Friday, July 25, 2014

नारायण राणेंचं बंड- हार की प्रहार ?


"नारायण राणेंची जडणघडणच बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत झालेली...त्यामुळं आक्रमकपण त्यांच्या अंगात ठायीठायी भरलेला आहे..ते शिवसेनेत असो वा काँग्रेसमध्ये एक घाव दोन तुकडे असा त्यांचा स्वभाव. एकच अंगार बाकी सगळे भंगार म्हणजे राणे...पण आता राणेंमध्ये तो जोश राहलेला नाही का?...का कमी झाला राणेंचा आक्रमकपणा,? त्यांच्या बंडात आव्हानाऐवजी तडजोडीचाच प्रयत्न दिसतोय का?..राणेंच्या बंडाचा अर्थ लावणारा हा लेख....
  
 
नारायण राणे यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याचं हत्यार उपसलं असलं तरी काँग्रेसवर त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही. नारायण राणे यांनी बंड केलं खरं पण समर्थक आमदार त्यांच्याबरोबर नाहीत..याच नारायण राणेंनी याआधी केलेल्या बंडानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावताना त्यांनी 12 आमदारांची फौज बरोबर घेतली होती..उद्धव ठाकरेंचा उद्धार करत त्यांनी शिवसेनेतही खळबळ माजवून दिली होती..त्यानंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांनी बंड केले तेंव्हा थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली होती..पण यावेळी यातलं काहीच दिसत नाही...राणेंच्या बंडात त्यांना साथ देणारा एकही खंदा समर्थक दिसत नाही..आमदार विनायक निम्हण गेल्या काही महिन्यांपासून राणेंपासून दूर गेलेत. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेही राणेंकडे फिरकले नाहीत, कालिदास कोळमकर आहेत पण ते समोर येताना दिसत नाहीत..तर ठाण्याचे रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येऊन नारायण राणेंना 9 वर्ष झाली. या 9 वर्षांत राणेंना महत्वाची पदं मिळाली..काही समर्थकांना विधान परिषद, विधानसभेची उमेदवारीही मिळाली..पण मुख्यमंत्रीपदाची त्यांची इच्छा काही काँग्रेस हायकमांड पूर्ण करू शकलं नाही हि सल त्यांचा मनात आहे..पण आता विधानसभेला जेमतेम दोन महिने राहिले असताना औट घटकेचा मुख्यमंत्री काँग्रेस करणार नाही आणि राणेंनाही ते नको आहे मग राणेंचा हा थयथयाट कशासाठी आहे... 

लोकसभेच्या निवडणुकीत राणेंच्या मुलाचा शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी मोठ्या फरकानं पराभव केला. हा पराभव राणे यांच्या खूपच जिव्हारी लागलाय..कोकणातलं त्यांचं साम्राज्याही आता राहीलेलं नाही..दीपक केसरकर या राष्ट्रवादीच्या आमदारानं तर राणेंना थेट आव्हान देत दोन हात करण्याची भाषा केलीय.. याच केसरकरांनी लोकसभा निवडणुकीत राणेंच्या विरोधात काम केलं..राणेंचा मुलगा नितेश राणेही आक्रमक पण त्यांच्या गाडीवर सिंधुदुर्गात दगडफेक झाली. राणेंची फोस्टर्स फाडली यावरून राणेंचा कोकणातला दबदबा संपल्याचं दिसतय.. 

एकीकडं कोकणतल्या साम्राज्याला लागलेला सुरुंग आणि दुसरीकडे काँग्रेसची सत्ता पुन्हा येणार नाही याची राणेंना खात्री आहे..आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना भाजपची सत्ता आली तर उद्धव ठाकरे आपल्याविरोधात कारवाईचा ससेमिरा लावतील अशी भितीही त्यांनी सतावतेय..काँग्रेससोडून जावं तर पर्यायही कमी आहेत..शिवसेनेत त्यांना दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंचाच तीव्र विरोध आहे...राष्ट्रवादीत जाणं शक्य नाही..मनसेत जावं तर मनसेचीच अवस्था बिकट आहे..आणि भाजपमध्ये जायचं तर उद्धव ठाकरे यांनी त्याला कडाडून विरोध केलाय..त्यामुळं राणेंची मोठी पंचायत झालीय..सर्व बाजूंनी कोंडी झालेल्या राणेंनी राजीनाम्याचं हत्यार उपसून दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय..यासाठी राणे 10 जनपथकडे डोळे लावून बसलेत...यातून त्यांच्या पदरात काही पडतंय का हे पाहणं महत्वाचं आहे...

 

 

 

 

 

Thursday, July 17, 2014

पृथ्वीराज चव्हाण सर्वांना पडले 'लय भारी'

 

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जून महिना गाजला..आज मुख्यमंत्री बदलणार, उद्या बदलणार, तीन दिवसात नवा मुख्यमंत्री येणार या चर्चांनी रकानेच्या रकाने भरले..नारायण राणे, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे एवढच काय नितीन राऊतांचं नावंही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊन गेलं..पण ही शर्यत झालीच नाही..मुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि सर्व वातावरण शांत झालं....मुख्यमंत्र्यांना हायकमांडनं अभय तर दिलच पण विधानसभा निवडणूकही पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वात लढण्याचा आदेशही दिला..त्यामुळे सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले..

पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना तर गप्प बसवलच पण राष्ट्रवादी काँग्रेसला ताळावर आणलं...अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणातून हटवल्यानंतर त्यांच्या जागी दिल्लीतून आलेल्या या पृथ्वीराज चव्हाण यांना सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या मुख्यमंत्री विरोधकांनी फारसं गांभिर्यानं घेतलं नाही..अजित पवार यांना तर आता काँग्रेसवर कुरघोडी करणं सहज सोपं जाईल असचं वाटलं होतं. पण सर्वांची गणितं चुकली आणि या बाबांनी सर्वांची जिरवली...तीन वर्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात काँग्रेसमधून कोणी ब्र शब्दही काढला नाही यावरून त्यांची दिल्लीतली पत किती मोठी आहे याचा अंदाज येतो....

पृथ्वीराज चव्हाण हे दरबारी राजकारणी...ते कराडमधले असले तरी त्यांचं राजकारण बहरलं ते दिल्लीतच..गांधी कुटुंबाशी त्यांची असलेली जवळीक सर्वांना माहित आहे..पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण काँग्रेसच्या नेहमीच्या राजकारणाप्रमणे केवळ गांधी घराण्याचे एकनिष्ठ म्हणून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बहाल करण्यात आली..ते मास लिडर प्रकारात मोडत नाहीत, त्यांचा राज्यात कोणता गटही नाही...पण हायकमांडनं त्यांना महाराष्ट्रात पाठवलं आणि राज्यातल्या राजकारणाला वेगळचं वळण लागलं..
पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची वर्णी लागली. त्यावेळी सर्वांनीच अजितदादा हे बाबांना खावून टाकणार असचं बोललं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अजित पवारही त्याच आविर्भावात होते...पण बाबांनी पहिला दणका दिला तो राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या शिखर बँकेला..त्यांनी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं...त्यानंतर अजितदादांच्या मर्जितल्या जलसंपदा विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणायला लावला...त्यातून अजित पवारांचा तिळपापड झाला..बाबांनी एक एक करून राष्ट्रवादीला जेरीस आणलं. बाबांनी अजितदादा आणि राष्ट्रवादीची अशी कोंडी केली की त्यातून अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला..पण बाबांनी माघार घेतली नाही, गप्प बसून त्यांनी राष्ट्रवादीला जागा दाखवून दिली...शरद पवार यांनाही मग मुख्यमंत्री कसे काम करत नाही अशी जाहीर टीका करावी लागली...मुख्यमंत्री फाईलींवर सहीच करत नाही यावरून किती वाद झाला...मुख्यमंत्र्यांच्या हाताला लखवा मारतो काय एवढ्या पर्यंत शरद पवारांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली पण बाबा बधले नाहीत..त्यांनी राष्ट्रवादीला पुरतं जेरीस आणलं...
राष्ट्रवादी काँग्रेसला जसं बाबांनी जागा दाखवली तशीच त्यांनी पक्षातल्या विरोधकांनाही जागा दाखवून दिली..एक तर उठसूठ मुख्यमंत्र्यांविरोधात दिल्लीत जाऊन तक्रारी करण्याचा प्रकार पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर बंद झाला..दिल्लीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासमोर जाण्याची कोणाची हिम्मतही झाली नाही..मुख्यमंत्री आपल्याच पक्षातल्या आमदारांची कामं करत नाहीत अशा तक्रारी येत होत्या पण करणार काय...नारायण राणे, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरेंसह अनेकांना मुख्यमंत्र्यांनी वावच दिला नाही...या सर्वांना लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवानंतर मात्र बळ आलं..काँग्रेसच्या पराभवाला मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धतच कारणीभूत असल्याचा आरोप करत विधानसभा जिंकायची असेल तर मुख्यंमत्री बदला म्हणून काँग्रेससह राष्ट्रवादीनंही तगादा लावला..काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री बदलाचं वातावरणही तयार केलं पण झालं काही नाही.. मुख्यमंत्र्यांनी सर्वांची कुंडलीच हायकमांडसमोर मांडली...मुख्यमंत्री बदला म्हणून आघाडीवर असलेल्या नारायण राणे हे तर मुलाच्या विजयासाठी मतदारसंघ सोडून प्रचाराला बाहेरही पडले नाहीत..आणि बाकीचे नेते स्वतःच्या मतदारसंघातही काँग्रेसला आघाडी देऊ शकले नाहीत ते राज्याचं नेतृत्व काय करणार असा प्रश्नही उपस्थित केला...त्यामुळं सर्वांची बोलती बंद झाली...
पृथ्वीराज चव्हाण यांना कोणताही गट सांभाळायचा नाही..फक्त हायकमांडचा आशिर्वाद पाहिजे आणि तो त्यांच्यावर आहेच...त्यामुळं राष्ट्रवादीसह काँग्रेसमधल्या विरोधकांना ते भारी पडले....आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरीही त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही....शेवटी एवढचं की राजकारणात स्वतःला फार मोठा नेता म्हणन मिरवणा-यांना बाबांनी चांगलच वठणीवर आणलय..स्वच्छ प्रतिमा तर त्यांनी जपलीच पण कोणतीही आगपाखड न करता शांतपणे त्यांनी सर्वांना गप्प केलं.... 

 

 

 

 

 

 

Sunday, July 6, 2014

मुंबईत फक्त 5 रुपयांत पोटभर जेवण !!!! 

सत्तेचा माज कसा चढतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्यांच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्य...मुंबई शहरात पाच रुपयां पोटभर जेवायला मिळतं असं भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्टयलय..हे शेलारसाहेब मुंबईचेच...यांचं आयुष्य या शहरातच गेलं...सध्या ते मुंबईचे भाजप अध्यक्ष आणि आमदार आहेत...मुंबईमध्ये सामान्य माणसाचं खाणं म्हणजे वडापाव. ..हा वडापावही 5 रुपयांना मिळत नाही याची शेलारांना माहिती नाही.. कारण हा वडापाव 10 रुपयांच्या खाली कुठंही मिळत नाही..मग मुंबईत पाच रुपयात पोटभर जेवण मिळतं कुठं हे त्यांनी सांगायला हवं...या शेलारांनी मागच्या काही वर्षांत पाच रुपये तरी बघितलेत आहेत का. कालपर्यंत विरोधीपक्षात असताना उठसुठ काँग्रेसवर तोफ डागणा-या भाजपची दिल्लीत पूर्ण बहुमतानं सत्ता आल्यापासून त्यांची भाषा बदललीय...एका महिन्यात सत्तेचा माज या भाजपवाल्यांना आल्याचं त्यांच्या चालण्याबोलण्यातून दिसतोय..

 

मागच्या पाच सहा महिन्यापूर्वीच काँग्रेसच्या काही महाशयांनी अशीच गरिबांची थट्टा उडवली होती...त्यात याच महानगरात वावरलेलं बॉलिवूड अभिनेता आणि काँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनी मुंबईत 12 रुपयात पोटभर जेवण मिळतं असा मुर्ख दावा केला होता...त्यावेळी हेच भाजप नेते राज बब्बर यांच्यावर तुटून पडले होते.. आता दिवस बदललेत, सत्तेत भाजप आहे आणि विरोधात काँग्रेस पण गरिबांची थट्टा करायचं काही थांबलेलं नाही...50 रुपये कमावणारा गरिब नाही असा दावाही करणारे सरकारच...आणि पाच 10 रुपयात पोटभर जेवण मिळतं सांगणारेही आमच्याच देशातले नेते...या नेत्यांनी कधी आपल्या आलिशान गाडीतून खाली उतरून स्वतःच्या पैशानं कमी पैशांत जेवण केलय का....हा प्रकार जसा सत्तेचा माज दाखवतो तसच या नेत्यांना वस्तूस्थितीचं किती अज्ञान आहे हेही यातून दिसतंय..    

 

आशिष शेलार काय राज बब्बर काय..पक्ष कोणताही असो गरिबी आणि गरिबांचा कळवळा यांना किती आहे हे सांगण्याचा त्यांचा फक्त प्रयत्न असतो...ज्या भाजपच्या आशिष शेलार यांनी पाच रुपयात पोटभर जेवण मिळतं असं म्हटलय..त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी गरिब चहावाला देशाचा पंतप्रधान झाला म्हणून केवढी स्तुती झाली...पण त्यांना गरिबांचा किती कळवळा आहे हे सत्तेत आल्यानंतर एका महिन्यातच वाढलेल्या महागाईच्या आलेखानं दिसलय...महागाई का वाढली याचं लंगडं समर्थन आता हे भाजपचे नेते करत आहेत...सत्ता मिळवण्यासाठी फक्त थापा मारण्याचा धंदा या नेत्यांनी सुरू केलाय..

 

पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय म्हणून भाजपचे हेच नेते टीका करण्यात आघाडीवर होते..आशिष शेलार, विनोद तावडे यांनी मागच्या काही वर्षात अजित पवार, आर आर पाटील यांच्यावर कशी टीका केलीय ते आठवून पाहा...राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय म्हणणा-या भाजपची केंद्रात सत्ता येऊन अवघा महिना झालाय, अजून महाराष्ट्रात सत्ता आलेली नाही तर यांचं विमान हवेत उडायला लागलय..पंधरा वर्ष सत्तेत राहिल्यावर तर माज येणारच पण यांना तर एका महिन्यात माज आलाय हे शेलारांच्या बोलण्यातून दिसतय...

शेलारसाहेब, तुम्ही मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहात ..सार्वजनिक जीवनात बोलताना काही तारतम्य बाळागयचं असतं हे तुम्हाला माहिती नाही असं कसं म्हणता येईलं...बोलताना कधी कधी नेत्यांचा तोल सुटतो..पण एवढा तोल सोडू नका की त्यातून गरिबांची आणि गरिबीची थट्टा करावी...हे तुम्हाला शोभत नाही एवढचं ...