Saturday, September 1, 2012

राज ठाकरेंचा वाद बिहारी

" राज ठाकरेंनी पुन्हा एकदा बिहारींचा मुद्दा उचलून धरलाय. बिहारच्या मुख्य सचिवांच्या एका पत्रावरुन हा वाद सुरु झालाय.. त्यातून सगळे बिहारी नेते उंच आवाजात राज ठाकरेंना देशद्रोही ठरवा असं म्हणत आहेत. त्यात तेल ओतन्याचं काम उत्तर भारतातील मिडीयानं केलय..

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण हलवून टाकलय. मुद्दा होता बिहारींचा..बिहारच्या मुख्य सचिवांच्या पत्राचा मुद्दा करत राज ठाकरेंनी बिहारींना राज्यातून हाकलून लावू असा इशारा दिला..राज ठाकरेंनी बिहारविषयी काही बोलताच बिहारी नेत्यांची तळपायाची आग मस्तकात गेली नसती तरच नवल...शिवानंद तिवारी, लालू प्रसाद यादव, शरद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, यांनी तर राज ठाकरेंवर तोफ डागलीच, पण काँग्रेसचे वाचाळ सरचिटणीस दिग्वीजयसिंगही त्यात पडले..ठाकरेंचं मुळ बिहारमध्ये होतं. ते मध्यप्रदेश मार्गे मुंबईत गेले असा जावई शोध त्यांनी लावला..त्यातच त्यांनी राज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलय असं म्हटलं. तर केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करावा अशी मागणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदींनी केलीय..दिल्लीतल्या बिहारच्या झाडून सगळ्या नेत्यांनी राज ठाकरेंवर तोंडसुख घेतलं. राज्य घटनेचा हवाला देऊन कोणीही कुठही जाऊ येवू शकतो याची आठवण करुन दिली..पण हे सगळेच नेते राज ठाकरेंवर तुडुन पडत असताना त्यांच्या एवढंही लक्षात आलं नाही की याचा थेट फायदा राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेलाच होणाराय. राज ठाकरेंनी मुंबईतून एकच इशारा दिला आणि या इशा-यानं पाटणा मार्गे दिल्ली हलवली...

दिल्ली आणि पाटण्यात हे राजकारण तापलं असताना मुंबईतही राजकीय नेते कामाला लागलेच..म्हणजे राज ठाकरेंनी एकाच इशाऱ्यात अनेकांना कामाला लावलं..राज ठाकरे काही बोलले आणि त्यावर अबु आझमी आणि संजय निरुपम बोलणार नाहीत असं कसं होईलं..त्यांनीही मग कॅमेऱ्यासमोर येऊन आव्हान प्रतिआव्हानाची भाषा केली..फरक एवढाच होता की यावेळी संजय निरुपम यांची भाषा बऱ्यापैकी सौम्य होती..कारण त्यांनी यापूर्वी राज ठाकरेंवर आगपाखड केली होती त्यावेळी त्यांना पक्षश्रेष्ठीकडून तंबी देण्यात आली होती. ते लक्षात ठेऊनच निरुपम यांनी प्रतिक्रीया दिली..पण अबु आझमी मात्र आपल्या स्टाईलमध्ये मैदानात उतरलेच...जाता जाता आर. आर. पाटीलही राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अभ्यास करुन योग्य ती कारवाई करु असं सांगून गेले...यात उत्तर भारतातील प्रसारमाध्यमांनीही तेल ओतन्याचं काम केलय हेही नाकारुन चालणार नाही..राज ठाकरे मराठीचा मुद्दा जेव्हा उचलतात किंवा बिहारीचा मुद्दा उचलतात तेव्हा उत्तर भारतातील प्रसार माध्यमं राज ठाकरेंना व्हिलन ठरवतात..

राज ठाकरेंच्या या सर्व प्रकरणात काँग्रेस त्यांना छुपी साथ देत आहे असं म्हटलं जातय..कारण वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यावेळी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंना मोकळं रान दिलं होतं असं म्हटलं जातय. मुंबईत त्यावेळी डाव्यांचा जोर होता. त्यांना मोडीत काढण्यासाठी नाईकांनी बाळासाहेबांना मोकळीक दिली होती असं म्हटलं जातय..तोच पत्ता काँग्रेस आज राज ठाकरेंच्या रुपानं वापरत असल्याचं बोललं जातय. शिवसेना जशी काँग्रेसच्या शिडीवरुन वाढत गेली. तसच मनसेलाही काँग्रेसकडून मिळणाऱ्या या मोकळीकचा फायदा होणारच आहे..तर दुसरीकडं २०१४ च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीची ही तयारी सुरु झालीय असंही म्हणायला हरकत नाही..तर अबु आझमी आणि राज ठाकरे यांनाही त्याचं राजकीय मायलेज मिळणारच आहे..राज ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना देशद्रोही ठरवा असा आवाज या बिहारी नेत्यांनी उठवलाय तसच त्यांच्यावर भाषण बंदी करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

राज ठाकरे यांना टायमिंगही चांगलंच जमतय..त्यांनी एखादा मुद्दा उचलून धरावा आणि त्याचा त्यांना फायदा झाला नाही असं घडलेलं नाही..तसच एखादा विषय किती ताणावा हेही त्यांना चांगलच कळतं. म्हणूनच तर त्यांचा पक्ष राज्यात जोरात वाढतोय..मुंबई, नवी मंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात मनसेचा जोर धडाक्यात वाढलाय. याच पट्ट्यात विधानसभेच्या १०० च्या वर जागा आहेत. मनसेच्या या राजकीय वाढीची सर्वच पक्षांनी दखल घेतलीय. शिवसेना भाजप युतीत आठवले जाऊन बसले असले तरी त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही..म्हणूनच राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्याचा विचार सुरु झालाय. भाजपाकडून तरी त्यावर हालचाली सुरु असल्याचं दिसतय..तर दुसरीकडं शरद पवार यांनीही राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची घौडदौड वेगानं होत असल्याचं मान्य केलय..२०१४ च्या निवडणुकीत जर मनसेचा हा विजयपथ असाच कायम राहिला तर ते किंगमेकर होणार हे नक्की.. त्यासाठीच तर हा सगळा वाद सुरुय असंच आतातरी म्हणावं लागेल..
 

No comments:

Post a Comment