Saturday, March 17, 2012

आपल्या तेंडल्याचं महाशतक झालं रे.

शुक्रवारचा दिवस गाजवला तो दोन मोठ्या व्यक्तीमत्वांनी..पहिले म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि दुसरा आपल्या तेंडल्या..हो आपला सचिन तेंडुलकर..दिवसभर या दोघांचीच चर्चा आणि दोघांकडेच सा-या देशाचं लक्ष लागलं होतं. प्रणव मुखर्जी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत असताना काय महाग होणार आणि काय स्वस्त होणार याकडं लहान मोठ्या सर्वच गटातले लोक आतुरतेनं वाट पहात होते. पण प्रणवबाबूंनी आयकरात थोडासा दिलासा दिला एवढं सोडून सगळीकडं कर वाढवले..पर्यायानं महागाईचा दणका बसला हे सांगायलाच नको..अगदी हॉटेलमधलं जेवण महाग केलं, ब्युटीपार्लरला जाणंसुद्धा महाग केलं..आता आली का पंचायत, सुंदर दिसणंही महाग पडणार म्हटल्यावर काय बोलायचं. मुलींपासून गृहिणींपर्यत सा-या सख्यांनी प्रणवदांच्या नावानं बोटं मोडली नसतील तरच नवल..सोन्याचे दागिने महाग केले. सिमेंट, स्टिलच्या किंमती वाढवल्या म्हणजे घराच्या किंमती वाढणार. पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढण्याचे संकेतही त्यांनी दिल्यानं अख्खा दिवस टेन्शनमध्ये गेला....

प्रणव मुखर्जी इकडं टेन्शन देत असताना दुस-या बाजूला तुमचा आमचा लाडका तेंडल्या मिरपूरमध्ये धावा जमवत होता. जस जशा धावा वाढत होत्या तस तसा उत्साहही वाढत होता..अखेर तो क्षण आला आणि सचिननं शतक ठोकलं..हे शतक काही फालतु नव्हतं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं शतकांचं शतक होतं..शतकांची शतकं करणारा हा विक्रमादित्य आपला मराठी मुंबईचा पोरगा म्हणूनच त्याच्या या महाशतकाची पर्वणी एक आनंद देऊन गेली..क्षणभर महागाईचं टेन्शन विसरून गेलो. सारा देश सचिनच्या महाशतकाच्या आनंदोत्सव न्हाऊन निघाला...या सामन्यात भारत हरला पण सचिनचं शतक झालं या आनंदात तो पराभवही फिक्का वाटला..आज प्रणव मुखर्जी हरले, भारत हरला पण आपला तेंडल्या मात्र जिंकला..

सचिनचं हे शंभरावं शतक व्हायला तब्बल एक वर्ष लागलं..त्यावरुन त्याच्यावर टीका होतेय. तसच सचिनचं महाशतक झालं मात्र भारत बांगलादेशाकडून हरला. पण काही महाभाग त्याचं खापर सचिनच्या शतकावर फोडून मोकळे झाले..आता सचिनचं शतक आणि भारताचा पराभव याचा काही संबंध आहे का ? पण टीकाकारांनी टीका केली नाहीतरच नवल.. ! अगदी तो कर्णधार धोनीही म्हणाला..आणखी थोड्या धावा हव्या होत्या. ! अरे बाबा धोनी पण २९० ही काही कमी धावसंख्या आहे का ? आणि धावा कमी पडल्या असं म्हणून अप्रत्यक्षपणे तू सचिनला दोष देत असशील तर गोलंदाजीचं काय रे बाबा..? त्यांची सुमार कामगिरी का नाही दिसली तुला..? बांगलादेशाचे फलंदाज जर आपल्याला भारी पडत असतील तर गोलंदाजांनी काय केलं..? आणि तु कर्णधार म्हणून काय व्यूहरचना केली होती..? म्हणजे कमी पडणा-यांचे दोष लपवून सचिनच्या शतकाची उंची काय कमी होणार आहे का..? तर ती नक्कीच नाही..आणि सचिनच्या शंभर धावा ह्यासुद्धा सामन्याच्या धावसंख्येतच जमा होतात..! पण काहीही असो..शतकाला वर्ष लागलं तरी त्याचं महत्व कमी होत नाही..त्यामुळे सचिनवर टीका करण्यापेक्षा त्याचा खेळ पहा. दोन चार सामन्यात काय फटकेबाजी केली म्हणजे सचिनला पर्याय तयार होत नसतो.. मागची सलग वीस वर्षे हा माणूस खेळत आहे आणि खेळतच आहे. जगातल्या महान खेळाडूंच्या कामगिरीतही चढ उतार झालेला आहे. त्याला सचिनही अपवाद नाही. त्यामुळे सचिन काही सामन्यात कमी खेळला म्हणजे काही त्याचं क्रिकेट संपलं असं म्हणता येत नाही..त्यामुळे सचिनला निवृत्तीचे सल्ले वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नका..तो महान खेळाडू आहे आणि महानच राहिल. त्याच्यावर टीका करणारे त्याची उंची गाठू शकत नाहीत. ते सचिनसमोर खुजे वाटतात, म्हणून त्याच्यावर टीका करण्या-यांनी जरा सबुरीनं घ्यावं..दुसरं असं की सचिन आता क्रिकेटच्या क्षितीजावर ज्या जागेवर गेलाय ती जागा घेणं आता कोणालाही शक्य नाही.. क्रिकेटमध्ये विक्रम मोडले जातात पण सचिन ज्या उंचीवर जाऊन पोचलाय त्या जागी पोचण यापुढे तर शक्य आहे असं वाटत नाही..कारण टी २० च्या या फास्ट क्रिकेटमध्ये कसोटी, एकदिवसीय सामन्यात सातत्यानं खेळणच मुळी आता अशक्य झालय. त्यामुळे सचिनचं हे अढळपद पटकावण कठिण नव्हे तर महाकठीण आहे..

सचिनच्या या महाशतकाचा मला एक मराठी माणूस म्हणून गर्व आहे आणि माझ्या महाराष्ट्राची शान या क्रिकेटच्या जगतात वाढवलीय म्हणून त्याला लाख लाख शुभेच्छा.. खरच सचिन सचिनच आहे.असा खेळाडू शतकातून नव्हे तर महाशतकातून एकदाच होतोहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आज सचिनबद्दल कौतुकानं म्हटलंय ते अगदी बरोबर आहे. सचिन तु असाच खेळत रहा.. तु नव्या पिढीचा आदर्श आहेस. क्रिकेटमधलं तुझं सातत्य, खेळावरची एकाग्रता, जिद्द, तुझा फिटनेस आणि यशाच्या शिखरावर असूनही तुझे पाय जमिनीवर आहेत हे गुण आम्हा सर्वांना खूप काही शिकवून जातात. मग आम्ही कोणत्याही क्षेत्रात असू , तुझा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आहे आणि तुझी कामगिरी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी आहे...सचिन तु महान आहेस..तुझ्याबद्दल काय लिहावं..! खरच शब्द कमी पडतात तुझ्याबद्दल लिहीताना..तू महाराष्ट्राचं भूषण आहेस, तुझ्यासमोर भारतरत्न वगैरे छोटे वाटतात रे..तो फक्त एक पुरस्कार आहे..तर तु जगाला लाभलेलं मोठं रत्न आहेस..तुझ्याकडून अशीच कामगिरी होऊ हीच श्रींच्या चरणी पार्थना करुन तुला या विक्रमाबद्दल पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो...

जय महाराष्ट्र... !!!

No comments:

Post a Comment