Friday, February 22, 2013

हैदराबादच्या स्फोटानं जागवल्या आठवणी...


हैदराबाद गुरुवारी संध्याकाळी दोन बॉम्बस्फोटानं हादरलं..दिलसुखनगर भागात हे दोन बॉम्बस्फोट झाले..याच दिलसुखनगरशी माझं खूप जवलचं नातं आहे..याच भागात मी 9 वर्षे राहिलोय..त्यामुळं स्फोटाची बातमी समजात अंगावर शहारे आले...कारण ज्या ठिकाणी हे स्फोट झाले त्याच्या प्रत्येक जागेवर..इंचा इंचावर मी फिरलोय..तिथच शॉपिंग केलय..तिथचं साईबाबा मंदिरात अनेकदा दर्शनाला गेलोय..त्याच आनंद टिफीन सेंटरमध्ये अनेकदा भरपेट ताव मारलाय...ज्या थिएटरजवळ हे बॉम्बस्फोट झाले त्याच थिएटरमध्ये तेलुगु चित्रपट पाहिलेत..बॉम्बस्फोटाची बातमी एकल्यानंतर लगेच त्या सर्व जागांची आठवण आली...
 
असाच मोठा बॉम्बस्फोट 25 ऑगस्ट 2007 मध्ये हैदराबादमध्ये झाले होते..दोन बॉम्ब फुटले..तर तिसरा याच वेंकटाद्री थिएटरसमोर ठेवला होता..त्यावेळी तो निकामी करण्यात आला..पण यावेळी त्या हरामखोरांनी डाव साधला....इतर ज्या दोन ठिणी स्फोट झाले आणि तिथं रक्ताचा सडा सांडला होता...त्यातलच एक होतं कोटी भागतलं गोकुळ चाट भांडार...नेहमी खाण्यासाठी प्रचंड गर्दी असते..तिथच स्फोट झाला होता..त्याची आठवण आली म्हणून मागच्या वर्षी लिहिलेला हा ब्लॉग पुन्हा देतोय.......

आठवण हैदराबादची

हैदराबादमध्ये चाट भांडार भरपूर आहेत. शहरात जागोजागी छोट्या मोठ्या गाड्यांवर भेळपूरी, शेवपुरी, पॅटीस, पाणीपुरी मिळेतच..पण अनेक गाड्यांवर तेलुगु चव जास्त जाणवते. म्हणजे प्रत्येक पदार्थाला एक वेगळी चव असते तशी ती जाणवत नाही. त्यातच चाट आणि पाणीपुरी म्हटल्यावर जो काही चवीचा मुद्दा येतो तो वेगळाच असतो..त्यामुळे अनेकदा या चाटची फारशी मजा नाही येतया सर्वांवर एक उपाय म्हणजे कोटी भागातालं गोकुळ चाट...इथं मिळणारे सर्वच पदार्थ चविष्ट असतात..अगदी दहीपुरी, रगडा पॅटीस किंवा मिसळ प्रत्येक पदार्थाला एक छान चव आहे.. त्यामुळे या गोकुळमध्ये संध्याकाळी एखाद्या पदार्थावर ताव मारण्याची इच्छा होतेच..पण या गोकुळमध्ये काही खायचं म्हणजे मोठं दिव्यच असतं..गर्दी एवढी प्रचंड असते की त्यातून वाट काढत जायचं , आपली आर्डर द्याचयी आणि पाच सात मिनीटात त्या गरम प्लेट घेऊन त्याच गर्दीतूनच बाहेर पडण्याचं दिव्य करावं लागतं.. पण आपल्याला हवा असलेला पदार्थ खाताना ते दिव्य फारसं कठीण वाटत नाही..

गोकुळमध्ये नेहमी जायचा योग काही येत नाही..त्यातच आम्ही कोटीपासून फारच दूर राहत असल्यामुळे केवळ चाट खाण्यासाठी हैदराबादच्या ट्रॅफिकमधून वाट काढत जाणं सोप नाही.. त्यातच वेळे अभावीही तिकडं फारसं जाणं होत नाही..पण पूर्वी जेव्हा हैदराबादमध्ये नवीन आलेलो होतो तेव्हा आठवड्यातून एखादी चक्कर त्या भागात व्हायचीच..मग काय थोडंफार भडकणं झाल्यानंतर गोकुळला भेट ठरलेलीच..त्यामुळे या गोकुळशी जिव्हाळ्याचं नातं जडलयपण मागच्या काही वर्षात तिथं जाण्यात खंड पडला होता..पण मागच्याच आठवड्यात त्या गोकुळमध्ये जाण्याचा योग पुन्हा आला..हो योगच म्हणायचं...माझ्या दोन सहका-यांबरोबर आम्ही अबीट्सला थोडी शॉपींग केली आणि नंतर गोकुळला जाण्याचा बेत ठरला... ठरल्याप्रमाणं आम्ही तीघेजण गोकुळला गेलो..अबीट्स ते कोटीचे गोकुळ हा जेमतेच पाच मिनीटाचा बसचा प्रवास पार करायला आम्हाला तब्बल अर्धातास लागलातेवढा टॅफिकचा त्रास संपवून आम्ही एकदाचे गोकुळमध्ये आलो. नेहमीप्रमाणं गर्दी होतीच..आम्ही तिघांच्या तीन वेगवेगळ्या आर्डर देऊन त्या येण्याची वाट पहात होतो.. शेवटी गर्दीतून गरम प्लेट घेऊन आम्ही तिघांनी ताव मारला..खरं तर आणखी एक एक प्लेट घ्यायचा विचार होता..पण गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही बाहेर पडलो

गोकुळमध्ये आम्ही पंधरा वीस मिनीटीचं होतोत्या पंधरा वीस मिनिटीत रगडा पॅटीस आणि दहीपुरीवर ताव मारताना माझं मन मात्र त्याचा आस्वाद घेताना वेगळात विचार करत होतं..याच गोकुळमध्ये आमच्यासारखे लोक दररोज येतात. नेहमीच्या चवीत थोडा बदल करण्यासाठी ते इथं येतात..अशाच एका संध्याकाळी म्हणजे २५ ऑगस्ट २००७ ला या गोकुळमध्ये अघटीत घडलं…. अनेकजण याच गर्दीत आपली प्लेट फस्त करण्यात मग्न होतेत्याचवेळी  गोकुळमध्ये मोठा स्फोट झाला…..कुणाला काही कळायच्या आताच सगळं चित्र बदलेलं..सगळीकडे एकच गोंधळ, आरडाओरड आणि रक्ताचा सडा सांडलेला..लोकांची बाहेर पडण्याची घाई होती तर काही जण मदतीसाठी याचना करत होतेगोकुळमध्ये ज्या गर्दीत हा सर्व पदार्थ बनवण्याचा आणि तिथंच खाण्याचा दररोजचा नित्यक्रम होता तिथं गॅस सिलेंडरवर कोण्या हरामखोरानं एका पिशवीत बॉम्ब ठेवला होताआणि अपेक्षीत वेळी त्यांनं त्याचा स्फोट घडवून आणला..जवळपास २०-२५ लोकांचा बळी गेला..काहीजण जखमी झाले..स्फोट एवढा भयानक होता की काही लोकांचे पाय तुटले. काहींचे हात तुटलेकाहीजण भाजून काळे ठीक्कर पडले.. त्यावेळी मी माझ्या ऑफीसमध्ये रात्रीचं बातमीपत्र बनवण्यात व्यस्त होतो.. त्या घटनेची व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर मला त्या गोकुळचा तिटकारा आला....गोकुळमध्ये लोक जिभेचे थोडे लाड पुरवायला जातात..त्यात त्यांची काहीही चूक नसताना त्यांना प्राण गमवावे लागलेमी ज्या दिलसुखनगरमध्ये रहात होतो तिथला शेजा-याचा एकुलता एक मुलगाही त्याच स्फोटात गेलाइंजिनिअरिंगचा तो मुलगा कॉलेजमधून येताना मित्रांबरोबर गोकुळमध्ये गेला तो पुन्हा परत आलाच नाही.. गोकुळमध्ये मी दहीपुरी संपवत असताना माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा ते चित्र दिसत होतं..आणि आज पुन्हा तसा प्रसंग आला तर…! भितीनंच मी गार पडलो...नेहमीप्रमाणं मला आता त्या गोकुळच्या कोणत्याच पदार्थाची चव लागत नव्हती..त्या जागेवर पाय ठेवताच कुठं बॉम्ब तर ठेवलेला नाही ना अशी शंका आली.... खातानासुद्धा मला त्या भयाण घटनेची आठवण होत होती...

गोकुळ चाटचा तो प्रसंग आठवला की आजही अंगावर शहारे येतात..जे गोकुळ त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध होतं.. त्यांनं २०-२५ लोकांचा बळी घेतलातिथली चव आजही बदललेली नाही..पण मला मात्र त्या चवीत फरक पडलाय असचं वाटतय...का कोण जाणं पण आता त्या गोकुळमधल्या कोणत्याच पदार्थावर ताव मारण्याचं मनच होत नाही….

दिलसुखनगरच्या स्फोटाची बातमी एकल्यानंतरही माझं मन सुन्न झालं..पुन्हा दिलसुखरनग डोळ्यासमोर तरळलं....दिलसुखनगरच्या आठवणी लवकरच शेअर करेन....

 

Friday, February 15, 2013

बाळासाहेबांची शिवसेना- एक झंझावात..


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचा झंझावात 17 नोव्हेंबर 2012 ला संपला.. ज्या नावानं अख्या महाराष्ट्राला राजकारणाची नवी दिशा दिली, नवी ओळख दिली, राजकारण तळागाळात पोचवलं, एका वेगळ्या धाटणीचं राजकारण ज्यांनी केलं, ते बाळासाहेब गेले.. बाळासाहेबांच्या जाण्यानं शिवसेनेचं काय होणार याची चर्चा सुरु आहे. खरं तर बाळासाहेब, शिवसेना आणि शिवसैनिक हे वेगळं नातं या महाराष्ट्रानं पाहिलं. 40 वर्ष या माणसानं महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीनं वेड लावलं. वादग्रस्त व्यक्तिमत्व ही बाळासाहेबांची ओळख होती..त्यांनी घेतलेल्या भूमिका ह्या नेहमीच वादात सापडल्याय..मुस्लिम व्देषाचं राजकारण असो की राडा संस्कृती..मी लोकशाही मानत नाही म्हणणारा आणि तरीही निवडणुकीत लढवणारा हा माणूस एक अजब व्यक्तिमत्व होतं. ( बाळासाहेबांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही..)कोणाला पटो वा ना पटो पण या माणसानं मराठीला वेगळी ओळख दिली.. एक दरारा निर्माण केला..दिल्लीपासून गल्लीपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही चर्चा नेहमीच व्हायची..

मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही..मला त्याच्याशी काही देणघेणंही नाही..पण कॉलेजमध्ये असताना 1990 च्या वेळी बाळासाहेबांबद्दल वर्तमानपत्रात बरच छापून यायचं.. त्यावेळी टिव्ही खूपच मर्यादीत होता..डीडी सोडलं तर फारसं काही नव्हतं.. त्यातच 24 तासाचं दळण दळणा-या वाहिन्या तर नव्हत्याच...जे काही समजलं जायचं ते वर्तमान पत्रातूनच...आणि असचं एकदा बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा मला सोलापूरच्या होम मैदानावर ऐकायला मिळाली..आम्ही कॉलेजचे अनेकजण या सभेला होतो..ते भाषण मी जेव्ही ऐकलं तेव्हाच बाळासाहेबांबचा चाहता झालो.. तसं राजकारण हे गावात चालतच..आजपर्यंत आम्ही फक्त काँग्रेसवाल्यांची त्याच त्या धाडणीतली रटाळ भाषणं ऐकायचो. पण बाळासाहेब हे त्यापेक्षाही काहीतरी वेगळे आहेत हे त्या एका भाषणातूनच जाणवलं.. माझ्याबरोबर अनेक सहकारी जे काँग्रेसच्या राजकारणाशी जवळ होते. त्यांनाही बाळासाहेब आवडायचे..(त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हता..) एक उदाहरण देतो..माझे काही मित्र अकलूज भागातले होते. त्यांचा विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या राजकारणाशी काही ना काही कारणानं संबंध यायचा..घरातले काही लोकही सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, डीसीसीबँक, सोसायटीचे सदस्य..अकलूज परिसरात तर मोहिते पाटील सोडून दुसरं नावही कोणी घ्यायचं धाडस करत नव्हतं..त्या भागातली जी मुलं माझ्याबरोबर कॉलेजमध्ये होती तीसुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे चाहते झाले होते..एक तर कॉलेजची मुलं त्यात तरुणाईतला बंडखोरपणा..आणि त्याला साद घालणारे बाळासाहेब ठाकरे हे नातं घट्ट झालं होतं..तेव्हापासून आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आवडत्या व्यक्तिमत्वापैकी एक आहेत...आणि ते राहतील..

 

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची गुंडगिरी किंवा ठोकशाहीवर टीका करण्या-यांना हे माहित असेलच की राजकारणातले अनेक नेते आणि गुंडगिरी यांचा जवळचा संबंध असतो..हे आम्ही तरी गावापासूनच पहात आलोय मग तो छोठा मोठा नेता कोणत्याही पक्षाचा असो.. म्हणजे राजकारणातलं स्वच्छ व्यक्तिमत्व शंभरात एक दोनही सापडले तर खूपच होईलं. त्यामुळं शिवसेनेचा राडा वैगेरे टीका होत असली तरी ते राजकारणातल्या जवळपास सर्वांनाच लागू पडतं..पण तरुण रक्तात जी बंडखोरवृत्ती असते त्याला मात्र बाळासाहेबांनी वाट करुन दिली होती..म्हणूनच माझासारखी असंख्य मुलं बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वानं भारुन केली होती..एवढाच माझा आणि त्या शिवसेनेचा संबंध..पण नंतर जेव्हा मी प्रसारमाध्यमात आलो तेव्हा माझ्या ज्ञानात वेगवेगळ्या मार्गानं शिवसेना, बाळासाहेब आणि त्यांचं राजकारण यांची भर पडली.. त्यामुळं बाळासाहेबांनी घेतलेले अनेक निर्णय , त्यांच्या भूमिका मला आवडल्या नाहीत किंवा त्याची बाजू घ्यावी असं कधीच मला वाटलं नाही..पण एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावरचं प्रेम हे तसभूरही कमी झालं नाही.. 40 लाख झोपडपट्टीवासींना मोफत घरं आणि 27 लाख नोक-या देण्याचं आश्वासन..नाही वचन देत बाळासाहेबांनी महाराष्ट्रात युतीचं सरकार आणलं ..खरं तर जो काही या 27 लाखांच्या बेरोजगारीचा आकडा होता त्यातलाच मी एक...मलाही नोकरीची आशा होतीच..पण युतीच सरकार आलं तेव्हा मी नुकताच एमए करुन बेकार झालो होतो. कॉलेज नावाच्या फॅक्टरीतून बाहेर पडलो होतो..पण त्यानंतर नोकरी काही मिळाली नाही..म्हणजे बाळासाहेबांनी दिलेलं आश्वासन पाळलचं नाही.. ना घर ना नोकरी..ते आणि त्यांची शिवसेना सुद्धा काँग्रेससारखीच झाली...पण अशी दिलेली आश्वासनं पाळली जात नसतात किंवा ते फक्त प्रचारातलं एक भाषण म्हणून पहायचं असतं हे तोपर्यंत मला समजलं होतं..

 

बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात एक नवा वर्ग आणला..ज्या लोकांच्या सात पिढ्यांचा राजकारणाशी फक्त मतदान करण्यापलिकडे संबंध आला नाही अशी माणसं नगरसेवक, सरपंच, नेते, आमदार, खासदार मंत्री झाले..हे बाळासाहेब ठाकरेंमुळचं झालं हे मान्य करावचं लागेल..मला माहित आहे माझ्या भागातली  अनेक टुकार माणसंही मोठ्या पदावर जाऊन बसली. एका विशिष्ठ वर्गापुरतं मर्यादीत असलं नेतृत्व शिवसेनेच्या माध्यमातून उदयाला आलं..नंतर त्यांचं काय झालं..तेही काँग्रेसच्या वाटेनं कसे गेले हा चर्चेचा वेगळा विषय आहे..पण महाराष्ट्रात राजकारण हे तळागाळापर्यंत पोचवण्यात बाळासाहेब ठाकरेंचा सिंघाचा नव्हे तर वाघाचा वाटा आहे..

शिवसेनेचा जन्म मुंबईतला..आणि मुंबईत आवाज फक्त शिवसेनेचाच चालतो हे आम्ही तेव्हा पहात एकत होतो..त्यामुळं मुंबईच्या आकर्षणात शिवसेना या नावामुळं भर पडली.. त्यानंतर मी नोकरीनिमित्त अनेक वर्ष हैदराबादमध्ये होतो..वगवेगळ्या भाषेतली चॅनेल्स असलेल्या ईटीव्हीमध्ये असल्यामुळे तिथं भारताच्या वेगवेगळ्या भागातले सहकारी होते. त्यांची भाषा, संस्कृती, राजकारण यांच्यावर मोठ्या गप्पा व्हायच्या..माझे तर अनेक मित्र बिहार, उत्तर प्रदेश या भागातलेही होते..त्यांनाही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबदद्ल प्रचंड आकर्षण असायचं..त्यातले अनेकजण माझ्याकडून बाळासाहेब आणि शिवसेनेबदद्ल विचारत असत..त्यातल्या अनेकजणांमध्येही या दोन्हींबद्दल मोठे गैरसमज होते..पण संधी मिळेल तेव्हा ते गैरसमज दूर करण्याचा मी प्रयत्न केला..त्यातला अनेकांचा त्यामुळे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंबदद्लचा गैरसमज दूर झाल्याचं मला जाणवलं..एक ओरिसाचा सहकारी होता..त्या पठठ्याला तर बाळासाहेबांबद्दल प्रचंड आदर होता..अनेकवेळा बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिका मला पटल्या नाहीत पण हा पठठ्या मात्र बाळासाहेबांच्या कोणत्याच भूमिकेला विरोध करत नव्हता..त्याला सर्वकाही योग्यच वाटतं होते.. एवढा तो बाळासाहेब ठाकरेंचा चाहता होता..
 

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबदद्ल हे सर्व सांगण्याचं कारण हेच की ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी शिवसेना नावाची एक संघटना स्थापन करुन एक वेगळं व्यासपीठ, एक वेगळी दिशा घालून दिली ती आता मागे पडत चाललीय. शिवसेनेतेही अनेक बदल झालेत..नेतृत्वाची नवी फळी निर्माण करण्यात आलीय.. खरं तर शिवसेनेत नेतृत्व घडवली जात होती आता ती निर्माण केली जातात.. आवाज कुणाचा असं म्हणण्याची आज गरज नाही कारण शिवसेनेचा तो खरा आवाज केंव्हाच बंद झालाय.. आंदोलन म्हणाल तर त्यातही काही दम दिसत नाही.. फक्त टीव्हीवर आक्रमक बाईट देण्यानं किंवा भाषण ठोकण्यानं शिवसेनेचा आवाज बुलंद राहत नाही.. आतातर बंडखोरी ही तर काँग्रेसला लाजवेल त्यापेक्षा जास्त झालीय..एक काळ होता बंडखोरी म्हटलं की त्या नेत्यांची पाचावर धारण बसायची... पण नेतृत्वच दमदार राहिलं नाही तर कार्यकर्ते तर कुठून दमदार राहणार.. सगळ्यांना आता पद, पैसा याची लालसा निर्माण झालीय..त्यामुळंच मुंबईतल्या संपर्कनेत्यांच्या समोर आवाज मोठा करण्याची हिंमत आता कोणीही करतो. मुंबईतून नेतृत्व लादण्याची परंपरा आता इतर भागातल्या नेत्यांनाही रुचत नाही..घाम गाळून, पोलीसांच्या लाठ्या खाऊन, तडीपारी, केसेस झेलून ज्या तळागाळातल्या शिवसैनिकांनी ही शिवसेना वाढवली ती काँग्रेसच्या वाटेनं जाताना अनेकांना पाहवत  नाही..पण बाळासाहेबांनी उभी केलेली ही संघटना फक्त सत्तेच्या आणि पदाच्या आलसेनं संपत असेल तर ते वाईटच आहे..सत्तेच्या राजकारणाची चटक लागलेल्या शिवसेनेला आता सत्तेची भूक भागवायची आहे..त्यासाठी शिवसेनाही आता इतर राजकीय पक्षांसारखीच झालीय..शिवसेना पक्ष म्हणून संपेल असं मला तरी वाटत नाही पण पूर्वीची शिवसेना आता होणे नाही हेही सत्य आहे..शिवसेना पक्ष म्हणून वाढेल, पुढे जाईल किंवा नाही हे वेगळा भाग...पण बाळासाहेंबाची शिवसेना पुन्हा होणे नाही म्हणजे नाही..म्हणून बाळासाहेबांची शिवसेना आजही माझ्यासह अनेकांच्या मनात घर करुन आहे आणि ती राहिल..
 

Thursday, February 14, 2013

प्रेमाचा गावा जाऊ....म्हणजेच VALENTINE DAY


आज १४ फेब्रुवारी ..तरुणाईचा दिवस..प्रेम करणा-यांचा दिवस...पण आज प्रेमाच्या नावावर जे काही चाललय ते पहावत नाही..सगळेच काही तसे आहेत असं नाही पण जास्तीत जास्त प्रकरणात मात्र प्रेमाच्या नावाखाली काहीही चाललय असंच आहे..म्हटलं चला आज याच विषयावर काहीतरी लिहूयात..

१४ फेब्रुवारी हा प्रेमविरांचा आवडता दिवस..व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याचं हे फ्याड अलिकडच्या काही वर्षातच खूप माजलय..म्हणजे प्रेमाचा महिमा आत्ताच आलाय असं नाही. यापूर्वीही लोक प्रेम करतच होते. लांब कशाला आमच्याकडे हिर रांझा, लैला मजनू पासून ते अगदी वासू सपनापर्यंत कितीतरी अजरामर प्रेमकथा झाल्यात..इतिहासातच काय पूराणातही अनेक प्रेमकथा आहेतच की..मग हा १४ फेब्रुवारीच प्रेम साजरं करण्याचा दिवस मध्येच कुठून उपटला..? तो कोणी पाश्चिमात्य होता त्याच्या नावानं आपण का प्रेम दिवस साजरा करायचा..? आणि प्रेम व्यक्त करायला किंवा सेलिब्रेशनला हवा कशाला एकच दिवस ? वर्षभर दररोज प्रेम करा की, कोण अडवतं तुम्हाला...? पण प्रेमाच्या नावानं जो काही बाजार मांडलाय ना तो निंदनिय आहे. किती मोठाली अन् महागडी ग्रिटिंग कार्डस, काही गिफ्ट किंवा स्पेशल ट्रीटसाठी कशाला हवी पैशांची उधळपट्टी...! तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेवून झकास जाहीरातबाजी करायची आणि आपल्या तुंबड्या भरायची ही बाजारपेठ बंदच व्हायला हवी. ! त्याचा अर्थ प्रेमाला मी विरोध करतो असं नाही..पण त्याचं बाजारीकरण नको...


आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या तरी त्या ग्रिटिंग कार्डातल्या कोणितरी तिस-या व्यक्तीनं व्यक्त केलेल्या भावना काय तुम्ही पोचवता.. तुम्हाला स्वतः काही भावना नाहीत का..? त्याच तुम्ही सोप्या शब्दातही व्यक्त करु शकता ना.. मग कशाला हवा हा बिनकामाचा थाट.. त्यातून पैशाची उधळपट्टीच होतेय..ती थांबली पाहिजे.. तुम्ही जर एकमेकावर खरं प्रेम करत असाल तर ह्या बाजारू वस्तूंना काडीचीही किंमत नाही..त्या फक्त तुम्ही तुमच्या डोळ्यातूनही व्यक्त करु शकता.. दुसरं म्हणजे सध्या कॉलेजमधली तरुणाई आहे ती या दिवसाचा उपयोग कोणालातरी प्रपोज करण्यासाठी करतात.. त्यातून होकार-नकार जो काही येवो त्यातून ह्याचं प्रेम वगैरे सुरु होतं म्हणे..! १४ फेब्रुवारी काय प्रेमाचा मुहुर्त आहे काय...? आणि या १४ फेब्रुवारीला प्रपोज केलेलं किती दिवस टिकतं..? त्यामुळे प्रेमकरण्यासाठी असा काही दिवस वगैरे ठरवण्याची गरज नाही.. प्रेम करा वर्षभर, त्यासाठी १४ फेब्रुवारीसारखं पाश्चिमात्याचं अंधानुकरण करण्याची काही गरज नाही...
 

प्रेम कसं असतं हे कवीच्याच शब्दात सांगायचं झालं तर मंगेश पाडगावकरांची कविता आपण कितीतरी वेळा वाचलीय-ऐकलीय...त्यात आहेच की प्रेमाचा अविष्कार...हेच पहा पाडगावकर काय म्हणतात ते...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं ! “

पाडगावकरांच्या या काही ओळीच सांगून जातात ना प्रेमाची महती काय आणि कशी आहे ती. पाडगावकर म्हणातात तसं अगदी मराठीतूनही प्रेम व्यक्त करता येतच की..त्यांनी त्यांच्या या कवितेतून काही १४ फेब्रुवारीचा मुहुर्त नाही सांगितला..तरीही प्रेमानं भरलेले आणि ऐकणा-याला भारावून टाकणारेच शब्द आहेत ते...


आणि प्रेम म्हणजे काय तर दोघांमध्ये आपलेपणाची भावना असली पाहिजे, परस्परांवर विश्वास असला पाहिजे, कोणत्याही परस्थितीत एकमेकाला साथ देता आली पाहिजे. नुसतं I LOVE U म्हणून किंवा डेटिंग करुन काही प्रेम वगैरे होतं नसतं. ते असतं फक्त तरुण वयातलं शारिरिक आकर्षण. त्यात कुठे दिसते उत्कट प्रेमाची भावना ? माझं हे लिखाण अनेकजणांना आवडणार नाही, पण हि वस्तूस्थिती आहे. नाहीतर १४ फेब्रुवारीला जिला प्रपोज करता तिचा नकार येताच तिच्यावर ऍसिड हल्ले झाले नसते. नकार दिला म्हणून त्या मुलीला बदनाम करण्याचे प्रकार झाले नसते..तुमच्या आजूबाजूला बघा कितीतरी उदाहरणं सापडतील तुम्हाला अशा प्रकारची. मग हा कसला व्हॅलेंटाईन..? हे कसलं प्रेम.? प्रेमाची महती पाडगावकरांच्या याच कवितेत पहा काय सांगितलीय ती...

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं

या भावनाच प्रेम आहेत. त्या ज्यांच्यात असतात त्यांना गरज नसते कोणत्याही बाजारू प्रदर्शनाची आणि व्हॅलेंटाईनची...

तरी सुद्धा मी म्हणतो प्रेम करा..नाहीच जमलं तर प्रेम करणाऱ्यांना करु द्या..फक्त त्याचं उदात्तीकरण होऊ देऊ नका.त्यासाठी बाजारातल्या भेट वस्तूंची नाहीतर तुमच्या विश्वासाची, समर्थ आणि भक्कम आधाराची, योग्य साथ देण्याची गरज आहे. ते कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ते आपल्यात असायला हवं. आपल्या जोडीदाराला तो विश्वास वाटला पाहिजे. ते कुठं एकावर एक फ्रि मिळत नाही किंवा ५० टक्के डिसकाऊंट मध्ये मिळत नाही. ते सर्वस्वी आपल्या मनात असतं तेच व्यक्त करा...आणि कवी कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर....

मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला. . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..

बसं एवढचं...

प्रेमाच्या बदलेल्या या व्याख्या आणि त्याचे परिणाम यावर प्रकाश टाकण्याचा केलेला आहे एक प्रयत्न आहे..तो काहींना आवडणारही नाही पण सत्य हेच आहे. फक्त ते पाहण्यासाठी डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे...बाकी सगळं सेमच आहे..

(मी हा ब्लॉग मागच्या वर्षी 14 फेब्रुवारीला लिहीला होता..आज पुन्हा त्याची आठवण झाली म्हणून पुन्हा हा ब्लॉग प्रपंच....)