Saturday, May 14, 2016

भाजपचे ‘हात दाखवून अवलक्षण’!



मोदी सरकारला दोन वर्षे होत आहेत. पण अजूनही त्यांची सत्तेची मस्ती काही कमी झालेली नाही. अनेक मुद्यांवर तोंडघशी पडले तरीही आपली वाकडी चाल काही सरळ करताना हे सरकार दिसत नाही. ताजे उदाहरण उत्तराखंडचे आहे. शेवटी न्यायालतही होती नव्हती तेवढी गेली. आतातरी मोदी सरकार काही बोध घेईल का.
केंद्रातील भाजप सरकारला धडा शिकवलेले हरिश रावत
 
उत्तराखंडमध्ये जे राजकीय महाभारत झाले त्यात भाजपने आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था हात दाखवून अवलक्षण या मराठी म्हणीसारखीच झाली. खरे तर हरिश रावत यांचे उत्तराखंडमधले सरकार बरखास्त करुन तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काहीच गरज नव्हती. पण विजयाची हवा डोक्यात गेलेल्या आणि काँग्रेसमुक्त देश करण्याच्या भाजपच्या मस्तीतून त्यांनी रहिश रावत यांचे सरकार बरखास्त केले. राजकीय पटलावरून काँग्रेसला नेस्तनाबुत करण्याचा भाजपचा डाव अर्थातच रडीचा डाव असेच म्हणावे लागेल. काँग्रेसच्या 9 बंडखोरी आमदारांच्या जोरावर राजकीय लाभ उठवण्याच्या फंद्यात भाजपचे तर हसे झालेच पण त्या 9 बंडखोर आमदारांनाही चांगलाच धडा मिळाला. 
उत्तराखंडचा डाव फसला असेच तर विचारत नाहीत नाही मोदी !
 
उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीला काँग्रेसचे हरिश रावत यांनी आव्हान दिले. उच्च न्यायालयानेही हरिश रावत सरकार बरखास्त करण्याचा निर्णय चुकीचा ठरवून त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले.उच्च न्यायालयाचा हा निर्णय केंद्र सरकारने स्विकारला नाही,राजकीय सारीपाट मांडून बसलेल्या भाजप आणि केंद्र सरकारने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले पण येथेही ते तोंडावरच आपटले. उच्च न्यायालयाप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयानेही हरिश रावत यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले.या परीक्षेत हरिश रावत पास झाले. या राजकीय साठमारीत त्या 9 बंडखोरांची आमदारकी मात्र गेली.
या संपूर्ण साठमारीमुळे कलम 356 चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या कलमाचा वापर अपवादात्मक परिस्थितीतच करावा असे म्हटले जात असले तरी हे कलम केंद्र सरकारच्या हातातले एक मोठे अस्त्र आहे. आपल्या मताशी सहमत नसलेले किंवा विरोधी पक्षांची सरकारे एनकेन प्रकारे बरखास्त करण्यासाठीच या कलमाचा आतापर्यंत जास्तीत जास्त वेळा वापर केला गेलेला आहे. यात केंद्रात सध्या असलेल्या भाजप सरकारचा सहभाग कमी असली तरी त्यांनी या कलमाचा गैरवापर केलेला आहेच. केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असो या कलामाचा गैरवापर अनेकदा केला गेलेला आहे. स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे काँग्रेसच सत्तेत राहिली असल्याने त्यांनीही या कलमाचा राजकीय वापर जास्तीत जास्त केलेली उदाहरणे आहेत.
कलम 356 रद्द करावे की त्यात काही सुधारणा कराव्यात या मुद्दा थोडा बाजूला ठेवून उत्तराखंडवर चर्चा केली तर भाजपला ही मोठी चपराक आहे. यातून ते काही बोध घेतील असे वाटत नाही. पण मोदींच्या लाटेवर दिल्ली काबीज केल्यानंतर भाजपचा वारू चौफेर उधळला होता. त्याला बिहारमध्ये ब्रेक लागला आहेच आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही तोच अनुभव येण्याची चिन्हं दिसत आहेत. तर तामिळनाडू, केरळ, आसाम यापैकी आसाममध्येच भाजपला काही लाभ झाला तर झाला अन्यथा त्यांचा हा विजयरथ थांबला असे म्हणावे लागेल.उत्तराखंडचा अंगलट आलेला डाव, बिहारने दाखवलेला पराभव आणि आता पश्चिम बंगाल यातून भाजप काही बोध घेईल का एवढाच प्रश्न..

No comments:

Post a Comment