Monday, July 9, 2012

२५ ऑगस्ट २००७ आणि गोकुळ चाट...


हैदराबादमध्ये जागोजागी छोट्या मोठ्या गाड्यांवर भेळपूरी, शेवपुरी, पॅटीस, पाणीपुरी मिळेतच..पण अनेक गाड्यांवर तेलुगु चव जास्त जाणवते. म्हणजे प्रत्येक पदार्थाला एक वेगळी चव असते तशी ती जाणवत नाही. त्यातच चाट आणि पाणीपुरी म्हटल्यावर जो काही चवीचा मुद्दा येतो तो वेगळाच असतो..त्यामुळे अनेकदा या चाटची फारशी मजा नाही येत...अलिकडे काही उत्तर भारतीय लोक पाणीपुरी बनवतात ती त्यातल्या त्यात चांगली वाटते.. पण बाकी सर्सास बेचवच असते. भेळ किंवा ओली भेळ, मिसळ ..छोट्या मिरचीची भजी किंवा कांदा भजी ही एकतर मिळत नाहीत आणि मिळाली तर आपल्याला आवश्यक ती चव मिळत नाही..बटाटे वडा म्हटल्यावर तर तोंडाला पाणी सुटणार नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही..पण हैदराबादमधले हे लोक ते कशापासून बनवतात माहित नाही पण चवीच्या बाबतीत मात्र एकदमच फालतु म्हणावं असाच तो प्रकार आहे. मी तर काही पदर्थांची मुळ चवच विसरून गेलोय. या सर्वांवर एक उपाय म्हणजे हैदराबादमध्ये कोटी भागात गोकुळ चाट हे हॉटेल आहे..इथं मिळणारे सर्वच पदार्थ खुपच चविष्ट असतात..अगदी दहीपुरी, रगडा पॅटीस किंवा मिसळ प्रत्येक पदार्थाला एक छान चव आहे..त्यामुळे या गोकुळमध्ये संध्याकाळी एखाद्या पदार्थावर ताव मारण्याची इच्छा होतेच..पण या गोकुळमध्ये काही खायचं म्हणजे मोठं दिव्यच असतं..गर्दी एवढी प्रचंड असते की त्यातून वाट काढत जायचं , आपली आर्डर द्याचयी आणि पाच सात मिनीटात त्या गरम प्लेट घेऊन त्याच गर्दीतूनच बाहेर पडण्याचं दिव्य करावं लागतं.. पण आपल्याला हवा असलेला पदार्थ खाताना ते दिव्य फारसं कठीण वाटत नाही..गोकुळमध्ये नेहमी जायचा योग काही येत नाही..त्यातच आम्ही कोटीपासून फारच दूर राहत असल्यामुळे केवळ चाट खाण्यासाठी हैदराबादच्या ट्रॅफिकमधून वाट काढत जाणं सोप नाही.. त्यातच वेळे अभावीही तिकडं फारसं जाणं होत नाही..पण पूर्वी जेव्हा हैदराबादमध्ये नवीन आलेलो होतो तेव्हा आठवड्यातून एखादी चक्कर त्या भागात व्हायचीच..मग काय थोडंफार भडकणं झाल्यानंतर गोकुळला भेट ही आलीच..त्यामुळे या गोकुळशी थोडं जिव्हाळ्याचं नातं जडलय...पण मागच्या काही वर्षात तिथं जाण्यात खंड पडला होता..पण मागच्याच आठवड्यात त्या गोकुळमध्ये जाण्याचा योग पुन्हा आला..हो योगच म्हणायचं..माझ्या दोन सहका-यांबरोबर आम्ही अबीट्सला थोडी शॉपींग केली आणि नंतर गोकुळला जाण्याचा बेत ठरला.. ठरल्याप्रमाणं आम्ही तीघेजण गोकुळला गेलो..अबीट्स ते कोटीचे गोकुळ हा जेमतेच पाच मिनीटाचा बसचा प्रवास पार करायला आम्हाला तब्बल अर्धातास लागला...तेवढा टॅफिकचा त्रास संपवून आम्ही एकदाचे गोकुळमध्ये आलो. नेहमीप्रमाणं गर्दी होतीच..आम्ही तिघांच्या तीन वेगवेगळ्या आर्डर देऊन त्या येण्याची वाट पहात होतो.. शेवटी गर्दीतून आपली गरम प्लेट घेऊन आम्ही तिघांनी चांगलाच ताव मारला..खरं तर आणखी एक एक प्लेट घ्यायचा विचार होता..पण गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही बाहेर पडलो...


गोकुळमध्ये आम्ही पंधरा वीस मिनीटीचं होतो...त्या पंधरा वीस मिनिटीत रगडा पॅटीस आणि दहीपुरीवर ताव मारताना माझं मन मात्र त्याचा आस्वाद घेताना वेगळात विचार करत होतं..याच गोकुळमध्ये आमच्यासारखे लोक दररोज गर्दी करतात. नेहमीच्या चवीत थोडा बदल करण्यासाठी लोक इथं येतात.. गर्दीतच एखाद्या विशेष प्लेटवर ताव मारत असतात...अशाच एका दिवशी म्हणजे २५ ऑगस्ट २००७ ला या गोकुळमध्ये अघटीत घडलं.....अनेकजण याच गर्दीत आपली ऑर्डर घेण्यात मग्न होते तर काही जण आपली प्लेच फस्त करण्यात मग्न होते...लहान थोर, मुलं-मुली आपापल्या विश्वात मग्न होते आणि त्याचवेळी गोकुळमध्ये मोठा स्फोट झाला.....कुणाला काही कळायच्या आताच सगळं चित्र बदलेलं होतं..सगळीकडे गोंधळ, आरडाओरड आणि रक्ताचा सडा सांडलेला होता..लोकांची बाहेर पडण्याची घाई होती तर काही जण मदतीसाठी याचना करत होते...गोकुळमध्ये ज्या गर्दीत हा सर्व पदार्थ बनवण्याचा आणि तिथंच खाण्याचा दररोजचा नित्यक्रम होता तिथं गॅस सिलेंडरवर कोण्या हरामखोरानं एका पिशवीत बॉम्ब ठेवला होता...आणि अपेक्षीत वेळी त्यांनी त्याचा स्फोट घडवून आणला होता..त्यात जवळपास २०-२५ लोकांचा बळी गेला तर काहीजण जखमी झाले..स्फोट एवढा भयानक होता की काही लोकांचे पाय तुटले. काहींचे हात तुटले... काहीजण भाजून काळे ठीक्कर पडले होते.. त्यावेळी मी माझ्या ऑफीसमध्ये रात्रीचं बातमीपत्र बनवण्यात व्यस्त होतो.. त्या घटनेची व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर मला त्या गोकुळचा तिटकारा आला..गोकुळमध्ये लोक जिभेचे थोडे लाड पुरवायला जातात..त्यात त्यांची काहीही चूक नसताना त्यांना प्राण गमवावे लागले...पण काही हरामखोर लोक सामान्य लोकांचं जगणं कठीण करण्यातच धन्यता मानतात...मी ज्या दिलसुखनगरमध्ये रहात होतो. तिथचं शेजा-याचा एकुलता एक मुलगाही त्याच स्फोटात गेला...इंजिनिअरिंग करणारा तो मुलगा कॉलेजमधून येताना मित्रांबरोबर गोकुळमध्ये असाच एखाद्या प्लेटवर ताव मारण्यासाठी गेला तो पुन्हा परत आलाच नाही.. ह्या घटनांवर भरपूर लिहता येण्यासारखं आहे..आज खाण्याचा विषय होता. त्याचा उल्लेख होता म्हणून त्या संदर्भानं ह्या दुर्घटनेचा उल्लेख केला..कारण मी दहीपुरी संपवत असताना माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा ते चित्र दिसत होतं..आणि आज पुन्हा तसा प्रसंग आला तर...अशा भितीनं मीसुद्धा थंड झालो होतो....नेहमीप्रमाणं मला आता त्या गोकुळच्या कोणत्याच पदार्थाटी चव लागत नाही.. सर्व कसं बेचव वाटतय...त्या जागेवर पाय ठेवताच कुठं बॉम्ब तर ठेवलेला नाही ना अशी शंका येते.. खातानासुद्धा आजूबाजूला तेचं भयान दृष्य आठवण करुन देत होतं....

गोकुळ चाटचा तो प्रसंग आठवला की आजही अंगावर शहारे येतात..जे गोकुळ त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध होतं.. त्यांनं २०-२५ लोकांचा बळी घेतला...तिथली चव आजही बदललेली नाही..पण मला मात्र त्या चवीत फरक पडलाय असचं वाटतय.. का कोण जाणं त्या गोकुळमध्ये गेल्यानंतर मस्त ताव मारण्याचं मनच होत नाही....


1 comment: