Sunday, March 25, 2012

विलासराव आणि अशोकरावांची ग्रेट भेट

केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मराठवाड्यातले दोन माजी मुख्यमंत्री नांदेडमध्ये एकत्र आले..तुम्ही त्यात काय विशेष असं म्हणाल..तर विशेष आहे. कारण या दोन्ही नेत्यांनी मंत्री ते मुख्यमंत्रीपदावर काम केलेलं आहे. त्यात विलासराव यांची कारकिर्द मोठी आहे. विलासराव दोन टर्ममध्ये मिळून जवळपास आठ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यामानानं अशोक चव्हाणांच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद फार कमी काळ आलं. मुंबई बॉम्बस्फोटानंतर विलासरावांची खुर्ची गेली आणि अशोकराव आले होते. पण या दोन नेत्यांत मागच्या चार पाच वर्षांपासून कटुता आली होती. काही राजकीय कारणानं ह्या दोन नेत्यांत दुरावा वाढला होता. पण शनिवारी अचानक विलासराव देशमुखांनी नांदेडात असताना अशोक चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आपल्यात काहीही मतभेद नाहीत असा निर्वाळा दिला.खरं तर अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनीच विलासरावांना राजकारणात आणलं. तसं विलासराव शनिवारी बोलतानाही अशोकराव हे आपले गुरु बंधू आहेत असं म्हणाले हे त्यामुळेच..आणि आमच्यात काही कारणानं दुरावा निर्माण झाला होता तो आता संपला आहे असं सांगितलं...

राजकारणात कोणीही कायमस्वरुपी कोणाचा शत्रु असू शकत नाही असं म्हणातात. त्यामुळंच ह्या दोघांनी कटुता मिटवण्याचा प्रयत्न केला असावा असं म्हटलं तर विषय संपेल..पण ते तसं नाही..या दोघांनी एकत्र येण्यामागं मोठी पार्श्वभूमी आहे. मुळात हे दोन नेते भेटले त्याच्या टायमिंगकडे सुरुवातीला लक्ष द्यावं लागेल. पहिलं कारण असं की आदर्श सोसायटी प्रकरणी सध्या सीबीआयचा तपास महत्वाच्या वळणावर आलाय. कन्हैयालाल गिडवाणीसह पाच जणांना अटकही झालीय. त्यामुळे आदर्शचा फास या दोन नेत्यांभोवतीही आवळला जात आहे. अशोक चव्हाण तर थेट आरोपीच्या यादीतच आहेत. याच आदर्शनं अशोकरावांचा बळी घेतलाय. तर विलासराव आणि सुशिलकुमार शिंदे यांचही नाव आदर्श प्रकरणी जोडलं गेलय. आदर्श प्रकरणी सह्या करण्यात हे दोन मुख्यमंत्रीही आहेत. त्यांची चौकशीही झालीय. त्यामुळे यातून सहिसलामत सुटण्यासाठी हे दोन नेते एकत्र आल्याचं बोललं जातय. आदर्श प्रकरणी या तीन्ही मुख्यमंत्र्यांनी जी साक्ष दिलीय त्यानुसार ती जमीन राज्य सरकारच्या मालकीची होती म्हणूनच आम्ही त्याला परवानगी दिली असं त्यांनी म्हटलय. त्या जमिनीच्या मालकीवरुन वादही आहे. काही कागदपत्रानुसार ती लष्कराची आहे असं म्हटलं जातय तर काही कागदपत्रात ती राज्य सरकारची आहे असं म्हटलय. त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे उद्या हे मोठे नेते काही तांत्रिक कारणाच्या आधारे वाचू शकतीलही..तसच दोन्हीकडे काँग्रेसचच सरकार असल्यामुळे त्यांना वाचवलही जाऊ शकतं. या झाल्या उद्याच्या शक्यता पण त्यापूर्वी दोघांनी एकत्र आलं तर दोघांना बळ मिळेल आणि राजकीय दबाव निर्माण करण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो...

हे दोन नेते एकत्र येण्यापूर्वी नांदेड जिल्हा परिषदेवर काँग्रेसची म्हणजे अशोक चव्हाण गटाची सत्ता येण्यासाठी विलासरावांचे आमदार पुत्र अमित यांनी मदत केली. विलासराव गटाच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच अशोकराव जिल्हा परिषद कायम ठेऊ शकले. ही तत्कालीन घटना आहे. त्यानंतरच हे दोन नेते नांदेडात विद्यापीठाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले.पण हे दोघे नेते एकत्र येण्यामागं आणखी एक कारण आहे. तेही जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकाच आहे. या दोन्ही निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसलाय आणि राष्ट्रवादीनं मुसंडी मारलीय. ह्याचा जाब हायकमांडनं विचारला तेव्हा विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्ट प्रकरणामुळं काँग्रेसची घसरण झाल्याचं सांगितलं.त्यांचा रोख हा सुरेश कलमाडींपेंक्षा आदर्श प्रकरणातल्या विलासराव आणि अशोकरावांकडे जास्त होता. त्यामुळेच ह्या दोन नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात एकत्र येण्यासाठीही कटुता संपवली असेल असं म्हणायला जागा आहे. किंवा हायकंमाडनच या दोघांना एकत्र येण्याचा आदेश दिला असेल..तसच राष्ट्रवादीची आक्रमकता थांबवणं पृथ्वीराज चव्हाण यांना शक्य नाही. ती त्यांची क्षमताही नाही. त्यामुळे दोन वर्षांनी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या आधी आदर्श प्रकरणातून बाहेर पडण्याचा या दोन नेत्यांचा प्रयत्न असावा. कारण पृथ्वीराज चव्हाण यांना तगडा पर्याय देताना विलासराव देशमुखांसारखाच ताकदीचा आणि राष्ट्रवादीला टक्कर देणारा नेता काँग्रेसला हवा आहे. त्यामुळं उद्याचा विचार करुन हे दोन्ही नेते एकत्र आले असावेत असा तर्क लढवला जातोय. कारण काहीही असो राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शुत्र नसतो हे या दोघांच्या भेटीतून पुन्हा सिद्ध झालय एवढचं...

No comments:

Post a Comment