Tuesday, March 27, 2012

राष्ट्रवादीचा राज्यात धुमाकुळ

महाराष्ट्रातलं राजकीय चित्र सध्या बदलत चालल्याचं चित्र दिसतय. भाजप-शिवसेना ही २५ वर्षापासूनची असलेली युती तर त्यांना शह देणारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असं सरळसरळ चित्र महाराष्ट्रात होतं. त्यात दलित पक्षांचे काही तुकडे काँग्रेसबरोबर तर काही राष्ट्रवादीबरोबर होते..जातीयवादी पक्ष अशी टीका करत हे दोन्ही काँग्रेस भाजप सेनेला हिणवत सत्ता मिळवायचे..तीच री रामदास आठवलेही ओढत..पण शिर्डीत काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत धोका दिल्यानंतर राजकीय अडगळीत पडलेल्या रामदास आठवलेंना आशेचा किरण दिसला. वांद्र्यात रहायला गेल्यानंतर वाढदिवसाचं निमित्त साधून आठवलेसाहेबांनी मातोश्रीवर धुळ झाडली..याच भेटीत बाळासाहेबांनी दिलेल्या शिवशक्ती भिमशक्तीच्या मंत्राचा रामदास आठवलेंवर असा काय परिणाम झाला की आठवलेसाहेब जुनं सगळं विसरले. मग त्यांनाही आपलं राजकीय पुनर्वसन होणार अशी स्वप्नं पडायला लागली..त्यामुळे सेक्युलरचा जप करणारे आठवलेसाहेब कालपर्यंत ज्यांना जातीयवादी म्हणून शिव्या घालत होते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले..एवढ्यावरच थांबतील तर आठवलेसाहेब कसे..त्यांनी उलट काँग्रेस राष्ट्रवादीलाच जातीयवादी म्हणून ठोकायला सुरुवात केली..अशा रितीनं एक राजकीय समिकरण जुळलं..

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मग शिवसेना-भाजप आणि आठवलेंचा रिपाइं अशी महायुती सुसाट सुटली. तर तिकडे या दोन आघाडी आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी राज ठाकरेंचा मनसे सज्जच आहे..राज्यात हे असं तिरंगी चित्र दिसत होतं. त्याचा महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत अनुभव आलाच. या सर्वांनी आपापली ताकद अजमावली..खरं तर सेनेला मुंबई राखता आली. पण ठाण्यात सत्ता राखण्यासाठी त्यांना राज ठाकरेंना शरण जावचं लागलं..पण नाशकात त्यांनी दगाफटका केला..मनसेचा महापौर होऊ नये म्हणून शिवसेनेनं जंगजंग पछाडलं..पण त्यांना त्यात यश आलं नाही..तिथं मनसेला भाजपनं साथ दिली तर राष्ट्रवादीनं तटस्थ राहून मनसेला मदत केली..हा नवा पॅटर्न झाला..आणि नाशकात शिवसेनेनं दगाफटका केल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याच्या इराद्यानं मग मनसेनं औरंगाबाद जिल्हा परिषदेत चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. ही अशी विविध विचारसरणीची सांगड घातली गेली. त्यातून कोणत्याही पक्षाला आता विचारसरणी आहे म्हणणंच जास्त धाडसाचं वाटू लागलंय..कारण सत्तेसाठी कोणाचाही हात हातात धरायचा हीच नवी विचारसरणी झालीय.

राज्यातल्या राजकारणातले हे दोन अंक संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत या नाटकाचा तिसरा अंक झाला..सेक्युलरचा जप करणा-या पक्षांनी सत्तेसाठी सर्व मर्यादा सोडल्या. ज्या पक्षांच्या जास्त जागा त्यांचा अध्यक्ष आणि कमी जागा असलेल्या मित्रपक्षाला उपाध्यक्षपद अशी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्यात सरळ सरळ वाटणी करायचं ठरलं..पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रवादीनं गनिमा कावा करत काँग्रेसचा घात केला..विदर्भात तर राष्ट्रवादीनं धुमाकुळच घातला... यवतमाळमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना धोबीपछाड देण्यासाठी त्यांनी शिवसेनेशी युती केली आणि झे़डपीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला..तर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीत कमळाबाईंशी सलगी करुन राष्ट्रवादीनं उपाध्यक्षपद मिळवलं..अमरावतीत काँग्रेसच्या जास्त जागा असतानाही काँग्रेसविरुद्ध सर्वपक्षांची मोट बांधून तिथंही राष्ट्रवादीनं काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला..या झेडपीवरही राष्ट्रवादीनं अद्यक्षपद पटकावलं आणि भाजपला उपाध्यक्षपद दिलं..अशापद्धतीनं राष्ट्रवादीनं अख्खा विदर्भ भाजप सेनेच्या साथीनं काबीज केला आणि काँग्रेस फक्त बघत राहिली..विदर्भात जसा राष्ट्रवादीनं धुमाकुळ घातला तसाच धुमाकुळ अहमदनगरातही घातला..विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या वादात तिथंही राष्ट्रवादीनं झेडपी बळकावली..अद्यक्षपदावर तर त्यांनी महिनाभरापूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या विठ्ठलराव लंघेंना अध्यक्षपदाचा लाल दिवा दिला..तर उपाध्यपदासाठी काँग्रेसला मदत करण्याऐवजी थोरातांचा भाचा सत्यजित तांबेचा पराभव करत उपाध्यक्षपदही पटकावलं..

राष्ट्रवादीनं अशापद्धतीनं संपूर्ण राज्यात धुमाकुळ घालत काँग्रेसला जेरीस आणलं..आघाडीचीच सत्ता येणार अशा भ्रमात काँग्रेसवाले राहिले आणि राष्ट्रवादीनं त्यांचा पुरता गेम केला. २६ जिल्हा परिषदांपैकी तब्बल १३ झेडपीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसवले..सत्तेसाठी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला भिक न घालता राष्ट्रवादीनं जिथं जिथं ज्या ज्या पक्षाची साथ घेता येईल तशी घेतली..त्यासाठी त्यांनी कोणत्याही विचारसरणीला सोडलं नाही..फक्त सत्ता मिळवणं हाच एक उद्देश ठेवत त्यांनी हा धुडगुस घातला..त्यासाठी त्यांनी काँग्रेसला जो काही दणका दिलाय त्यातून ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी सावरतील का याची शंका वाटतेय.. राष्ट्रवादी एवढंच करुन थांबली नाही तर सोलापूर-बीड सारख्या जिल्ह्यात आपल्याच पक्षातल्या प्रस्थापित सुभेदारांनाही त्यांनी दणका दिला. ही वाटचाल पाहता २०१४ ची विधानसभा हे राष्ट्रवादीचं टार्गेट आहे हे स्पष्ट दिसतय..कसंही करुन काँग्रेसला जेरीस आणायचं आणि त्यांच्या जागा कमी करायच्या, कारण अजितदादांना मुख्यमंत्री करायचं तर काँग्रेसची जिरवावीच लागणाराय. त्यानंतर वेळ पडलीच तर मनसेची मदत घेण्यासही ते मागं पुढं पाहणार नाहीत..

हा सगळा बदलता राजकीय सारीपाट पाहिल्यानंतर सेक्युलरचं तुणतुणं वाजवणारे आपले पवारसाहेब हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं बघत होते असाच प्रश्न पडतो..कारण शिवसेना भाजपाला नेहमीच जातीयवादी पक्ष म्हणून शिव्या घालत हेच पवारसाहेब शाहू-फुले-आंबेडकरांचा नारा देत असतात. त्यांना कमळाबाईशी केलेला हा संग कसा आवडला असेल..जरी सत्तेसाठी काहीही करण्याचा अजितदांदाचा धडाका असला तरी पवारसाहेबांच्या संमतीशिवाय एवढं धाडस केलं असेल असं वाटत नाही..त्यामुळे पवारसाहेबांची विचारसरणीच बदलील की काय असं वाटायला लागलय..किंवा अजितदादांच्या धडाक्यासमोर त्यांनीही त्यांच्या विचारसरणीला मुरड घातली असावी..असो ! एवढं सगळं राजकीय रामायण महाभारत झाल्यानंतर स्थानिक पातळीवरचे ते निर्णय आहेत असं म्हणत पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्र येऊन जातीयवादी शक्तींचा मुकाबला केला पाहिजे असं म्हणायला पवारसाहेब मोकळेच आहेत..पण घड्याळाची ही टीकटीक काँग्रेसनं वेळीच थांबवली नाही तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उरली सुरली ताकदही राज्यातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही..

No comments:

Post a Comment