Thursday, May 31, 2012

पाणी पुरवठा मंत्री ढोबळे सरांचा दुष्काळ


महाराष्ट्रातील काही भागात यावर्षी भिषण दुष्काळ पडलाय..पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकूनही पाणी मिळत नाही. तर जनावरांना चारा नाही. जमीनी ओस पडल्यात. अशी गंभीर परिस्थीती असताना या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना मात्र हा दुष्काळ दिसत नाही. जो काही दुष्काळ हा तो तेवढा तिव्र नाही. तो मिडीयानं उभा केलाय. हा पितपत्रकारितेचा प्रकार असून टीव्हीवाल्यांनी त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी दुष्काळ अतिरंजीत करुन दाखवलाय अशी मुक्ताफळं ह्या मंत्रीमहोदयांनी उधळलीत. आता राज्यात दुष्काळ आहे की नाही हे जर या राज्याच्या मंत्र्याला माहितच नाही तर त्यांना कोण सांगणार. बरं या दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यावर तोच मंत्री दुष्काळ तेवढा काही भीषण नाही असं जर म्हणत असेल तर हे या राज्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल. ढोबळेसाहेब ज्या मंतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या मोहोळ-मंगळवेढा तालुक्यात पिण्याची पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यांच्याच मतदारसंघाला लागून सांगोला तालुका आहे. तसच सोलापूर जिल्ह्याची सीमा असलेल्या सांगली आणि सातारा भागातही मोठा दुष्काळ आहे. याच भागात काँग्रेसचे युवराज येऊन दुष्काळाची पाहणी करुन गेले. पण ढोबळेसाहेबांना मात्र हा सर्व मिडीयाचा अतिरंजीतपणा वाटतो..जर हा दुष्काळ मिडीयानं उभा केला असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची, जनावरांना चारा डेपोची व्यवस्था कशासाठी केली आहे. पन्नास पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या पण दुष्काळाची झळ बसत असलेल्या भागालाही चारा डेपो देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कशासाठी दिलेत. ज्या मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत त्यांच्याच मंत्रीमंडळात ढोबळेसाहेब पाणी पुरवठा मंत्री आहेत ह्याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय...

राज्यात दुष्काळाची जर गंभीर परिस्थीती नसेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे २७०० कोटींची मदत कशासाठी मागितली हे ढोबळेंनी सांगावं. त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष आणि जाणते राजे शरद पवार यांनी दुष्काळ प्रश्नावर राज्यापालांना का लक्ष्य केलं होतं. राज्यपालांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करायला पाहिजे असं पवारसाहेब का म्हणाले.. हे ढोबळेसरांनी लक्षात घ्यावं. याउपर जर राज्यात दुष्काळ नाही असं जर आपणास म्हणाचय तर मग केंद्र सरकार मदत तर कशाला करेल हेसुद्धा या ढोबळेंना कळू नये का.. खरं तर एखाद्या विषयावरुन लक्ष दुसरीकडं वळवण्याचा किंवा जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे. ढोबळेसाहेब पाणी पुरवठामंत्री आहेत. त्यांनी जरा या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला असता तर त्यांना या दुष्काळाच्या झळा आणि दुष्काळग्रस्तांच्या व्यथाही कळल्या असत्या. पण केवळ सरकारी आकडेवारी नाचवून दुष्काळाची तीव्रता कमी आहे हे सांगण्यातच ज्या मंत्र्याला धन्यता वाटते त्यांनी त्या खुर्चीवर बसण्याचा नाद सोडावा. कारण आपण जर जबाबदारी समर्थपणे पार पाडत नसू तर त्या खूर्चीवर बसण्याचा त्यांना काहीएक अधिकार नाही...

ढोबळेसाहेब आपण म्हणता तसं अतिरंजीत चित्र मिडीयानं रंगवलं असेल तर या भागातली जनता पाण्याच्या टँकरसाठी दिवसभर वाट का पहातेय. एवढी जर आपल्याला माहिती नसेल तर आपण सरकारी कागदांवर विसंबून न रहता प्रत्यक्ष परिस्थीती पाहून या. तुम्हाला त्याची तीव्रता कळेलच. दुसरं असं की दुष्काळ काय आणि दुष्काळ सदृष्य परिस्थीती काय किंवा टंचाई सदृस्य परिस्थीती काय हे झालं सरकारी नियमानुसार दुष्काळाचं केलंल वर्णन..पण दुष्काळ हा दुष्काळच असतो हे तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनीधीला कळू नये यापेक्षा तुमचं अज्ञान ते काय..

दुष्काळ किती आहे. तो मिडीयानं उभा केलाय की निसर्गाचा मार आहे. यावर वेळ घालवण्यापेक्षा त्या दुष्काळग्रस्तांना वेळेवर मदत मिळणं गरजेच आहे. सरकारी आकडेवारीनुसार ज्या गावात दिवसाला चार पाच टँकर पाणी पुरवले जातात असं सांगितलं जातं त्याठिकाणी दिवसातून एकदाच टँकर येतो. ज्या भागात टँकरच्या १०-१५ खेपा व्हायला हव्यात तिथं जेमतेम दोन तीन खेपा होतायत. तर काही गावाला दोन दोन दिवस टँकर येतच नाही ही वस्तुस्थीती आहे. फक्त कागदावर १५०० टँकरनं पाणी पुरवठा सुरु आहे किंवा १००-१५० चाराडेपो उभा केलेत हे सांगून लोकांची थट्टा करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कीती होतेय यावर भर दिला तर दुष्काळावर काही प्रमाणात तरी मात करण्यास सरकारला यश येईलं. नाहीतर नेहमीप्रमाणे टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी एवढे कोटी रुपये खर्च झाले. तर चारा डेपोवर एवढे कोटी खर्च झाले असे सरकारी आकडे फक्त दाखवले जातील..

दुष्काळग्रस्त माणूस निसर्गाच्या ह्या मा-यानं अगोदरच हैराण झालाय. पिण्यासाठी पाणी, जनावराला चारा, पिण्याचं पाणी आणि हाताला काम एवढच्या त्याच्या माफक अपेक्षा आहेत. त्या जर हे सरकार देणार नसेल तर सरकार म्हणून तुम्हाला तिथं बसण्याचा अधिकार नाही. आपण मायबाप सरकार आहात, लोक तुमच्याकडे आशेनं पहात आहेत. त्यांना मदत करुन त्यांच्या जगण्याला हातभार लावण्याचा प्रयत्न व्हायला हवा. ते सोडून त्याचं खापर दुस-यावर फोडून समस्या संपणार नाही.. ढोबळेसर आपण हुशार आहेत. प्राध्यापक आहेत, ग्रामीण भागातले लोकप्रतिनिधी आहेत. तुमच्याचकडे पाणी पुरवठा विभाग आहे. लोकांना त्याचा फायदा होईल एवढं काम करण्यात आपण आपली ऊर्जा खर्च केली तर ते तुम्हाला शोभून दिसेल. नसते मिडियावर खापर फोडून काही समस्या सुटणार नाहीत हे समजण्याएवढे आपण सुज्ञ आहेत एवढचं या निमित्तानं आपणास सांगणं आहे...

Tuesday, May 29, 2012

स्त्री भ्रुण हत्या - एक सामाजिक समस्या


स्रीभ्रूण हत्येचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचं एक कारण म्हणजे आमीर खानच्या बहुचर्चित "सत्यमेव जयते" या कार्यक्रमात या सामाजिक विषयाला दिलेलं महत्व..खरं तर या कार्यक्रमामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला एवढचं...! कारण या विषयावर पूर्वीपासूनच जागृतीच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम सुरुच आहे. लेक वाचवा अशी आंदोलनही झाली. पण आमीर खानच्या कार्यक्रमामुळे तो विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. तसच या विषयाचं गांभिर्य, स्त्री भ्रुण हत्या केली जात असताना होणारा मातेचा कोंडमारा आणि वैद्यकीय क्षेत्रातली अपप्रवृती यावरही प्रकाश टाकण्यात आल्यानं हा विषय चर्चेत आला.

स्त्री भ्रुण हत्या करणा-या अनेक डॉक्टरांनी त्यांची दुकानंच थाटलेली आहेत. अनेक शहरात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरुय. बीड जिल्ह्यातला परळी तर या प्रकारात बदनाम झालय. परळीतलं डॉ. सुदाम मुंडे यांचे हॉस्पीटल तर ह्या गोरख धंद्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. ह्या हॉस्पीटलमध्ये स्त्रीभ्रुण हत्या होत असल्याचं उघड झालं होतं. त्याचा परवानाही रद्द करण्यात आला होता. पण पुन्हा तो धंदा राजरोसपणे सुरु होता. त्यातच मुलगी नको म्हणून गर्भपात करताना एका मातेचा मृत्यु झाला. त्यानंतर डॉ. मुंडेवर कारवाईसाठी हात उचलला गेला. तो डॉक्टर सध्या फरार आहे. पण हा गोरखधंदा त्या हॉस्पीटलमध्ये होत होता हे सर्वांनाच माहित असताना कोणतीही यंत्रणा त्याकडे का गेली नाही हे न समजण्यासारखे नाही. कारण याच प्रशासकीय यंत्रणा अशा डॉक्टरांना पाठीशी घालतात. हे सुद्धा त्यातलं एक प्रमुख कारण आहे. परळीतला डॉक्टर मुंडे हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारचे डॉक्टर मुंडे जागोजागी आहेत आणि त्यांच्याकडे अशा स्त्री भ्रुण हत्या राजरोसपणे होत आहेत. काही हजार रुपयांच्या मोबदल्यात गर्भपात करण्याचा हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २५० अधिकृत सोनोग्राफी सेंटर आहेत. यावरुन महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या सोनोग्राफी सेंटरची संख्या आणि तिथं होत असलेले प्रकार याची व्याप्ती लक्षात येते..

मुलगी नको म्हणून जन्माला यायच्या आतच तिला मारण्याचं पाप करण्याचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. त्याला जबाबदार असणा-यांनी विचार करायला हवा. हा प्रकार खेडेगावात, आदिवासी भागात जास्त प्रमाणात चालतो असा आतापर्यंत समज होता. पण मागच्या काही दिवसात प्रकाशात आलेल्या माहितीनुसार मोठ्या शहरातून तसच सुशिक्षीत लोकांकडूनही हा प्रकार होत असल्याचं पुढं आलय. म्हणूनच हा विषय आणखी गंभीर होत चाललाय. कारण मुलगी नको, मुलगाच हवा ही मानसिकता सगळीकडे घर करत चालल्याचं यावरुन दिसून येतय. त्यामुळे शहर असो की गाव, सुशिक्षित असो अडाणी, कमी शिकलेला या सर्व स्तरातून मुलगी नको हा विचार नष्ट होणं गरजेचं आहे.

स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी जिल्हातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना सायलंट ऑब्जर्व्हर हे यंत्र बसवण्याचा आदेश दिला होता. त्यातून कोणत्या सोनोग्राफी केंद्रात काय प्रकार चाललाय हे स्पष्ट होण्यास मदत होते. तसच सोनोग्राफी करताना त्या महिलेकडून एक अर्ज ऑनलाईन भरुन घेण्याचा आदेशही काढलाय. पण त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. पण मुंबई हाय कोर्टांनं तो अर्ज फेटाळून लावला. कोल्हापूरात मुलींचं प्रमाण हे दरहजारी ८३९ पर्यंत खाली घसरलंय. थोड्या फार फरकानं मुलींचं हे प्रमाण इतर जिल्ह्यातही असंच घसरत चाललय. त्यामुळे मुलगी वाचवणं ही काळाची गरज बनलय.

स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. तसच प्रसुतीपूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदाही आहे. पण कायद्याच्या पळवाटा तसच घरातूनच वंशाचा दिवा हवा म्हणून होणारा हट्ट यामुळे अनेक ठिकाणी स्त्री भ्रुण हत्या केली जाते. हे थांबवायचे असेल तर त्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. जोपर्यंत मुलगी नको फक्त मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हा प्रकार थांबणं शक्य नाही. फक्त डॉक्टरांनाही दोष देऊन काही उपयोग होणार नाही. स्त्री भ्रण हत्या रोखण्यासाठी लोकांच्या मानसिकेत बदल होणं गरजेचं आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुलींना जन्माला येण्यापूर्वीच त्यांना संपवण्याचा हा प्रकार थांबणं अवघड आहे. कारण सर्वांना मैत्रिण हवी आहे, बायको हवी आहे, आई हवी आहे, बहिण हवी आहे..मग मुलगी का नको...? मुलीला जन्माला येऊ दिलं जात नसेल तर आई, बायको किंवा बहिण कुठून येणार याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळेच लेक वाचवा असं म्हणण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलीय..