Thursday, February 12, 2015

तेरा 'झाडू' चल गया

भाजप आणि काँग्रेससारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांना शह देतअरविंद केजरीवाल यांनीराजधानीतून देशाच्या राजकारणात नवा इतिहास लिहिलाय.सरकारमधील उच्चपदाची नोकरी सोडून सामाजिक प्रश्नावर लढण्यासाठी  अण्णा हजारेंचाय आंदोलनात उडी घेतली. नंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष स्थापन करून थेट राजकारणात उडी घेतली आणि दोन वर्षात दुस-यांदा दिल्लीचा मुख्यमंत्री होण्यापर्यंत थक्क करणारी मजल मारलीय.. लोकसभेच्या निवडणुकीपासून भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा जोडगोळीचा उधळलेला विजयाचा रथ अखेर दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी अडवला. हा विजयरथ नुसता अडवलाच नाही तर 70 जागांपैकी तब्बल 67 जागा जिंकून त्यांनी भाजप आणि काँग्रेसला एवढी मोठी धोबीपछाड दिली की त्यांना या पराभवाचं आणि केजरीवाल यांच्या विजयाचं हजारदा चिंतन करावं लागणाराय. विशेषतः भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत मोदी-शहांनी जो विजयाचा धडाका लावला होता. त्यामुळे काँग्रेससह छोट्या प्रादेशिक पक्षांचेही धाबे दणाणले होते. पण अरविंद केजरीवालांचा ‘झाडू’दिल्लीत असा काही चालला की भाजप फक्त तीन जागांवर येऊन थांबाला. काँग्रेसचा तर विचार न केलेलाच बरा. त्यांच्या 61 उमेदवारांना अनामतही वाचवता आली नाही.. दोन वर्षांआधी म्हणजे 2013 ला आम आदमी पक्षानं राजकारणातली पहिली परीक्षा दिली. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि भाजपला मागं टाकलं. बहुमतासाठी काही जागा त्यांना कमी पडल्या होत्या, तरिही त्यांनी सत्ता स्थापन केली. पण अवघ्या 49 दिवसांतच केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदासह सत्ताही सोडली. तेंव्हापासून केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका होत होती, पळपुटा माणूस, अराजक निर्माण करणारा नेता, नेहमी नेहमी धरणं धरणारा माणुस म्हणून केजरीवालांची थट्टा केली जात होती. त्यातच लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं पानीपत झालं आणि मोदींच्यारुपानं नवी शक्ती दिल्लीच्या राजकारणात उदयाला आली.काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांनाही मोदींच्या भाजपनं धोबी पछाड दिली. यशाचा हा वारू उधळतच होता. त्यातच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. मोदींचा वारू असाच उधळेल असा अंदाज होता. पण केजरीवाल यांनी झाल्या चुका जाहीरपणे मान्य करून लोकांना पुन्हा एकदा सत्ता देण्याचं आवाहन केलं. केजरीवाल यांचा हाच प्रामाणिकपणा त्यांच्या कामी आला आणि दिल्लीकरांनी प्रचंड, प्रचंड अतिप्रचंड असा कौल दिला.. भाजपनं दिल्लीच्या निवडणुकीसाठी मोठा फौजफाटा उतरवला. छोट्याशा दिल्लीसाठी अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांसह हजारो कार्यकर्ते प्रचारात उतरवले. किरण बेदींना आयत्यावेळी भाजपात घेऊन थेट मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनच मैदानात उतरवलं.बाहेरून आणलेली कमुक, बाहेरून आणलेले उमेदवार आणि मोदी, शहांच्या हुकुमशाही नेतृत्वाला दिल्लीकरांनी अजिबात थारा दिला नाही.पंतप्रधान मोदींच्या विकासाचा बुरखाही दिल्लीकरांनी टराटरा फाडला. हा निकाल भाजपसाठी बरचंकाही सांगणारा आहे. नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून हिंदूत्ववादी संघटनांनी घेतलेली आक्रमक भूमिका, घरवापसी, चार-पाच मुलांना जन्म देण्याचा अनाहुत सल्ला देणारे हिंदू परिवारातले नेते यामुळं जनतेत नाराजी वाढलीच होती. त्यातच मोदींचा सारखा-सारखा वाजणारा विकासाचा पोकळ ढोलही लोकांना आवडला नाही असचं दिसतय. त्याविरोधात केजरीवालांचा प्रामाणिकपणा लोकांना आवडला. केजरीवालांच्या या यशात अनेक राजकीय पक्षांना आशेचा किरणही दिसू लागलाय. महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना असो वा मोदींशी थेट दोन हात करणा-या ममता बॅनर्जी, नितीशकुमार, डावे पक्ष यांना दिल्लीतला विजय हा आपलाच विजय असल्याचं वाटू लागलय. कारण मोदींचा विजयरथ थोपवण्याचं धाडस कोणीही करु शकलं नव्हतं. उधळलेला हा घोडा केजरीवालांनी अडवल्यानं आपणही या मोदी लाटेचा वारू थोपवू शकतो असं या पक्षांना आता वाटू लागलय. त्यामुळचं केजरीवालांवर या पक्षांनी लगेच शुभेच्छांचा वर्षाव केला.दिल्लीच्या विजयानं पुन्हा एकदा नवी राजकीय समिकरणं उदयाला येतील हे मात्र नक्की.    

No comments:

Post a Comment