Saturday, August 25, 2012

राज ठाकरेंचा झंझावात


महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मंगळवारी 21 तारखेला जो मोर्चा काढला त्यानंतर राज्यातील राजकीय चित्र ढवळून निघालाय. 11 ऑक्टोबरला आझाद मैदानावर ज्या काही मुस्लीम संघटनांनी नंगानाच केला. पोलिसांवर हल्ला केला, महिला पोलिसांचा विनयभंग केला, गाड्या जाळल्या, प्रसार माध्यमांच्या ओबी व्हॅन जाळल्या. एवढ्यावरच्या हे आंदोलक थांबले नाहीत तर तिथं असणाऱ्या अमर जवान ज्योतीला लाथेनं उडवून लावलं.. हा सगळा धुडगुस घातला तेव्हा मुंबई पोलीस तो उघड्या डोळ्यांनी पहात होते. खरं तर हा मोर्चा ज्या रझा अकादमीनं आयोजित केला होता त्यांची पार्श्वभूमी सरकारला माहित होती. हिंसक कारवाया करण्यात त्यांचा सहभाग आहे हे पोलिसांना माहित होतं. त्यांच्या मोर्चाला मुळातच परवानगी द्यावयास नको होती, पण ती दिली. त्यावरही कहर म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा अहवाल होता की आंदोलक मंडळी हिंसक कारवाया करणार आहे, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. त्यावरुन राज्यात असंतोष माजला. लोकांच्या मनात चिड निर्माण झाली. कारण एवढा सगळा नंगानाच घातल्यानंतरही कारवाईच्या बाबतीत मात्र सरकार शांत राहिलं. बघु करु अशी भूमिका घेतली गेली, त्यावरुन लोकांच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला. राजकीय पक्षांनीही कारवाईची मागणी केली..पण सरकार आणि गृहमंत्री आर आर पाटील मात्र कारवाईच्या बाबतीत थंडच राहिले..या सर्व प्रकारावर आर आर पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांची भूमिका संशयास्पद राहिलीय..

रझा अकादमीनं घातलेला हिंसक गोंधळ, त्यात पोलिसांवर हल्ला, अमर जवान ज्योतीचा अपमान हे अवढं सगळं होऊनही आर आर पाटील कारवाई करण्याएवजी विरोधकांनाच दोष देत राहिले.. राज ठाकरे यांनी हाच मुद्दा घेऊन आर आर पाटील आणि पटनायक यांच्यावर थेट हल्लाबोल केला..राजीनामा द्या ह्या मागणीसाठी त्यांनी 21 तारखेला मोर्चा काढला...ह्या मोर्चाला मात्र पोलिसांनी कायद्याचा किस पाडत परवानगी नाकारली. पुन्हा अल्पसंख्याक समाजाची बाजू घेतल्याचं स्पष्ट झालं.फक्त आझाद मैदानावर सभा घेण्यास परवानगी दिली. त्यासाठी जवळपास 15 हजार पोलिस बंदोबस्ताला ठेवले..म्हणजे 11 तारखेला जी खबरदारी घ्यावयास हवी होती ती घेतली नाही मात्र मनसेच्या मोर्चात अडथळे आणण्यासाठी एकही संधी सोडली नाही. यावरुनही लोकांच्या रागाचा पारा चढला होता. पोलीसांच्या परवानगीची वाट न पाहता राज ठाकरेंनी मोर्चा काढला. त्यांनी सरकारला शिंगावरच घेतलं..तो मोर्चा आणि सभेची गर्दी पाहून राजकीय पक्ष अचंबितच झाले. एक लाख लोकांचा मोर्चा आणि सभा घेऊन राज ठाकरेंनी मोर्चा कसा काढावा हेच दाखवून दिलं. या सभेतून आणि मोर्चातून राज ठाकरेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. आझाद मैदानावरच्या सभेत अवघ्या 15 मिनीटाच्या भाषणात त्यांनी आर आर पाटील, अरुप पटनायक ह्यांच्यावर हल्ला तर चढवलाच पण त्यांचं लाडकं पेटंट अबु आझमीलाही त्यांनी शिव्या घातल्या. रामदास आठवलेंसह सर्वच दलित नेत्यांनाही त्यांनी झोडपून काढलं..तर दुसरीकडं पोलिसांची बाजू पूर्णपणे उचलून धरली, प्रसारमाध्यमांची बाजू घेतली, सर्व विरोधी पक्षांवर कडी केली आणि सरकारला जो विरोध केला पाहिजे तो कसा करावा हे दाखवून दिलं..मुस्लीम समाजकंटांवर हल्ला चढवत आपला मोर्चाही हळूहळ हिंदुत्ववादी नेता अशी करुन दिली..आपला धर्म हा महाराष्ट्र धर्म म्हणत त्यांनी जरी हिंदुत्वाची वाट धरल्याचं सरळ सरळ मान्य नाही केलं तरीही त्यांनी ज्या पद्धतीनं हा सगळा पट मांडला तो हिंदुत्ववाद्यांना तर नक्कीच भावलाय..

राज ठाकरेंनी ह्या मोर्चातून अरुप पटनायक आणि आर आर पाटील यांनाच टार्गेट केलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अरुप पटनायक यांची बदली करण्यात आली..त्यांना महासंचालकपदी बढती दिली असली तरी मुंबईचं आयुक्तपद गेलंच..आता लक्ष्य फक्त आर आर पाटील..कदाचित येत्या काही दिवसात हे प्रकरण थोडं शांत झाल्यानंतर आर आर पाटलांचाही राजीनामा किंवा खातेबदल झाल्यास नवल वाटायला नको..एक मात्र खरं राज ठाकरेंनी आपली ताकद दाखवून दिली..मीच सरकारला अंगावर घेऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. लाखाचा मोर्चा काढून इतर विरोधी पक्षांना म्हणजे शिवसेना, भाजपलाही त्यांनी त्यांची ताकद किती आहे हे दाखवून दिलं.. 2014 च्या निवडणुकींची ही सुरुवात आहे. आपला रस्ता काय आहे हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलय. पोलीसांमध्ये सहानुभूती निर्माण करुन, प्रसार माध्यमांनाही त्यांनी आपण तुमचे तारणहार आहोत हे जसं त्यांनी दाखवून दिलं. तसच अबु आझामी, दलित नेत्यांना टार्गेट करत अल्पसंख्याक समाजाला आपल्याकडे या अन्यथा तुमची गरज नाही हेही दाखवून दिलं. मुस्लीम आणि अबु आझमींना दणका देत हिंदुत्ववाद्यांनाही त्यांनी चुचकारलंय अर्थात त्यामुळे संघ आणि हिंदुत्ववाद्यांच्या मनात राज ठाकरेंनी घर केलंय. ह्या सर्वांचा परिणाम आगामी निवडणुकीत मनसेला होणार हे नक्की..फक्त हा राजकीय सारीपाट राज ठाकरे पुढच्या काही महिन्यात कसा रंगवतात त्यावर त्यांची राजकीय भिस्त असणाराय. पण त्यांनी आता टाकलेले फासे जर असेच पडले तर मनसे आणि राज ठाकरेंना मोठा राजकीय फायदा होणार हे मात्र आत्ताच पक्कं झालय.

Sunday, August 19, 2012

विलासराव देशमुख- एक उमदं नेतृत्व हरपलं..

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं १४ ऑगस्टला चेन्नईत ग्लोबल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना ह्रदय विकाराचा झटका येऊन निधन झालं..विलासरावांवर या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याअगोदर विलासराव देशमुख यांच्यावर पंधरा दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण प्रकृती गंभीर बनल्यानंतर त्यांना तातडीनं चेन्नईला हलवण्यात आलं.. विलासराव देशमुख यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. तसच त्यांच्या दोन्ही किडन्याही खराब झाल्या होत्या. विलासराव देशमुख यांना व्हँटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं कठिण झालं होतं. त्यांच्यावर यकृतरोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण शेवटी १४ तारखेला त्यांची प्राणज्योत मालवली... 
विलासराव देशमुखांचे निधन

विलासराव देशमुख यांची प्रकृती ठीक नसल्याची चर्चा मागच्या वर्षभरापासून सुरु होती. पण त्यांचा आजार एवढा गंभीर असेल असं वाटलं नव्हतं..त्यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात खरचं पोकळी निर्माण झालीय. विलासराव देशमुख यांनी वसंतराव नाईकांनंतर सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवलय. दोन टर्ममध्ये त्यांनी राज्याचं नेतृत्व केलय. नेहमी हसतमुख चेहरा, मिश्किल स्वभाव, फरडा वक्ता आणि कार्यकर्त्यांशी जोडलेला नेता अशी त्यांची ख्याती होती...
लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री हा सर्वच प्रवास विलासराव दगडोजी देशमुख यांनी एका देशमुखी ऐटीत आणि दिमाखात केला. ही कारकीर्द सरळ एका रेषेत कधीच नव्हती. पण विलासराव मात्र सदैवच दिलखुलास राहिले.
विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले. नंतर युवक काँग्रेसच्या राजकारणातून त्यांची खूप झपाट्याने प्रगती झाली. तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य असं करीत करीत ते १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. पंचायत समितीचा उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली होती. तेव्हा ते कधी सायकलवर तर कधी एसटीनंही प्रवास करुन कार्यकर्त्यांची कामं करत.. 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

देशमुख यांची दोस्तीही खूपच गाजली..सुशिलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांना तर राजकारणात दो हंसो का जोडा असं म्हटलं जायचं..विलासराव देशमुख यांचं निधन झाल्याची माहिती लोकसभेत देताना सुशीलकुमार शिंदे यांनाही गहिरवरुन आलं होतं. स्वतः शिंदेसाहेबांनी एक हंस सोडून गेला अशी प्रतिक्रीया दिल.. तर गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षाचे नेते असूनही त्यांच्याशी विलासराव देशमुख यांची खास दोस्ती होती. गोपीनाथ मुंडे यांची आणि त्यांची दोस्ती पुण्यापासूनची. त्यांची कारकीर्दही समांतरच. मुंडेंनी विलासरावांच्या लगतच्या मतदारसंघातून पहिली विधानसभा लढवली ती १९८० साली.. दोघेही एकदा एकदा पराभूत झालेत. त्यानंतर दोघेही दिल्लीच्या राजकारणात गेले.. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद दिलं. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिलं नाही. पुढे १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
मराहाष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे विलासराव देशमुख हे आवडते शिष्य होते. दोघेही मराठवाड्याचे तर होतेच पण शरद पवार यांना असलेला विरोध हेही त्यांचं समान सूत्र होतं. ते शेवटपर्यंत कायम राहिलं. शरद पवार यांना रोखू शकणारा आणि महाराष्ट्रव्यापी प्रभाव असलेला सध्याचा एकमेव नेता म्हणजे विलासरावच होते. त्यामुळेच स्वतंत्र राष्ट्रवादी स्थापन होऊन पहिलं आघाडीचं सरकार चालवण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विलासरावांकडेच नेतृत्व दिलं. १३ ऑक्टोबर १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि २००४ च्या निवडणुकीनंतर दुस-यांदा ते मुख्यमंत्री झाले.
विलासराव देशमुख हे निव्वळ राजकारणी नव्हते. वडिल दगडोजी यांच्याकडून शास्त्रीय संगीताच्या उत्तम जाणकारीचा वारसा त्यांना लाभला होता. मराठी पुस्तकं असोत की नाटकं त्यांचे ते उत्तम भोक्ते रसिक होते. त्यांचं लावणीचं प्रेमही असंच रसिक होतं. त्यामुळे सर्वच कलाकाऱांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बहुरंगी आणि बहुश्रुत व्यक्तिमत्वामुळे त्यांचं वक्तृत्व हेही प्रसन्न आणि उमदं होतं. त्यामुळेच ते मुख्यमंत्री असताना काही नाराज आमदार त्यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करीत असल्याबद्दल त्यांना कधी विचारलं तर ते सहजपणे सांगत की, पूर्वी मी नुसता मंत्री असताना हेच करायचो. त्यामुळे आता नवीन लोक ते करीत असतील तर त्यात काही विशेष नाही.
१९९५ साली शिवाजीराव कव्हेकर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन शिवसेनेच्या मदतीने विधानपरिषदेवर येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकानं निवडून येऊन ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या गेल्या दहा वर्षांतल्या कारकीर्दीचा आलेखही असाच वरखाली होत राहिला. गेल्या पाच वर्षात मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचा झालेला आरोप, दिलीप सानंदा प्रकरणी उच्च न्यायालयानं ठोठावलेला दंड, आदर्श प्रकरणी निर्माण झालेला संशय, सुभाष घई यांना जमीन देण्यावरून न्यायालयानं ओढलेले कडक ताशेरे यामुळे त्यांची कारकीर्द झाकोळली गेली. पण तरीही त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी काँग्रेसला मुंबईतून जी भक्कम राजकीय आणि आर्थिक रसद मिळवून दिली त्याची पोचपावती म्हणून ते पक्षश्रेष्ठींनी त्यांना दूर केले नाही.
विलासराव आजारी असल्याचं राजकीय वर्तुळात सर्वांना ठाऊक होतं. पण हे आजारपण इतकं गंभीर होईल आणि ६७ व्या वर्षी एका चतुरस्त्र नेत्याचा अंत होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं...विलासराव देशमुख एवढे मोठे नेते होते की त्यांच्या अंत्ययात्रेला बाभळगाव या गावात दहा लाखांचा जनसागर लोटला होता. पंतप्रधान, सोनिया गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री यांच्यासह व्हीव्हीआयपींचीच संख्या शेकडयांच्याही वर होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तर दोन किलोमिटर चालत जावं लागलं तर इतर व्ही आयपींनाही मोटारी सोडून पायी चालतच जावं लागलं..लातूरला १५ तारखेला ५४ विमानं आली होती. यासह हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं.. त्यांच्या जाण्यानं सामान्य कार्यकत्यालाही आपला नेता गेला असच वाटत होतं..
लातूर पोरके झाले