Monday, December 19, 2011

४० कोटीचा कारकुन

एक किलो सोनं, चार किलो चांदी, २५ एकरावर भव्य फार्म हाऊस, एक हॉटेल, चार लक्झरी कार, चार मोटारसायकल्स, चार प्लॉट्स, विमा पॉलिसिमध्ये मोठी गुंतवणूक आणि विविध बँकांमध्ये विविध खात्यांवर जमा केलेली रक्कम..या सर्वांची एकत्रित बेरीज जवळपास ४० कोटी रुपयांच्या घरात जाते...आता हा हिशोब कशाचा म्हटलं तर तुम्हाला सांगतो...ही संपत्ती आहे एका क्लार्कची...हो क्लार्कची...म्हणजे एका कारकूनाची...मध्य प्रदेशातल्या भोपाळमधल्या आरटीओ ऑफीसमध्ये हा कारकून काम करत होता..१९९६ साली तो कामाला लागला..आत्ता त्याचा पगार महिना फक्त १६ हजार रुपये आहे.. म्हणजे तो ज्यादिवशी नोकरीत रुजु झाला त्यावेळी त्याचा पगार जेमतेम पाच सहा हजार रुपयेच असावा.. सहाव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला ,त्यामुळे तो १६ हजार रुपये आहे.. पण २५ वर्षात एक कारकून एवढी माया गोळा करु शकतो तर त्याच्यावरचा अधिकारी किती माया गोळा करु शकतो याची गोळीबेरीज न केलेलीच बरी....


आपल्याला हे माहित आहे की चिरीमिरी दिल्याशिवाय सात बाराचा उताराही तलाठी देत नाही..तर मग नगरपालिका काय किंवा तहसिल कार्यालय काय.. सर्वच क्षेत्रात पैसे खाण्याचं या लोकांना एक व्यसनच लागलय..


होय पैसे खाण्याचं हेसुद्धा एक व्यसनच आहे.. तुम्हा आम्हाला अनेकदा याचा अनुभव आलाय..पण सरकारी काम पैसे दिल्याशिवाय होतच नाही. त्यामुळं वेळ आणि हेलफाटे घालण्यापेक्षा चिरीमिरी देऊन आपण काम करुन घेतो..त्याच चिरिमिरीतून कारकूनसुद्धा कुबेर बनतो याचं हे उदाहरण... एका कारकूनाची ४० कोटींची संपत्ती ही खरं तर थक्क करायला लावणारीच आहे.. भोपाळमध्ये सापडलेला हा कारकून काय एकटाच आहे असं नाही..याच भोपाळमधून मागच्या आठवड्यात एका कारकूनाच्या घरातून पाच कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली...ही दोन उदाहरणं मी फक्त वानगीदाखल देतोय...यावरुन आपल्या लक्षात येईलं कि सरकारी कार्यालयात भ्रष्टाचाराचं थैमान किती माजलय ते...त्याची ही बोलकी उदाहरणं आहेत..सामान्य लोकांचा ज्या सरकारी कार्यालयात थेट संपर्क येतो त्या प्रत्येक कार्यालयात असे महाभाग असतात...ते कार्यालयात येतात ते शिकार करण्यासाठीच..त्यांना सरकार जो पगार देतो तो काम करण्यासाठी नाही तर टाईमपास करण्यासाठीच....जोपर्यंत तुम्ही पैशाचं बोलत नाही तोपर्यंत असे महाभाग तुमच्या कामाकडं डुंकुनही पहात नाहीत...वर सरकारी नियम सांगतील..साहेब नाहीत..उद्या या..अमुक अमुक कादगपत्रांची कमतरता आहे..अशी अनेक कारणं सांगतिल..आणि तेच जर तुम्ही हात ओला की लगेच पुढच्या तासात तुमचं काम फत्ते....याची माहिती त्यांच्या वरिष्ठांना नसते असं नाही.. त्याची त्यांनाही पुरेपुर कल्पना असते.. कारण यातलाच प्रत्येकाचा शेअर म्हणजे हिस्सा ठरलेला असतो..त्यातही कधी कोणी सापडलाच तर निलंबित करण्यापलिकडे त्याचं कार्यालय जास्त काही करु शकत नाही आणि बाकीचा मॅटर काळाच्या ओघात सेटल केला जातोच... पुन्हा समाजात उजळ माथ्यानं फिरण्यास हे महाभाग तयार... या दुष्टचक्रात भरडला जातेय तो फक्त सामान्य माणूस...त्यामुळे कितीही कायदे करा कितीही लोकपाल आणा जोपर्यंत या पैसे खाणाऱ्यांना कठोर शिक्षेची भिती बसत नाही तोपर्यंत समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची ही कीड संपणार नाही...

1 comment:

  1. corrupt system who made clerk a monster ..money eater. hang him..

    ReplyDelete