दोसा किंवा उथ्थपा यापेक्षा इडली सांबर, सांबर इडली किंवा वडा सांबर आणि सांबर इडली यालाच पहिली पसंती देतो..मला ते आवडतात. डोसा आवडत नाही असं नाही पण एकूण मसालेदार पदार्थ किंवा इतर चव चाखण्यापेक्षा इडली किंवा वडा फारच उत्तम..! शिवाय त्यासाठी वाट पहात बसावी लागत नाही. नाहीतर डोसा उथ्थपा खायचा म्हटलं तर गर्दीच्या हॉटेलमध्ये तर वेंटीग करावचं लागतं..! भले ती सकाळची वेळ असली तरीही...आणि ऑर्डर दिल्यानंतर नाष्टा लवकर नाही आला तर नाष्ट्याचा मूडही कमी होत जातो. त्यापेक्षा इडलीच बरी..! त्याशिवाय मला इडली ही सोलापूरला असल्यापासूनच आवडते..त्याबरोबर मिळणारी चटणी आणि सांबर तर विचारूच नका..

सांबर इडली

सोलापूरात असतानाही नाष्ट्याला इडलीची ऑर्डर आवर्जून द्यायचो..आमच्या सोलापूरातही काही हॉटेल्समध्ये इडलीबरोबरची चटणी आणि सांबर मस्तच मिळतं...! मी तर इडली म्हटलं की त्याबरोबर दोन वाट्या गरम सांबर तर ओरपायचोच..मस्त वाटायचं.. आहाहाहाहा...!!! खरं तर इटलीबरोबरच सांबर आणि चटणी जर झकास असेल तर मग काय विचारायलाच नको..! त्यामुळे पहिली पसंती इडली सांबरच...! सांबर इडली हा प्रकारही त्यातलाच.. मोठ्या कटो-यात दोन तीन इडल्या आणि त्यावर गरमा गरम सांबर..! अगदी त्या सांबरमध्ये इडली मनसोक्त डुबलेली असते.. सांबरमध्ये डुबलेल्या इडलीचा एक गरम बाईट घेत त्याबरोबर चटणीची चव चाखली की आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडतात..व्वा ! मस्त रे...!!!

इडलीबरोबरच वडा किंवा वडा-सांबर हा दुसरा पदार्थ नाष्ट्याला घ्यायला काहीच हरकत नाही..मला स्वतःला वडा फारसा आवडत नाही..पण सांबर- वडा मिळाला तर मात्र नाही म्हणायला होतच नाही..वाटतं एक प्लेट ट्राय करुयातच.. मग काय, दे रे एक प्लेट सांबर वडा, म्हणून ऑर्डर दिलीच म्हणून समजा...सांबरमध्ये डुंबलेला तो वडा आणि मस्त लालसर रंग आलेलं सांबर पाहताच तोंडाला पाणी सुटतं..मग तीन चार मिनटातच झाली की प्लेट फस्त...! खरं तर इडली काय आणि वडा काय माझा यातला विक पाँईट आहे तो म्हणजे सांबर...आणि त्याबरोबर मिळणारी चटणी..! ज्या हॉटेलमध्ये सांबर आणि चटणी उत्तम तिथल्या सांबर इडलीवर हात साफ केलाच म्हणून समजा...
सांबर वडा

इडली आणि वडा हे दोन्ही पदार्थ पचायला फारसे अवघड नाहीत..त्यातच ते मिळतातही सगळीकडे..आता हैदराबादच कशाला आपल्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शहरातून चौका चौकात इडली सांबर, वडा सांबर, उथ्थपा, दोसा मिळतोच की..आणि त्यात जर हे हॉटेल साऊथ इंडियन मालकाचं असेल तर खुशाल जा आणि सकाळी सकाळी गरम सांबरबरोबर वडा किंवा इडलीवर हात साफ करून बघा..! मस्त मज्जा येईलं..! मग होऊन जाऊयात सांबर इडली...

1 comment:

  1. chhan lekh ! mala pan idali sambar aani chatni garam garm khupach aavadate,

    ReplyDelete