जम्मू काश्मीर, पठाणकोट, सिमल्यात सध्या बर्षवर्षाव होत आहे। त्याचे हे काही फोटो...पहा आणि घरबसल्या त्याचा आनंद घ्या...




भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा पुन्हा एकदा राजकीय अस्थैर्याच्या वाटेवर आहे. पाकिस्तानातलं राजकीय अस्थैर्य म्हणजे लष्करी राजवट. आजच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल अशपाक कियानी यांनी सरकारला गंभीर परिणामाचा इशारा दिलाय. त्यामुळे पाकिस्तानातलं लोकशाही सरकार पुन्हा उलथवून टाकलं जाईल काय अशी भिती व्यक्त केली जातेय.. कियानी यांनी सरकारला इशारा दिला तो काही आज तडकाफडकी नाही..मागचे काही दिवस पाकिस्तानात सरकार- न्यायपालिका आणि लष्कर यांच्यात वाद सुरुय. मेमोगेट प्रकरणामुळे अडचणित आलेल्या सरकारची नामुष्की वाढलीय. राष्ट्रपती झरदारी यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव असल्याच्या बातम्याही येत आहेत. या सर्व पार्श्वभूमिवर आज पंतप्रधान गिलानींनी संरक्षण सचिवाची हकालपट्टी केली. ही हकालपट्टी लष्करप्रमुख जनरल कियानींना चांगलीच झोंबली. ज्या संरक्षण सचिवाची सरकारनं हकालपट्टी केली तो लष्करातीलच अधिकारी होता आणि मेमोगेट प्रकरणी लष्कराची बाजू त्यानं न्यायालयात मांडली होती. त्याच अधिकाऱ्याची गिलानींनी हकालपट्टी केली हे जनरल कियानींना पटलं नाही. रावळपिंडीत तातडीची बैठक घेत कियानींनी सरकारला इशारा तर दिलाच पण महत्वाचं म्हणजे त्यांनी रावळपिंडीचा कमांडरही बदललालय. त्यामुळे पाकिस्तानात लष्करी राजवट येणार काय याची जोरदार चर्चा सुरुय.
पंतप्रधान गिलानींनी आपल्या सरकारला धोका नाही असं स्पष्ट केलय. पण पाकिस्तानचा कोणताही पंतप्रधान छातीठोकपणे असं विधान करु शकत नाही..हा झाला आजचा घटनाक्रम आणि त्याची पार्श्वभूमी...पण पाकिस्तान हा नेहमीच राजकीयदृष्ट्या अस्थिर देश राहिलाय. भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकाचवेळी स्वतंत्र झाले. भारतात लोकशाही रुजली, नांदली, त्याची फळं सामान्य लोकांपर्यत पोचली..पण पाकिस्तानात मात्र मागच्या ६०-६५ वर्षात लोकशाही मात्र रुजु शकली नाही. हा देश नेहमीच लष्करी सत्तेच्या हातात राहिलाय. कोणत्याही पक्षाचं सरकार हे लष्कराच्या हातचं बाहुलचं असतं. जे सरकार लष्कराच्या विरोधात जाईलं त्याची गय केली जात नाही. अशी अनेक सरकारं लष्करानं उलथवून लावलीत. त्याचीच पुनरावृती आज पाकिस्तानात होतेय.
या घटनाक्रमाकडे वेगळ्यादृष्टीनंही पाहिलं जातय. माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानात येण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची मुशर्रफ यांची धडपड सुरुय. त्यासाठी त्यांनी अरबी राजघराण्याकडही साकडं घातलय. आपले खास दूत पाठवून त्यांनी आपल्याला पाकिस्तानात गेल्यानंतर सरकार अटक करणार नाही असं ठोस आश्वासन द्यावं अशी गळ घातलीय. अमेरिकी अधिकाऱ्यांकडेही मुशर्रफ यांनी फिल्डींग लावलीय. पाकिस्तानात जाताच आपल्याला अटक केला जाईल अशी भीती त्यांना वाटतेय. त्यामुळेच सध्याचं सरकार अस्थिर करण्याचा किंवा उलथवून लावण्याचा हा कट असू शकतो..मुशर्रफ हे लष्करी अधिकारी, त्यांनीही नवाज शरिफ यांची सत्ता उलथवून लावली होती. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानची सुत्रं आपल्या लष्करी पंजाखाली घेतली होती. पण आता पुन्हा त्यांना राजकारणात सक्रीय व्हायचय..त्यासाठी तर त्यांचे लष्करातले मित्र हा सर्व खटाटोप तर करत नाहीत ना अशीही शंका येते..
दुसऱ्या बाजूनं विचार करता अमेरिकेबरोबरचे पाकिस्तानचे संबंधही सध्या ताणलेले आहेत. त्यामुळे अमेरिका धार्जिण नेतृत्व पाकिस्तानात पुन्हा रुजवण्याचा घाटही घातला जात असावा..कारण पाकिस्तान हा नेहमीच अस्थिर देश राहिलाय तो अस्थिरच रहावा अशी अमेरिकेची भूमिका राहिलीय. पण भारताचा विचार करता आपला शेजार अस्थिर राहणं आपल्यासाठी चांगलं नाही. पाकिस्तानात लोकशाही नांदावी अशीच भारताची भूमिका राहिलीय. कारण पाकिस्तानात लष्करी राजवट असणं हे भारताच्यादृष्टीनंही फारसं हिताचं नाही...

सचिन तेंडुलकरच्या महाशतकाची सध्या जोरदार चर्चा सुरुय. या सामन्यात तो महाशतक ठोकणार त्या सामन्यात ठोकणार असं म्हणत जवळपास आठ ते दहा महिने झालं सचिनचं ते बहुचर्चित महाशतक काही पूर्ण होत नाहीए. प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला सचिन महाशतक झळकवणार अशा हेडलाईन्स मात्र प्रसारमाध्यमात झळकतात. त्याचे चाहतेही या महाशतकाची आतुरतेनं वाट पहात आहेत. पण काही केल्या हे शतक काही पूर्ण होत नाहीए..जणु काही सचिनच्या मागं सध्या साडेसातीचा फेराच लागलाय. काहीजण त्याला सल्ले देत आहेत तर काहीजण नेहमीप्रमाणे टीका करत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचाही परफार्मन्स खूपच ढासळलाय. पण सचिनकडून त्याच्या महाशतकाची अपेक्षा सर्वच क्रिकेटप्रेमी करत आहेत. पण तब्बल १३ वेळा त्याला या महाशतकानं हुलकावणी दिलीय. त्याचा खेळ फारसा खालावलाय असं म्हणता येणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवातीच्या दोन कसोटीत संघ ढेपाळला पण सचिनची कामगिरी चांगली झालीय. त्यातच सर्वात जास्त धावाही त्यानंच केल्यात. पण शतकाला मात्र अजून गवसणी घालता आली नाहीए..
सिडनीत झालेल्या दुसऱ्या कसोटीत सचिन हे महाशतक पूर्ण करेल अशी आशा होती. वातावरणही तसच होतं. कारण सिडनीच्या मैदानावर सचिननं आजपर्यंत चांगला खेळ केलेला आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाची सध्याची टीमही काही मजबूत नाहीए. सिडनीची खेळपट्टीही पाटा आहे. मायकल क्लार्कनं काढलेलं त्रिशतक, हसी आणि पॉटिंगनं केलेली शतकी खेळी पाहता या खेळपट्टीवर सचिनचं महाशतक पक्कं असाच सर्वांचा होरा होता. पण घात झालाच....ऑस्ट्रेलियाच्या नेहमीच्या गोलंदाजांना सचिन दाद देत नाही हे पाहून मायकल क्लार्कनं चेंडू हातात घेतला आणि सरावाचा नसलेल्या एका सोप्या चेंडूनं सचिनची विकेट पडली..सचिन ८० धावा काढून तंबूत परतला आणि सचिनसह त्याचे चाहते तमाम क्रीडा रसिक यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला...याच खेळपट्टीवर सचिनचं महाशतक होईलं असा आशावाद तिथल्या प्रसारमाध्यमांनीही व्यक्त केला होता. पण या कसोटीत त्याला नशिबानं पुन्हा हुलकावणी दिली..
सचिन हा महान खेळाडू आहे यात वादच नाही, त्याचा परफॉर्मन्स बिघडला की त्याच्यावर टीकेची झोड उठवली जाते. सिडनीत ज्या सोप्या चेंडूवर त्याची विकेट उडाली ते पाहून त्याचा पूर्वीचा साथीदार सौरव गांगुलीनंही त्याच्यावर टीका केलीय. असाच बचावात्मक खेळ करायचा असेल तर तु क्रिकेट सोडून दुसरा खेळ खेळ असा सल्ला मी त्याला देईनं असं गांगुलीनं म्हटलय...असो टीका करणाऱ्यांना टीका करुदेत त्यामुळे त्याचं महत्व आणि त्याचं क्रिकेटचं योगदान काही कमी होत नाहीए.
सचिनवर या महाशतकाचं मोठं दडपण आहे याची त्यालाही जाणीव आहे. पण क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. या खेळात शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही घडू शकतं..अशावेळी त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे..ऑस्ट्रेलियाविरुद्धच्य कसोटी मालिकेतल्या आणखी दोन कसोटी शिल्लक आहेत. त्यात तो ही उणिव भरुन काढेलच. पण जोपर्यंत हे महाशतक पूर्ण होत नाही तोपर्यंत महाशतकाची हुरहुर ही लागतच राहणार.. पुढच्या कसोटीत हे महाशतक पूर्ण व्हावं यासाठी सचिनला आपणही शुभेच्छा देऊयात..
नशिबावर अनेकजण विश्वास ठेवतातच, काहीजण उघडपणे तर काहीजण लपून छपून पण नशिब, लकीनंबर, लकी दिवस यावर अनेकांचा विश्वास आहेच...म्हणूनतर आपण शुभ दिवस बघून नवीन बाईक किंवा कारही घरी आणली जाते..आता कार किंवा बाईकचाच विषय निघालाय तर त्याच्याशीच निगडीत असलेल्या नंबरप्लेटवरही थोडेसं बोलूया.
आपल्या गाडीचा नंबर काय असावा याबाबतही काहीलोक खूपच जागृत असतात. त्यामुळे गाडीपेक्षाही नंबरला महत्व दिलं जात असल्याची अनेक उदाहरणं आहेत... काहीजणांचा लकी नंबर ९ असतो. त्या लकी नंबरसाठी बक्कळ पैसाही मोजतात..बरं झालं मागच्या काही वर्षापासून आरटीओ ऑफीस अशा लकी कम फॅन्सी नंबरसाठी लिलावात बोली लावतं किंवा ठराविक नंबरला ठराविक रक्कम ठरवून घेतं...पूर्वी वशिल्याच्या जोरावर असे नंबर मिळवले जायचे..
हैदराबादमध्ये परवाच अशा लकी नंबरसाठी लाखो रुपयांची बोली लागली..तो लकी नंबर होता ९..त्यामुळे एपी ०९ एसीबी ९९९९ आणि दुसऱ्या दोन सिरीजमध्येही एपी ९---९९९९ अशा तीन नंबरसाठी मोठी मागणी होती. त्यामुळे त्यासाठी लिलाव झाला.एका कार मालकाने तब्बल ८ लाख ५० हजार रुपये मोजून एक नंबर मिळवला तर दुसऱ्यानं पाच लाख आणि तिसऱ्या नंबरसाठी साडेचार लाख रुपये मोजले...आता नंबरसाठी लाखोंची रक्कम ज्या कारसासाठी दिली त्या कारही तेवढयाच किंमती असल्या पाहिजेत...हो साडे आठ लाख रुपये मोजलेली कार होती मर्सिडीज..तर दुसऱ्या दोन होत्या बीएमडब्ल्यू.... कारही महागड्या आणि त्यांचे नंबरही महागडे...पण ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांना काय फरक पडतो..एखाद्या नंबरसाठीही लाखो मोजायला...पण नंबरमुळे गाडीमध्ये काही फरक पडणार आहे का ? तर नाही, पण लकी नंबर म्हणून एवढा पैसा मोजला ना...
आपल्याकडेही नंबरची मोडतोड करुन दादा, अण्णा, भाऊ असा अर्थ होईलं असे नंबर मिळवण्यासाठी धडपड होतेच. तशा नंबरच्या गाड्याही आपण पाहिल्यात...हा एक नाद म्हणा किंवा लकी नंबर म्हणा पण गाडीपेक्षा नंबरही कधी कधी भाव खावून जातोच एवढच..


जानेवारी महिना आला की ज्या पार्टीचा सुगावा लागतो ती म्हणजे हुर्डा पार्टी....खरं तर ह्याचं हुर्डा पार्टी असं नामकरण शहरी लोकांनी केलय. रब्बी हंगामातली ज्वारी किंवा मका भरली की ती आगीवर भाजून खाण्याचा प्रकार म्हणेज हुर्डा...पण आमच्यासारख्या गावाकडच्या लोकांनी नोकरी व्यवसाय किंवा इतर कारणामुळं शहराचा रस्ता धरला आणि याला हुर्डा पार्टी असं गोंडस नाव दिलं....असू द्या हुर्डा पार्टी म्हटलं तरी हुर्ड्याची चव काय बदलणार नाही....तर गावाकडे या मोसमात म्हणजे वेळ अमावस्या संपल्यानंतर ते संक्रातीचा दिवस या १५ ते २० दिवसाच्या काळापासून हुर्डा करण्यासारखी ज्वारीची कणसं भरलेली असतात.. म्हणजेच कोवळी ज्वारी... मक्याचा हुर्डाही असतो पण त्यात ज्वारीचा हुर्डा हा खायला उत्तम...तसं मक्याचं कणीस जसं शहरात चौका चौकात मिळतं तसं ज्वारीचा हुर्डा मिळत नाही..ज्या काही शहरात सध्या तो मिळतो तो फक्त पूर्ण भाजलेला असा तो हुर्डा असतो.. पण हुर्डा हा शेतात जाऊन तिथंच खाल्ला तरच त्याची खरी मजा मिळते...
शेतातली ज्वारीची उभी ताटं काढून आणायची, त्याची कणसं बाजूला काढायची... जमीनित एक छोटासा खड्डा करुन त्यात गोवऱ्या पेटवायच्या आणि त्या गोवऱ्याच्या विस्तवात ही कणसं भाजायची.. भाजल्यानंतर ती हातावर घेऊन कणसापासून त्यातले दाणे बाजूला केले की मिळतो तो हुरडा...आणि शेगांची चटणी, गुळ किंवा काही विशिष्ट बनवलेल्या चटण्याबरोबर तो खायचा...अहाहाहा...काय ती चव... पण तुम्ही हा प्रकार स्वतः करु नका, कारण हा सर्व खेळ ज्याला जमतो त्या शेतात राबनाऱ्या हातालाच जमतो...आपण करायला जायचो आणि नसता हात भाजायचा....असो पण वरचं वर्णन समोर आलं की मला लगेच जुने दिवस आठवात..अशाच एका हुरडा पार्टीची मला आज आठवण झाली..
साधारणपणे पाच वर्षापूर्वी आम्ही एक हुर्डा पार्टी केली होती... हैदाराबादमधल्या नेहमीच्या पार्टीपेक्षा ही वेगळी पार्टी...आमच्याकडे राजेंद्र हुंजे नावाचा सहकारी होता.. सध्या तो आयबीएन लोकमतमध्ये आहे...माझा चांगला मित्र..त्याचं गाव हैदराबाद पासून पाच तासावर आहे.. अशाच एका दिवशी हुर्डा पार्टीचा बेत ठरला..खरं तर हुंजे कुणाला काही देणार यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.. पण पठ्यानं हुर्डा पार्टीचा जो बेत केला होता त्याला तोड नाही..म्हणजे आम्ही जवळपास दहा बाराजण या हुर्डा पार्टीसाठी भल्या पहाटे पाच वाजताच तयार होऊन निघालो.. त्यावेळचे आमचे सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणजे आमचे बॉस गिरीश केमकर, मेघराज पाटील, मंदार लोहोकरे, दुर्गेश सोनार, सागर गोखले, अशोक सुरवसे, रवी गुळकरी, सचिन फुलपगारे, अभय जिन्सीवाले आणि मी अशी खासी मंडळी या हुर्डा पार्टीला होती...( एखादे नाव राहिले गेले असेल तर चुक भूल देणे घेणे असावे )
हैदराबाद ते उमरग्याजवळचं येणेगुर गाव हा पाच तासांचा रस्ता आम्ही मौज मस्तीत घालवला.. त्यानंतर हुंजेच्या घरचा पाहुणचार झाला..भरपेट जेवण झालं.. पण आमचा ओढा होता तो हुरड्याकडे...गावाच्या बाजूलाच राजाचं शेत होतं तरीही बैलगाडीतून आम्ही सारी मंडळी शेतात गेलो.. तिथं गरम गरम हुरड्यावर यथेच्च ताव मारला...ताव मारला काय राव आम्ही सगळी मंडळी तुटुनच पडलो की...हुरडा पार्टीबरोबरच शेतात मनसोक्त फिरलोही...शेवटी आम्ही "अन्नदाता सुखी भव" म्हणत परत फिरलो... राजानं ही हुर्डा पार्टी देऊन आम्हाला सर्वांना गावाकडची आठवण करुन दिली....या हुरडा पार्टीतले इतर किस्से पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये जरुर शेअर करेन आणि अर्थातच या पार्टीचे काही फोटीही लवकरच फेसबुकवर अपलोड करेन...पण आज या पाच वर्षापूर्वीच्या हुरडा पार्टीची आठवण झाली ती दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आलेल्या हुरडा पार्टीच्या बातमीमुळं.. या बातमीमुळे राजा हुंजेच्या शेतातल्या हुरडा पार्टीची आठवण ताजी झाली.. त्यामुळे राजाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुढच्या हुर्डा पार्टीची वाट पाहतो....
( मित्रहो..माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत..पण तुम्ही comments as ... Anonymous हा पर्याय सिलेक्ट करुन तुमची काँमेंट आणि तुमचे नाव टाकून पाठवा. मला ती मिळेल..लवकरच हा तांत्रिक दोष दूर करण्याचा प्रयत्न करत आहे..)

हैदराबादमध्ये बिर्याणी ही सगळीकडे मिळते..पण तुम्हाला जर जुन्या हैदराबादची सफर करायची असेल किंवा चारमिनारच्या भागात तुम्ही फेरफटका मारत असाल आणि जेवण्याचा बेत असेल तर त्याच भागात असलेल्या शादाब किंवा मदिना हॉटेलला जरुर भेट द्या.. या दोन्ही हॉटेलमध्ये बिर्याणी उत्तम प्रतिची मिळते.. पूर्वी मदिना हॉटेलचा बोलबाला असायचा पण सध्या त्याची रौनक काहीप्रमाणात कमी झालीय...पण बिर्याणीचा आस्वाद मात्र तोच आहे..त्याशिवाय बावर्ची, कॅफे बहार, अशा हॉटेलमधूनही तुम्हाला उत्तम दर्जाची चविष्ट बिर्याणी मिळते... आणि तुम्ही जर सिंकदराबाद भागात असाल तर पॅराडाईज हॉटेलला भेट देण्यास विसरू नका...तुम्हाला बिर्याणीचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेता येईलं.. ही काही बोटावर मोजण्याएवढी नावं आहेत..पण हैदराबादच्या कोणत्याही भागात गेलात तरी तुम्हाला बिर्याणी मिळतेच मिळते..तुम्ही जर चार-पाच जण किंवा जास्तजण असाल तर अगदी फॅमिली पॅकही मिळतो..
हैदराबादच्या बिर्याणीचा इतिहासही हैदराबाद शहराएवढाच जुना म्हणजे जवळपास ४०० वर्षाचा आहे.. निजामाच्या किचनमध्ये बिर्याणीला पहिलं आणि मानाचं स्थान होतं. त्यामुळेच त्या बिर्याणीचा थाट आजही नवाबी दिसतो.. ह्या बिर्याणीएवढाच तिचा इतिहास ही रंजक आहे. मोघल आक्रमणाबरोबर बिर्याणीही भारतात आली असं म्हणतात. तैमूर लंग यानं भारतावरच्या आक्रमणाबरोबच त्यांचं खाद्य असलेली बिर्याणी भारतात आणली असं म्हणतात.. त्यानंतर मोघलांच्या मोहिमांबरोबर ही बिर्याणीही भारताच्या अनेक भागात पोचली.. पण तिचं अस्तित्व आणि थाट जपला आणि जोपासला गेला तो हैदराबादमध्ये.. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणीला निजामाच्या जेवणात पहिलं स्थान असायचं पण निजामाचे जे सावकार होते ते महाजन हिंदू होते. ते मांसाहार करत नसत त्यामुळे त्यांच्यासाठी खास शाकाहारी बिर्याणी बनवली जायची असं म्हणतात...असा हा रंजक इतिहास असलेली खास हैदराबादी बिर्याणी तुमच्या तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही...त्यामुळे हैदराबाद भेटीत एक डाव बिर्याणीचा....
