Thursday, January 5, 2012

हुरडा पार्टी आणि जुन्या आठवणी...


जानेवारी महिना आला की ज्या पार्टीचा सुगावा लागतो ती म्हणजे हुर्डा पार्टी....खरं तर ह्याचं हुर्डा पार्टी असं नामकरण शहरी लोकांनी केलय. रब्बी हंगामातली ज्वारी किंवा मका भरली की ती आगीवर भाजून खाण्याचा प्रकार म्हणेज हुर्डा...पण आमच्यासारख्या गावाकडच्या लोकांनी नोकरी व्यवसाय किंवा इतर कारणामुळं शहराचा रस्ता धरला आणि याला हुर्डा पार्टी असं गोंडस नाव दिलं....असू द्या हुर्डा पार्टी म्हटलं तरी हुर्ड्याची चव काय बदलणार नाही....तर गावाकडे या मोसमात म्हणजे वेळ अमावस्या संपल्यानंतर ते संक्रातीचा दिवस या १५ ते २० दिवसाच्या काळापासून हुर्डा करण्यासारखी ज्वारीची कणसं भरलेली असतात.. म्हणजेच कोवळी ज्वारी... मक्याचा हुर्डाही असतो पण त्यात ज्वारीचा हुर्डा हा खायला उत्तम...तसं मक्याचं कणीस जसं शहरात चौका चौकात मिळतं तसं ज्वारीचा हुर्डा मिळत नाही..ज्या काही शहरात सध्या तो मिळतो तो फक्त पूर्ण भाजलेला असा तो हुर्डा असतो.. पण हुर्डा हा शेतात जाऊन तिथंच खाल्ला तरच त्याची खरी मजा मिळते...


शेतातली ज्वारीची उभी ताटं काढून आणायची, त्याची कणसं बाजूला काढायची... जमीनित एक छोटासा खड्डा करुन त्यात गोवऱ्या पेटवायच्या आणि त्या गोवऱ्याच्या विस्तवात ही कणसं भाजायची.. भाजल्यानंतर ती हातावर घेऊन कणसापासून त्यातले दाणे बाजूला केले की मिळतो तो हुरडा...आणि शेगांची चटणी, गुळ किंवा काही विशिष्ट बनवलेल्या चटण्याबरोबर तो खायचा...अहाहाहा...काय ती चव... पण तुम्ही हा प्रकार स्वतः करु नका, कारण हा सर्व खेळ ज्याला जमतो त्या शेतात राबनाऱ्या हातालाच जमतो...आपण करायला जायचो आणि नसता हात भाजायचा....असो पण वरचं वर्णन समोर आलं की मला लगेच जुने दिवस आठवात..अशाच एका हुरडा पार्टीची मला आज आठवण झाली..

साधारणपणे पाच वर्षापूर्वी आम्ही एक हुर्डा पार्टी केली होती... हैदाराबादमधल्या नेहमीच्या पार्टीपेक्षा ही वेगळी पार्टी...आमच्याकडे राजेंद्र हुंजे नावाचा सहकारी होता.. सध्या तो आयबीएन लोकमतमध्ये आहे...माझा चांगला मित्र..त्याचं गाव हैदराबाद पासून पाच तासावर आहे.. अशाच एका दिवशी हुर्डा पार्टीचा बेत ठरला..खरं तर हुंजे कुणाला काही देणार यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.. पण पठ्यानं हुर्डा पार्टीचा जो बेत केला होता त्याला तोड नाही..म्हणजे आम्ही जवळपास दहा बाराजण या हुर्डा पार्टीसाठी भल्या पहाटे पाच वाजताच तयार होऊन निघालो.. त्यावेळचे आमचे सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणजे आमचे बॉस गिरीश केमकर, मेघराज पाटील, मंदार लोहोकरे, दुर्गेश सोनार, सागर गोखले, अशोक सुरवसे, रवी गुळकरी, सचिन फुलपगारे, अभय जिन्सीवाले आणि मी अशी खासी मंडळी या हुर्डा पार्टीला होती...( एखादे नाव राहिले गेले असेल तर चुक भूल देणे घेणे असावे )


हैदराबाद ते उमरग्याजवळचं येणेगुर गाव हा पाच तासांचा रस्ता आम्ही मौज मस्तीत घालवला.. त्यानंतर हुंजेच्या घरचा पाहुणचार झाला..भरपेट जेवण झालं.. पण आमचा ओढा होता तो हुरड्याकडे...गावाच्या बाजूलाच राजाचं शेत होतं तरीही बैलगाडीतून आम्ही सारी मंडळी शेतात गेलो.. तिथं गरम गरम हुरड्यावर यथेच्च ताव मारला...ताव मारला काय राव आम्ही सगळी मंडळी तुटुनच पडलो की...हुरडा पार्टीबरोबरच शेतात मनसोक्त फिरलोही...शेवटी आम्ही "अन्नदाता सुखी भव" म्हणत परत फिरलो... राजानं ही हुर्डा पार्टी देऊन आम्हाला सर्वांना गावाकडची आठवण करुन दिली....या हुरडा पार्टीतले इतर किस्से पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये जरुर शेअर करेन आणि अर्थातच या पार्टीचे काही फोटीही लवकरच फेसबुकवर अपलोड करेन...पण आज या पाच वर्षापूर्वीच्या हुरडा पार्टीची आठवण झाली ती दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आलेल्या हुरडा पार्टीच्या बातमीमुळं.. या बातमीमुळे राजा हुंजेच्या शेतातल्या हुरडा पार्टीची आठवण ताजी झाली.. त्यामुळे राजाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुढच्या हुर्डा पार्टीची वाट पाहतो....


( मित्रहो..माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत..पण तुम्ही comments as ... Anonymous हा पर्याय सिलेक्ट करुन तुमची काँमेंट आणि तुमचे नाव टाकून पाठवा. मला ती मिळेल..लवकरच हा तांत्रिक दोष दूर करण्याचा प्रयत्न करत आहे..)

2 comments:

  1. Junya Athwani tajya Zalya...Hurd..Hunje ni party..golden days...Mandar Lohokare

    ReplyDelete
  2. काका मस्त... लिहत जा... लांबोटी चिवड्या बद्दल ही लिहा बरं का :)

    ReplyDelete