Monday, January 2, 2012

हैदराबादी बिर्याणी
हैदराबाद म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चारमिनार, सालारजंग म्युझीयम, बिर्ला मंदीर, गोवळकोंडा किल्ला आणि रामोजी फिल्म सीटी.. हैदराबादला आलेला प्रत्येकजण या सर्व ठिकाणांना किंवा यापैकी काही ठिकाणी भेट देतो...पण भेटीच्या कार्यक्रमात जेवणाचा बेत असतोच.. मग काय हैदराबादची खासीयत आहे ती बिर्याणी..हैदराबादी बिर्याणी म्हणून तिचा मोठा लौकिक आहे.. हैदराबादच्या लहान मोठ्या सर्व हॉटेलमध्ये बिर्याणी मिळते.. तसं पाहिलं तर बिर्याणीचे २६ प्रकार आहेत असं म्हणतात. पण हैदराबादमध्ये चिकन बिर्यामी, मटन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी हे प्रकार सर्रास पहायला मिळतात..आता त्यातही अनेक प्रकार जोडले गेलेत तो भाग वेगळा. पण हैदराबादच्या बिर्याणीची चव खास हैदराबादी आहे. ती बनवण्याची पद्धत आणि त्याला असललेला एक विशेष हैदराबादी टच हीच त्या बिर्याणीची खासीयत.. अगदी ५० रुपयापासून ही बिर्याणी मिळते..म्हणजे चांगल्या दर्जाच्या हॉटेलमध्ये गेलात तर जवळपास १०० रुपयाच्या पुढे या बिर्याणीची किंमत आहे..काही हॉटलमध्ये तीची किंमत ३००-४०० रुपयेही आहे. पण लहान हॉटेलमध्ये तुम्हाला सिंगल बिर्याणी मिळते. त्यामुळे पन्नास-साठ रुपयातही काम भागते...


हैदराबादमध्ये बिर्याणी ही सगळीकडे मिळते..पण तुम्हाला जर जुन्या हैदराबादची सफर करायची असेल किंवा चारमिनारच्या भागात तुम्ही फेरफटका मारत असाल आणि जेवण्याचा बेत असेल तर त्याच भागात असलेल्या शादाब किंवा मदिना हॉटेलला जरुर भेट द्या.. या दोन्ही हॉटेलमध्ये बिर्याणी उत्तम प्रतिची मिळते.. पूर्वी मदिना हॉटेलचा बोलबाला असायचा पण सध्या त्याची रौनक काहीप्रमाणात कमी झालीय...पण बिर्याणीचा आस्वाद मात्र तोच आहे..त्याशिवाय बावर्ची, कॅफे बहार, अशा हॉटेलमधूनही तुम्हाला उत्तम दर्जाची चविष्ट बिर्याणी मिळते... आणि तुम्ही जर सिंकदराबाद भागात असाल तर पॅराडाईज हॉटेलला भेट देण्यास विसरू नका...तुम्हाला बिर्याणीचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेता येईलं.. ही काही बोटावर मोजण्याएवढी नावं आहेत..पण हैदराबादच्या कोणत्याही भागात गेलात तरी तुम्हाला बिर्याणी मिळतेच मिळते..तुम्ही जर चार-पाच जण किंवा जास्तजण असाल तर अगदी फॅमिली पॅकही मिळतो..


हैदराबादच्या बिर्याणीचा इतिहासही हैदराबाद शहराएवढाच जुना म्हणजे जवळपास ४०० वर्षाचा आहे.. निजामाच्या किचनमध्ये बिर्याणीला पहिलं आणि मानाचं स्थान होतं. त्यामुळेच त्या बिर्याणीचा थाट आजही नवाबी दिसतो.. ह्या बिर्याणीएवढाच तिचा इतिहास ही रंजक आहे. मोघल आक्रमणाबरोबर बिर्याणीही भारतात आली असं म्हणतात. तैमूर लंग यानं भारतावरच्या आक्रमणाबरोबच त्यांचं खाद्य असलेली बिर्याणी भारतात आणली असं म्हणतात.. त्यानंतर मोघलांच्या मोहिमांबरोबर ही बिर्याणीही भारताच्या अनेक भागात पोचली.. पण तिचं अस्तित्व आणि थाट जपला आणि जोपासला गेला तो हैदराबादमध्ये.. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणीला निजामाच्या जेवणात पहिलं स्थान असायचं पण निजामाचे जे सावकार होते ते महाजन हिंदू होते. ते मांसाहार करत नसत त्यामुळे त्यांच्यासाठी खास शाकाहारी बिर्याणी बनवली जायची असं म्हणतात...असा हा रंजक इतिहास असलेली खास हैदराबादी बिर्याणी तुमच्या तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही...त्यामुळे हैदराबाद भेटीत एक डाव बिर्याणीचा....

3 comments:

  1. हैदराबादची बिर्याणी लय भारी...
    एक डाव बिर्याणीचा होणारच राव..
    राधेश्याम पवार, सातारा

    ReplyDelete