Wednesday, April 9, 2014

राज ठाकरेंचं चाललय तरी काय ?

 
 
 
लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढवणार का नाही याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली पण मोजक्याच जागांवर उमेदवार उभे करून त्यांना काय साध्य करायचंय हे स्पष्ट झालेलंच आहे. शिवसेना हाच आपला नंबर एकचा शत्रू आहे हे राज ठाकरे यांनी जाहीरच केलय. केवळ शिवसेनेचे उमेदवार पाडण्याच्या एकमेव उद्देशानं राज ठाकरे यांनी 10 उमेदवार दिलेत. त्यातला अपवाद फक्त पुणे आणि भिवंडी..या दोन ठिकाणी भाजपच्या उमेदवाराविरोधात मनसेचे उमेदवार आहेत. नरेंद्र मोदींबरोबरची मैत्री जाहीरपणे मान्य करायची, त्यांना पाठिंबा द्यायचा आणि त्याचवेळी महायुतीतल्याच शिवसेनाला कट्टर विरोध करायचा हेच धोरण राज ठाकरेंनी अवलंबलय.
राज विरुद्ध उद्धव ठाकरे
मनसेला महायुतीत घेण्याचा भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण त्याला शिवसेना आणि विशेषतः उद्धव ठाकरेंनी विरोध केला. टाळीसाठी उद्धव ठाकरेंनी हात पुढं केला होता पण तेही फारसे गंभीर नव्हते. त्याला राज यांनी प्रतिसाद दिला नाही तो भाग वेगळा. दोन ठाकरे बंधूमधल्या तीव्र विरोधामुळे अखेर मनसेला महायुतीत जागा काही मिळाली नाही. त्यातच उद्दव ठाकरे यांनाच मनसे महायुतीत नको आहे असं सांगून भाजप नेत्यांनी आगीत तेल ओतलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनाला विरोध करण्यासाठी 10 उमेदवार उतरून राजकारण केलय..
मनसेचा फायदा कोणाला ?
राज ठाकरे महायुतीत जाणार का याची चर्चा दोन वर्षापासून सुरु होती. त्यातच शिवसेना आणि मनसेच्या दुस-या फळीतल्या नेत्यांनीही महायुतीत मनसे असावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण ते शक्य झालं नाही..मुळात राज ठाकरे यांचा काँग्रेसला सॉफ्ट कॉर्नर आहे असं बोललं जात होतं. मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून तरी असचं दिसलं. मनसेमुळे मुंबई आणि आसपासच्या अनेक जागांवर भाजप शिवसेनेला फटका बसला आणि त्याचा थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. आता मात्र मनसेच्या राजकीय खेळीचा आघाडीबरोबरच भाजपलाही फायदा होणार आहे.
 
मनसेचं टार्गेट फक्त शिवसेना
लोकसभेच्या यावर्षीच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेला टार्गेट केलंय. पण मागच्या काही सभांमधून ते ज्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर सडकून टीका करत होते. तशी टीका त्यांनी केलेली नाही. अगदी काँग्रेसवरही फारच सौम्य टीका केलीय. अजित पवार आणि आर. आर. तर राज ठाकरेंचं खास गि-हाईकच, पण ते यावेळी होताना दिसत नाही. त्यातच शरद पवारांनी राज ठाकरेंची स्तुती केलीय. यातून महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्याआड वेगळीच जमवाजमव झाल्याचं दिसतय. राज ठाकरे यांचा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला सॉफ्ट कॉर्नर तर शिवसेनाला प्रखर विरोध..राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सभांतून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. तर भाजपचं आतून राज ठाकरे प्रेम हे सर्वश्रुत झालय. त्यामुळे महाराष्ट्रात तरी शिवसेनाला टार्गेट करण्यावर सर्व पक्षांनी भर दिलाय.
नवे राजकीय समिकरण!
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राज ठाकरे आणि भाजप यांच्यात काही राजकीय बेरीज झाली तर नवल वाटायला नको. तसंही राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी मित्र नसतो तसा शत्रूही नसतो...