Wednesday, August 31, 2011

पिस्ता हलिम




















हैदराबादची बिर्याणी हे या शहराच्या खाद्य संस्कृतीची ओळख आहे..मुंबई म्हटलं की जसा वडापाव समोर येतो तसं हैदराबाद म्हटलं की बिर्याणी ही आलीच. हैदराबादला कोणी आला आणि त्यानं बिर्याणीची चव चाखली नाही असं होत नाही.याच हैदराबादच्या खाद्य संस्कृतीत आणखी एका पदार्थाची भर पडलीय. ती म्हणजे हलीम..हैदराबादची बिर्याणी जशी लज्जतदार आहे तसच हलीम...हलीम हा फक्त रमजानच्या महिन्यातच मिळतो. हलीम चिकन किंवा मटनपासून बनवला जातो. याची पाककृती मोठी आहे..पण या हलिममध्ये तुप आणि सुकामेव्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. तो बनवायलाही खूप वेळ लागतो. विशेषतः जुन्या हैदराबाद शहरात जर तुम्ही रमजानच्या महिन्यात फेरफटका मारला तर तुम्हाला त्याची खाशियत कळेल..संध्याकाळ झाली रे झाली की हलीमसाठी उड्या पडतात. अनेक छोट्या मोठ्या हॉटेल आणि स्टॉलच्याबाहेर मोठी गर्दी लागलेली असते..पिस्ता हलिम हे हैदराबादच्या हलिमचा मोठा ब्रँड. ह्या ब्रँडचा हलीम अरब देशातही पाठवला जातो. शहरात अनेक छोट्या मोठ्या हॉटेलसह, चौका चौकात तुम्हाला पिस्ता हलिम मिळेल..पण त्याची किंमत थोडी जास्तच म्हणावी लागेल. साधारणपणे ३५० ग्रॅमच्या हलिमची किंमत ८० रुपये एवढी आहे. पण लज्जतदार हलिम खायचा तर खिशाला थोडा भार हा सोसावाच लागेल..शेजारचा हलिमचा फोटो पाहिला तर तुमच्या तोंडाला पाणी आलं नाही असं होणार नाही.. त्यामुळे एखादवेळी८० रुपये मोजायला हरकत नाही..यावर्षी मात्र हलिमची विक्री कमी झालीय. त्याचं कारण म्हणजे रमजान आणि श्रावण एकत्रच आले..श्रावणात बहुसंख्य हिंदू लोक मांसाहार करत नाहीत..कारण हलिम खाण्यात फक्त मुस्लीम बांधव आहेत असं नाही तर हलिम खाणाऱ्यांमध्ये जवळपास ४० टक्के लोक हे हिंदू आहेत आणि कितीही पट्टीचा मांसाहार करणारा असला तरी श्रावण पाळतोच...यापुढे जर हैदराबादला भेट देण्याची विचार झाला आणि रमजानचा महिना असेल तर जरुर एकदा हलिमची चव चाखाच..

1 comment: