Wednesday, March 4, 2015

महाराष्ट्रात पुन्हा 'अशोकपर्व'

मराहाष्ट्र काँग्रेसमध्ये अखेर हायकमांडनं फेरबदल केले. अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर मुंबईची जबाबदारी संजय निरुपम यांच्याकडे देण्यात आलीय. अशोक चव्हाण यांना त्यांच्या पक्षनिष्ठेचं फळ मिळालंय. तर निरुपम यांची निवड मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेली आहे. महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसला नंबर एकचा पक्ष करण्याचं मोठं आव्हान आता या दोघांसमोर आहे. हे आव्हान ते कसं पेलणार हे येणा-या निवडणुकांच्या निकालावरून दिसेल.वर्षानुवर्षं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची पुरती दाणादाण उडाली आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची उरली सुरलीही गेली. काँग्रेसचा एवढा मोठा पराभव या महाराष्ट्रात झाला नव्हता..पण मोदी लाटेत सगळेआडवे पडले. मोदींच्या या लाटेत ताठ आणि भक्कमपणे उभा राहिला तो नांदेडचा गड. अशोक चव्हाण नावाच्या या पठ्यानं नांदेडचा किल्ला तर कायम ठेवलाच पण शेजारच्या हिंगोलीची जागाही राखली. हिंगोलीतून राहुल गांधींचे खास मित्र राजीव सातव यांना निवडुन आणण्यात अशोक चव्हाणांची भूमिका महत्वाची होती. या विजयाचं बक्षिस तर अशोक चव्हाणांना मिळालेलं आहेच पण आदर्श प्रकरणावरून मुख्यमंत्रीपद गमावावं लागलेल्यानंतर त्यांनी शांत राहणं पसंत केलं. राजकीयदृष्या कठीण काळ असतानाही अशोक चव्हाण यांनी शांतपणे राहून परिस्थितीवर मात केली. आदर्शमध्ये एकट्या अशोक चव्हाणांचं नाव नव्हतं तरीही राजकीय शिक्षा मात्र त्यांनाच झाली. या सर्वांचं बक्षीस शेवटी हायकमांडनं त्यांना दिलं. अशोक चव्हाण हे पक्षाचा मराठा चेहरा आहेत. अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. गांधी घराण्याची निष्ठा तर वडील शंकरराव चव्हाण यांच्यापासून आहेच.त्यातच विलासराव देशमुखांसारखा नेता नसल्यानं काँग्रेससमोर पर्यायही कमीच होते. आता असलेल्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाणांना माननारा मोठा गटही आहे. त्यातच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांच्याच पारड्यात वजन टाकल्यानं अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले.मुंबई काँग्रेसची सूत्रं उत्तर भारतीय संजय निरुपम यांच्याकडे देण्यात आलीत.मुंबई महापालिकेच्या निवडणुका वर्षभरात होणार आहेत. मुंबईतला उत्तर भारतीयांच्या व्होटबँकेवर नजर ठेऊन निरुपम यांची निवड करण्यात आलीय. यात ते कितपत यशस्वी होतील हे पाहणं महत्वाचं ठरणाराय. निरुपम हे आक्रमक नेते आहेत. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये ते आलेत. तरिही त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलीय. विशेष म्हणजे भाजपचा शहरअद्यक्ष मराठी आहे.शिवसेना, मनसेचा मराठी अजेंडा असतानाही निरुपम यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आलीय.तर शिवसेनेतूनच काँग्रेसमध्ये आलेल्या नारायण राणेंना मात्रडावलण्यात आलं. अर्थात या निवडीनंतरही राणेंनी थयथयाट केलाच. आपल्याला विचारात का घेतलं नाही असा त्यांचा नाराजीचा सूर आहे. पण हायकमांड राणेंकडे काही लक्ष द्यायला तयार नाही..राणेंनी काहीही केलं तरी त्यात त्यांचीच मोठी अटचण आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर लगेचच राणेंनी असहकाराचा झेंडा फडकवलाय. त्यामुळं राणेंसह इतर नाराजांची समजूत काढत अशोक चव्हाणांना पुढची वाटचाल करावी लागणाराय. शिवसेना आणि भाजपची वाढलेली ताकद थोपण्याचं एकीकडं मोठं आव्हान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही प्रभाव आहे त्याला थोपवून काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्याचं शिवधनुष्य हे दोघे कसं पेलतात ते पाहुयात...तुर्तास या दोघांना शुभेच्छा.....  

No comments:

Post a Comment