Saturday, August 25, 2012

राज ठाकरेंचा झंझावात


महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मंगळवारी 21 तारखेला जो मोर्चा काढला त्यानंतर राज्यातील राजकीय चित्र ढवळून निघालाय. 11 ऑक्टोबरला आझाद मैदानावर ज्या काही मुस्लीम संघटनांनी नंगानाच केला. पोलिसांवर हल्ला केला, महिला पोलिसांचा विनयभंग केला, गाड्या जाळल्या, प्रसार माध्यमांच्या ओबी व्हॅन जाळल्या. एवढ्यावरच्या हे आंदोलक थांबले नाहीत तर तिथं असणाऱ्या अमर जवान ज्योतीला लाथेनं उडवून लावलं.. हा सगळा धुडगुस घातला तेव्हा मुंबई पोलीस तो उघड्या डोळ्यांनी पहात होते. खरं तर हा मोर्चा ज्या रझा अकादमीनं आयोजित केला होता त्यांची पार्श्वभूमी सरकारला माहित होती. हिंसक कारवाया करण्यात त्यांचा सहभाग आहे हे पोलिसांना माहित होतं. त्यांच्या मोर्चाला मुळातच परवानगी द्यावयास नको होती, पण ती दिली. त्यावरही कहर म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा अहवाल होता की आंदोलक मंडळी हिंसक कारवाया करणार आहे, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. त्यावरुन राज्यात असंतोष माजला. लोकांच्या मनात चिड निर्माण झाली. कारण एवढा सगळा नंगानाच घातल्यानंतरही कारवाईच्या बाबतीत मात्र सरकार शांत राहिलं. बघु करु अशी भूमिका घेतली गेली, त्यावरुन लोकांच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला. राजकीय पक्षांनीही कारवाईची मागणी केली..पण सरकार आणि गृहमंत्री आर आर पाटील मात्र कारवाईच्या बाबतीत थंडच राहिले..या सर्व प्रकारावर आर आर पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांची भूमिका संशयास्पद राहिलीय..

रझा अकादमीनं घातलेला हिंसक गोंधळ, त्यात पोलिसांवर हल्ला, अमर जवान ज्योतीचा अपमान हे अवढं सगळं होऊनही आर आर पाटील कारवाई करण्याएवजी विरोधकांनाच दोष देत राहिले.. राज ठाकरे यांनी हाच मुद्दा घेऊन आर आर पाटील आणि पटनायक यांच्यावर थेट हल्लाबोल केला..राजीनामा द्या ह्या मागणीसाठी त्यांनी 21 तारखेला मोर्चा काढला...ह्या मोर्चाला मात्र पोलिसांनी कायद्याचा किस पाडत परवानगी नाकारली. पुन्हा अल्पसंख्याक समाजाची बाजू घेतल्याचं स्पष्ट झालं.फक्त आझाद मैदानावर सभा घेण्यास परवानगी दिली. त्यासाठी जवळपास 15 हजार पोलिस बंदोबस्ताला ठेवले..म्हणजे 11 तारखेला जी खबरदारी घ्यावयास हवी होती ती घेतली नाही मात्र मनसेच्या मोर्चात अडथळे आणण्यासाठी एकही संधी सोडली नाही. यावरुनही लोकांच्या रागाचा पारा चढला होता. पोलीसांच्या परवानगीची वाट न पाहता राज ठाकरेंनी मोर्चा काढला. त्यांनी सरकारला शिंगावरच घेतलं..तो मोर्चा आणि सभेची गर्दी पाहून राजकीय पक्ष अचंबितच झाले. एक लाख लोकांचा मोर्चा आणि सभा घेऊन राज ठाकरेंनी मोर्चा कसा काढावा हेच दाखवून दिलं. या सभेतून आणि मोर्चातून राज ठाकरेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. आझाद मैदानावरच्या सभेत अवघ्या 15 मिनीटाच्या भाषणात त्यांनी आर आर पाटील, अरुप पटनायक ह्यांच्यावर हल्ला तर चढवलाच पण त्यांचं लाडकं पेटंट अबु आझमीलाही त्यांनी शिव्या घातल्या. रामदास आठवलेंसह सर्वच दलित नेत्यांनाही त्यांनी झोडपून काढलं..तर दुसरीकडं पोलिसांची बाजू पूर्णपणे उचलून धरली, प्रसारमाध्यमांची बाजू घेतली, सर्व विरोधी पक्षांवर कडी केली आणि सरकारला जो विरोध केला पाहिजे तो कसा करावा हे दाखवून दिलं..मुस्लीम समाजकंटांवर हल्ला चढवत आपला मोर्चाही हळूहळ हिंदुत्ववादी नेता अशी करुन दिली..आपला धर्म हा महाराष्ट्र धर्म म्हणत त्यांनी जरी हिंदुत्वाची वाट धरल्याचं सरळ सरळ मान्य नाही केलं तरीही त्यांनी ज्या पद्धतीनं हा सगळा पट मांडला तो हिंदुत्ववाद्यांना तर नक्कीच भावलाय..

राज ठाकरेंनी ह्या मोर्चातून अरुप पटनायक आणि आर आर पाटील यांनाच टार्गेट केलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अरुप पटनायक यांची बदली करण्यात आली..त्यांना महासंचालकपदी बढती दिली असली तरी मुंबईचं आयुक्तपद गेलंच..आता लक्ष्य फक्त आर आर पाटील..कदाचित येत्या काही दिवसात हे प्रकरण थोडं शांत झाल्यानंतर आर आर पाटलांचाही राजीनामा किंवा खातेबदल झाल्यास नवल वाटायला नको..एक मात्र खरं राज ठाकरेंनी आपली ताकद दाखवून दिली..मीच सरकारला अंगावर घेऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. लाखाचा मोर्चा काढून इतर विरोधी पक्षांना म्हणजे शिवसेना, भाजपलाही त्यांनी त्यांची ताकद किती आहे हे दाखवून दिलं.. 2014 च्या निवडणुकींची ही सुरुवात आहे. आपला रस्ता काय आहे हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलय. पोलीसांमध्ये सहानुभूती निर्माण करुन, प्रसार माध्यमांनाही त्यांनी आपण तुमचे तारणहार आहोत हे जसं त्यांनी दाखवून दिलं. तसच अबु आझामी, दलित नेत्यांना टार्गेट करत अल्पसंख्याक समाजाला आपल्याकडे या अन्यथा तुमची गरज नाही हेही दाखवून दिलं. मुस्लीम आणि अबु आझमींना दणका देत हिंदुत्ववाद्यांनाही त्यांनी चुचकारलंय अर्थात त्यामुळे संघ आणि हिंदुत्ववाद्यांच्या मनात राज ठाकरेंनी घर केलंय. ह्या सर्वांचा परिणाम आगामी निवडणुकीत मनसेला होणार हे नक्की..फक्त हा राजकीय सारीपाट राज ठाकरे पुढच्या काही महिन्यात कसा रंगवतात त्यावर त्यांची राजकीय भिस्त असणाराय. पण त्यांनी आता टाकलेले फासे जर असेच पडले तर मनसे आणि राज ठाकरेंना मोठा राजकीय फायदा होणार हे मात्र आत्ताच पक्कं झालय.

No comments:

Post a Comment