Sunday, December 25, 2011

आरक्षणाचे गाजर
मुस्लीम समाजाला साडेचार टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केलीय. हे आरक्षण सध्या असलेल्या ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाच्या कोट्यातूनच देण्यात येणाराय. ही घोषणा करण्यामागं मात्र मुस्लीम समाजाचा उद्धार करणं वगैरे नसून नेहमीप्रमाणं त्याचं कारण राजकीयच आहे.. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.. भारतातल्या या सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या राज्यात सत्ता आणण्यासाठी सर्व पक्षांनी ताकद पणाला लावलीय. पण काँग्रेसची स्थिती सत्ता आणण्यासारखी नसली तरी कमीत कमी तिथली परिस्थीती सुधारण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. त्याचाच एक भाग म्हणजे हे मुस्लीम आरक्षण...
निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीमांनाच आरक्षण का ? तर ज्या उत्तर प्रदेशात ह्या निवडणुका होत आहेत. त्या राज्याची लोकसंख्या आहे २० कोटी आहे आणि त्यात तब्बल १८ टक्के लोकसंख्या ही मुस्लीम आहे.. त्यामुळेच या १८ टक्के मतावर डोळा ठेऊन केंद्र सरकारनं हे आरक्षण जाहीर केलय. मुळात २७ टक्के ओबीसींच्या कोट्यात मुस्लीमांना आरक्षण देऊन सरकारनं ओबीसींची पंचायत करुन ठेवलीय. पण तो झाला जनतेचा प्रश्न.. राजकर्त्यांना आपली पोळी भाजून घेण्यासाठी अशा घोषणा करणं हे काही नवीन नाही..
या आरक्षणामागं राजकीय कारण आहे असं मी म्हणाले त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला सांगतो..उत्तर प्रदेशत विधानसभेच्या ४०३ जागा आहेत..मायावती यांचा बसप, मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष हे दोन मोठे पक्ष युपीत आहेत. त्यांची सत्ता मागच्या दहा पंधरा वर्षात येत असते.. त्यानंतर नंबर लागतो तो भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांचा...काँग्रेसचा विचार केला तर उत्तर भारतातून काँग्रेसची पुरती वाट लागलीय. त्यात सुधारणा करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्यातच राहुल गांधींचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठीही काँग्रेसचा आटापीटा सुरुय. पुढचा पंतप्रधान म्हणून जर राहुलबाबांचा राज्याभिषेक करायचा असेल तर उत्तरेत काँग्रेसला मोठी मजल मारली पाहिजे.. त्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसचा प्रयत्न सुरुय.. उत्तर प्रदेशात मायावतींनी मागच्या निवडणुकीत एकहाती सत्ता आणली होती.. त्यानंतर मुलायमसिंग यादव यांच्या पक्षाचा नंबर लागला.. जर उत्तर प्रदेशातली पक्षाची ताकद वाढली तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेला त्याचा फायदा होऊ शकतो त्यासाठीच हा सर्व खटाटोप आहे.. दलित, मागासवर्ग आणि मुस्लीमांची मतं मायावती आणि मुलायमसिंग यादव यांच्या पक्षात विभागली गेलीत. त्या व्होट बँकेला फोडण्यासाठी काँग्रेसनं हा मुस्लीम आरक्षणाचा पत्ता टाकलाय.
तसं पाहिलं तर निवडणुका जिंकण्यासाठी असे पत्ते टाकावेच लागतात..महाराष्ट्रात नाही का आपण मोफत विजेचं गाजर दाखवलं होतं..महाराष्ट्रातही अधून मधून मराठा समाजाच्या आरक्षाचा आवाज उठत असतोच की...सध्या तो शांत आहे पण उद्याच्या निवडणुकीच्या तोंडावर तो पुन्हा उठणार नाही असं म्हणता येणार नाही..शेवटी काय आपले राजकर्ते हे आपल्याकडे फक्त एक मतदार म्हणूनच बघतात..त्यातच ज्या समाजाची लोकसंख्या ज्या भागात जास्त आहे त्यांच्यासाठी अशा घोषणा, आश्वासनं, योजना राबवल्या जातात. निवडणुका जिंकण्याचा हा एक शॉर्ट कट आहे हे आपल्या राज्यकर्त्यांना आणि राजकीय पक्षांना चांगलच माहित आहे. त्यामुळे एकट्या काँग्रेसला दोष देऊन काही उपयोग नाही..कारण निवडणुका जिंकायच्या म्हणजे सर्वकाही करावं लागतं..त्यात आरक्षण हा एक पत्ता आहे...

2 comments:

  1. ज्वलंत विषय आहे..राजकारण हेच गढूळ झाले आहे..

    ReplyDelete