Thursday, February 26, 2015

युतीच्या वादाचा 'सामना'

“सत्तेत राहूनही सहकारी भाजपला टोले मारण्याची एकही संधी सध्या शिवसेना सोडत नाही.आजच्या टीकेसाठी निमित्त होतं, पानसरेंच्या हत्येचं... ही टीकाही थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध आहे..सत्तेत राहून अशी टीका करणं किती संयुक्तिक आहे असा प्रश्न यानिमित्तानं निर्माण होतो”महाराष्ट्रात युतीचं सरकार येऊन अवघे तीन महिने झालेयत...पण युतीचा गाडा मात्र सरळ चाललेला दिसत नाही. शिवसेना भाजपवर टीका करण्यासाठी मुद्द्यांच्याच शोधात आहे की काय अशी शंका आता निर्माण होतंय...रोज नवा मुद्दा आणि नवी टीका असं समीकरणच सध्या बनून गेलंय..यावेळचा मुद्दा आहे तो गोविंद पानसरेंच्या हत्येचा...सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय...”जे दाभोळकर प्रकरणात झाले तेच पानसरेंप्रकरणी घडत आहे. कथा, पटकथा व संवाद बदललेले नाहीत. नायक, खलनायक बदलून जुन्याच पटकथेवर नवा सिनेमा सुरू आहे. पानसरे हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 20 टीम स्थापन केल्यात. दाभोळकरांच्या वेळीही अशा 'टीम'स्थापन झाल्याच होत्या. महाराष्ट्रात नवीन काय चालले आहे ? कोणी सांगेल काय?” अशी टीका करण्यात आलीय...ही टीका नक्कीच बोचणारी आहे..सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणा-या मित्रानं अशी टीका केल्यामुळं ती भाजपवाल्यांच्या डोक्यात जाणार यात शंका नाही... आणि झालंही तसंच...मुख्यमंत्र्यांनी सामंजस्यानं प्रत्युत्तर दिलं असलं तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी ठोशास ठोसा लगावला.‘सामाना’तून होणा-या टीकेचा एकदाच सोक्षमोक्ष लावण्याचा दानवेंनी इशारा दिलाय.भाजपनं युती सरकारमध्ये शिवसेनेला सामावून घेण्यासाठी खूपच ताणून धरलं होतं. त्याचा राग शिवसेनेच्या मनात खदखदत असणारच...पण किती काळ हा राग मनात ठेवणार ?...आता शिवसेनासुद्धा याच युती सरकारचा घटकपक्ष आहे...त्यामुळं सरकारचं अपयश म्हणजे एकट्या भाजपचं अपयश असं शिवसेना कसं काय मानते ? स्वतःच्याच सरकारवर एवढी टीका करण्याची शिवसेनेला खुमखुमी असेल तर भाजप म्हणते त्याप्रमाणे शिवसेना सरकारमधून बाहेर का पडत नाही ? शिवसेनेला अजूनही सत्तेत असल्याची जाणीवच होत नाही का ? सत्तेत राहून सत्तेचा लाभ घ्यायचा आणि अपयशाचं खापर मात्र भाजपवर फोडायचं अशी भूमिका असेल तर शिवसेनेची ती राजकीयदृष्ट्या अपरिपक्वता असेल आणि त्याचा फटका शिवसेनेलाच बसेल हे शिवसेना लक्षात का घेत नाही..शिवसेनेनं वेळीच सरकारमध्ये असल्याचं भान ठेवावं आणि चांगला कारभार करुन छाप पाडावी. बाकी टीका करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक, राजकीय आखाडा आहेच की...या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल ती म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार १५ वर्ष सत्तेत होतं. त्यांच्यातही सर्वकाही काही आलबेल होतं असं नाही.त्यांच्यातही विस्तव जात नव्हता. पण त्यांच्या एवढ्या कुरबुरी नव्हत्या. ज्या होत्या त्या मंत्रालयाच्या मजल्यावरच व्हायच्या.कधी कधी ही धुसफूस बाहेर पडायची पण त्यासाठी त्यांना खूप वेळ लागला. सुरवातीला त्यांनी ही धुसफूस बाहेर येणार नाही याचीकाळजी घेतली जात होती.विलासराव असो वा सुशिलकुमार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ब-यापैकी जुळवून घेतलं होतं. त्यांच्यातले वाद वाढले ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर तेही शेवटच्या २-३ वर्षात..पण शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये तर पहिल्या दोन तीन महिन्यातच कुरुबुरीला जाहीर स्वरुप आलय..हे शिवसेनेनं थांबवलं तर त्यात त्यांचचं भलं आहे....  

No comments:

Post a Comment