Sunday, January 8, 2012

सचिनच्या महाशतकाची प्रतिक्षासचिन तेंडुलकरच्या महाशतकाची सध्या जोरदार चर्चा सुरुय. या सामन्यात तो महाशतक ठोकणार त्या सामन्यात ठोकणार असं म्हणत जवळपास आठ ते दहा महिने झालं सचिनचं ते बहुचर्चित महाशतक काही पूर्ण होत नाहीए. प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला सचिन महाशतक झळकवणार अशा हेडलाईन्स मात्र प्रसारमाध्यमात झळकतात. त्याचे चाहतेही या महाशतकाची आतुरतेनं वाट पहात आहेत. पण काही केल्या हे शतक काही पूर्ण होत नाहीए..जणु काही सचिनच्या मागं सध्या साडेसातीचा फेराच लागलाय. काहीजण त्याला सल्ले देत आहेत तर काहीजण नेहमीप्रमाणे टीका करत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचाही परफार्मन्स खूपच ढासळलाय. पण सचिनकडून त्याच्या महाशतकाची अपेक्षा सर्वच क्रिकेटप्रेमी करत आहेत. पण तब्बल १३ वेळा त्याला या महाशतकानं हुलकावणी दिलीय. त्याचा खेळ फारसा खालावलाय असं म्हणता येणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवातीच्या दोन कसोटीत संघ ढेपाळला पण सचिनची कामगिरी चांगली झालीय. त्यातच सर्वात जास्त धावाही त्यानंच केल्यात. पण शतकाला मात्र अजून गवसणी घालता आली नाहीए..

सिडनीत झालेल्या दुसऱ्या कसोटीत सचिन हे महाशतक पूर्ण करेल अशी आशा होती. वातावरणही तसच होतं. कारण सिडनीच्या मैदानावर सचिननं आजपर्यंत चांगला खेळ केलेला आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाची सध्याची टीमही काही मजबूत नाहीए. सिडनीची खेळपट्टीही पाटा आहे. मायकल क्लार्कनं काढलेलं त्रिशतक, हसी आणि पॉटिंगनं केलेली शतकी खेळी पाहता या खेळपट्टीवर सचिनचं महाशतक पक्कं असाच सर्वांचा होरा होता. पण घात झालाच....ऑस्ट्रेलियाच्या नेहमीच्या गोलंदाजांना सचिन दाद देत नाही हे पाहून मायकल क्लार्कनं चेंडू हातात घेतला आणि सरावाचा नसलेल्या एका सोप्या चेंडूनं सचिनची विकेट पडली..सचिन ८० धावा काढून तंबूत परतला आणि सचिनसह त्याचे चाहते तमाम क्रीडा रसिक यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला...याच खेळपट्टीवर सचिनचं महाशतक होईलं असा आशावाद तिथल्या प्रसारमाध्यमांनीही व्यक्त केला होता. पण या कसोटीत त्याला नशिबानं पुन्हा हुलकावणी दिली..

सचिन हा महान खेळाडू आहे यात वादच नाही, त्याचा परफॉर्मन्स बिघडला की त्याच्यावर टीकेची झोड उठवली जाते. सिडनीत ज्या सोप्या चेंडूवर त्याची विकेट उडाली ते पाहून त्याचा पूर्वीचा साथीदार सौरव गांगुलीनंही त्याच्यावर टीका केलीय. असाच बचावात्मक खेळ करायचा असेल तर तु क्रिकेट सोडून दुसरा खेळ खेळ असा सल्ला मी त्याला देईनं असं गांगुलीनं म्हटलय...असो टीका करणाऱ्यांना टीका करुदेत त्यामुळे त्याचं महत्व आणि त्याचं क्रिकेटचं योगदान काही कमी होत नाहीए.

सचिनवर या महाशतकाचं मोठं दडपण आहे याची त्यालाही जाणीव आहे. पण क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. या खेळात शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही घडू शकतं..अशावेळी त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे..ऑस्ट्रेलियाविरुद्धच्य कसोटी मालिकेतल्या आणखी दोन कसोटी शिल्लक आहेत. त्यात तो ही उणिव भरुन काढेलच. पण जोपर्यंत हे महाशतक पूर्ण होत नाही तोपर्यंत महाशतकाची हुरहुर ही लागतच राहणार.. पुढच्या कसोटीत हे महाशतक पूर्ण व्हावं यासाठी सचिनला आपणही शुभेच्छा देऊयात..

1 comment: