Friday, September 21, 2012

टीम अण्णा अखेर फुटली..


 " जनलोकपालच्या मुद्यावर एकत्र आलेले अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्यात फुट पडलीय. यापुढे केजरीवाल आणि अण्णांचे रस्ते वेगळे असणार आहेत. ही टीम का फुटली, त्याला कारण काय, कोण जबाबदार आहे टीम फुटण्याला, याचा अन्वयार्थ लावणारा हा लेख...



 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर त्यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यापासून फारकत घेतली. मागच्या दीड दोन वर्षापासून सुरु झालेल्या टीम अण्णांचे दोन तुकडे पडलेत. एका तुकड्यात केजरीवाल आणि प्रशांत भूषण आहेत तर दुसरीकडे अण्णा, किरण बेदी वगैरे मंडळी आहेत. लोकपलाच्या मुदद्यावर एकत्र आलेल्या या टीमला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. पण राजकीय पर्याय देण्याच्या मुद्द्यावरुन या टीममध्ये फूट पडली. केजरीवाल यांना राजकीय पक्ष काढून ताकद दाखवण्याची खुमखुमी आली होती, त्याला अण्णांचा अर्थातच विरोध होता. पण जनतेचा मिळत असलेला पाठिंबा पाहून केजरीवाल यांनी त्यांचं घोडं दामटवण्याचा प्रयत्न केला. अण्णांचा वापर करुन आपला फायदा करुन घेण्याचा केजरीवाल यांचा उद्देश होता. पण अण्णांनी त्याला छेद देत आपल्या वाटा वेगळ्या आहेत हे दाखवून दिलं...

अण्णा हजारे यांनी स्वतःच दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर टीम अण्णा फुटल्याचं जाहीर केलं. तसं करताना त्यांनी केजरीवाल आणि कंपनीला निवडणुकीत आपला फोटो किंवा नाव न वापरण्याचा इशाराही दिला. पण हा निर्णय जाहीर होण्याच्या अगोदरच टीम फुटणार हे जाणवत होतं. राजकीय पर्यायाला किरण बेदी, संतोष हेगडे यांचाही विरोध होताच पण उपोषण सोडताना अण्णांना तसा पर्याय देण्याचं जाहीर करावं लागलं होतं. त्याचवेळी अण्णांचा त्याला विरोध आहे अशीही माहिती मिळाली होती. शेवटी अण्णांनी केजरीवाल यांना त्यांची जागा दाखवली. त्यामुळे केजरीवाल यांच्या आशेवर पाणी पडलंय
 

दीड वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी जनलोकपालचा झेंडा हाती घेऊन दिल्ली हादरवून सोडली होती. दिल्लीतल्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद आणि प्रसिद्धी माध्यमांनी दिलेली अमाप प्रसिद्धी पाहून सरकारलाही सुरुवातीला चार पावलं मागं हटावं लागलं होतं. पण उपोषणाचं हत्यार मागच्या दीड वर्षात वारंवार वापरून अण्णांनी त्याची धार बोधट केली. शिवाय उठसुठ राजकीय नेत्यांना शिव्या देण्याचा सपाटाही त्यांच्या सहाकाऱ्यांनी लावला. कोणत्याही मुद्द्यावर हेकेखोर आणि हटवादी भूमिका घेण्यामुळेही लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होत गेला. दिल्लीत मिळालेला सुरुवातीचा प्रतिसादही नंतर मिळत नव्हता. त्यामुळे गर्दी नाही तर दर्दी लोकांची गरज असल्याचा आवही त्यांना आणावा लागला. तर दुसरीकडं सरकारनंही त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अण्णांना त्यांच्या भूमिकेचा फेरविचार करावा लागला..केजरीवाल यांच्या बेछुट आरोप करण्याच्या वृत्तीमुळेही लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यातच टीममध्येच अनेकदा मतभेद असल्याचं समोर येत होते. शेवटी राजकीय पर्यायाच्या मुद्दयावर ही टीम फुटली..

अण्णा हजारेंचा एकूण प्रवास पाहता त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात आजपर्यंत अनेक नामांकित लोकांनी त्यांनी साथ दिली पण ते शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. बाबा आढाव, गो. रा. खैरनार, मेधा पाटकर, अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांनी अण्णांना भ्रष्टाचार विरोधी लढ्यात साथ दिली पण काही काळानंतर त्यांनीही अण्णापासून दूर राहण पसंत केलं. याला अण्णांचा हट्टी स्वभावही कारणीभूत असल्याचं बाबा आढाव सारख्या जाणत्या व्यक्तीनं म्हटलय. तर अण्णा हे फक्त ढोंगी आहेत असं खैरनार यांनी म्हटलय. तर अण्णांच्या कोणत्याच भूमिकेवर ठाम न राहण्याच्या सवयीमुळेही अनेक सहका-यांनी त्यांची साथ सोडली. अण्णांच्या सहकाऱ्यांवरही अनेक प्रकारचे आरोप झालेले आहेत. पण त्याबाबत अण्णा फारसं बोललेलं दिसत नाहीत. तर दुसरीकडं अण्णा हे भाजप आणि संघ परिवाराचे समर्थक आहेत, त्यांच्या हातचे बाहुले आहेत असा आरोपही होत आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे असं म्हणता येईलं. कारण काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आगपाखड करताना भाजपच्या भ्रष्टाचारावर गप्प बसण्यातूनही या आरोपांना पुष्टीचं मिळते. तर दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनाही अण्णांच्या आंदोलनात संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते असं म्हटलय. त्यामुळे कुठेतरी अण्णा आणि संघ यांच्यात जवळीक असल्याची शंका येतेच.

अण्णांनी आता केजरीवाल यांना दूर करुन रामदेव बाबा यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. त्यामुळे अण्णांचे यापुढेचे साथीदार रामदेव बाबा असतील. त्यांच्याबरोबर अण्णा किती दिवस साथ देणार हे लवकरच कळेल..

No comments:

Post a Comment