Friday, May 20, 2016

‘काँग्रेसमुक्त भारत’- कमळाबाईचे दिवास्वप्न



पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून भाजप आणि काँग्रेसला काय मिळाले याचा विचार होणे क्रमप्राप्त आहे. भाजपसाठी सर्वात मोठे यश म्हणजे ईशान्येकडील आसाममध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले. काँग्रेसचा दोन राज्यात पराभव झाला तरी आकड्यांचा विचार करता भाजपपेक्षा काँग्रेसचे यश जास्त आहे. या निकालातून एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे प्रादेशिक पक्षांचे घवघवीत यश.


तामिळनाडू, केरळ आणि छोट्या पद्दुचेरीमध्ये लागलेले निकाल फारसे आश्चर्यकारक नाहीत. तामिळनाडूत मुख्य लढत होती ती जयललीता आणि करुणानिधी या दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्येच. या राज्यात मागील 32 वर्षांचा अऩुभव पाहता कोणताही पक्ष सलग दुस-यांदा निवडून येत नाही. पण त्यावर मात करत जयललिता यांनी पुन्हा सत्ता काबीज करण्यात यश मिळवले आहे. त्यामानाने करुणानिधींसाठी मात्र हा मोठा धक्का आहे. वयाची नव्वदी पार केलेल्या करुणानिधी यांना सत्तेने हुलकावणी दिली.खरे तर करुणानिधी यांच्या घरातच राजकीय गोंधळ सुरू आहे. करुणानिधी यांचा उत्तराधिकारी स्टॅलिन की अळागिरी याचा फटका त्यांना बसला असे म्हणावे लागेल. घरातच एकमत नाही तर बाहेर कोण मत देणार. तरिही करुणानिधी यांनी जोरदार धडक देण्याचा प्रयत्न केला, पण सत्ता मिळवण्यात ते कमी पडले. 

विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्याकडे जनतेने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसते. जयललिता यांच्यावर जसे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तसेच करुणनिधी यांची मुलगी कनिमोळी, त्यांचे सरकारी ए, राजा आणि मारन बंधू यांच्यावर टू जीचे भूत आहे.पण मतदारांवर त्याचा फारसा प्रभाव पडलेला दिसला नाही. जललिता यांच्या अम्मा कँटीन सारख्या योजनांचा त्यांना चांगलाच फायदा झाला. द्रमुकसाठी समाधाची बाब म्हणजे त्यांच्या जागांमध्ये झालेली वाढ एवढेच काय ते त्यांचे यश.
केरळमध्येही दर पाच वर्षांनी सत्ताबद्दल होतो असे आतापर्यंतचे निकाल सांगतात, याच निकालाची पुनरावृत्ती यावर्षीही झाली. काँग्रेस आघाडीला पराभूत करुन डाव्या आघाडीने सत्ता काबीज केली. काँग्रेसचे ओमन चांडी यांच्या सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आणण्यात 92 वर्षांच्या अच्युतानंदन यांना यश आले. पण याच डाव्यांना पश्चिम बंगालमध्ये मात्र ममता बॅनर्जी यांनी मोठी धुळ चारली. तर भाजपलाही केरळमध्ये आरएसएसचे मोठे नेटवर्क असून फारसे काही पदरात पडले नाही. 

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममतादीदी जिंदाबादचा नाराच गाजला. ममतादीदींच्या राज्यात सर्व काही आलबेल होते असे नाही, पण त्यांच्या विरोधात भक्कम पर्यायच उभा नव्हता. डाव्या पक्षांची आता ताकद राहिलेली नाही,जी होती तीसुद्धा या निवडणुकीत कमी झाली. त्यांच्याकडे आता नेतृत्वाचा अभाव आहे. ममता बॅनर्जींशी दोन हात करण्यात कमी पडलेल्या डाव्यांना उभारी घेण्यास मोठी कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसबरोबर आघाडी करुनही त्याचा काही फायदा झाला नाही.

पाच राज्यातील सर्वात मोठे यश म्हणजे भाजपचे आसामधील यश. पहिल्यांदाच भाजपचे कमळ आसाममध्ये फुलेले. हे यश मिळवण्यासाठी त्यांनी आखलेली रणनिती यशस्वी ठरली. बिहार निवडणुकीच्या वेळी केलेल्या चुका त्यांनी टाळल्या. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही निवडणुकीआधीच जाहीर केला. तसेच स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वावरही भाजपने विश्वास टाकला. यामुळे आसाममध्ये भाजप आजपर्यंत आसाम गण परिषदेचा मित्र पक्ष ही ओळख पुसुन स्वतःची मोठी ताकद उभारण्यात यशस्वी झाला.

आसाममध्ये जरी भाजपला मोठे यश मिळाले असले तरी इतर राज्यात मात्र त्यांचा चंचुप्रवेश एवढाच काय ते त्यांचे यश. काँग्रेसची केरळ आणि आसामची सत्ता गेली. यातूनही काँग्रेस सावरेल आणि पुन्हा नव्या ताकदीने उभी राहील. भाजपानेही आसामच्या विजायाने फारसे हुरळून जाण्याचे कारण नाही. प्रादेशिक पक्षांची ताकद मात्र डोळेझाक करणारी नाही हेही या निकालावरून सिद्ध होते.

No comments:

Post a Comment