Thursday, March 29, 2012

अण्णा हजारे आणि कंपनीच्या माकडचेष्टा

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची मशाल पेटवलेल्या अण्णा हजारेंच्या सहका-यांनी मागच्या काही दिवसात जो काही उच्छाद मांडलय ते पाहून प्रचंड संताप होतोय. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन म्हणून देशातल्या तमाम लोकांनी ज्यांना डोक्यावर घेतलं तेच आता माकडचेष्टा करु लागलेत. संसद, त्यातले लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात अरविंद केजरीवाल नावाचा महाभाग वाट्टेस ते बरळत चाललाय. हे महाभाग स्वतःला फारच शहाणे समजतात. शहाणे म्हणजे एवढे शहाणे की त्यांना जगाच्या पाठीवर जी काही अक्कल आहे ती फक्त त्यालाच आहे आणि बाकीचे सर्व मुर्ख आहेत याच आविर्भात तो दिडशहाणा वावरतोय. परवाच दिल्लीत जंतर मंतरवर झालेल्या एक दिवसाच्या उपोषणावेळीही हा दिडशहाणा बरचं काही बरळला..संसदेचा अपमान करणारा हा महाभाग तिथं असणा-या खासदारांबद्दल वाट्टेल तो बरळला..वरून काय तर म्हणे आमच्यावर कारवाई करा असं म्हणण्यापर्यंत तो मुजोर झालाय...
केजरीवाल नावाचा हा दिड शहाणा जेव्हा हे बरळत होता तेव्हा त्याच्या टीमचे कर्णधार असलेले हेच अण्णा हजारे व्यासपीठावर होतेच. त्यांना त्यात काहीच वावगं वाटलं नाही. उलट आमच्याकडे पुरावे आहेत, चौकशी करा अशी मागणी करुन केजरीवालची पाठच थोपटली. हे जरा जास्तच होतय ! राजकीय नेत्यांना सरसरकट शिव्या देणं हाच या अण्णा टोळीचा सध्या एककलमी कार्यक्रम सुरुय. भ्रष्टाचाराच्या गप्पा मारणा-या अण्णा टोळीनं त्यांच्याच सदस्यांचा भूतकाळही तपासून पहावा. प्रशांत भूषण, त्यांचे पिताश्री शांतीलाल भूषण, किरण बेदी यांच्या मालमत्तेची चौकशी करा. कुठुन आली त्यांच्याकडे एवढी संपत्ती हे जाहीर करा..किरण बेदींचा पगार किती होता ? सध्या त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ? त्याचं उत्तर द्या अगोदर. समाजसेवी संस्थेच्या नावाखाली विमान तिकीटाचे पैसे लाटणा-या किरण बेदींना दुस-याला भ्रष्टाचारी म्हणण्याचा काहीएक नैतिक अधिकार नाही. तो भ्रष्टाचार ह्या अण्णा हजारेंना कसा चालतो ? का आपला तो बाब्या, दुस-याचं ते कार्टं ह्या म्हणीप्रमाणं चाललाय हा सर्व उद्योग..त्यांच्या आंदोलनाचं आयोजन करणा-या इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाच्या एनजीओचा कर्ताकरवीता असणा-या मयंक गांधीचे उद्योग अण्णा हजारेंनी तपासून पाहिलेत का.? तसच भूषण पिता पुत्रांनी माया कुठुन गोळा केली याचे किस्सेही अण्णांनी माहित करुन घ्यावेत. अण्णांनी अगोदर स्वतःचं घर निट ठेवावं आणि मगच दुस-याला आरोपीच्या पिंज-यात उभं करावं.
अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या नावाखाली जे आंदोलन उभं केलं त्याला लोकांनी सुरुवातीला पाठिंबा दिला..कारण हा भ्रष्टाचार खालपासून वरपर्यंत बोकाळलाय. जाऊ तिथं खाऊ ही अपप्रवृत्ती वाढलीय. त्याचा फटका सर्वांना बसतोय. तो मुद्दाच सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे म्हणून लोकांनी त्यांना भरभरुन पाठिंबा दिला आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावही केला. पण मिळालेला पाठिंबा पाहून ही टोळी भरकटलीय. आपण म्हणतो तेच ब्रम्हसत्य या तो-यात ही टोळी वावरु लागलीय. कोणाबद्दल काय बोलावं याचं ताळतंत्रही त्यांना राहिलेलं नाही. म्हणूनच लोकांची सहानुभूतीही आता कमी होऊ लागलीय.
राजकीय लोकांबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनातही चिड आहेच. पण त्याचा अर्थ त्यांचा उद्धार वाट्टेल त्या भाषेत करणं ह्या टोळीला शोभत नाही आणि तसा अधिकारही त्यांना कुणी दिलेला नाही. उलट अण्णा हजारेंच्या पहिल्या मोठ्या आंदोलनानंतर झालेल्या निवडणुकीतही लोकांनी भरभऱुन मतं दिलीच ना ! दुसरीकडं राजकीय लोकांबद्दल संताप व्यक्त करताना अण्णा हजारेंनी जनतेला कोणता पर्याय दिलाय का ? तर त्याचं उत्तर नाही असचं आहे..राजकीय पक्ष, त्यातले लोक भ्रष्ट आहेत तर अण्णा टोळींनी उतरावं ना राजकारणात ! त्यांना पाठिंबा देणारे लोक त्यांच्या पाठिशी आहेत का ते बघावं ? पण लोकांची गर्दी जमा करणं म्हणजे लोक तुमच्या पाठीशी आहेत हा गैरसमज त्यांनी दूर करावा..! गर्दी कशालाही गोळा होते. त्यातच लोक जर तुमच्याकडे अपेक्षेनं आलेत तर त्यांचा अपेक्षाभंग तुम्ही का करताय ? आंदोलन उभा करणं, ते टिकवणं ही सोपी गोष्ट नाही. हे त्या केजरीवाल सारख्यांना काय माहित. ?
केजरीवाल, किरण बेदी, सिसोदिया यांना कोण ओळखतं ? अण्णा हजारे सोडले तर त्यातल्या एकावरही जनता विश्वास ठेवत नाही. त्यामुळं अण्णांचा हा जो वापर सुरु झालेला आहे तो अण्णा हजारे यांनी वेळीच ओळखला पाहिजे..दुसरं म्हणजे आंदोलनाच्या नावाखाली अण्णा आणि त्यांची टोळी प्रस्थापीत व्यवस्थेला आव्हान देत आहे. तसच समांतर यंत्रणा उभी करण्याची स्वप्नं ते पहात आहेत. पण ते समाजव्यवस्थेला आणि पर्यायानं संसद, न्यायापालिका यासारख्या सर्व संस्थांना घातक आहे.त्यामुळे आंदोलनाच्या नावाखाली हा जो काही तमाशा सुरु आहे तो इथच थांबला पाहिजे. अन्यथा ज्या लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं तेच उद्या तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात असू द्यावं. !!!!  

3 comments:

  1. मी आहे अण्णा हजारेThursday, March 29, 2012 at 12:26:00 PM GMT+5:30

    सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
    मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए...!!


    अण्णांच्या आंदोलनाला नवा बहर येणार...
    क्रांतीचा कल्पवृक्ष डेरेदार होणार..
    लाख झाले फितुर तरी झुंज आम्ही देणार..


    आलात तर बरोबर..
    न आलात तर तुमच्या शिवाय..
    आणी विरोधाल तर तुम्हाला न जुमानता..

    ReplyDelete
  2. आवरा धनंजय साहेब. .... भ्रष्टाचार निर्मूलनामधे आपले योगदान काय आधी ते स्पष्ट करा..! लालू, दिग्गीराजा या वाचाळविरांवर लेख येउ द्या आधी.

    ReplyDelete
  3. Team anna var kele gelele arop mhanje lokancha laksha hatavnyasathi kelela pratap hota. Tumchya lekhavarun to sadhya zala asa vatata. Bhrashachari sarkarla konitari jab vicharna garajecha ahe.. mag bhale team anna madhe ka kahi sadashya brashtachari asenat.. tyanchavar pan karvai hou dya.. Mukya mudda ha ahe ki Brashta sarkarcha brashtachar sampla pahije. Mag to konapule pan sampena.

    Regards,
    Waman Joshi, Pune

    ReplyDelete