Tuesday, February 3, 2015

सर्वशक्तिमान मुख्यमंत्री फडणवीस!

राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार येऊन अवघे तीन महिने झालेत..अशातच सरकारमध्ये शक्तिमान कोण यावरून वाद रंगलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी शक्तिमान मुख्यमंत्री आहे असं म्हटलय...त्यांनी हा इशारावजा संदेश कोणा-कोणाला उद्देशून दिलाय.”​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचाच आशिर्वाद असल्यानं ते सध्यातरी सर्वशक्तीमान मुख्यमंत्री असल्याचं सांगत आहेत.. भाजपमधल्या सर्व श्रेष्ठांना आणि ज्येष्ठांना डावलून फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्यानं एकनाथ खडसे, नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांचा भ्रमनिराश झाला..पण थेट मोदी-शहांचाच वरदहस्त असल्यानं आवाज करण्याची कोणाचाही हिम्मत झाली नाही..आत्ताही एकनाथ खडसे कधी जाहीरपणे तरी कधी पडद्याआड त्यांची नाराजी व्यक्त करतातच. पण भाजपचे इतर नेत्यांची अवस्था मात्र तोंड दाबून लाथा बुक्क्यांचा मार अशीच झालीय. ते बिचारे उघडपणे त्यांची नाराजीही व्यक्त करू शकत नाहीत..पक्षांतर्गत हा विरोध असताना दुस-या बाजूला शिवसेनेचाही मोठा विरोध फडणवीस यांना पत्करावा लागतोय..अशात फडणवीस यांनी मात्र मी शक्तीमान मुख्यमंत्री आहे असे संकेत आणि इशारा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना हा संदेश दिलाय.त्यांचा हा संदेश काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जसा आहे तसाच तो गल्लीत म्हणजे मातोश्रीवर निर्णय घेत नाही असा सुचक इशारा उद्दव ठाकरेंनाही आहेच...तर दिल्लीत निर्णय घेत नाही याचा अर्थ पंतप्रधान मोदी, अमित शहा किंवा नितीन गडकरींनाही विचारून निर्णय घेत नाही असचं त्यांना सुचवाचय...शिवसेना हा भाजप सरकारचा सहकारी पक्ष असला तरी निर्णय प्रक्रियेचे सर्वाधिकार आपल्याच हाती आहेत. त्यामध्ये शिवसेनेचेचा अडथळा असणार नाही असा स्पष्ट संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलाय...​​​राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार येऊन अवघे तीन महिने झालेत. असं असताना मुख्यमंत्र्यांनी असा इशारा देण्यामागं काही कारणंही आहेत. आधी युती तोडून भाजपनं शिवसेनेला एकटं पाडलं होतं. त्यानंतर सत्तेत सहभागी करुन घेण्यासाठी शिवसेनेला जागा दाखवून दिली..कधी नव्हे एवढा पाणउतारा भाजपनं शिवसेनेचा केला. त्याची मोठी सल शिवसेनेच्या मनात आहेच. त्यामुळंच जेंव्हा जेंव्हा संधी मिळेत तेव्हा शिवसेना भाजपला कात्रजचा घाट दाखवण्याची संधी सोडत नाही. हा सामना रंगतच जाणाराय. सत्तेत राहुनही शिवसेना भाजपला वेळीवेळी विरोध करण्याची संधी सोडत नाही. आताही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या कायदा सुवस्थेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली होती..गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे..त्यातच नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ दिवसाढवळ्या खून झाला..हा धागा पकडत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा आहेरच दिलाय..उद्धव ठाकरे फक्त कायदा सुव्यवस्थेवरच चिंता करुनच थांबले नाहीत तर उसाच्या प्रश्नावरही त्यांनी वेगळी भूमिका मांडली.. शिवसेना शेतक-यांच्या पाठीशीच आहे. सत्तेत असलो तरीही आणि सत्तेत नसलो तरीही असं म्हणून त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींची पाठराखणही केली. एकीकडे शेतक-यांची सहानुभूती मिळवायची, दुसरीकडं भाजपकडे झुकलेल्या मित्रपक्षांना पाठिंबा द्यायचा आणि थेट सरकारवर हल्ला करायचा अशी नितीच शिवसेनेनं आखल्याचं दिसतय. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अशी आव्हानात्मक परिस्थिती आहे. म्हणूनच त्यांनाही परिस्थितीचा अंदाज घेऊन सर्वांना सूचक इशारा दिलाय. त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत. ते जरी मीच सर्वशक्तीमान असल्याचं सांगत असले तरी त्यांना सरकार चालवणं एवढं सोपं नाही. शिवसेनेला जरी त्यांनी इशारा दिला असला तरी शिवसेनाही काही गप्प बसणार नाही..संधी मिळेत तेव्हा शिवसेना मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यास कमी करणार नाही...मुख्यमंत्र्यांना पक्षांतर्गत विरोधकही काही कमी नाहीत..एकनाथ खडसे, मुनगंटीवार,विनोद तावडे हे शांत बसून मुख्यमंत्र्यांना काम करु देतील असं वाटत नाही....

No comments:

Post a Comment