Monday, August 29, 2011

अण्णांनी इतिहास घडवला




अण्णा हजारे यांनी १३ दिवसांचे उपोषण दिल्लीत रामलीला मैदानावर सोडले. जनलोकपाल विधेयकासाठी सुरु केलेल्या या उपोषणात त्यांचा विजय झाला की नाही यावर आता चर्चा सुरु आहे. जनलोकपाल विधेयक ३० ऑगस्टपर्यंत संसदेत पास करा अन्यथा उपोषण सोडणार नाही असा इशारा अण्णांनी दिला होता. प्रत्यक्षात सरकारनं अण्णांचे जनलोकपाल स्विकारलेले नाही. सरकारी लोकपाल, जनलोकपाल, अरुणा रॉय यांचे लोकपाल संसदेच्या स्थायी समितीपुढे ठेवले. पण अण्णांनी ज्या मागण्या प्रतिष्ठेच्या केल्या होत्या..(पंतप्रधानांचा लोकपालच्या कक्षेत समावेश, न्यायपालिका लोकपालच्या कक्षेत आणणं..वगैरे ) या तर सरकारने फेटाळून लावल्या. पण कनिष्ठ कर्मचारी लोकपालच्या कक्षेत आणणे, राज्यात लोकायुक्त आणि नागरी सनद या त्यांच्या तीन मागण्यांचा समावेश करण्याचे सरकारने आश्वासन दिले आहे. तशा आशयाचे पत्रही पंतप्रधानांनी अण्णांना पाठवले. संसदेतही त्यावर चर्चा झाली आणि बाकं वाजवून त्याला अनुमोदन देण्यात आले. खरं तर अण्णांच्या उपोषणाच्या १० व्या दिवशीच पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्या, सभापती यांच्यासह सभागृहाने त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती.. पंतप्रधानांनी तर त्यांना सलाम केला होता. त्यावेळी अण्णांनी उपोषण मागे घेतले असते तर तो त्यांचा मोठेपणाच दिसला असता पण त्यांच्या सल्लागार मंडळाने त्यांना तसा निर्णय घेऊ दिला नाही..
अण्णांनी त्यांच्या मागण्यांवर संसदेत प्रस्ताव पास करण्याची मागणी लावून धरली. हा तर संसदीय परंपेत अडचणिचा मुद्दा होता. पण सरकारने शेवटी तोही मान्य केला. कधी नव्हे ते शनिवारी संसदेचे कामकाज सुरु राहिले. कोणताही व्हीप बजावलेला नसताना खासदारही बहुसंख्येने उपस्थित होते. रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत कामकाज चालले आणि अण्णांच्या मागण्या सभागृहाने तत्वतः मान्य केल्य़ा. त्यानंतर अण्णांनी उपोषण सोडले..या उपोषणामुळे अण्णा हे दिल्लीच्या राजकारणात जसे मोठे झाले तसे देशभर अण्णांची ख्याती पोचली. त्यांच्या उपोषणाला आणि त्यानंतर इंडिया गेटवर जो विजयोत्सव साजरा करणाऱ्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्यातच अण्णांचे यश दडलय.या आंदोलनाची एक महत्वाची बाब म्हणजे समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी यात भाग घेतला. तरुणाई शक्यतो अशा आंदोलनात वगैरे उतरत नाही पण त्यांचा सहभागसुद्धा प्रचंड होता. हे का घडलं याचा विचार केला तर एक बाब लक्षात येते ती म्हणजे लोकांमध्ये भ्रष्टाचाराबदद्ल प्रचंड चिड आहे. त्याला एक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम अण्णांनी केले. जरी अण्णांचे जनलोकपाल आहे तसे स्विकारले तरी भ्रष्टाचार हा काही संपणार नाही, हेही लोकांना माहित आहे पण राजकीय व्यवस्थेवरचा राग आणि बोकाळलेला भ्रष्टाचार हा लोकांना सतावणारा मुद्दा आहे. तोच राग लोकांनी रस्त्यावर येऊन व्यक्त केला. खरं तर अण्णांना कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना एका गावातल्या माणसाने अहिंसेच्या मार्गाने एक इतिहास घडवला हे मात्र नक्की..

No comments:

Post a Comment