Sunday, March 11, 2012

अखिलेश नावाचा उत्तरेतला सिंह..

पाच राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे यशापयशाची गणितं मांडली जाऊ लागली..या पाच राज्यात सर्वात महत्वाचं राज्य होतं अर्थातच उत्तर प्रदेश...देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या निकालावर अनेक राजकीय आडाखे बांधले जातात..त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्वाची असते...दिल्लीचा रस्ता लखनौमधून जातो असं म्हणतात, त्याला अलिकडच्या काही वर्षात छेद दिला गेला असला तरी लोकसभेच्या ८० जागा असलेल्या या राज्याकडे कोणत्याच पक्षाला दुर्लक्ष करुन चालत नाही.. म्हणूनच उत्तर प्रदेशची निवडणूक सर्व राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्वाची असते..यावेळच्या निकालानं मायावतींना जमिनीवर आणलंय तर मुलायमसिंग यादव यांची सायकल अगदी जेट विमानाच्या वेगानं सुसाट सुटली..एवढं मोठं यश मिळेलं असं दस्तुरखुद्द मुलायमसिंग यादवांनाही वाटलं नव्हतं..पण ४०३ सदस्यांच्या विधानसभेत त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवत सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला..या निवडणुकीचा अन्वयार्थ लावताना मायावतींचा सपाटून पराभव झाला आणि मुलायमसिंग यादवांना घवघवीत यश मिळालं एवढाच लावून चालणार नाही..तर या निवडणुकीतून एका युवा नेत्याचा उदय झाला असं म्हटलं तर वावगं ठरु नये...होय मी मुलायमसिंग यादव यांचा मुलगा अखिलेशबदद्लच बोलतोय...उत्तर प्रदेशचा गड जिंकणं तशी सोपी गोष्ट नाही. भल्याभल्या नेत्यांना आणि मोठ्या पक्षांना या राज्यानं कोसो दूर लोटलय...त्यामुळच सर्वात जुना आणि सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसलाही मागच्या २५-३० वर्षात आपला गेलेला जनाधार परत मिळवण्यात यश येत नाही.. राम मंदिराच्या मुद्यावर काँग्रेसला हद्दपार करुन भाजपनं तर त्यानंतर कधी समाजवादी पक्ष, कधी बसप तर किती बसप-सपा..बसप-भाजप अशी सरकारं स्थापन्यात आली.. तर २००७ मध्ये मायावतींच्या सामाजिक अभिसरणाच्या प्रयोगालाही मोठा प्रतिसाद मिळाला..पण मायावतींचा तळागाळातल्या लोकांशी तुटलेला संपर्क, भ्रष्टाचारात बुडालेले त्यांचे सहकारी मंत्री यामुळे हत्तीला लोकांनी जमिनीवरच लोळवलं.. तर मुलासमसिंग यादवांच्या पक्षाला मोठं यश मिलं..आणि या यशात अर्थात सिंहाचा वाटा आहे तो मुलायमसिंग यादव यांचा मुलगा अखिलेशसिंग यांचा...

अखिलेशसिंगच्या प्रयत्नाला जसं यश मिळालं तसं राहुल गांधींना मात्र मिळालं नाही हे या निकालानंतर विचार करायला लावणाराय.राहुल गांधींकडे सर्व यंत्रणा होती..नेत्यांचा, कार्यकर्त्यांची दांडगी संख्या होती . मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी बाटला इनकाऊंटरसह आरक्षणाचं गाजर दाखवण्यात आलं तरिही काँग्रेसच्या कामगिरीत काहीच फरक पडला नाही..पुन्हा त्यांची कामगिरी सुमार दर्जाचीच झाली..उत्तर प्रदेशात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी या पक्षानं सर्व प्रकारचे प्रयत्न करुन पाहिले..मागच्या निवडणुकीत युवराज राहुल गांधींचा आधार घेतला..पण त्या निवडणुकीत मायावतींच्या हत्तींचा धडाका त्यांना रोखता आला नाही तर यावर्षी सायकलनं त्यांना चिरडलं..

उत्तर प्रदेशची ही निवडणूक दोन युवा नेत्यांमुळेही गाजली..एक होते सर्व शक्ती,मोठा लवाजामा आणि एक वलय असलेलं नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते राहुल गांधी तर दुसरं नाव होतं मुलामसिंग यादव यांचे सुपुत्र खासदार अखिलेशसिंह...दोघांनाही राजकीय पार्श्वभूमी असली तरी दोघांची तुलना करता राहुल गांधी हे वरचढच ठरतात...दोघांनीही उत्तर प्रदेश पिंजून काढला..पण यशाची माळ ही अखिलेशच्याच गळ्यात पडली... खरं तर निवडणुकीच्या दोन वर्ष अगोदर समाजवादी पक्ष मरगळलेला होता..त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव यांची सुन आणि अखिलेशची पत्नी यांचा झालेला पराभव.. मुलायमसिंग यांच्यावर होत असलेले घराणेशाहीचे आरोप आणि बेनामी संपत्तीच्या चौकशीचा फेरा ही सर्व विरोधात जाणारी परिस्थिती असताना अखिलेश यांनी पक्षाची धुरा हाती घेतली..त्यानंतर त्यांनी घेतलेल्या मेहनतीला नुसते यशच मिळाले असे नाही तर समाजवादी पक्षाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमतही मिळवून दिलं. त्यांच्या नेतृत्वावर उत्तर प्रदेशमधल्या तरुण वर्गानं शिक्कामोर्तब तर केलच..पण जेवढं मोठं यश मिळालं त्यावरुन त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या जनतेनं मोठा विश्वास टाकल्याचं दिसतय..

अखिलेश यादव यांच्यावर जेवढा विश्वास तिथल्या जनतेनं टाकला तेवढा राहुल गांधींवर का टाकला नाही हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे..कारण दोघांनाही राजकीय वारसा आहे असं असताना राहुल गांधींचा करिश्मा उत्तर प्रदेशमध्ये का चालला नाही..राहुल गांधींनी काँग्रेसला विशेषतः उत्तर प्रदेशात नवसंजिवनी देण्याचा विडा उचलला होता..पण विधानसभेच्या दोन निवडणुकांत स्वतःला झोकून दिलं असतानाही त्यांना लोकांनी पसंद का केलं नाही ? राहुल गांधी यांचं सल्लागार मंडळ कुचकामी आहे का ? की त्यांचा कार्यकर्ते आणि सामान्य लोकांशी संवाद कमी पडतोय..! याचा विचार होणं गरजेचं आहे..काँग्रेसला उत्तर प्रदेशात पक्ष म्हणून उभं करण्यात तेसुद्धा पार अपयशी ठरलेत हे या निकालावरुन दिसतय..फक्त पराभवाची जबाबदारी घेऊन चालणार नाही तर भविष्याचा विचार करता राहुल गांधी यांना त्यांची रणनिती बदलावी लागणाराय. तरुण मतदारांची नस ओळखता आली पाहिजे तरच राहुल गांधींना त्याचा फायदा होणाराय.अन्यथा लादलेलं नेतृत्व एवढीच त्यांची ओळख राहिल..

No comments:

Post a Comment