Sunday, January 15, 2012

ऑस्ट्रेलियात भारताचे पानिपतभारत पर्थमधली तिसरी कसोटीही हरला..आणि कांगारुंनी मालिका जिंकत आपणच श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करुन दाखवलं..क्रिकेटमध्ये हार जित होतच असते..पण ज्या पद्धतीनं टीम इंडिया हरली त्याला क्रिकेट म्हणायचे का असा प्रश्न लहान मुलंही विचारतील..सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि यशस्वी कर्णधार म्हणून ज्याकडे बघितलं जातं तो महेंद्रसिंग धोनी.. हे सर्वच महान फलंदाज आहेत. असं असतानाही पहिल्या तिनही कसोटीत या महारथींची कामगिरी काहीच झाली नाही. यापैकी एकाही महारथीची बॅट ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर तळपली नाही.. द्रविड आणि लक्ष्मण तर कसोटीतले भारताचे हुकमी एक्के पण त्यांचीही बॅट तळपली नाही याला काय म्हणावे..तेंडूलकरची कामगिरीही शून्यच झाली. ज्याकडे अख्खं जग क्रिकेटचा महाराजा म्हणून पाहतं, त्याच्या महाशतकाची चातकासारखी वाट पहातं तो सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर अपय़शी ठरला..या महत्वाच्या फलंदाजांनीच जर नांगी टाकली तर नवखे फलंदाज तरी काय दिवा लावणार.. पण नवख्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीनं थोडीफार कामगिरी केली. पण ती पराभव वाचवण्यासाठी कामी येण्यासारखी नव्हती..तसच गोलंदाजीत यादवनही चांगली कामगिरी केली...पण कसोटीत पराभव झाला तो फलंदाजांमुळे..

तीन कसोटीपैंकी दोन कसोटीत भारत डावानं मार खातो याला काय म्हणायचं. ज्या संघाच्या यादीवर एक नजर टाकली तर मोठ मोठं विक्रम असलेले हे महारथी. विश्वकप जिंकणारा संघ अशी ख्याती असलेले महान खेळाडू अचानक ढेपाळले कसे..तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं १८० धावांची खेळी केली..तर भारतानं पहिल्या डावात १६१ आणि दुसऱ्या डावात १७१ धावा काढल्या... म्हणजे एकट्या वार्नरच्या धावाही अख्खा भारतीय संघ काढू शकला नाही हे कशाचं द्योतकं आहे.. ज्या खेळपट्टीवर कांगारुंचे खेळाडू तीनशे धावा काढतात, शतकामागून शतकं ठोकतात त्याच खेळपट्टीवर भारताचे हे महारथी अपयशी ठरतात यावर कोणचाही विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे, हे पचवण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही..

कागदावर सर्वात बलवान असलेला आपला संघ असा एकदम नांगी का टाकतो याची उत्तरं शोधण्याची आवश्यकताय..जो पराभव झाला त्याला कर्णधार म्हणून आपण दोषी आहोत असं महेंद्रसिंग धोनी आता म्हणत आहे..अर्थात यश किंवा अपयश हे काही एकट्या कर्णधाराची जबाबदारी नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे त्याच्या यशाची काय आणि अपयशाची काय जबाबदारी ही सर्वांचीच असते. पण मागच्या काही दिवसांपासून ज्या बातम्या येत आहेत. त्यातून धोनीच्या कर्णधारपदावरुन संघात वाद तर नाही ना अशी शंका येत आहे. कारण धोनीच्या कर्णधारपदावर वरिष्ठ खेळाडू नाराज असल्याच्या बातम्या मागच्याच आठवड्यात झळकल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघात ऑल इज वेल आहे असं म्हणता येत नाही..भारताच्या सध्याच्या सुमार कामगिरीवरही सर्व स्तरातून टीका होऊ लागलीय. वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी पाहून आत्ता बस्स झालं त्यांना घरी बसवलं पाहिजे असं सुनिल गावस्कर यांनीही म्हटलय. त्यामुळे संघात सुधारणा होणं गरजेचं आहे..नुसतं कागदावर मजबूत संघ असून चालणार नाही तर त्याची कामगिरीही तेवढीच मजबूत असायला हवी..त्यामुळे ही मरगळ दूर करुन टीम इंडियानं पुन्हा एकदा यशाचा झेंडा फडकवला पाहिजे तरच आपण विश्वविजेते आहोत असं मिरवण्यात काही अर्थ आहे...

1 comment:

  1. INDIAN TEAM IS FULL OF DIRTY FELLOWS..PLAYS ONLY IN IPL AND ADVERTISE..THROW THEM .JP. BANGOLARE

    ReplyDelete