Monday, July 23, 2012

ये रे ये रे पावसा...


पाऊस म्हटलं की सर्वांच्या मनात कल्पनांचं मोहोळ उभं राहतं..विशेषतः एप्रिल - मे महिन्यात जेव्हा पारा 40 च्या वर जातो तेव्हा सर्वांनाच कधी एकदाचा हा ऊन्हाळा जातो आणि जून महिना उजाडतो असं वाटतं...जून महिना आला की मान्सून बरसेल आणि अंगाची लाही लाही करणारा ऊन्हाळा एकदाचा जाईलं म्हणून सर्व जण त्या पावसाकडे डोळे लावून बसतात.पाऊस सर्वांनाच हवा वाटतो..शहरी असो वा निमशहरी कडक उन्हापासून सुटका हवी असते सर्वांनाच... पाण्याची समस्या तर हल्ली सगळीकडेच आहेत. ती सुटावी म्हणून पावसाची वाट पाहिली जाते..तर शेतकरी शेती आणि जनावरांच्या चारा-पाण्यासाठी त्याची आतुरतेनं वाट पहात असतो..ज्या पावसाची सर्वच जण आतुरतेने वाट पहात असतात त्याच्या पाठीमागची सर्वाची कारणं आणि कल्पना वेगवेगळ्या असतात. पण पाऊस सर्वाना हवा असतो हे मात्र नक्की.. सर्वांना हवा हवासा वाटतो तो पाऊस हलक्या मध्यम रिमझीम सरींचा पाऊस.. सर्वांच्याच मनाला स्पर्श करुन जाणारा तो पाऊस....तर धो धो कोसळणारा पाऊस वेगळाच..हा पाऊस कधी रोमँटीक असतो तर कधी विध्वंसक ठरतो...ज्या पावसाची आपण आतुरतेनं वाट पहात असतो तो जर कोसळायला लागला तर सर्वांची पुरती वाट लावते..मग वाटते पुरे झालं आता....हल्ली तर शहरांची पुरती वाटच लावतो हा पाऊस...शहरातले रस्ते पण थोडासा पाऊस झाला तरी सापडत नाहीत..अनेक भागात पाणीच पाणी..रस्ताच सापडत नाही...तर घरं कोसळून जीवित हानी करतो तो वेगळच...त्यातून त्या पावसाची तीव्रता लक्षात येते आणि वाटतं..नको हा जीवघेणा पाऊस आता....आठवून पहा 26 जुलैची मुंबई...कीती भयानक असू शकतो पाऊस, त्याची शहरातल्या लोकांना आलेली ती मोठी प्रचिती असावी... हे झालं रौद्र रुपातल्या पावसाबद्दल...
..पण जो सर्वांना हवा हवा वाटतो तो हलका पाऊस पडायला लागला की सर्वाना आठवते गरमा गरम भज्जी आणि वाफाळलेला चहाचा कप....पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना.. घराच्या गॅलरीत किंवा खिडकीत बसून गरम भज्जी आणि वाफाळलेल्या चहाची लज्जत काही औरच....! त्याची मजा शहरातल्या आपल्या सर्वांनाचा हवी हवीशी वाटणारी आहे..आणि हा पाऊस जर रात्रीच्या वेळचा असेल तर...? हातात एक व्हिस्कीचा किंवा रमचा पेग, मंद हवा आणि हलका हलका पेग....व्वा क्या बात है.. ! साधनेला यापेक्षा आणखी कोणता माहौल चांगला असेल...! नुसती कल्पना जरी केली तरी अनेकांची विमानं  लगेच आकाशात झेपवतात.. असो, कल्पना छान आहे...!!! तर मुंबईच्या नरीमन पॉईंट किंवा तशाच काही स्पॉटवर रिमझीम पावसात भिजण्याची मजाही काही औरच नाही का...? आणि समजा कोणत्याही शहरातल्या काही विशिष्ट स्पॉटवर असा पाऊस पडताना एखादी मैत्रीण बरोबर असेल तर....! आठवा आठवा..!!! एका पावसात दोघांनी भिजण्याचा अनुभव काही धम्मालच नाही का... ? एकाच छोट्या छत्रीत न मावणारे दोघेजण...! आतून बाहेरुन ओलंचिंब झाल्याचा अनुभव येतो ना... ? मग छत्रीही नको वाटते...नकळत हातात हात घेऊन जुळलेल्या त्या रेशिमगाठी ...! अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे...

पावसातील मस्तीच्या मुड
आज कदाचित तसाच पाऊस पडत असताना त्या आठवणी जाग्या होतीलही...! असा हा रोमँटीक पाऊस कोणाला नको आहे...! काहींच्या मनाला भरती येऊन छान छान कविताही याच पावसात सुचतात...! पावसाची चाहूल जरी लागली तरी मोर जसा पिसारा फुलवून नाचायला लागतो... तशी सगळ्यांची मनं डोलायला लागतात....भूतकाळातल्या त्या आठवणी आठवल्या तर घरात किंवा ऑफीसात असतानाही नुसत्या आठवणींनीच ओलेचिंब भिजल्या सारखं होतं ना...!! आणि ज्यांची मनं आणि ह्रदय ह्याच पावसानं तोडली असतील... ते "बघ माझी आठवणं येते का..?"  म्हणत बसतील....कारण काहीही असो..पाऊस सर्वानाच हवा हवासा वाटतो...
रोमँटीक पाऊस...
..मनाला स्पर्शून जाणाऱ्या या पावसात भिजण्याचा आनंद काही वेगळाच...बच्चे कंपनींची मजा तर वेगळीच..! लहानपणी पावसात भिजताना किती धम्माल यायची..! पावसाच्या साचलेल्या पाण्यातून समोरच्याच्या अंगावर फुटबॉलची किक मारावी तशी त्या पाण्य़ात मारुन कसं भिजवलं..त्याची गम्मत काही न्यारीच ..!! पावसाच्या पाण्यात कागदीची नाव करुन सोडण्याचा मोह कोणाला झाला नसेल...? पावसात भिजणं , राडा करणं ( हा राडा शिवसेनेचा नाही बरं का..हा आपला लहानपणीचा राडा.. ) ही लहान मुलांची नैसर्गिक खोडकर वृत्ती.. त्यावेळी आई बाबा ओरडायचे.. पावसात भिजू नको..सर्दी होईलं...? तेव्हा कोणाचीच मम्मी "दाग अच्छे होते हैं "...असं म्हणत नव्हती....मात्र आई बाबाचं नाही ऐकलं तर मोठा धपाटा मात्र बसायचा.. ! किती आठवणी त्या पावसाच्या..!!! आमचं घर गावात होतं...थोडा मोठा पाऊस झाला की.. घराला गळती लागायची..रात्रीच्यावेळी तर खूपच राग यायचा त्या पावसाचा..घर सगळीकडूनच टप टप गळतय...झोपायलाही जागा नसायची..कुठं कुठं म्हणून भांडी ठेवून  गळतीचं पाणी थोपवायचं....त्यावेळी पावसाचा राग यायचा आणि आपल्या गळक्या घराचाही... पण पत्र्याच्या घरात जर पाऊस पडताना झोपलात तर त्याचा जो काही आवाज होतो ना तो मात्र वेगळीच धम्माल बरकं...अर्थात...घरात एकटेच असताना..लाईट गेलेली असेल तर मात्र कधी कधी त्याच पावसाच्या आवजाची भितीही वाटायची..असा हा पाऊस किती किती आठवाव्या त्याच्या आठवणी.....
पावसात मस्ती करणारी मुलं..
...पण यापेक्षा पावसाची सर्वात जास्त गरज ज्याला असते..जो पावसाच्या आशेनं आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो तो आमचा शेतकरी, हाच खऱा त्या पावसाचा हक्कदार आहे.. जमीन तापलेली आहे...प्यायला पाणी नाही..जनावराला चारा नाही...पेरणीचे दिवस आलेत..पण पावसाचा काही पत्ता नाही..बिच्चारा शेत नांगरुन पावसाची वाट पहात बसतो...पण कधी वेळेवर येईल तर तो पाऊस कसला..? जूनच्या पहिल्या आठवड्यात मिरगाचा पाऊस पडल म्हणून तो आभाळाकडे डोळं लावून बसतो पण तो कसला येतोय..मृग गेला..दुसर नक्षत्र गेलं तरी पाऊस काही येत नाही..त्याची चिंता वाढतच जाते...आता तर पेरणी करा पावसाची वाट बघा..नाहीच आला तर दुबार पेरणीचं संकट आ वासून बसलेलंच..! जनावरं सांभाळणंही अवघड होऊन बसलय...वेळेवर पाऊस येत नाही म्हणून हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्याला चिंता असते आणि जेव्हा येतो तेव्हा ऊभ्या पिकाची वाट लावून जातो..शेतीचा बांध फोडून सगळं नुकसान करुन जातो..तरीही आमचा शेतकरी कधी त्यावर रागावत नाही..कारण पाणी हवय...मग ते कसंही येवो..मोठा पाऊस झाला...बांध फुटून पिक वाया गेलं..एखादा हंगाम वाया गेला तरी पाणी तर मिळेल ना या आशेवर तो जगतो...पाऊस हवाच आहे मग तो कोणत्याही रुपात येवो...रोमँटीक भासनारा असो वा सरीवर सरी कोसळणारा असो..पूर येऊन नुकसान करणारा असो ..पाऊस हवाच आहे..मोठा पाऊस होऊ दे...अगदी ओला दुष्काळ पडला तरी चालेल..आमच्या भूमातेची तहान भागवेल एवढा मोठा पाऊस पडू दे...जमीनीची तहान भागली तरच शेती फुलेलं..धरणात पाणी साचेल...पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल..शेतीची, जनावरांची चिंता मिटेल...शेतातली पिकंही डौलानं ऊभी राहतील..कृषी उत्पन्न वाढेल...अन्नधान्याची चिंता राहणार नाही...पण त्यासाठी हवा आहे तो पाऊस..मग तो कसाही येवो धो धो अथवा रिमझीम...जमिनीची तहान भागेपर्यंत पावसाची गरज आहे..तो भरपूर यावा आणि शेतकऱ्याची चिंता मिटावी..त्यातच त्याचं आणि आपलं भलं आहे...म्हणून तर म्हणतात ....ये रे ये रे पावसा....   








Friday, July 20, 2012

राजेश खन्ना- पहिला सुपरस्टार


राजेश खन्ना हा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार , पहिला रोमँटिक हिरो, ज्यानं सलग 15 सोलो हिट दिले , तो महान अभिनेता बुधवारी हे जग सोडून गेला. वयाच्या 69 वर्षीच त्यानं या जगातून एक्झीट घेतली. राजेश खन्नानं 1970 चं दशक गाजवलं. तो खऱ्या अर्थानं सुपरस्टार होता. त्यानं पहिला चित्रपट केला तो आखिरी खत पण तो खरा स्टार झाला तो आराधना चित्रपटापासून..शर्मिला टागोर बरोबरच्या आराधनामधली गाणी खूपच गाजली. मेरे सपनो रानी की कब आयेगी तू...या गाण्यानं त्यावेळच्या तरुण पिढीला भुरळ घातली होती.. तर तरुणींच्याही सपनों का सौदागर झाला...आराधना नंतर राजेश खन्नानं 15 सलग हिट दिले. त्यातूनच तो सुपरस्टार जन्माला आला...आराधना, कटी पतंग, अमर प्रेम, हाथी मेरे साथी, नमक हराम, हम दोनो, आनंद ..एक ना दोन अनेक चित्रपटांनी इतिहास रचला...

राजेश खन्नाचा उल्लेख येताच सर्वात आधी नावं येतं ते आनंद या चित्रपटाचं, या चित्रपटात त्यावेळी नवखा असलेला अमिताभ बच्चन राजेश खन्नाच्या समोर होता..खूप गाजला तो चित्रपट. खऱं तर याच चित्रपटानं अमिताभलाही एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं..आनंद चिॆत्रपटाची कथा, त्यातला राजेशचा मृत्यु आणि सदाबहार गाण्यानं चित्रपट त्यावेळी गाजला तसाच तो आजही पुन्हा पुन्हा पहावा असाच आहे. त्यातला बाशू मोशाय आजही लोकांना आठवतो..
राजेश खन्नाच्या चित्रपटाच्या यशात गाण्यांचाही मोठा हात आहे..राजेश खन्ना किशोरकुमार आणि आर डी बर्मन या त्रिकुटानं एकसे बढकर एक हिट गाणी दिलीत..मेरे सपनोंकी रानी, रुप तेरा मस्ताना, कुछ तो लोग कहेंगे, ये शाम मस्तानी, ये क्या हुआ, चिंगारी कोई भडकी, जय जय शिवशंकर, ओ मेरे दिल के चैन, ये जो मोहब्बत है, ही आणि यासारखी अनेक गाणी या चित्रकुटानं दिलीत जी ऑल टाईम हिट आहेत..आजही यातली अनेक गाणी गुणगुणावी वाटतात... राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांचा आवाज हे जणू समिकरणच बनलं होतं...ही गाणी जशी हिट झालीत तशीच आन मिलो सजना या चित्रपटातील गाण्यांनीही धुमाकुळ घातला होता. अच्छा तो हम चलते है हे गाणही त्यापैकीच एक..निर्माते ओमप्रकाश यांनी गितकार आनंद बक्षी आणि संगितकार लक्ष्मिकांत यांना आणखी एक रोमँटीक गाणं तयार  करण्यास सांगितलं..पण आनंद बक्षी यांनी 20-25 गितांचे बोल लिहिले पण ओमप्रकाश यांना हवं असलेलं रोमँटीक गाणं काही तयार होतं नव्हतं...10 तास मेहनत करुनही गाण्याचे बोल काही  पसंत पडत नव्हते . त्यावेळी आनंद बक्षी जायला निघाले आणि म्हणाले अच्छा तो हम चलते हैं...त्यावर लक्ष्मिकांत यांनी म्हटलं फिर कब मिलोगे...आणि यातून आनंद बक्षी यांना गितांचे बोल मिळाले आणि पुढच्या 25 मिनीटात ते गाणं तयार झालं...ज्या गाण्यानं सुद्धा इतिहास रचला..अशी एक ना दोन अनेक गाणी होती राजेश खन्ना यांच्या चित्रपटात ज्यांनी त्यांना सुपरस्टार पदापर्यंत पोचण्यास मोलाचा हात दिला...

राजेश खन्ना रोमँटिक हिरोच, पण त्याच्या भूमिका तशा इमोशनल होत्या..राजेश खन्ना सुद्धा आपली इमेज ही इमोशनल हिरोची आहे अॅक्शन हिरोची नाही असंच म्हणत होता. राजेश खन्ना हा सर्वार्थानं सुपरस्टार सारखंच जगला..पण त्याची जादू ओसरली तेव्हांही तो त्याच तोऱ्यात वावरत होता. राजेश खन्नाची जागा अमिताभ बच्चननं घेतली, दोघांच्या अभिनयाचा बाज वेगवेगळा आहे..तरिही नमक हराक नंतर अमिताभ राजेश खन्नाला भारी पडतोय हे स्पष्ट झालं. ते राजेश खन्नानं खाजगीत मान्यही केल्याचं चित्रपटसृष्टीतले राजेशच्या जवळचे पत्रकारही सांगतात..पण मी परत येत आहे असा तो नेहमी म्हणायचा..आणि त्यानंतर अवतार, सौतन सारखे हिट त्यानं दिलेही..पण तो काळ अँग्री यंग मॅन अमिताभचा होता..त्यामुळे पुढे राजेश खन्नाची जादू फारशी चालली नाही..त्यानंतर राजेश खन्ना राजकारणात आला..त्यानं दिल्लीतून लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात  निवडणूक लढवली होती...या निवडणुकीत अडवाणी जिंकले पण त्यांना हा विजय मिळवणं कठीण झालं होतं..अडवाणी फक्त दिड हजार मतांनी जिंकले होते...जर ते हरले असते तर राजेश खन्नाही जायंट किलरच्या पंक्तित बसला असता..तसा त्यानं हा पराभवही स्विकारला नाही..त्यानंतर तो खासदार म्हणून 1991 ते 1996 पर्यंत राजकारण होता..त्यानंतर तो निवडणुक प्रचारात सक्रीय भाग घेत होता..

राजेश खन्नासाठी त्याचे चाहते जीव ओतायचे, त्याला खूप मोठे चाहते लाभले होते. तरुण मुली तर त्याच्यासाठी वेड्या व्हायच्या..राजेश खन्ना सतत चाहत्यांच्या गराड्यात अडकलेला अभिनेता होता...तो आपल्या चाहत्यांनाच सर्व काही मानत असं..व्ययक्तित आयुष्यातही तो ऐटीत आणि रुबाबातच राहिला..पण डिंपलबरोबरचं त्याचं लग्न फार वर्ष टीकलं नाही..आठ वर्षानंतर दोघे वेगेळे झाले पण शेवटपर्यंत त्यांनी घटस्फोट घेतला नाही....आयुष्याच्या संध्याकाळी त्याला एकटेपणा जाणवत होता..पण शेवटचे काही दिवस डिंपल, दोन्ही मुली आणि जावई अभिनेता अक्षयकुमार त्याच्याबरोबर असायचे...त्यानं शेवटी एका जाहिरातीसाठी काम केलं. मरण्यापूर्वी शूट करण्यात आलेली त्याची एका पंख्याची जाहिरातही खूपच वास्तविक झाली होती...मेरे फॅन हमेशा मेरेही रहेंगे म्हणतच राजेश खन्नानं या जगाचा निरोप घेतला..

Monday, July 9, 2012

२५ ऑगस्ट २००७ आणि गोकुळ चाट...


हैदराबादमध्ये जागोजागी छोट्या मोठ्या गाड्यांवर भेळपूरी, शेवपुरी, पॅटीस, पाणीपुरी मिळेतच..पण अनेक गाड्यांवर तेलुगु चव जास्त जाणवते. म्हणजे प्रत्येक पदार्थाला एक वेगळी चव असते तशी ती जाणवत नाही. त्यातच चाट आणि पाणीपुरी म्हटल्यावर जो काही चवीचा मुद्दा येतो तो वेगळाच असतो..त्यामुळे अनेकदा या चाटची फारशी मजा नाही येत...अलिकडे काही उत्तर भारतीय लोक पाणीपुरी बनवतात ती त्यातल्या त्यात चांगली वाटते.. पण बाकी सर्सास बेचवच असते. भेळ किंवा ओली भेळ, मिसळ ..छोट्या मिरचीची भजी किंवा कांदा भजी ही एकतर मिळत नाहीत आणि मिळाली तर आपल्याला आवश्यक ती चव मिळत नाही..बटाटे वडा म्हटल्यावर तर तोंडाला पाणी सुटणार नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही..पण हैदराबादमधले हे लोक ते कशापासून बनवतात माहित नाही पण चवीच्या बाबतीत मात्र एकदमच फालतु म्हणावं असाच तो प्रकार आहे. मी तर काही पदर्थांची मुळ चवच विसरून गेलोय. या सर्वांवर एक उपाय म्हणजे हैदराबादमध्ये कोटी भागात गोकुळ चाट हे हॉटेल आहे..इथं मिळणारे सर्वच पदार्थ खुपच चविष्ट असतात..अगदी दहीपुरी, रगडा पॅटीस किंवा मिसळ प्रत्येक पदार्थाला एक छान चव आहे..त्यामुळे या गोकुळमध्ये संध्याकाळी एखाद्या पदार्थावर ताव मारण्याची इच्छा होतेच..पण या गोकुळमध्ये काही खायचं म्हणजे मोठं दिव्यच असतं..गर्दी एवढी प्रचंड असते की त्यातून वाट काढत जायचं , आपली आर्डर द्याचयी आणि पाच सात मिनीटात त्या गरम प्लेट घेऊन त्याच गर्दीतूनच बाहेर पडण्याचं दिव्य करावं लागतं.. पण आपल्याला हवा असलेला पदार्थ खाताना ते दिव्य फारसं कठीण वाटत नाही..



गोकुळमध्ये नेहमी जायचा योग काही येत नाही..त्यातच आम्ही कोटीपासून फारच दूर राहत असल्यामुळे केवळ चाट खाण्यासाठी हैदराबादच्या ट्रॅफिकमधून वाट काढत जाणं सोप नाही.. त्यातच वेळे अभावीही तिकडं फारसं जाणं होत नाही..पण पूर्वी जेव्हा हैदराबादमध्ये नवीन आलेलो होतो तेव्हा आठवड्यातून एखादी चक्कर त्या भागात व्हायचीच..मग काय थोडंफार भडकणं झाल्यानंतर गोकुळला भेट ही आलीच..त्यामुळे या गोकुळशी थोडं जिव्हाळ्याचं नातं जडलय...पण मागच्या काही वर्षात तिथं जाण्यात खंड पडला होता..पण मागच्याच आठवड्यात त्या गोकुळमध्ये जाण्याचा योग पुन्हा आला..हो योगच म्हणायचं..माझ्या दोन सहका-यांबरोबर आम्ही अबीट्सला थोडी शॉपींग केली आणि नंतर गोकुळला जाण्याचा बेत ठरला.. ठरल्याप्रमाणं आम्ही तीघेजण गोकुळला गेलो..अबीट्स ते कोटीचे गोकुळ हा जेमतेच पाच मिनीटाचा बसचा प्रवास पार करायला आम्हाला तब्बल अर्धातास लागला...तेवढा टॅफिकचा त्रास संपवून आम्ही एकदाचे गोकुळमध्ये आलो. नेहमीप्रमाणं गर्दी होतीच..आम्ही तिघांच्या तीन वेगवेगळ्या आर्डर देऊन त्या येण्याची वाट पहात होतो.. शेवटी गर्दीतून आपली गरम प्लेट घेऊन आम्ही तिघांनी चांगलाच ताव मारला..खरं तर आणखी एक एक प्लेट घ्यायचा विचार होता..पण गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही बाहेर पडलो...


गोकुळमध्ये आम्ही पंधरा वीस मिनीटीचं होतो...त्या पंधरा वीस मिनिटीत रगडा पॅटीस आणि दहीपुरीवर ताव मारताना माझं मन मात्र त्याचा आस्वाद घेताना वेगळात विचार करत होतं..याच गोकुळमध्ये आमच्यासारखे लोक दररोज गर्दी करतात. नेहमीच्या चवीत थोडा बदल करण्यासाठी लोक इथं येतात.. गर्दीतच एखाद्या विशेष प्लेटवर ताव मारत असतात...अशाच एका दिवशी म्हणजे २५ ऑगस्ट २००७ ला या गोकुळमध्ये अघटीत घडलं.....अनेकजण याच गर्दीत आपली ऑर्डर घेण्यात मग्न होते तर काही जण आपली प्लेच फस्त करण्यात मग्न होते...लहान थोर, मुलं-मुली आपापल्या विश्वात मग्न होते आणि त्याचवेळी गोकुळमध्ये मोठा स्फोट झाला.....कुणाला काही कळायच्या आताच सगळं चित्र बदलेलं होतं..सगळीकडे गोंधळ, आरडाओरड आणि रक्ताचा सडा सांडलेला होता..लोकांची बाहेर पडण्याची घाई होती तर काही जण मदतीसाठी याचना करत होते...गोकुळमध्ये ज्या गर्दीत हा सर्व पदार्थ बनवण्याचा आणि तिथंच खाण्याचा दररोजचा नित्यक्रम होता तिथं गॅस सिलेंडरवर कोण्या हरामखोरानं एका पिशवीत बॉम्ब ठेवला होता...आणि अपेक्षीत वेळी त्यांनी त्याचा स्फोट घडवून आणला होता..त्यात जवळपास २०-२५ लोकांचा बळी गेला तर काहीजण जखमी झाले..स्फोट एवढा भयानक होता की काही लोकांचे पाय तुटले. काहींचे हात तुटले... काहीजण भाजून काळे ठीक्कर पडले होते.. त्यावेळी मी माझ्या ऑफीसमध्ये रात्रीचं बातमीपत्र बनवण्यात व्यस्त होतो.. त्या घटनेची व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर मला त्या गोकुळचा तिटकारा आला..गोकुळमध्ये लोक जिभेचे थोडे लाड पुरवायला जातात..त्यात त्यांची काहीही चूक नसताना त्यांना प्राण गमवावे लागले...पण काही हरामखोर लोक सामान्य लोकांचं जगणं कठीण करण्यातच धन्यता मानतात...मी ज्या दिलसुखनगरमध्ये रहात होतो. तिथचं शेजा-याचा एकुलता एक मुलगाही त्याच स्फोटात गेला...इंजिनिअरिंग करणारा तो मुलगा कॉलेजमधून येताना मित्रांबरोबर गोकुळमध्ये असाच एखाद्या प्लेटवर ताव मारण्यासाठी गेला तो पुन्हा परत आलाच नाही.. ह्या घटनांवर भरपूर लिहता येण्यासारखं आहे..आज खाण्याचा विषय होता. त्याचा उल्लेख होता म्हणून त्या संदर्भानं ह्या दुर्घटनेचा उल्लेख केला..कारण मी दहीपुरी संपवत असताना माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा ते चित्र दिसत होतं..आणि आज पुन्हा तसा प्रसंग आला तर...अशा भितीनं मीसुद्धा थंड झालो होतो....नेहमीप्रमाणं मला आता त्या गोकुळच्या कोणत्याच पदार्थाटी चव लागत नाही.. सर्व कसं बेचव वाटतय...त्या जागेवर पाय ठेवताच कुठं बॉम्ब तर ठेवलेला नाही ना अशी शंका येते.. खातानासुद्धा आजूबाजूला तेचं भयान दृष्य आठवण करुन देत होतं....

गोकुळ चाटचा तो प्रसंग आठवला की आजही अंगावर शहारे येतात..जे गोकुळ त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध होतं.. त्यांनं २०-२५ लोकांचा बळी घेतला...तिथली चव आजही बदललेली नाही..पण मला मात्र त्या चवीत फरक पडलाय असचं वाटतय.. का कोण जाणं त्या गोकुळमध्ये गेल्यानंतर मस्त ताव मारण्याचं मनच होत नाही....


Thursday, July 5, 2012

आंध्र प्रदेशातून काँग्रेस संपली..


आंध्र प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका या २०१४ मध्ये होत आहेत पण त्या निवडणुकीचा निकाल हा आत्ताच लागलाय. राज्यात सध्या काँग्रेस पक्षाचं सरकार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांनी काँग्रेसला सलग दोनवेळा सत्तेत आणलं पण त्यांच्या अपघाती निधानानंतर आंध्रातलं राजकारण पूर्णपणे बदललय. वायएसआर यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांनी वडलांच्या निधनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली होती पण ती काँग्रेसनं मान्य केली नाही शेवटी याच जगनमोहन रेड्डींनी स्वताचा वेगळा पक्ष स्थापन केलाय आणि हा पक्षच काँग्रेसची सत्ता घालवणार हे जवळजवळ पक्कं आहे. जगनममोहन यांच्या पक्षाचं उघड उघड समर्थन करणा-या आमदारांची संख्याही जास्त आहे. त्याचाच एक दणका जगनमोहन रेड्डींनी काँग्रेसला दिलाय. जगन यांचे समर्थन करणा-या १६ आमदारांना काँग्रेसनं निलंबित केलं होतं. त्यामुळे आंध्रात पोटनिवडणुक झाली. विधानसभेच्या एकूण १८ जागा तर लोकसभेच्या एका जागेसाठी ही निवडणूक झाली. त्यात विधानसभेच्या १५ आणि लोकसभेची जागा जिंकून जगनमोहन यांनी काँग्रेसचा पत्ता साफ केला. ही काँग्रेससाठी मोठी चिंतेची बाब आहे. या पोटनिवडणुकीनं जगनमोहन यांनी काँग्रेसचं आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणाराय हे आत्ताच दाखवून दिलय. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या तेलुगु देसमचंही काही खरं नाही..त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दक्षिणेतला बालेकिल्ला ढासळलाय हे नक्की..

खरं तर या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच जगनमोहन रेड्डी यांना सीबीआयनं अटक केली. अवैघ संपत्तीच्या प्रकरणात सीबीआय चौकशीचा ससेमिरा जगन यांच्यामागे लावून देण्यात आलाय. त्यात जगन यांच्या खास जवळच्या काही सहका-यांना तर काही सनदी अधिका-यांनाही सीबीआयनं अटक केलीय. पण जगन यांच्या अटकेचं टायमिंग मात्र सर्वांनाच खटकतय. पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच जगन यांना अटक करुन त्यांचा बिमोड करायचा हा काँग्रेसचा डाव होता. सीबीआयचा राजकीय वापर करण्यात काँग्रेसचे सत्ताधारी तरबेज आहेत हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. पण जगन मोहन रेड्डींना थोपवण्यासाठी काँग्रेसनं टाकलेला सीबीआयचा फास उलटा पडला आणि जगनच्या अनुपस्थीतीत त्यांची आई आणि बहिण यांनी झंझावाती प्रचार केला. जगन मोहन यांना राजकीय द्वेषातून फसवल्याचा आरोप त्यांनी प्रचार सभांतून केला. तसच दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर यांनी गरिब आणि आदिवासींसाठी सुरु केलेल्या योजना जगन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा सुरु केल्या जातील असं आश्वासन देण्यात आलाय..जगन तुमचा भावी मुख्यमंत्री आहे असा प्रचारही केला गेला त्याला लोकांनी जोरदार साथ दिली..

वाय एस राजशेखर रेड्डी यांची जनसामान्यात स्वच्छ प्रतिमा होती. दलित, ख्रिश्चन आणि मागास जातींमध्ये त्यांचा जनाधार मोठा होता. त्याची सहानुभूती जगन यांना मिळाली. तसच आंध्रातला रेड्डी समाजही जगन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. हेच चित्र पुढही कायम राहणाराय. भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात डांबलेल्या जगन यांना त्यांच्या अटकेचा फायदाही झालाय. आत्ता फक्त जगन यांना जामीन मिळण्याचा अवकाश..आंध्रात एखादा राजकीय भूंकप होण्याची शक्यताय. किरण रेड्डी यांचं सरकार काठावरचं बहुमत घेऊन सत्तेत आहे. त्यामुळे आणखी १५-२० आमदारांनी जगन कॅम्पमध्ये उडी मारल्यास काँग्रेसचं सरकार राहणार नाही..हे आजचं चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस आणि तेलुगु देसम यांना आत्ता धडकी भरलीय.

आंध्र प्रदेशातून काँग्रेसची सत्ता गेल्यास लोकसभा निवडणुकीतही त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे आधीच चारी बाजूंनी घेरलेल्या काँग्रेसपुढं जगन मोहन रेड्डींनी मोठं आव्हान उभं केलय. हे आव्हान मोडून काढण्याची धमक आंध्रातल्या काँग्रेस नेतृत्वाकडे नाही..तर तेलंगणाच्या मुद्द्यावरची चालढकलही काँग्रेसला महागात पडणाराय. त्यामुळे आंध्र प्रदेशातून काँग्रेसचं उच्चाटन झालेलं आहे ही मी आत्ताच सांगतो...

Thursday, May 31, 2012

पाणी पुरवठा मंत्री ढोबळे सरांचा दुष्काळ


महाराष्ट्रातील काही भागात यावर्षी भिषण दुष्काळ पडलाय..पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकूनही पाणी मिळत नाही. तर जनावरांना चारा नाही. जमीनी ओस पडल्यात. अशी गंभीर परिस्थीती असताना या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना मात्र हा दुष्काळ दिसत नाही. जो काही दुष्काळ हा तो तेवढा तिव्र नाही. तो मिडीयानं उभा केलाय. हा पितपत्रकारितेचा प्रकार असून टीव्हीवाल्यांनी त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी दुष्काळ अतिरंजीत करुन दाखवलाय अशी मुक्ताफळं ह्या मंत्रीमहोदयांनी उधळलीत. आता राज्यात दुष्काळ आहे की नाही हे जर या राज्याच्या मंत्र्याला माहितच नाही तर त्यांना कोण सांगणार. बरं या दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यावर तोच मंत्री दुष्काळ तेवढा काही भीषण नाही असं जर म्हणत असेल तर हे या राज्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल. ढोबळेसाहेब ज्या मंतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या मोहोळ-मंगळवेढा तालुक्यात पिण्याची पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यांच्याच मतदारसंघाला लागून सांगोला तालुका आहे. तसच सोलापूर जिल्ह्याची सीमा असलेल्या सांगली आणि सातारा भागातही मोठा दुष्काळ आहे. याच भागात काँग्रेसचे युवराज येऊन दुष्काळाची पाहणी करुन गेले. पण ढोबळेसाहेबांना मात्र हा सर्व मिडीयाचा अतिरंजीतपणा वाटतो..जर हा दुष्काळ मिडीयानं उभा केला असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची, जनावरांना चारा डेपोची व्यवस्था कशासाठी केली आहे. पन्नास पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या पण दुष्काळाची झळ बसत असलेल्या भागालाही चारा डेपो देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कशासाठी दिलेत. ज्या मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत त्यांच्याच मंत्रीमंडळात ढोबळेसाहेब पाणी पुरवठा मंत्री आहेत ह्याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय...

राज्यात दुष्काळाची जर गंभीर परिस्थीती नसेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे २७०० कोटींची मदत कशासाठी मागितली हे ढोबळेंनी सांगावं. त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष आणि जाणते राजे शरद पवार यांनी दुष्काळ प्रश्नावर राज्यापालांना का लक्ष्य केलं होतं. राज्यपालांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करायला पाहिजे असं पवारसाहेब का म्हणाले.. हे ढोबळेसरांनी लक्षात घ्यावं. याउपर जर राज्यात दुष्काळ नाही असं जर आपणास म्हणाचय तर मग केंद्र सरकार मदत तर कशाला करेल हेसुद्धा या ढोबळेंना कळू नये का.. खरं तर एखाद्या विषयावरुन लक्ष दुसरीकडं वळवण्याचा किंवा जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे. ढोबळेसाहेब पाणी पुरवठामंत्री आहेत. त्यांनी जरा या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला असता तर त्यांना या दुष्काळाच्या झळा आणि दुष्काळग्रस्तांच्या व्यथाही कळल्या असत्या. पण केवळ सरकारी आकडेवारी नाचवून दुष्काळाची तीव्रता कमी आहे हे सांगण्यातच ज्या मंत्र्याला धन्यता वाटते त्यांनी त्या खुर्चीवर बसण्याचा नाद सोडावा. कारण आपण जर जबाबदारी समर्थपणे पार पाडत नसू तर त्या खूर्चीवर बसण्याचा त्यांना काहीएक अधिकार नाही...

ढोबळेसाहेब आपण म्हणता तसं अतिरंजीत चित्र मिडीयानं रंगवलं असेल तर या भागातली जनता पाण्याच्या टँकरसाठी दिवसभर वाट का पहातेय. एवढी जर आपल्याला माहिती नसेल तर आपण सरकारी कागदांवर विसंबून न रहता प्रत्यक्ष परिस्थीती पाहून या. तुम्हाला त्याची तीव्रता कळेलच. दुसरं असं की दुष्काळ काय आणि दुष्काळ सदृष्य परिस्थीती काय किंवा टंचाई सदृस्य परिस्थीती काय हे झालं सरकारी नियमानुसार दुष्काळाचं केलंल वर्णन..पण दुष्काळ हा दुष्काळच असतो हे तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनीधीला कळू नये यापेक्षा तुमचं अज्ञान ते काय..

दुष्काळ किती आहे. तो मिडीयानं उभा केलाय की निसर्गाचा मार आहे. यावर वेळ घालवण्यापेक्षा त्या दुष्काळग्रस्तांना वेळेवर मदत मिळणं गरजेच आहे. सरकारी आकडेवारीनुसार ज्या गावात दिवसाला चार पाच टँकर पाणी पुरवले जातात असं सांगितलं जातं त्याठिकाणी दिवसातून एकदाच टँकर येतो. ज्या भागात टँकरच्या १०-१५ खेपा व्हायला हव्यात तिथं जेमतेम दोन तीन खेपा होतायत. तर काही गावाला दोन दोन दिवस टँकर येतच नाही ही वस्तुस्थीती आहे. फक्त कागदावर १५०० टँकरनं पाणी पुरवठा सुरु आहे किंवा १००-१५० चाराडेपो उभा केलेत हे सांगून लोकांची थट्टा करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कीती होतेय यावर भर दिला तर दुष्काळावर काही प्रमाणात तरी मात करण्यास सरकारला यश येईलं. नाहीतर नेहमीप्रमाणे टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी एवढे कोटी रुपये खर्च झाले. तर चारा डेपोवर एवढे कोटी खर्च झाले असे सरकारी आकडे फक्त दाखवले जातील..

दुष्काळग्रस्त माणूस निसर्गाच्या ह्या मा-यानं अगोदरच हैराण झालाय. पिण्यासाठी पाणी, जनावराला चारा, पिण्याचं पाणी आणि हाताला काम एवढच्या त्याच्या माफक अपेक्षा आहेत. त्या जर हे सरकार देणार नसेल तर सरकार म्हणून तुम्हाला तिथं बसण्याचा अधिकार नाही. आपण मायबाप सरकार आहात, लोक तुमच्याकडे आशेनं पहात आहेत. त्यांना मदत करुन त्यांच्या जगण्याला हातभार लावण्याचा प्रयत्न व्हायला हवा. ते सोडून त्याचं खापर दुस-यावर फोडून समस्या संपणार नाही.. ढोबळेसर आपण हुशार आहेत. प्राध्यापक आहेत, ग्रामीण भागातले लोकप्रतिनिधी आहेत. तुमच्याचकडे पाणी पुरवठा विभाग आहे. लोकांना त्याचा फायदा होईल एवढं काम करण्यात आपण आपली ऊर्जा खर्च केली तर ते तुम्हाला शोभून दिसेल. नसते मिडियावर खापर फोडून काही समस्या सुटणार नाहीत हे समजण्याएवढे आपण सुज्ञ आहेत एवढचं या निमित्तानं आपणास सांगणं आहे...

Tuesday, May 29, 2012

स्त्री भ्रुण हत्या - एक सामाजिक समस्या


स्रीभ्रूण हत्येचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचं एक कारण म्हणजे आमीर खानच्या बहुचर्चित "सत्यमेव जयते" या कार्यक्रमात या सामाजिक विषयाला दिलेलं महत्व..खरं तर या कार्यक्रमामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला एवढचं...! कारण या विषयावर पूर्वीपासूनच जागृतीच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम सुरुच आहे. लेक वाचवा अशी आंदोलनही झाली. पण आमीर खानच्या कार्यक्रमामुळे तो विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. तसच या विषयाचं गांभिर्य, स्त्री भ्रुण हत्या केली जात असताना होणारा मातेचा कोंडमारा आणि वैद्यकीय क्षेत्रातली अपप्रवृती यावरही प्रकाश टाकण्यात आल्यानं हा विषय चर्चेत आला.

स्त्री भ्रुण हत्या करणा-या अनेक डॉक्टरांनी त्यांची दुकानंच थाटलेली आहेत. अनेक शहरात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरुय. बीड जिल्ह्यातला परळी तर या प्रकारात बदनाम झालय. परळीतलं डॉ. सुदाम मुंडे यांचे हॉस्पीटल तर ह्या गोरख धंद्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. ह्या हॉस्पीटलमध्ये स्त्रीभ्रुण हत्या होत असल्याचं उघड झालं होतं. त्याचा परवानाही रद्द करण्यात आला होता. पण पुन्हा तो धंदा राजरोसपणे सुरु होता. त्यातच मुलगी नको म्हणून गर्भपात करताना एका मातेचा मृत्यु झाला. त्यानंतर डॉ. मुंडेवर कारवाईसाठी हात उचलला गेला. तो डॉक्टर सध्या फरार आहे. पण हा गोरखधंदा त्या हॉस्पीटलमध्ये होत होता हे सर्वांनाच माहित असताना कोणतीही यंत्रणा त्याकडे का गेली नाही हे न समजण्यासारखे नाही. कारण याच प्रशासकीय यंत्रणा अशा डॉक्टरांना पाठीशी घालतात. हे सुद्धा त्यातलं एक प्रमुख कारण आहे. परळीतला डॉक्टर मुंडे हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारचे डॉक्टर मुंडे जागोजागी आहेत आणि त्यांच्याकडे अशा स्त्री भ्रुण हत्या राजरोसपणे होत आहेत. काही हजार रुपयांच्या मोबदल्यात गर्भपात करण्याचा हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २५० अधिकृत सोनोग्राफी सेंटर आहेत. यावरुन महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या सोनोग्राफी सेंटरची संख्या आणि तिथं होत असलेले प्रकार याची व्याप्ती लक्षात येते..

मुलगी नको म्हणून जन्माला यायच्या आतच तिला मारण्याचं पाप करण्याचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. त्याला जबाबदार असणा-यांनी विचार करायला हवा. हा प्रकार खेडेगावात, आदिवासी भागात जास्त प्रमाणात चालतो असा आतापर्यंत समज होता. पण मागच्या काही दिवसात प्रकाशात आलेल्या माहितीनुसार मोठ्या शहरातून तसच सुशिक्षीत लोकांकडूनही हा प्रकार होत असल्याचं पुढं आलय. म्हणूनच हा विषय आणखी गंभीर होत चाललाय. कारण मुलगी नको, मुलगाच हवा ही मानसिकता सगळीकडे घर करत चालल्याचं यावरुन दिसून येतय. त्यामुळे शहर असो की गाव, सुशिक्षित असो अडाणी, कमी शिकलेला या सर्व स्तरातून मुलगी नको हा विचार नष्ट होणं गरजेचं आहे.

स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी जिल्हातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना सायलंट ऑब्जर्व्हर हे यंत्र बसवण्याचा आदेश दिला होता. त्यातून कोणत्या सोनोग्राफी केंद्रात काय प्रकार चाललाय हे स्पष्ट होण्यास मदत होते. तसच सोनोग्राफी करताना त्या महिलेकडून एक अर्ज ऑनलाईन भरुन घेण्याचा आदेशही काढलाय. पण त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. पण मुंबई हाय कोर्टांनं तो अर्ज फेटाळून लावला. कोल्हापूरात मुलींचं प्रमाण हे दरहजारी ८३९ पर्यंत खाली घसरलंय. थोड्या फार फरकानं मुलींचं हे प्रमाण इतर जिल्ह्यातही असंच घसरत चाललय. त्यामुळे मुलगी वाचवणं ही काळाची गरज बनलय.

स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. तसच प्रसुतीपूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदाही आहे. पण कायद्याच्या पळवाटा तसच घरातूनच वंशाचा दिवा हवा म्हणून होणारा हट्ट यामुळे अनेक ठिकाणी स्त्री भ्रुण हत्या केली जाते. हे थांबवायचे असेल तर त्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. जोपर्यंत मुलगी नको फक्त मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हा प्रकार थांबणं शक्य नाही. फक्त डॉक्टरांनाही दोष देऊन काही उपयोग होणार नाही. स्त्री भ्रण हत्या रोखण्यासाठी लोकांच्या मानसिकेत बदल होणं गरजेचं आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुलींना जन्माला येण्यापूर्वीच त्यांना संपवण्याचा हा प्रकार थांबणं अवघड आहे. कारण सर्वांना मैत्रिण हवी आहे, बायको हवी आहे, आई हवी आहे, बहिण हवी आहे..मग मुलगी का नको...? मुलीला जन्माला येऊ दिलं जात नसेल तर आई, बायको किंवा बहिण कुठून येणार याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळेच लेक वाचवा असं म्हणण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलीय..

Monday, April 23, 2012

विल्यम शेक्सपिअर-एक महान लेखक

विल्यम शेक्सपिअर

विल्यम शेक्सपिअर हा इंग्रजी वांड्मयातील महत्वाचा लेखक..महत्वाचा म्हणजे एवढा की..इंग्रजी वांड्मय म्हणजे दोन तृतीयांश बायबल आणि एक चतुर्थांश शेक्सपिअर असंही म्हटलं जातं. यावरुनच शेक्सपियरचं इंग्रजी वांड्मयातलं महत्व अधोरेखित होतं. तर शेक्सपिअरला वगळून इंग्रजी वांड्मयावर लिहणं अश्यकच आहे. एवढं मोठं योगदान या लेखकानं इंग्रजीला दिलेलं आहे. आपल्या अवघ्या ५२ वर्षाच्या आयुष्यात शेक्सपिअरनं ३६ नाटकं लिहिली तर जवळपास १५० सुनितं लिहिली. असं म्हणतात की शेक्सपिअरनं त्याच्या लेखनातून एकही विषय सोडला नाही. त्याच्या लेखनानं सर्व विषयाला स्पर्श केलाय. राजकारण, प्रेम, कौटुंबिक, सामाजिक, यासह जीवनाच्या सर्व अंगाला त्याच्या लेखनीनं स्पर्श केलाय. त्याची नाटकं सर्वात जास्त गाजलेली तसच इंग्रजी वांड्मयाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. ट्रॅजेडी असो वा कॉमेडी, किंवा नाटकाचा इतर कोणताही प्रकार असो त्यात शेक्सपिअर नाही असं होत नाही..ट्रॅजेडीचाच विचार करायचा तर हॅम्लेट, किंग लिअर, ऑथेल्लो, मॅकबेथ, रोमिओ आणि ज्युलियट यांना कोण विसरु शकेल.

सोळाव्या शतकातल्या या लेखकाविषयी जगभरातून लेखन झालय. त्याच्या नाटकांची जगातल्या जवळपास सर्वच भाषेत भाषांतरं झालेली आहेत. तर त्याच्यावर लाखो समिक्षकांनी लेखन केलय. तरीही शेक्सपिअर हा विषय काही संपत नाही. त्याच्या लेखनीनं इंग्रजीच्या अभ्यासकांना तर झपाटूनच सोडलंय. १६ व्या शतकात त्यानं ज्या पद्धतीनं नाटकं बसवली आणि ती अजरामर झाली त्याला तोडच नाही. आजही तुमच्या आमच्यातल्या अनेकांच्या व्यवहारात बोलतानाही शेक्सपिअरच्या नाटकातल्या पात्रांचा विषय येतो तर कधी त्या नाटकातले संदर्भ येतात. हेच पहा ना. to be or not to be असं म्हटलं की हॅम्लेटच नावं ओठावर येतच. तुमची माझी अनेकांची हॅम्लेटसारखी अवस्था अनेकदा झालेली आहे. तर राजकारण किंवा मैत्रिच्या बाबतीत Brutus you too ! हा ज्युलियस सिझरमधला अजरामर डायलॉग येतोच. तर प्रेमाचा विषय निघाल्यावर रोमिओ ज्युलियट शिवाय तर तो पूर्ण होऊच शकत नाही. अशी एक ना दोन अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. किंग लिअरबद्दल तर कीतीतरी वेळा चर्चा होईन गेलीय. म्हातारा किंग लिअर आणि त्याच्या तीन मुली संपत्तीसाठी काय- काय करतात हा १६ व्या शतकातला शेक्सपिअरनं मांडलेला विषय आजही आपल्या अवतीभोवती अनेकदा आपण पाहतोय.

शेक्सपिअरच्या नाटकांची जगातल्या सर्व भाषेत भाषांतरं झाली त्यात मराठीही मागं नाही. किंग लिअरवरचं नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकरांचं नाटक तर जगजाहीर आहे. शेक्सपिअरच्या एका-एका नाटकाचं पाच-सहा लेखकांनी त्यांच्या शैलित भाषांतर केलय. यावरुनच शेक्सपिअरच्या लेखनाची महती विषद होतेय. कारण त्या- त्या भाषेत लिहिण्यासाठी विषय नाहीत असं नाही पण शेक्सपिअरनं विषयच असे काही हाताळलेत ते आज पाचशे वर्षानंतरही अजरामर आहेत. त्याचा विषय काय किंवा आशय काय आजही जिवंत आहेत. ते कालबाह्य झालेले नाहीत. हीच त्याच्या लेखनाची ताकद म्हणावी लागेल.

इंग्रजी वांड्मयाला भरभरुन दिलेल्या या लेखकाच्या बाबतीत फारशी माहिती मात्र उपलब्ध नाही. अगदी त्याच्या जन्मतारखेचाही घोळ आहेच. एप्रिल महिन्यातील २३ किंवा २६ तारखेला त्याचा जन्म झाला असावा असं मानलं जातय. तर मृत्युच्या तारखेबद्लही असंच म्हटलं जातय. काही ठिकाणी तर शेक्सपिअरची जन्म तारिख आणि मृत्युची तारीखही एकाच दिवशी येते म्हणजे २३ एप्रिल असाही एका मतप्रवाह आहे. तर त्याच्या जीवनाबद्दलही अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. शेक्सपिअरनं त्याच्यापेक्षा वयानं ८ वर्ष मोठ्या मुलीशी लग्न केलं होतं. तो त्याच्या कौटुंबिक जीवनात सुखी नव्हता. यापासून त्याच्या संबंधांबद्दलही बरचं काही लिहलं गेलय. पण त्याच्या इतर बाबींवर जास्त लक्ष देण्यापेक्षा त्यानं इंग्रजी वांड्मयाला दिलेली अमुल्य देणगी ही लाख मोलाची आहे. त्यावर आपण लक्ष केंद्रीत करुयात...विल्यम शेक्सपिअरचा जन्म इंग्लड मधल्या वारविकशायर परगण्यातील स्ट्रॅटफोर्ड-ऑन- अँव्हान या गावात १५६४ साली झाला. त्यानंतर तो इंग्लडला गेला. तिथच त्यानं आपलं बस्तान बसवलं आणि नाटकात मोठं नाव कमावलं. त्यानंतर तो आपल्या गावी परत आला. आयुष्याचे शेवटचे दिवस त्यानं आपलं गाव स्ट्रॅटफोर्ड या गावातच घालवले. १६१६ साली शेक्सपिअरचं निधन झालं. शेक्सपिअरच्या जन्मतारखेचा जसा वाद आहे तसाच त्याचा फोटो किंवा पोर्ट्रेटचाही आहे. त्याचा खरा फोटो कोणता हे आजही गुलदस्त्यातच आहे. त्याच्या केलेल्या वर्णावरुन काही पोर्ट्रेट बनवलीत त्यालाच मान्यता देण्यात आलीय. एप्रिलचा महिना आहे आणि शेक्सपिअरचा विषय आठवला म्हणून इंग्रजीचा एक विद्यार्थी या नात्याना त्याच्यावर काही लिहिता येईल का असा विचार मनात चमकून गेला आणि वाटलं शेक्सपिअरवर काहीही हलकं फुलकं लिहूयात म्हणून हा प्रपंच केला. बाकी शेक्सपिअवर लिहायचं म्हटलं तर दोन चार पानच काय अखंडपणे लिहित राहावं एवढा मोठा त्याच्या लेखनाचा पसारा आहे. त्यावर कितीही लिहिलं तर कमीच आहे. पण केवळ शेक्सपिअर कोण होता एवढं तर जाता जाता लक्षात यावं, त्याचं स्मरण व्हावा म्हणून अगदी थोडक्यात या चारोळ्या लिहिलेल्या आहेत..