Sunday, January 22, 2012

शिवसेना बाळासाहेबांची आणि आत्ताची...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेला जन्माला घातले ती शिवसेना आज आहे का असा सवाल सध्या विचारला जातोय. त्यात तथ्यही आहे. कारण शिवसेनेची आजची अवस्था पाहता या संघटनेची वाताहत झाल्याचंच दिसतय. सेनेचे नेते जरी त्याचा काही फरक पडत नाही असं म्हणत असले तरी ते फारसं खरं नाही..मुळात बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली त्यावर त्यांचा एकहाती अंमल होता. एक दरारा होता. त्यांची संघटनेवर, शिवसैनिकांवर जबरदस्त पकड होती. तसच त्यांनी माणसं जोडली होती. त्यांचा सामान्य शिवसैनिकांशी थेट संवाद असायचा. तसच पक्षात फक्त आणि फक्त त्यांचाच शब्द असायचा आणि तो आदेश म्हणून पाळला जात होता. शिवसेना किंवा शिवसेनेबद्दल ब्र काढण्याचीही कोणाची हिम्मत नव्हती. संघटनेतच काय बाहेरचा माणूसही सेनेबद्दल बोलताना दहादा विचार करत असे. त्यांना अनेक स्तरातून विरोध होता पण थेट अंगावर घेण्यास सहसा कोणी पुढं येत नसे. बाळासाहेबांनी सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन एक मोठा संघर्ष केला. त्यातूनच त्यांच्या संघटनेचं पक्षात रुपांतर झालं आणि बघता बघता शिवसेना सत्तेत आली. सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवून त्यांनी मोठं यश संपादन केलं. त्यानंतर त्यांनी ठाण्यात मुसंडी मारली. पण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याच बालेकिल्यात सेना वाढली, मोठी झाली. मुंबई आणि मुंबई महानगरपालिका हेच शिवसेनेच्या आर्थिक ताकदीचा स्रोत होता आणि आजही राहिलाय. कारण मागच्या ४७-४८ वर्षात सेना फक्त एकदाच राज्याच्या सत्तेवर साडेचार वर्षे होती. त्यानंतर ती सतत विरोधातच राहिलीय. त्यामुळे कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिकांचा जो आर्थिक प्रश्न असतो तो मुंबईतच मिळत होता. त्यामुळेच सेनेला सर्व प्रकारचं पाठबळ मिळालं ते मुंबईतूनच..


मुंबईत शिवसेनेशिवाय कुणाचा आवाज हि कल्पनाही केली जात नव्हती. पण ती ताकदही आता सेनेत राहिली नाही. त्यांची अलिकडची आंदोलनही फुसकी ठरलीत. मुंबई बंद पाडण्याची धमक फक्त शिवसेनेत होती. ( बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत...उद्धव ठाकरेंच्या नाही..) तर सेनेतून बाहेर पडणे ही कल्पनाही कोणी करत नव्हतं. ठाण्यातलं खोपकर प्रकरण आठवून बघा.. त्यामुळेच सेनेतून बाहेर पडणं म्हणजे आपला खोपकरच होणार ही भिती होती. म्हणून छगन भुजबळ यांनी १९९१ ला सेना सोडली तेंव्हा तेसुद्धा जीव मुठीत घेऊन अनेक महिने परागंदा होते. भुजबळांसारखा जबरदस्त ताकदीचा माणूस...मुंबईच्याबाहेर मराठवाड्यात सेनेला पोचवण्यात भुजबळांचा सिंहाचा ( वाघाचा ) वाटा आहे. पण ते शरद पवारांच्या हाती लागले..१२ आमदारांना घेऊन भुजबळांनी शिवसेनेच्या अभेद्य गडाला तडा देण्याचं धाडस दाखवलं..पण त्यांनाही पळता भूई थोडी झाली होती..पण त्यानंतर किती गेले याचा पत्ता सेनेच्या आजच्या नेतृत्वालाही नाही.. शिवसेनेत तोंड वर करण्याची हिंमत होत नव्हती पण आज तो उठतो आणि सेनेच्या नेतृत्वावर टीका करतो..अर्थात त्यांचा थेटरोख उद्धव ठाकरेंवर असतो. अनेकजण सेना सोडताना थेट उद्धव ठाकरेंवर टीका करतात. त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतात. पण बाळासाहेबांवर विश्वास आणि श्रद्धा प्रकट करतच.. हे असं का व्हावं ? शिवसेनेची ही अवस्था का झाली ? याची उत्तरही सर्वांना माहित आहेत. मुळात बाळासाहेबांची शिवसेना एक आक्रमक संघटना होती. त्याचं नेतृत्व बाळासाहेबांच्या वज्रमुठीत होतं. त्यांचा शब्द आदेश होता. बाळासाहेबांच्या एका शब्दाखातर जीवाची बाजी लावणारी माणसं त्यांनी जोडली होती. म्हणूनच बाळासाहेबांना त्यांच्या शिवसेनेत मानाचं स्थान आहे. इतर पक्षातल्या लोकांमध्येही बाळासाहेबांबदद्ल आदर आहे. त्यांची मैत्रिही मोठीही दिलदार आहे. शरद पवार, अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध आजची चर्चिले जातात.. वाघाची संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जायचं. पण तो आब.. तो रुबाब आता राहिला नाही...

बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची धुरा सोपवली तेव्हापासूनच शिवसेनेच्या अधोगतीला सुरवात झाली. मुळात शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेला गरज आहे ती तेवढ्याच आक्रमक नेतृत्वाची आणि उद्धव यांच्य़ात ती नाही. उध्दव हे सौम्य स्वभावाचे आणि कलाकाराच्या मनाचे. त्यांना सेनेची धुरा तर दिली पण ती पेलवता आली नाही. त्यातच त्यांचं सल्लागार मंडळ हेच कुचकामी आहे. त्यांच्या अवतीभवतीच्या नेतेमंडळीची नावं घेतली तर ती शिवसेनेच्या स्वभावाला कुठचं मिळत नाहीत. त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंच्या जवळचे म्हणून त्यांचा शब्द चालतो आणि इतरांना डावललं जातं ही भावना शिवसेनेत झालेली आहे. शिवसेनेच्या खासदार आमदारांनाही जर सेनेचं नेतृत्व वेळ देत नाही असा आरोप होत असेल तर ती गंभीर बाब आहे. जी शिवसेना व्हॅलेंटाईन डे सारख्या प्रकारांना आपल्या तोडफोडवृतीनं विरोध करायची तीच सेना आता तरुण व्होट बँक आणि नातवाच्या नेतृत्वामुळे मवाळ भूमिका घेतं ही कुठली शिवसेना ? तर जे बाळासाहेब ठाकरे घराणेशाहीवर जबरदस्त प्रहार करत त्यांनीच सुरवातीला उद्धव यांच्याकडे संघटनेची-पक्षाची जबाबदारी सोपवली...त्याचा कहर म्हणून की काय पुतण्या राज ठाकरेंच्या मनसेला तोंड देण्यासाठी नातू आदित्यला मैदानात उतरवलं. याला घराणेशाही नाही तर काय म्हणायचं.. ?मुळात आदित्यला अजून मिसरुडही फुटलेलं नाही तर युवा सेना नावाची सुभेदारी बहाल केली...मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यालाही उद्धवबरोबर आदित्यला मान द्यावा लागतो हे कशाचं द्योतक आहे. सेनेच्या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नेत्यांना व्यासपीठावर जागा मिळत नाही मात्र आदित्यला मात्र पहिल्या रांगेत जागा. हे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न नाही तर काय..?

शिवसेनेच्या मागच्या ४७-४८ वर्षातल्या इतिहासावर बरचं काही लिहण्यासारखं आहे. पण बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यातलं अंतर आणि फरक पडताळण्याचा हा प्रयत्न आहे..बाळासाहेबांची शिवसेना ते आदित्य ठाकरेंची युवासेना व्हाया उद्दव ठाकरेंची सेना हा प्रवास शिवसैनिकांनी पाहिलाय..पण तो शिवसैनिकांनाच पचणी पडत नाही. शेवटी काय ? ज्या संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी आपलं सर्वस्व वाहिलं त्यांना काहीच किंमत नाही. शिवसेना वाढवण्यास, त्याला पाठबळ देण्यात वाघाचा वाटा ज्यांचा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि आदेश बांदेकरसारख्यांना थेट विधानसभेची उमेदवारी असा प्रकार शिवसैनिकांनाही आता सहन होण्याच्या पलीकडे गेलाय. त्यांच्याही मनात जय महाराष्ट्र..करा कष्ट आणि व्हा नष्ट अशीच भावना वाढीस लागलीय...म्हणूनच सेनेचा गड आता गड राहीला नाही तर तोसुद्धा मुंबईतल्या फ्लॅट संस्कृतीसारखा आकसलाय. तोसुद्धा वन बिएचके किंवा वन रुम किचनसारखा छोटा झालाय. त्यामुळं त्याला आता गड म्हणनंही आतिशयोक्ती वाटतंय. याच बदलत्या नेतृत्वामुळं सेनेतून नारायण राणे, राज ठाकरे, सुरेश प्रभुंसारखे असंख्य मोहरे त्यांना सोडून गेले...आणि उरलेत ते फक्त कारकून आणि बारभाई..त्यांच्या जीवावर सेनेचा हा गाडा ओढला जातोय..बाळासाहेबांच्या आजच्या वाढदिवशी त्यांना त्यांनीच उभी केलेली जीवापाड प्रिय असलेली शिवसेना फुटताना त्याला तडे जाताना पाहण्याचं दुखः पचवावं लागतय...याला काय म्हणावं ? पण हा शिवसेनेचा डोलारा पुन्हा उभा रहावा अशीच तमाम मराठी मनाची आणि असंख्य शिवसैनिकांची आजही इच्छा आहे. ती पुन्हा मानानं उभी रहावी आणि मुंबईतही आवाज कुणाचा ? असा आवाज घुमला पाहिजे एवढीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त अपेक्षा...

जय महाराष्ट्र..

7 comments:

 1. सेना फक्त बाळासाहेबांचीच...तोच एक आवाज.
  बाकी सर्व बकवास..राजाभाऊ..उस्मानाबाद

  ReplyDelete
 2. बाळासाहेबांशिवाय शिवसेना ऐकायलाही बरोबर वाटत नाही राव..
  आनंद एकबोटे..सांगली..

  ReplyDelete
 3. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाढदिवसाच्या
  लाख लाख शुभेच्छा..
  जय महाराष्ट्र
  सुनिल रायबा जाधव
  बुलढाणा.

  ReplyDelete
 4. बाळासाहेबांची शिवसेना अंगार होती
  आत्ता फक्त भंगार आहे..
  अरे आवा....ज कुणाचा...
  शिवसेनेचा..
  प्रताप ढोके-पाटील, जळगाव.

  ReplyDelete
 5. शिवसेनेचा भगवा पुन्हा मुंबई महापालिकेवर मानाने
  डोलला पाहिजे..पण काय करावं बाळासाहेबांची सेना
  सांभाळायला कणखर नेताच नाही ही खंत आहे.
  साहेबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..
  जय महाराष्ट्र..
  तुकाराम लोकरे, सटाणा, नाशिक..

  ReplyDelete
 6. बेश्श्टटटटटटटटटट्...

  ReplyDelete