Thursday, April 5, 2012

शूभम शिर्के अपहरण आणि हत्येनंतर....


पिंपरी चिंचवडमधल्या शूभम शिर्के या शाळकरी मुलाचं अपहरण करुन त्याचा खून करण्यात आल्याची बातमी दोन दिवसापूर्वी आली. त्यातच हा सगळा प्रकार त्याच्या वर्गातल्या सहकारी मित्रांनी केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. एका शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याचं समजल्यावर खूपच वाईट वाटलं. ज्याचं अवघं आयुष्य शिल्लक आहे. अजून खेळण्याचं त्याचं वय, उमलण्याच्या अगोदरच फुल चिरडून टाकावं अशी ही घटना तर दुसरीकडं हे कृत्य करणारेही त्याच्याच वयाचे त्याच्याच वर्गातली मुलं असल्याचं समजल्यावर तर डोक्यात ना ना विचार आले. शुभमचं अपहरण हे त्यांनी ५० हजार रुपयांच्या खंडणीसाठी केलं. त्यातले १५ हजार रुपये त्याच्या वडीलांनी त्या मुलांना दिलं. पण ते देताना त्यांनी ज्या मोटारसायकलचा वापर केला त्याची संपूर्ण माहिती शूभमच्या वडलांनी पोलिसांना सांगितली. त्यामुळे हे गुन्हेगार लगेच हाताला लागले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. हा सगळा प्रकार उजेडात आला तेंव्हा आणखी एक गोष्ट समजली ती म्हणजे त्या मुलांनी हा सगळा प्रकार टीव्हीवरची सीआयडी मालिका पाहून केल्याचं त्या मुलांनी पोलिसांना सांगितलं.

हा सगळा प्रकार डोकं सुन्न करणारा आहे. दहावीच्या वर्गातली ही मुलं ५० हजार रुपयांसाठी आपल्याच एका मित्राचं अपहरण करतात काय आणि त्याचा खून करतात काय हे सगळच विचार करण्याच्या पलीकडे गेलय ! ज्या मुलांनी हा सगळा प्रताप केलाय़ त्यांचं वयही काही एवढा मोठा गुन्हा करण्याचं नक्कीच नाही. पण ही मुलं या थराला का गेली असावीत याचा गांभिर्यानं विचार करावा लागणाराय. त्या मुलांना अपहरणासारखी कल्पना सुचावी त्यातून खून करण्यापर्यंत त्यांची मजल जावी हे सगळंच चित्रपटातल्या कथेसारखं आहे. आता शुभम तर या जगात नाही, त्याच्या आई वडीलांवर दुखःचा डोंगर कोसळलाय. तर दुसरीकडं ज्या मुलांनी हा प्रकार केलाय त्यांच्या आई वडीलांची स्थितीही अशीच आहे.  आपली मुलं अपहरण आणि खूनाच्या गुन्ह्यात अडकलेली आहेत हे कोणत्याही पालकांना  शरमेनं मान खाली घालायला लावणाराच आहे. त्या पालकांना समाजात जगताना गुन्हा न करताही अपराध्यासारखं वाटत राहणाराय. कारण त्यांनाही एकप्रकारे न केलेल्या गुन्ह्याची ही शिक्षाच नाही काय..

ज्या मुलांनी हे अघोरी प्रताप केलाय त्यांचं वय पाहता त्यांना कायद्याच्या चौकटीत कदाचित मोठी शिक्षा होणार नाही. कारण अल्पवयीन असल्यामुळे कायद्याच्या पळवाटातून कदाचित त्यांची सुटका होईलही ! पण त्यातून हा प्रश्न सुटणारा नाही..! या प्रकरणातून अनेक प्रश्न निर्माण झालेत..??? ही मुलं खेळण्या-बागडण्याच्या या वयात एवढ्या मोठ्या गुन्ह्याकडे वळलीच कशी अशा प्रश्न उरतोच. त्यामुळे एकट्या शुभम किंवा हा गुन्हा करणा-या त्या दोन मुलांपुरता हा विषय न राहता सगळ्या पालकांना विचार करायला लावणाराय. तर शूभमच्या विषयालाच धरुन आणखी एक प्रकार मला आठवला तो म्हणजे दोन महिन्यापूर्वीच चेन्नईत एका नववीच्या मुलानं त्याच्या वर्ग शिक्षिकेचा वर्गातच चाकूनं भोसकून खून केला.त्या शिक्षिकेचा गुन्हा एवढाच होता की तो मुलगा अभ्यासात ढ होता. त्यावरुन त्या नेहमी त्याला रागावत आणि घटनेच्या दोन दिवस अगोदर त्यांनी त्या मुलाची त्याच्या पालकांकडे तक्रारही केली होती. त्याचाच राग मनात धरुन त्या मुलानं आपल्याच वर्गशिक्षिकेचा वर्गातच खून केला..!
पिंपरी चिंचवड मधली घटना आणि चेन्नईतली घटना यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे ह्या दोन्ही प्रकरणात खून करणारी मुलं ही शाळकरी आहेत. म्हणूनच डोक्यात पुन्हा पुन्हा प्रश्न उभा राहतोय तो हा की, ही लहान, सुंदर मुलं आयुष्याचा पाया बांधतानाच खूनासारख्या अत्यंत घृणास्पद प्रकाराकडं झुकतातच कशी. ? एवढा मोठा आणि एखाद्याचं जीवनच संपवण्याचा विचार त्यांच्या डोक्यात का घोळत असावा ? ही गुन्हेगारी प्रवृतीची बिजं त्यांच्या मनात या वयात कशी काय रुजली..? त्यांना त्याची भीती का वाटली नसावी ? आणि खून केल्यानंतर होणारी शिक्षा हे आपलं आयुष्य संपवणारी असते ह्यापैकी त्यांना कशाचीच भिती कशी काय वाटली नसावी..? असे अनेक प्रश्न मनात येतात. तर दुसरीकडं ही मुलं या थराला गेली त्याचा दोष कुणाचा असाही प्रश्न निर्माण होतोच..?

लहान मुलं घडत असताना त्यांच्यावर आजूबाजूच्या परिसराचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे या वयात त्यांच्यावर योग्य ते संस्कारच व्हायला हवेत. पण समाज बदलत चाललाय, शहरीकरण वाढलय. नोकरीच्या निमित्तानं आई वडील दोघेही घराबाहेर पडतात. तर दुसरीकडं विभक्त कुटुंब पद्धतीमुळं घरं लहान झालीत. घरात या मुलांवर संस्कार करायलाच कोणी नाही. त्यामुळं अशी मुलं टीव्ही, इंटरनेट यासारख्या माध्यमाकडं जास्त आकर्षित होताना दिसतायत. त्यातूनच या मुलांमध्ये एकलकोंडेपणाही घर करु पहातोय. त्यांच्यावर घरातले चांगले संस्कार होण्याऐवजी टीव्हीचे संस्कार होऊ लागलेत. काय चूक आणि काय बरोबर, काय करावं आणि काय करु नये, हे सांगणारी माणसचं आज घरात नाहीत. त्याचा दोष ना त्या मुलांचा ना त्या पालकांचा.. त्यातून मुलं काही अनुकरण करण्याच्या फंदात फसतात आणि त्यातून अपहरण आणि खूनासारखे गंभीर प्रकार या मुलांच्या हातून होत आहेत.त्यातून मार्ग काढणं सोप्प नाही. अशा या बदलत्या सामाजिक परिस्थीतीत पालकांची अवस्थाही बिकट झालीय आणि आपण सर्वजण खूपच अवघड वळणावर येऊन ठेपलोय.  

हा सगळा प्रकार झाल्यानंतर पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होत आहे असा एक मतप्रवाह बाहेर आला. कारण या लहान मुलांना घडवण्याची पहिली जबाबदारी ही आई वडीलांचीच आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर ही मोठी समस्या ऊभी ठाकलीय. एकीकडे महागाईतून जगणं मुश्किल होत आहे. दररोजच्या समस्यांतून मार्ग काढत काढत जगण्यासाठी धडपडणा-या  पालकांची परिस्थीती असे प्रकार पाहून आणखीनच दयनिय होतेय. ही एक मोठी कौटुंबिक आणि सामाजिक समस्या आपल्या समाजासमोर आ वासून ऊभी आहे. त्यातून मार्ग काढताना अर्थातच आपल्या सर्वांची दमछाक होतेय आणि आपल्यासमोर काय वाढून ठेवलय याचा विचार सारखा मनात घोळत राहतोय.
शूभम अपहरण आणि खून प्रकरणानंतर पालकांच्या समस्येत वाढ झालीय. ती म्हणजे आपल्या मुलांवर लक्ष देण्याची ! आपली मुलं काय करतात ? कोणाबरोबर फिरतात ? शाळेत ते काय करतात ? त्याची मित्रमंडळी कोण कोण आहेत ? तो शाळेनंतर काय करतो ? यासह सर्वच बाबींकडे लक्ष द्यावं लागणाराय. कामाचा कितीही व्याप असला तरी मुलाच्या आणि आपल्याही भवितव्यासाठी आपल्याला मुलं आणि कुटुंबासाठी वेळ द्यावाच लागणाराय…! मुलांबरोबर दररोज थोडातरी वेळ देऊन त्याच्याशी बोलावं लागणाराय. फक्त मुलांच्या सर्व भौतिक गरजा भागवून चालणार नाही तर त्यांच्या मानसिक गरजाही विचारात घ्यावा लागणारायत. थोडासा वेळ मुलांना देऊन त्यांचा पालक नव्हे तर मित्र बनण्याचा आपण प्रयत्न करावा. काय सांगावं यातूनच कदाचित उद्याचा एखादा धोका टाळता आला तर... !!!

No comments:

Post a Comment