Friday, November 25, 2011

हैदराबादची कामत जवार रोटी




हैदराबाद म्हटलं की जेवणाच्या मेनूत सर्वात वरचं स्थान असतं ते हैदराबादी बिर्याणीचं...या बिर्याणीवर मी लिहिणारच आहे.. पण आज मी हैदराबादच्या काही विशेष मेनूवर लिहिणाराय....सुरवातीला कामत हॉटेल मधल्या जवार रोटी यावर..... खरं तर आज ह्याच मेनूवर लिहिण्याचा माझा उद्देश आहे...हैदराबादमध्ये मी आता जवळपास १२ वर्षापासून राहत आहे.. मुळात महाराष्ट्राचा आणि त्यातच सोलापूरचा असल्यामुळे ज्वारीची भाकरी हा माझा जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय... सोलापूर हे तर ज्वारीचं कोठारचं आहे...त्यातच कर्नाटक लागूनच असल्यामुळे तिथंही ज्वारीची कडक भाकरी आणि दही हा मेनू सर्रास असतोच..गावाकडंतर ज्वारीची भाकरी हेच मुख्य अन्न..पण शहरीकरणामुळे ज्वारीची भाकरी थोडी मागं पडलीय...पण जाऊ द्या त्यावर नंतर बोलू....मी सांगत होतो ते हैदराबादमधल्या कामत जवार रोटीबद्दल...अबीड्स, नामपल्ली, कोटी या भागात जर तुम्ही कधी गेलात तर या परिसरातच रामकृष्ण थिएटर आहे.. त्याच्या कॅम्पसमध्ये तुम्ही गेलात की कामतची तीन हॉटेल्स तुम्हाला दिसतील.. त्यात रामकृष्ण ३५ एम एम थिएटरच्या बाजूला वरच्या मजल्यावर हे जवार रोटीचं हॉटेल आहे.. हॉटेल स्वच्छ आहे.. कसलाही गोंगाट नाही...मेनूही एकच.. ज्वारीची भाकरी...तुम्ही ऑर्डर देताच टेबलवर सर्वात अगोदर केळीचं मोठं पान येतं, त्यानंतर एका पाठोपाठ वाढपी म्हणजे वेटर्स...ते एकामागून एक सर्व पदार्थ तुमच्या पानावर वाढतात..सुरवातीला बेसण म्हणजे पिठलं, नंतर वांग्याची भाजी त्यानंतर पात असलेला कांदा किंवा कच्ची मेथीची भाजी तोंडी लावायला येते...मग येते गरम गरम ज्वारीची भाकरी त्यासोबत बटर.. एवढं सगळं समोर आल्यावर भाकरीला बटर लावून गरमागरम भाज्यांवर तुटुन पडण्याचा मोह मात्र आवरत नाही...त्याचवेळी ताकाचा एक ग्लासही मिळतो..सर्व भाज्या कशा स्वच्छ..मसाल्यांचा वापर खूपच कमी.. तिखट वगैरे काही नाही...अस्सा हा साग्रसंगित गावरान पण तेवढाच शहरी टच असलेला मेनू समोर असल्यावर पाच सहा भाकरी सहजच जाणार हे काही सांगायला नको.. हे माझ्या जेवणाचा अंदाज सांगतो हं.... प्रत्येकाचं लिमिट वेगळं वेगळं....काहीजण तर दहा भाकऱ्याही सहज फस्त करतात... असो...त्यानंतर पांढरा भात त्यावर साचूक तुपाची धार आणि गरम वरणाची धार..आहाहाहा.....काय बेत असतो म्हणून सांगू.. मग काय कोणीही तुटन पडणार नाही तर मग काय.....एवढं सगळं संपल्यानंतर मग बिल येणारच...पण बिलाबरोबर एक केळी आणि खायच्या पानाचा विडा ही इथली खासीयत बरं का...
एवढा सगळा साग्रसंगीत जेवणाचा बेत झाल्यानंतर खिशाला थोडा खड्डा पडणारच..पण घाबरू नका सध्या ही डिश शंभर रुपयाच्या पुढे आहे.. इतर हॉटेलमधल्या बिलापेक्षा जास्त नाही...पण शहरी टच आणि कामतची स्वच्छता लाभलेला हा गावरान मेनू चाखालया....म्हणजे त्यावर ताव मारायला काय हरकत आहे...सुट्टीच्या दिवशी तुम्ही जर कोटी-अबीड्सच्या भागात गेलात, पिश्चर पहायची लहर आली तर रामकृष्णमध्ये पिश्चर, त्यानंतर कामत जवार रोटी हा बेत आखायला चांगला आहे... कोणाली ट्रीट द्यायची असेल...एखाद्या मैत्रिणिबरोबर जायचं असेल तर हे ठिकाण आणि मेनू वाईट नाही..स्वताच्या बायकोलाही घेऊन जायला हे ठीकाण छान आहे...मग काय.. होऊन जाऊद्या एकदा कामत जवार रोटीचा बेत....
( पुढच्या वेळी हैदराबादमधल्या आणखी काही विशेष मेनू असलेल्या हॉटेलवर लिहिण्याचा प्रयत्न करेन..तोपर्यंत रामराम...)

अण्णा ! जरा जपून बोला...




जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी त्यांच्या बोलण्यानं या आठवड्यात पुन्हा वाद निर्माण केले..अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधातल्या लढ्यामुळे त्यांची ख्याती देशभरातच नाहीतर जगाच्या पाठीवरही पोचलीय...पण कधी कधी अण्णा स्वतःच्याच बोलण्यानं टीकेचे धनी होतात...त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे..अण्णांचा लढा मोठा आहे..त्यांच्यामुळे राज्यात काही कायदे झाले, माहितीचा अधिकार हा कायदा आला..त्यांनी केलेल्या अनेक उपोषणाला यश आलं.. हे सर्व मान्य असलं तरीही एवढ्या मोठ्या माणसानं बोलताना संयम बाळगावा हे त्यांना आता कोणीतरी सांगायला हवं..पण का कोण जाणो अण्णा स्वतःच स्वतःच्या बोलण्यानं वाद ओढवून घेतात...त्याचा पुन्हा प्रत्यय या आठवड्यात आला...तो शरद पवार आणि दारू पीणाऱ्यांना खांबाला बांधून फटके दिले पाहिजेत ह्या त्यांच्या दोन विधानानं...
शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत..राज्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे... त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल काही मतभेद असू शकतात...पण महाराष्ट्राच्या या मोठ्या नेत्याचा जेव्हा एका पंजाबी माथेफिरुनं त्यांच्यावर हल्ला केला...कृपाण काढून तो धमकावू लागला.. त्यांचा एवढा मोठा अपमान झाला..हा सारा प्रकार निषेध करण्यासारखाच आहे.. त्या माथेफिरुचं कोणत्याच बाबतीत समर्थन होऊ शकत नाही.. पण हा सारा प्रकार घडल्यानंतर अण्णा हजारे यांना पत्रकारांनी प्रतिक्रीया विचारली असता उपहास करत...एकच मारली का असा सवाल केला.. त्यावेळी तिथं जमलेले काही महाभाग हसलेही... खरं तर अण्णा हजारेंनी अशी प्रतिक्रिया देणं योग्य आहे का.. ?.पवारांशी त्यांचे काही मतभेद असतीलही म्हणून काय पवारांवर झालेल्या हल्ल्याचा असा उपहास करायचा....? काय अधिकार आहे अण्णा हजारेंना अशा प्रकारे प्रतिक्रीया देण्याचा..?.पण जेंव्हा त्यांची प्रतिक्रीया टीव्ही वाहिण्यांवर प्रसारित झाली त्यानंतर त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीकेची झोड उठली..त्यानंतर अण्णांच्या लक्षात ही बाब आली आणि आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याची सारवासारव केली..तसच प्रकरण अंगलट येतय असं लक्षात येताच माफी मागण्याची तयारी दाखवली....हे अण्णांना शोभणारं नाही....
दुसऱ्या एका प्रकरणात दारु पिणाऱ्यांना खांबाला बांधून मारलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं...दारूचे दुष्परिणाम असतात..त्याचं व्यसन ज्यांना लागलय त्यापासून त्यांना परावृत करणं हे महत्वाचं आहे..पण त्याला खांबाला बांधून फटके द्या असं म्हणण्याचा अण्णा हजारेला कोणी अधिकार दिला..? स्वतः गांधीवादी आहे असं म्हणायचं..अहिंसेचा मार्ग सांगायचा आणि स्वतःच हिंसक विधानं करायची हा काय प्रकार आहे...? मुळात या दोन्ही प्रकारात अण्णांना बोलण्याची गरजच नव्हती..पण प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्यानंतर जे होतं तेच अण्णा हजारेंचं होत आहे...मग काही हिंदुत्ववादी संघटना जेव्हा व्हॅलेंटाईन डे सारख्या प्रकाराला विरोध करत तरुण तरुणींना मारहाण करतात त्यांच्यात आणि या अण्णा हजारेंमध्ये फरक तो काय राहिला...? हा कसाला आलाय गांधीवाद..? त्यामुळे अण्णा जरी वयाने कीतीही मोठं असले तरी बोलताना थोडी काळजी घ्यायला नको का...पण नाही उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीप्रमाणं अण्णांची गत झालीय... त्यामुळे अण्णा...दुसऱ्याला उपदेश देण्यापूर्वी जरा जपून बोला.....नाहीतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले तसं हा कसाला गांधी हा तर वाकड्या तोंडाचा गांधी...असं लोकही म्हणतील.....
( या अगोदर मी माझ्या ब्लॉगवर अण्णा हजारेंच्या दिल्लीतल्या आंदोलनावर खूपच सकारात्मक बाजूनं लिहिलंय..पण त्यांची आत्ताची बेताल वक्तव्यं टीका करण्यासारखीच आहेत...त्यामुळे हा ब्लॉग लिहणं मला भाग पडलं.. )

Thursday, November 17, 2011

कापसाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचे हाल...




ऊसाला दर वाढवून द्यावा यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी केलेल्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता कापसासाठी राज्यभर वणवा पेटलाय. कापसाला सहा हजार रुपये भाव द्यावा यासाठी हे आंदोलन सुरु आहे.. ही मागणी रास्तच आहे.. कारण सध्या केंद्र सरकारनं कापसाला ३३०० रुपये हमी भाव जाहीर केलाय. हा हमी भाव कमी आहे.. त्यामुळे भाव वाढवून देण्याची मागणी केली जातेय..त्यासाठी कापूस उत्पादन घेतलं जाणारा मराठवाडा विदर्भ या पट्ट्यात या आंदोलनाचा जोर आहे..या आंदोलनात हिरीरीनं भाग घेतलाय तो शिवसेना, भाजप आणि इतर काही राजकीय पक्षांनी..त्याचं कारण आहे राज्यात होत असलेल्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका..त्यामुळे गावाकडच्या या राजकारणचं धुमशान जिंकायचं असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही..त्यातच ऊसाच्या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रात यश आलय. उस आणि साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्राची राजकीय ताकद आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं राष्ट्रवादीच काय काँग्रेस आणि शिवसेना, भाजप आणि नवख्या मनसेलाही परवडणारं नव्हतं म्हणून त्यांनी २०५० रुपयाचा भाव देऊन हे प्रकरण मिटवलं..तोच धागा पकडून कापसाचा प्रश्न हाती घेण्यात आलाय..या आंदोलनामागचं राजकारण थोडं बाजूल ठेऊयात...पण शेतकऱ्यांचा ऊस असो कांदा असो कापूस वा कोणत्याही पिकाला योग्य भाव मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे..नकदी पिकाचा विचार करता ऊसाला जो काही भाव मिळत आलाय त्यात शेतकऱ्याचा तोटा होत नाही..पण इतर पिकांचं काय.. कांदा तर शेकऱ्याचा नेहमीच वांदा करतो... पण या तिन मुख्य पिकावरुन राजकीय गणितं बांधलेली आहेत..म्हणून वेळीवेळी या पिकाच्या भावासाठी आंदोलनं केली जातात...त्याला काही वेळेला यश येत गेलय..पण नेहमीच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करण्याची वेळ का यावी...शेतकरी हा सुद्धा उत्पादकच आहे..पण इतर उत्पादकाप्रमाणे त्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही..हाच मुळात कळीचा मुद्दा आहे..शेतीमाल हा जगाच्या पाठीवरचा एकमेव उत्पादन आहे ज्याची किंमत त्याचा उत्पादक म्हणजे शेतकरी ठरवत नाही तर खरेदीदार.-व्यापारी ठरवतो. म्हणून मागच्या अनेक वर्षांची एक मागणी आहे....शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार द्या किंवा उत्पादन खर्चावर आधारीत किंमत ठरवा.. हे शक्य झालं तर शेतकऱ्याला कोणत्याही सबसीडीची गरज भासणार नाही किंवा कोणाकडे कर्जासाठी हात पसरण्याची गरज राहणार नाही..मुळात शेतीसाठी लागणारा खर्च वरचेवर वाढत चाललाय..त्यातच सिंचनाचा प्रश्न मोठा आहे..पावसावर आधारीत आपली शेती आहे..याच पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांचं जीवन कठीण करतो..चांगला पाऊस, चांगलं उत्पन्न आलं तरी चांगला भाव मिळेलच असं नाही...त्यामुळे शेतकऱ्यांवर नेहमीच टांगती तलवार असते..शेतीत केलेला खर्चही बऱ्याचवेळेला निघत नाही त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात...त्या दूर व्हाव्या असं कोणत्याच राजकीय पक्षाला किंवा सत्तेतल्या लोकांना वाटणार नाही..त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेल्या पिळवणूकीतून त्याची सुटका होणारच नाही..त्यामुळे आंदोलनं करावी लागत आहेत...पण निवडणुका किंवा राजकीय हितसंबंध लक्षात घेऊनच त्यावर निर्णय होत असतात..शेतकऱ्यांचे जाणते राजे म्हणवणारे नेतेही त्याच पंगतीत बसतात...

Saturday, November 12, 2011

ऊसाच्या पहिल्या हप्त्याचा वाद...




ऊसाला पहिला हप्ता किती असावा यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी जे आंदोलन छेडलं त्याला अखेर यश आलय..शरद पवारांच्या बारामतीतच ठाण मांडून बसलेल्या राजू शेट्टींनी अखेर सरकारला झुकायला लावलं..केंद्रानं जाहीर केलेल्या एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्यास राज्य सरकार तयार नव्हतं. हा एफआरपी १४५० पन्नास रुपये आहे. म्हणजे ९.५ टक्के रिकव्हरीला १४५० म्हणजे कोल्हापूर पट्ट्यातल्या साखरेची रिकव्हरी ११.५ टक्के धरली तरी १ टक्का बरोबर १५३ रुपये प्रमाणे जवळपास १७५० रुपयाच्या जवळपास हा पहिला हप्ता जात होता..पण आता सरकारनं कोल्हापूर, सांगली सातारा भागातल्या जास्त रिकव्हरी असलेल्या ऊसला पहिला हप्ता २०५० रुपये देण्याचं मान्य केलय. तर सोलापूर, नगर पुणे भागात १८५० आणि मराठवाडा - विदर्भाला १८०० शे रुपये देण्याचं मान्य केलय...खरं तर हा शेतकऱ्यांचा विजय आहे. राजू शेट्टी यांनी तर बारामतीत ठाण मांडून सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करावयास लावल्याच..पण बारामती, इंदापूर सह अनेक भागात बंदही पाळण्यात ते यशस्वी झाले.. त्यांची मागणी २३५० रुपयाची होती..पण २०५० हा सुद्धा काही कमी भाव नाही..तसं पाहिल तर ऊसाला ३००० रुपयांचा भाव देणंही शक्य आहे पण सहकारी क्षेत्रातली ही राजकीय मंडळी शेतकऱ्याला जादा पैसे मिळू देणार नाहीत. त्यामुळे हा सारा खटाटोप चालला होता..पंढरपूर ते बारामती पदयात्रा आणि त्यानंतर बारामतीतच उपोषण केल्यामुळे सरकारनं त्याची दखल घेतली..त्यातच शेतकऱ्यांनीही कारखान्याला ऊस जाऊ दिला नाही. अनेक ठिकाणी ऊस वाहतूक रोखून धरली तर काही ठिकाणी तोडफोडही केली..यावेळी तीन्ही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांच्या या आंदोलनाला शेवटी यश आलंय...
ऊसाच्या आंदोलनाला शिवसेना, मनसे या पक्षांनीही जाहीर पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतून मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. तर मनसेनं थेट रस्त्यावर उतरुन आंदोलनात उडी घेतली. त्यामुळेही या आंदोलनाला लवकर यश मिळालं असं म्हणता येईलं.. खरं तर जिल्हा परिषद , पंचायत समित्या नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गोची झाली होती. शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढणं सरकारला महागात पडलं असतं. काँग्रेस सुद्धा यातून व्यवहार्य तोडगा काढण्याची भाषा करत होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र तोंड बंद करुन होतं. त्याचं कारण अजितदादा..ऊसाला एफआरपीच्या वर भाव देऊच नका असा अजितदादांचा तोरा होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी त्यावर फारसं बोलणच टाळलं..त्यातच मावळ प्रकरणी पोलीसांचा हस्तक्षेप राष्ट्रवादीच्या अंगलट आला होता त्यामुळे यावेळी पोलीस बळाचा वापरही टाळण्यात आला हेसुद्धा महत्वाचं..
खरं तर शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या पवार साहेबांद्या राज्यात ऊसाला दोन हजार रुपयेही भाव देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी मात्र २५०० रुपयांचा भाव जाहीर केलाय. ते पवारसाहेबांना का जमलं नाही असा प्रश्न उपस्थित होतो. मुळात राज्यातली सहकारी साखर कारखानदारी या राजकीय नेत्यांना मोडीत काढायचीय..सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे ते नंतर लिलावात विकत घ्यायचा हा धंदाच सध्या या सर्व पक्षांच्या नेत्यांनी चालवलाय...त्याला सर्व पक्षांचे नेते जबाबदार आहेत..
या आंदोलनाची दुसरी एक बाजू आहे..राजू शेट्टी यांनी थेट बारामतीत जाऊन पवारांना आव्हान दिल्यामुळे काँग्रेसच्या नेतेमंडळींनी शेट्टींना रसद पुरवल्याची चर्चा आहे. थेट बारामतीत जाऊन पवार साहेबांना अशा पद्धतीनं आव्हान दिल्यामुळे पवारांचे कट्टर विरोधक इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांनीही मोठी भूमिका बजावल्याचं बोललं जातय. त्यातच या आंदोलानातून तोडगा काढण्यासाठी याच हर्षवर्धन पाटलांना अधिकार देण्यात आले होते. राष्ट्रवादीकडून फक्त विजयसिंह मोहिते पाटील होते..पण या सर्वांचं श्रेय शेवटी काँग्रेसलाच जाईल याची रणनिती आखण्यात आली होती..पवारांच्या बालेकिल्लात त्यांना आव्हान द्यायचं आणि श्रेयही काँग्रेसकडे घ्यायचं यात सध्यातरी काँग्रेसची सरशी झाल्याचं दिसतय...