Monday, December 26, 2011

दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकते तेंव्हा...
२०११ हे वर्ष खऱ्या अर्थानं गाजलं ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे.. अण्णा हे महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांची आंदोलनं, त्यातून राज्य सरकारची झालेली नामुष्की आणि एकूणच भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उभारलेल्या लढ्याची अख्या महाराष्ट्राला माहिती आहे..पण २०११ या वर्षात अण्णांची महती देशभरात पोचली..देशभरातच काय जगानंही अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतली..या वर्षात अण्णांनी लोकपालसाठी आंदोलनाची सुत्रं हाती घेतली आणि दिल्लीतली हवा तापली..दिल्लीनं अनेक भल्या भल्यांना पाणी पाजलय.. दिल्लीच्या सत्तेचा कैफही काही औरच असतो हे इतिहासापासून आजतागायत सर्वांनी पाहिलाय, ऐकलाय..पण याच दिल्लीला अण्णा हजारेंनी झुकवलं.. तसच महाराष्ट्राच्या एका खेड्यातून आलेला हा धोतरछाप माणूस एवढा महाग पडेल असं सरकारलाच काय पण इतर कोणालाही वाटलं नव्हतं..पण अण्णांनी ते घडवून आणलं..
लोकपालच्या लढाईसाठी अण्णा मैदानात उतरले तेच नेहमीच्या उपोषणाच्या ब्रम्हास्त्रांनं.. सुरवातीला जंतर मंतरवर झालेल्या उपोषणाला प्रतिसादही चांगला मिळाला पण त्यानंतर अण्णांनी रामलिला मैदानावरच्या आंदालनाची हाक दिली..पण त्याअगोदर याच रामलिला मैदानावरचं रामदेव बाबांचं उपोषण सरकारनं पोलिस बळाचा वापर करुन अर्ध्या रात्रीत मोडून काढलं होतं..अण्णांच्या उपोषणाची गतही तिच होईलं अशी भिती व्यक्त केली जात होती..सुरवातीला उपोषणाची परवानगी नाकारुन सरकारनं स्वताहूनच अपशकून घडवून आणला.. लोकशाहीत कोणालाही शांततेत आंदोलन करण्याचा हक्क आहे. पण सरकारनं अण्णांचं आंदोलन चिरडण्यासाठी त्यांना परवानगीच नाकारली.. पण अण्णा काय चिज आहे हे दिल्ली सरकारला माहित नव्हतं...त्यामुळेच अण्णांना उपोषणाच्या दिवशीच पहाटे त्यांच्या दिल्लीच्या मुक्कामाच्या जागेवर पोलिसांनी गाठलं..पण अण्णांचा निर्धार पक्का...जेलमध्ये जाईन पण उपोषण करेनच ही भिष्मप्रतिज्ञा अण्णांनी केली..पण पोलीस बिचारे हुकामाचे गुलाम त्यांनी अण्णांना अटक केली....ही सरकारनं केलेली दुसरी चूक....
अण्णा हजारे नावाचा हा मराठी माणूस कीती हट्टाचा आहे ते दिल्लीला माहितच नव्हतं.. शेवटी अण्णांना तिहार तुरुंगात पाठवलं...गम्मत अशी की ज्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा लढा देत आहेत..त्याच भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही नेते, माजी मंत्री आणि मोठ्या कार्पोरेटमधले उच्चपदस्थ अधिकारी त्याच तिहारमध्ये डांबलेले होते...सरकारची पुन्हा व्हायची तेवढी छी थू झाली...शेवटी अण्णांना तिहारमधून सो़डवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.. पुन्हा सरकार चुकलं..पण तोपर्यंच दिल्ली, संपर्ण देश आणि प्रसारमाध्यमांना अण्णा काय चिज आहे हे कळून चुकलं.. सरकारवर दबाव वाढला आणि त्यांना झक मारत अण्णांच्या उपोषणाला परवानगी द्यावी लागली...
रामलिला मैदानावर ठाण मांडताच अण्णांनी सरकारवर हल्लाबोल केला..आपल्या सर्व मागण्यांसह लोकपाल विधेयकाला हात घाला अन्यथा उपोषण सोडणार नाही...मरेन पण हटणार नाही या इशाऱ्यामुळे सरकारलाही धडकी भरली.. सरकारला वाटलं दोन तीन दिवसात अण्णा जमीनीवर येतील..तब्येत बिघडेल हॉस्पीटलमध्ये पाठवून देऊ..पण कुठे काय...अण्णा ठणठणीत...टीव्ही वाहिन्यांवर दिवसभर अण्णापुराण तर दुसरीकडं संसदेचं अधिवेशन सुरु, त्यामुळे सरकारला नमतं घेण्याशिवाय पर्याय नव्हता...संसदेत आणि संसदेबाहेर सरकारची होती नव्हती तेवढी सगळी पार धुळीला मिळाली..त्यामुळे संसदेनं एकमुखानं अण्णांच्या मागण्यावर विचार करायला सरकारला भाग पाडलं..शेवटी पंतप्रधांनांनी लेखी पत्र पाठवल्यानंतरच अण्णांनी रामलिलावरचं उपोषण सोडलं...तर दुसरीकडं दिल्लीच्या सरकारनही सुटलो बुवा आता असं म्हटलं...
या संपूर्ण आंदोलनाची दखल मिडीयानं घेतली..महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेडातल्या या गांधीवादी नेत्यानं उपोषणाच्या जोरावर दिल्लीच्या सरकारची झोप उडवली हेच त्यांच्यासाठी आश्चर्याचं होतं..त्यात मिडीयानं दखल दिल्यामुळे सर्वांनाच त्याची दखल घ्यावी लागली..म्हणूनच अण्णा घराघरात पोचले तसच त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली...त्यामुळेच अण्णा खऱ्या अर्थानं २०११ या वर्षाचे हिरो ठरले...कारण त्यांना पाठिंबा देणारा वर्ग हा सर्व वयोगटातला होता...सर्व वर्गातला होता.. अण्णांच्या भूमिकेवर काही वाद असू शकतात.. त्यांच्या हट्टीपणावर काही आक्षेप असू शकतात...मी म्हणतो तेच बरोबर या प्रवृत्तीवर आक्षेप असू शकतो...पण अण्णांच्या पायासमोर दिल्लीचं तख्तही झुकलं यातच सर्वकाही आलं...
जय महाराष्ट्र...

Sunday, December 25, 2011

आरक्षणाचे गाजर
मुस्लीम समाजाला साडेचार टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केलीय. हे आरक्षण सध्या असलेल्या ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाच्या कोट्यातूनच देण्यात येणाराय. ही घोषणा करण्यामागं मात्र मुस्लीम समाजाचा उद्धार करणं वगैरे नसून नेहमीप्रमाणं त्याचं कारण राजकीयच आहे.. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.. भारतातल्या या सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या राज्यात सत्ता आणण्यासाठी सर्व पक्षांनी ताकद पणाला लावलीय. पण काँग्रेसची स्थिती सत्ता आणण्यासारखी नसली तरी कमीत कमी तिथली परिस्थीती सुधारण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. त्याचाच एक भाग म्हणजे हे मुस्लीम आरक्षण...
निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीमांनाच आरक्षण का ? तर ज्या उत्तर प्रदेशात ह्या निवडणुका होत आहेत. त्या राज्याची लोकसंख्या आहे २० कोटी आहे आणि त्यात तब्बल १८ टक्के लोकसंख्या ही मुस्लीम आहे.. त्यामुळेच या १८ टक्के मतावर डोळा ठेऊन केंद्र सरकारनं हे आरक्षण जाहीर केलय. मुळात २७ टक्के ओबीसींच्या कोट्यात मुस्लीमांना आरक्षण देऊन सरकारनं ओबीसींची पंचायत करुन ठेवलीय. पण तो झाला जनतेचा प्रश्न.. राजकर्त्यांना आपली पोळी भाजून घेण्यासाठी अशा घोषणा करणं हे काही नवीन नाही..
या आरक्षणामागं राजकीय कारण आहे असं मी म्हणाले त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला सांगतो..उत्तर प्रदेशत विधानसभेच्या ४०३ जागा आहेत..मायावती यांचा बसप, मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष हे दोन मोठे पक्ष युपीत आहेत. त्यांची सत्ता मागच्या दहा पंधरा वर्षात येत असते.. त्यानंतर नंबर लागतो तो भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांचा...काँग्रेसचा विचार केला तर उत्तर भारतातून काँग्रेसची पुरती वाट लागलीय. त्यात सुधारणा करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्यातच राहुल गांधींचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठीही काँग्रेसचा आटापीटा सुरुय. पुढचा पंतप्रधान म्हणून जर राहुलबाबांचा राज्याभिषेक करायचा असेल तर उत्तरेत काँग्रेसला मोठी मजल मारली पाहिजे.. त्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसचा प्रयत्न सुरुय.. उत्तर प्रदेशात मायावतींनी मागच्या निवडणुकीत एकहाती सत्ता आणली होती.. त्यानंतर मुलायमसिंग यादव यांच्या पक्षाचा नंबर लागला.. जर उत्तर प्रदेशातली पक्षाची ताकद वाढली तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेला त्याचा फायदा होऊ शकतो त्यासाठीच हा सर्व खटाटोप आहे.. दलित, मागासवर्ग आणि मुस्लीमांची मतं मायावती आणि मुलायमसिंग यादव यांच्या पक्षात विभागली गेलीत. त्या व्होट बँकेला फोडण्यासाठी काँग्रेसनं हा मुस्लीम आरक्षणाचा पत्ता टाकलाय.
तसं पाहिलं तर निवडणुका जिंकण्यासाठी असे पत्ते टाकावेच लागतात..महाराष्ट्रात नाही का आपण मोफत विजेचं गाजर दाखवलं होतं..महाराष्ट्रातही अधून मधून मराठा समाजाच्या आरक्षाचा आवाज उठत असतोच की...सध्या तो शांत आहे पण उद्याच्या निवडणुकीच्या तोंडावर तो पुन्हा उठणार नाही असं म्हणता येणार नाही..शेवटी काय आपले राजकर्ते हे आपल्याकडे फक्त एक मतदार म्हणूनच बघतात..त्यातच ज्या समाजाची लोकसंख्या ज्या भागात जास्त आहे त्यांच्यासाठी अशा घोषणा, आश्वासनं, योजना राबवल्या जातात. निवडणुका जिंकण्याचा हा एक शॉर्ट कट आहे हे आपल्या राज्यकर्त्यांना आणि राजकीय पक्षांना चांगलच माहित आहे. त्यामुळे एकट्या काँग्रेसला दोष देऊन काही उपयोग नाही..कारण निवडणुका जिंकायच्या म्हणजे सर्वकाही करावं लागतं..त्यात आरक्षण हा एक पत्ता आहे...

Friday, December 23, 2011

महाराष्ट्रातील काका- पुतण्याचे राजकारण
महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याच्या नात्याला वेगळचं महत्व आहे.. जसं त्याला महत्व आहे तसच त्याला वादाची किनारही आहे..हा मुद्दा आता आठवण्याचं कारण म्हणजे राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एका पुतण्यानं काकाला खिंडित पकडलय.. हे काका पुतणे आहेत गोपीनाथ मुंडे आणि त्यांचा पुतण्या धनंजय...परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन पुतण्या धनंजयनं गोपीनाथरावांसमोर आव्हान उभं केलय..परळी हा गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला..याच परळीतून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले..राज्यात मास लिडर असणारा नेता म्हणून गोपीनाथ मुंडेची ओळख आहे.. राज्याच्या राजकारणात मोठं स्थान असलेल्या मुंडेंना पुतण्यानं केलेल्या या बंडामुळं फारच मनस्ताप झाल्याचं दिसतय. परळीचा नगराध्यक्ष आपण सांगेल तोच व्हावा यासाठी पुतण्यानं भाजप , काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मिळून जवळपास २५ -२६ जणांना अज्ञातस्थळी ठेवलंय..आणि दोन उमेदवारांचे अर्जही भरलेत..गोपीनाथ मुंडेंच्या उमेदवाराला त्यांनी थेट आव्हान दिलय...त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले पण पुतण्या काही मागं हटायला तयार नाही..असं म्हणतात की धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याशी चर्चा करुनच बंडाचा झेंडा फडकावलाय...त्यामुळे पुतण्यानं काकाची पुरती नाच्चकी केलीय..दिल्लीचं नेतृत्व करायला गेलेल्या गोपीनाथरावांना घर सांभाळणं अवघड जातय.. झोपत धोंडा घातला अशी मोघम नाराजी गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलीय..
आता या बंडाची थोडी पार्श्वभूमी पाहूया...गोपीनाथ मुंडेंचं परळीतलं राजकीय व्यवस्थापन हे धनंजय मुंडे पाहत होते..पण आजपर्यंत काकाच्या छायेत राहुन राजकारण करणाऱ्या पुतण्याच्या महत्वाकांक्षा मागच्या काही दिवसात वाढल्या..गोपीनाथ मुंडे हे जोपर्यंत राज्याच्या राजकारणात सक्रीय होते तोपर्यंत धनंजय स्थानीक राजकारण पहात असे..जिल्हा परिषद, सहकारी बँक यावर लक्ष ठेवत मुंडेंची स्थानिक जबाबदारी ते पार पाडत होते.. पण मुंडेंनी दिल्लीचा रस्ता धरल्यानंतर मात्र पुतण्याला काकाची जागा घेण्याची स्वप्नं पडू लागली...पण विधानसभेच्या जागेसाठी गोपीनाथ मुंडेंनी धनंजयला उमेदवारी देण्याएवजी मुलगी पंकजाला उमेदवारी देऊन आमदार केलं आणि बंडाची पहिली ठिणगी इथं पडली... आपल्याला उमेदवारी नाकारली असं कळताच या पुतण्यानं बंडाचा पवित्रा घेतला होता. पण त्यावेळी त्याची नाराजी दूर करण्यात आली आणि नंतर विधानपरिषदेवर त्यांना पाठवण्यात आलं..पण महत्वकांक्षा वाढलेल्या पुतण्याच्या मनात डावलल्याची सल डाचत राहिली आणि योग्य संधीची वाट पाहत बसलेल्या धनंजय यांना नगरपालिका निवडणुकीची संधी चालून आली..सुरुवातीला उमेदवारीत बाजी मारल्यानंतर त्यांनी नगराध्यपदासाठी मुंडेंचा आदेश धुडकावला आणि स्वतःचे दोन उमेदवार उभे केले..हाच मुंडेंना मोठा धक्का ठरला..आता या पुतण्याचे पाय राष्ट्रवादीकडे वळलेत असं दिसतय..
राज्याच्या राजकारणात यापूर्वी ठाकरे काका-पुतण्याचा वाद चांगलाच गाजला... बाळासाहेबांनंतर शिवसेनेत कोण याचं उत्तर राज असचं दिलं जात होतं...पण उद्धव ठाकरे यांची राजकारणात अचानक एंट्री झाली आणि कार्याध्यक्षाची जबाबदारी सोपवत आपला वारस कोण हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं...त्यामुळे नाराज झालेल्या राज ठाकरे यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन स्वतःचा नवा पक्ष काढला..त्यानंतर त्यांनी सेनेला पुरतं जेरीस आणलय...तर दुसरे काका पुतणे आहेत शरद पवार आणि अजित पवार...सध्यातरी पवार काका पुतण्यात काही वाद दिसत नसला तरी सर्व काही आलबेल आहे असं म्हणता येत नाही.... पवारसाहेबांचे आपणच वारसदार आहोत हे त्यांनी आत्तापासूनच दाखवून द्यायला सुरवात केलीय... वर्षभरापूर्वीच भुजबळांना हटवून उपमुख्यमंत्रीपद पटकावत अजित पवारांनी त्यांचे इरादेही स्पष्ट केलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ही काका पुतण्याची लढाई पुढं कुठं जाणाराय हे लक्षात येईलंच..
पण याच महाराष्ट्रात पेशवाईतल्या काका-पुतण्याचे दाखले दिले जातात...काका मला वाचवा असा टाहो फोडणाऱ्या या प्रसिद्ध वाक्याची यापुढे काकालाच पुतण्याकडे पाहुन पुतण्या मला वाचव अशी म्हणण्याची वेळ आलीय असं दिसतय..

Monday, December 19, 2011

४० कोटीचा कारकुन

एक किलो सोनं, चार किलो चांदी, २५ एकरावर भव्य फार्म हाऊस, एक हॉटेल, चार लक्झरी कार, चार मोटारसायकल्स, चार प्लॉट्स, विमा पॉलिसिमध्ये मोठी गुंतवणूक आणि विविध बँकांमध्ये विविध खात्यांवर जमा केलेली रक्कम..या सर्वांची एकत्रित बेरीज जवळपास ४० कोटी रुपयांच्या घरात जाते...आता हा हिशोब कशाचा म्हटलं तर तुम्हाला सांगतो...ही संपत्ती आहे एका क्लार्कची...हो क्लार्कची...म्हणजे एका कारकूनाची...मध्य प्रदेशातल्या भोपाळमधल्या आरटीओ ऑफीसमध्ये हा कारकून काम करत होता..१९९६ साली तो कामाला लागला..आत्ता त्याचा पगार महिना फक्त १६ हजार रुपये आहे.. म्हणजे तो ज्यादिवशी नोकरीत रुजु झाला त्यावेळी त्याचा पगार जेमतेम पाच सहा हजार रुपयेच असावा.. सहाव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला ,त्यामुळे तो १६ हजार रुपये आहे.. पण २५ वर्षात एक कारकून एवढी माया गोळा करु शकतो तर त्याच्यावरचा अधिकारी किती माया गोळा करु शकतो याची गोळीबेरीज न केलेलीच बरी....


आपल्याला हे माहित आहे की चिरीमिरी दिल्याशिवाय सात बाराचा उताराही तलाठी देत नाही..तर मग नगरपालिका काय किंवा तहसिल कार्यालय काय.. सर्वच क्षेत्रात पैसे खाण्याचं या लोकांना एक व्यसनच लागलय..


होय पैसे खाण्याचं हेसुद्धा एक व्यसनच आहे.. तुम्हा आम्हाला अनेकदा याचा अनुभव आलाय..पण सरकारी काम पैसे दिल्याशिवाय होतच नाही. त्यामुळं वेळ आणि हेलफाटे घालण्यापेक्षा चिरीमिरी देऊन आपण काम करुन घेतो..त्याच चिरिमिरीतून कारकूनसुद्धा कुबेर बनतो याचं हे उदाहरण... एका कारकूनाची ४० कोटींची संपत्ती ही खरं तर थक्क करायला लावणारीच आहे.. भोपाळमध्ये सापडलेला हा कारकून काय एकटाच आहे असं नाही..याच भोपाळमधून मागच्या आठवड्यात एका कारकूनाच्या घरातून पाच कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली...ही दोन उदाहरणं मी फक्त वानगीदाखल देतोय...यावरुन आपल्या लक्षात येईलं कि सरकारी कार्यालयात भ्रष्टाचाराचं थैमान किती माजलय ते...त्याची ही बोलकी उदाहरणं आहेत..सामान्य लोकांचा ज्या सरकारी कार्यालयात थेट संपर्क येतो त्या प्रत्येक कार्यालयात असे महाभाग असतात...ते कार्यालयात येतात ते शिकार करण्यासाठीच..त्यांना सरकार जो पगार देतो तो काम करण्यासाठी नाही तर टाईमपास करण्यासाठीच....जोपर्यंत तुम्ही पैशाचं बोलत नाही तोपर्यंत असे महाभाग तुमच्या कामाकडं डुंकुनही पहात नाहीत...वर सरकारी नियम सांगतील..साहेब नाहीत..उद्या या..अमुक अमुक कादगपत्रांची कमतरता आहे..अशी अनेक कारणं सांगतिल..आणि तेच जर तुम्ही हात ओला की लगेच पुढच्या तासात तुमचं काम फत्ते....याची माहिती त्यांच्या वरिष्ठांना नसते असं नाही.. त्याची त्यांनाही पुरेपुर कल्पना असते.. कारण यातलाच प्रत्येकाचा शेअर म्हणजे हिस्सा ठरलेला असतो..त्यातही कधी कोणी सापडलाच तर निलंबित करण्यापलिकडे त्याचं कार्यालय जास्त काही करु शकत नाही आणि बाकीचा मॅटर काळाच्या ओघात सेटल केला जातोच... पुन्हा समाजात उजळ माथ्यानं फिरण्यास हे महाभाग तयार... या दुष्टचक्रात भरडला जातेय तो फक्त सामान्य माणूस...त्यामुळे कितीही कायदे करा कितीही लोकपाल आणा जोपर्यंत या पैसे खाणाऱ्यांना कठोर शिक्षेची भिती बसत नाही तोपर्यंत समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची ही कीड संपणार नाही...

Sunday, December 18, 2011

मिसळ पाव आणि बरच काही....

मी मागच्या काही ब्लॉममध्ये विशेष मेनूवर भर दिला होता॥आज सर्वांच्या परिचयाचा आणि सर्वांनी ज्याची चव चाखलीय अशा मिसळ किंवा मिसळ पाव म्हणा, त्यावर थोडंसं लिहणाराय...पदार्थ छोटा, खाणं जेमतेम पण चव म्हणाल तर चटपटीत...आणि लज्जतदार...चला तर मग मिसळ पावबद्दल बोलूया...म्हणजे लिहूया....

मिसळ खाल्ली नाही असा माणूस शोधून सापडणार नाही...महाराष्ट्रातील गावातला माणूस असो की शहरातला, त्यानं मिसळची चव चाखली नाही असं म्हणता येणार नाही..गावातलं छोटं टपरी वजा हॉटेल असो वा आठवडी बाजारातल्या भेळवाल्याजवळची भेळ-मिसळ असो..आपण लहानपणापासून या मिसळबरोबर एवढे परिचित आहोत... त्यामुळे या मिसळची चव सर्वांनीच चाखलेली आहे.. खरं तर मिसळ हा गरिबांचा मेवाच..पण शहरात त्याला आता जास्तच भाव आलाय...एक दोन रुपयात मिळणारी गाड्यावरची ही मिसळही आता फारच भाव खाऊ लागलीय. आता कमीत कमी दहा रुपये तरी मोजावेच लागतात..अनेक ठिकाणी या मिसळचं, मिसळ पाव, सुकी मिसळ, ओली मिसळ, त्यात पुन्हा पुणेरी मिसळ, कोल्हापूरी मिसळ असे अनेक प्रकार आलेत..पण काही का असेना मिसळ पाव खाण्यात एक भलतीच मजा आहे..
खरं तर मिसळ काय किंवा मिसळ पाव काय हा साधा चुरमुरे, शेव, कांदा, कोथिंबीर थोडीशी भिजलेली मटकी वगैरेंचा एकत्र पदार्थ..ह्या सगळ्या पदार्थांना एखाद्या मसाल्यानं एकजीव केल्यामुळंच कदाचित त्याला मिसळ नाव पडलं असावं असं मला वाटतं...तर मिसळबरोबर पाव देण्याचा प्रघातही आहे.. काही ठिकाणी मिसळपाव बरोबर रस्साही दिला जातो.. मिसळ पाववर गरमागरम तर्रीचा रस्सा पडला कि खाताना जी मज्जा येते ती सांगण्यापेक्षा अनुभव घेणंच महत्वाचं.. सध्या अनेक शहरातले कोपरे म्हणजे चौपाट्याच म्हणा की गर्दीनं फुललेल्या असतात..त्यात मिसळ पाववर एक हात साफ करणाऱ्यांची संख्या जास्त आहे...
मी सुद्धा लहानपणापासून मिसळचा चाहता आहे...आठवी नववीला असताना मी गावातून तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेलो की हमखास मिसळ खायचोच...अर्थात कधी कधी मिरची भज्जी, कांदा भज्जी, बटाटा वडा यावरही हात साफ व्हायचा पण जेमतेम पैसे असल्यामुळे थोडक्यात आटपायला लागायचं....मिसळ पावसाठी एवढा तो काय खर्च... आता तो चिल्लर खर्च वाटतो..पण पैसे कमावत नव्हतो तेंव्हा दोन रुपयाची मिसळ खायचेही वांदे असायचे.. असो पण थोड्या पैशात आत्ताही मिसळ पाववर ताव मारतो येतो...मी कोल्हापूरात गेलो तेव्हा कोल्हापूरी मिसळ पाववर हात साफ केलाच...पुण्यातही पुणेरी मिसळ...सोलापूरातही ओली-सुकी मिसळ खाण्याचा मोह आवरत नाही...
मिसळ पावच्या भोवती अनेकांच्या काही आठवणी जोडलेल्या आहेत...कॉलेजच्या दिवसातील असतील किंवा नोकरीला लागल्यानंतरच्या असतील...मिसळ पावच्या निमित्तानं त्या आठवून बघाव्या... कोठे ना कोठे तरी मनाला हळूवार स्पर्श करुन जाणाऱ्या त्या घटना, किस्से तुम्हाला पुन्हा मिसळ पावची चव वाढवायला मदत करतील....आणि एखादी मनाला हळूवार मयुरपंखी स्पर्श करुन गेलेली घटना आठवलीच तर जावा की राव मिसळ पाववर ताव मारा आणि थोडा वेळ आठवणींच्या विश्वात रमा की.....

Thursday, December 15, 2011

कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा...
कोल्हापूर म्हटलं की नजरेत भरतो तो कोल्हापूरचा रांगडेपणा...कोल्हापूरच्या मातीतच तो रुजलेला आहे.. मग ती कुस्ती असो की मटनाचा रस्सा...त्याला अस्सल कोल्हापूरचा वास आहे.. खरं तर कोल्हापूरला गेलेला माणूस महालक्ष्मीचं दर्शन, कोल्हापूरी चप्पल आणि मटनाचा रस्सा यावर ताव मारणारच..तुम्ही तसा प्रयत्न केला नसले तर जरुर करुन पहा..पण आज मी कोल्हापूरच्या एका खास मेनूबदद्ल सांगत आहे...तोही नावाप्रमाणं रांगडा कोल्हापूरीच आहे...तो म्हणजेही कोल्हापूरचीच खास ओळख असलेल्या तांबडा पांढरा रस्सा....नाव काढल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलं का नाही....अहो त्याची लज्जतच तशी आहे...कोल्हापूरच्या जेवणात सुकं मटन, तांबडा आणि पांढरा रस्सा असा बेत जर जमला तर यापेक्षा दुसरा मांसाहारी बेत नाही..मी सुद्धा या विशेष कोल्हापूरी मेनूबद्दल खूप ऐकलं होतं...माझ्या काही कोल्हापूरच्या मित्रांनी तांबड्या पांढऱ्याचा बेतही हैदराबादमध्ये अनेकवेळा केला होता..खरं तर मज्जा आलीच हे सांगायला नको...पण खास कोल्हापूरात जाऊन उत्तम प्रतिच्या तांबड्या पांढऱ्या रस्स्यावर ताव मारणं ही काही औरच बात आहे....तसं हा बेत करायचं माझ्या मनात खूप वर्षापासून होतं.. पण बेत जूळून येत नव्हता...पण म्हणतात ना खानेवाले का नाम दाणे दाणे पै लिखा होता है.........तसंच झालं...
मी खास कोकणची सफर करण्यासाठी निघालो होतो. पण सोलापूरातून कोल्हापूरात पोहचेपर्यंत कोकणात मोठ्या वादळानं तुफान माजवलं होतं..त्यामुळे कोल्हापूरातून कोकणात जाण्याचा बेत मला रद्द करावा लागला.. मग काय मुक्काम कोल्हापूर....आता कोल्हापूरात थांबयचं तर बेत व्हायलाच हवा...मी कोल्हापूरातल्या माझ्या पत्रकार मित्रांना त्याबद्दल तशी कल्पना दिली....महालक्ष्मीचं दर्शन घेऊन किरको खरेदी झाली तोपर्यंत आमचा बेत ठरला...पन्हाळ्याच्या गेस्ट हाऊसवर तांबडा पांढरा रस्सा आणि सुकं मटन असा तो बेत झाला...त्या दिवशी मी पन्हाळ्यावर पावसात भिजतच गेलो...सर्व सोपस्कार संपल्यानंतर जो मेनू मला मिळाला, काय सांगू तांबडा पांढरा रस्सा काय आणि सुकं मटन काय....जो ताव मारला त्याचं वर्णन शब्दात करायलाही मला कठीण जातय... अहो ज्या पदार्थांचं फक्त नाव उच्चारलं तर तोंडात पाणी येतं त्याची अस्सल चव चाखल्यावर आणखी काय लिहणार त्याबद्दल... पण बेत मात्र रग्गील झाला...पन्हाळ्याचं त्या दिवशीचं वातावरण एकदम थंड होतं...रात्रीची वेळ...शांत परिसर..आठ दहा मित्रांची कंपनी आणि गरम पेयाबरोबरच सुकं मटन, तांबडा- पांढरा रस्सा... आहाहाहाहाहा...रग्गील बेत झाला....
माझा तर हा बेत झाला..यानंतरही मी जर कोल्हापूरला गेलो तर माझी पहिली पसंती अर्थातच तांबडा पांढराच असणार...तसं तुम्ही कधी कोल्हापूरला गेलाच तर कोल्हापूरात अनेक हॉटेल्स आहेत.. जिथं हा मेनू मिळतो...उदाहरण द्यायचं तर पद्मा गेस्ट हाऊस.. पुरेपुर कोल्हापूरमध्ये हा मेनू चांगला आणि तेवढाच दर्जेदार मिळतो...तर मग काय पुढच्या वेळी कोल्हापूरला गेला तर महालक्ष्मीचं दर्शन घ्या, तुमची कामं आटपा आणि होऊन जाऊद्या की हा रांगडा कोल्हापूरी बेत...

Thursday, December 8, 2011

कुबानी का मिठा

हैदराबादमधल्या मेनूबद्दल मी मागच्या ब्लॉगमध्ये कामत जवार रोटीचा उल्लेख केला होता...हा मेनू कामतच्या कर्नाटकातील काही हॉटेल्समध्येही मिळतो..आजचा जो मेनू आहे तो..फक्त हैदराबादमध्येच मिळतो....तो आहे कुबानी का मिठा...नावावरुन जर तुम्हाला तो मांसाहारी वाटत असला तरी तो शुद्ध शाकाहारी आणि काही फळं तसच साखर किंवा मधाचा वापर करुन बनवलेला आहे.. हैदराबादला नवाबी थाट आहे.. तशीच इथली एक स्वतंत्र ओळख असलेली खाद्य संस्कृती आहे..त्यामुळे त्या-त्या प्रांतातल्या पदार्थाला त्याची स्वतःची म्हणून ओळख आहे..जरी हे पदार्थ इतर ठिकाणी मिळत असले तरी त्याची खरी लज्जत त्या प्रांतात बनवल्यानं आणि त्याला तिथल्या संस्कृतीचा वारसा असल्यानं त्याची लज्जत काही औरच असते.. त्यातलाच कुबानी कि मिठा आहे...
हैदराबादमध्ये जर तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या हॉटेलमध्ये शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाचा बेत केला तर जेवणाचा शेवट म्हणून तुम्हाला स्विट डीश किंवा आईसक्रिम खायचे असेल तर त्याची जागी तुम्ही जरुर कुबानी कि मिठा ला द्या...पण जेवणाची ऑर्डर देताना त्यांच्या मेनूमध्ये कुबानी का मिठा आहे का याची जरुर विचारणा करा..कुबानी का मिठा हा फक्त हैदराबादी मेनू आहे. तो इतर ठिकाणी मिळत असावा असं मला वाटत नाही..पण जशी हैदराबादची बिर्याणी काही शहरात मिळते तसं जर कोणी कुबानी का मिठा त्यांच्या मेनूत ठेवला असेल तरीही त्याची चव चाखायला काही हरकत नाही..पण हैदराबादमध्येच जर तुम्हाला हा पदार्थ खायला मिळाला तर त्याची लज्जत काही औरच असेल...मी सुद्धा अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऑर्डर देण्यापूर्वी कुबानी का मिठा आहे का याची खात्री करुन घेतो..अनेकदा हा मेनू नाही असाच सुरु हॉटेलमध्ये असतो..पण स्वागत हॉटेल सारख्या काही हॉटेल्समध्ये हा पदार्थ आवर्जून मिळतो.. संपूर्ण जेवणावर ताव मारल्यानंतर आईसक्रीम किंवा सॉफ्ट ड्रिंक ऑर्डर करण्याएवजी एकदा कुबानी का मिठा ट्राय करुन बघा तो तुम्हाला जरुर आवडेल..तुम्हाला जर गोड पदार्थ आवडत असेल तर तुम्हाला त्यादिवशीची ती मेजवानीच म्हणून समजा आणि जर गोड पदार्थ फारसे आवडत नसतील तरीही शेवट गोड करावा म्हणून तरी कुबानी मिठा ची चव चाखायला हरकत नाही..तर मग काय हैदराबादमध्ये आलात आणि जेवणाचा बेत असेल तर नक्कीच कुबानी का मिठा ची चव चाखणार ना....