Sunday, April 1, 2012

पिण्याच्या पाण्याचे संकट


राज्याचे पाणीपुरवठा मंत्री माननीय नामदार लक्ष्मणराव ढोबळे यांचं पाण्यासंदर्भातलं वक्तव्य ऐकलं आणि वाईट वाटलं...लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूर जिल्ह्यातले असून ते बोलतात छान. ते प्राध्यापक होते म्हणूनही ते बोलण्यात पटाईत असतील. पण कधीकधी ते बोलतात आणि नाहक वाद ऊभा करतात. आज ते वाढीव पाणीपट्टीवर बोलले तेही वादग्रस्तच..यापूर्वी त्यांनी पत्रकारांना ऊसाच्या दांडक्यानं बडवलं पाहिजे असं म्हणून वाद निर्माण केला होता...तर मुद्दा आहे पाण्याचा.. सोलापूर महापालिकेनं शनिवारी पाणीपट्टीत २५ टक्के वाढ केली.. मुळात सोलापूरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरुळीत होत नाही. जे पाणी येतं ते दुषीत असतं. त्यामुळे अर्थातच पाणीपट्टी वाढल्यामुळे लोक नाराज असणं स्वाभाविक आहे. तोच धागा पकडून पत्रकारांनी त्याच विभागाचा मंत्री आणि सोलापूरचा पालकमंत्री या नात्यानं पाणीपट्टी वाढीबद्ल ढोबळे सरांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी त्या पाणीपट्टी वाढीचं जोरदार समर्थन केलं. एवढ्यावरच थांबतील तर ते ढोबळेसर कसले. या मंत्रीमहोदयांनी पाणीपट्टी वाढीचं समर्थन करताना पाण्याची तुलना चक्क सिगारेट आणि तंबाखूशी केली. तंबाखू सिगारेटचे दर जेवढे वाढलेत त्या तुलनेत पाण्याची दरवाढ काहिच नाही अशी मुक्ताफळं उधळून ते मोकळे झाले..


पाणीपट्टी वाढीचं समर्थन करणं त्या खात्याचे मंत्री म्हणून आपण समजू शकतो. पण मुळात त्यांनी त्या पाणीपट्टी वाढीचं समर्थन करताना ज्या दरवाढीचा दाखला दिलाय. पर्यायानं तुलना केलीय तीच मुळात चुकीची आहे. पाणी ही जीवनावश्यक बाब आहे. ती पुरवणं हेसुद्धा संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेचं पहिलं कर्तव्य आहे. तसं तंबाखू किंवा सिगारेट पुरवणं ही काही त्यांची जबाबदारी नाही आणि दुसरं म्हणजे या तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केलं नाहीतर तर माणूस जगू शकतो. त्याची आवश्यक बाबीत गणनाच होऊ शकत नाही. तसं पाणी हे आवश्यकच नाही तर अत्यावश्यक बाब आहे हे मंत्रीमहोदयांना माहित नाही काय..कमीत कमी तुलना करताना तरी आपण कशाची तुलना कशाशी करतोय याचं मंत्रीसाहेबांना ताळतंत्र असायला हवं होतं..

आता पाण्याचाच विषय निघालाय त्यामुळे त्याच्यावर आपण बोलूयात..आज सगळीकडे पिण्याच्या पाण्याची अवस्था समाधानकारक नाही..निदान उन्हाळ्यात तरी नाहीच..मुंबई असो कि पुणे उन्हाळा आला की पाणी पुरवठ्याचा प्रश्न चर्चेत येतोच. सध्याही पुण्यात पाणी कपातीचं संकट आहे. तर इतर शहरातही तिच बोंब आहे. शहरांना पाणी पुरवठा करण्या-या धरणांमध्ये पाणी कमी झाल्यानं पाणी कपात करावीच लागतेय. हे सत्य आहे. मग आपली वाढती गरज लक्षात घेता आपण पाण्याचा योग्य तो साठा व्हावा याचं नियोजन का करत नाही असा प्रश्नही उपस्थित होतो.मुख्यता धरणातलं पाणी हे पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगासाठी वापरलं जातं. -याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा धरणामधूनच होतो. पाऊस भरपूर झाला तरच ही धरणं भरतील आणि आपल्याला हवं तेवढं पाणी मिळू शकेल. पण पाऊस सर्वच भागात समान पडत नसल्यामुळे समस्या वाढतायत. त्यातच पाण्याचे जे स्रोत आपल्याकडं आहेत त्याचं योग्य नियोजन केलं पाहिजे. पाण्याचं योग्य व्यवस्थापन हाच त्यावरचा उपाय आहे. त्यासाठी पावसाचा थेंब न थेंब वापरात यायला हवा. तसे प्रयोग झालेत. पण म्हणावा तसा त्याचा वापर केला जात नाही..हे झालं पाणी कमी पडतय त्याच्याबद्दल...

दुसरा मुद्दा हा तो पिण्याच्या पाण्याचा सुरुळीत पुरवठा...पण अनेक शहरातही पाणी सारख्याचं दाबानं येत नाही. तर काही शहरात दुषित पाण्याचा पुरवठा होण्याच्या तक्रारी येतात. सोलापूरचचं पुन्हा उदाहरण देतो. सोलापूर शहराला होणरा पाणी पुरवठा नियमित आणि सुरुळीत होत नाही. अनेकदा हे पाणी रात्री अपरात्री सोडलं जातं. जे पाणी येतं ते दुषित असतं. याच दुषित पाण्यानं मागच्या वर्षी सोलापूरातले २१ बळी घेतले. दुषित पाण्याचा पुरवठा होत असताना आणि २१ बळी जाईपर्यंत महापालिकेचा पाणी विभाग काय झोपा काढत होता काय..पण त्याकडे लक्ष द्यायला आमच्या मंत्रिमहोदयांना वेळ नाही आणि पाणीपट्टी वाढीचं जोरदार समर्थन ते करतात हे पटत नाही. जो पाणीपुरवठा व्यवस्थित, नियमित आणि स्वच्छ होत नाही त्यासाठी पैसे कसले मागता असा प्रश्न जर नागरिक विचारत असतील तर त्यात त्यांचं काय चुकलं..त्याकडे त्या खात्याचे मंत्री म्हणून ढोबळेसरांनी लक्ष द्यायला हवं..मात्र पाण्याची समस्या सोडवण्यापेक्षा त्याची नको त्या पद्धतीनं तुलना करुन मंत्रीसाहेब फसले..

आजही आपण रस्ते, पाणी, आरोग्य, वीज, यासारख्या मुलभूत सुविधांच पुरवण्यात अजून यशस्वी झालेलो नाही. विकास होतोय. पण त्याचबरोबर त्याचा समतोल साधाला जात नाही.प्रत्येकवेळी निवडणुका येतात आणि ह्याच प्रश्नावर लोकांची भलावण केली जाते. लोकसंख्या वाढतेय, शहरीकरणही झपाट्यानं वाढत आहे. त्यातुलनेत आपलं नियोजन कुठं तरी चुकतय. म्हणूनच आपण या मुलभूत प्रश्नावर आजही मात करु शकलो नाही..पिण्याच्या पाण्यासाठी आजही झगडावं लागत असेल तर हे चित्र आशादायी नक्कीच नाही..शहरात एकवेळ पाणी मिळतं तर..गावाकडे जाऊन पहा. काय अवस्था आहे पाण्याची..पिण्याच्या पाण्यासाठी लांब कुठंतर शेतात विहिरीवर, तळ्यात किंवा नदीच्या पात्रात जावं लागतं. उन्हाळ्यात नदीचं पात्रही कोरडं पडलेलं असतं. त्या वाळूत छोटे छोटे खड्डे हातानं घेऊन तिथून लहान भांड्यानं घागरभर पाणी घेऊन बायका एक दोन किलोमिटर अंतर चालतात. काही ठिकाणी हातपंपाचा सहारा आहे. तोही जेमतेमच. हे दृष्य पाहिलं की ढोबळेसरांसारख्या मंत्र्यांच्या व्यक्तव्याची किव करावीशी वाटते..तरी बरं ढोबळे सर हे ग्रामिण भागातूनच निवडून जातात. त्यामुळे त्यांना याची कल्पना नाही असं म्हणता येत नाही..

पाण्याचा विषय आहे म्हणून आजची परिस्थीही सांगतो. मुख्यमंत्र्यांनीच परवा अधिवेशनात सांगितलं की राज्यात सध्या जवळपास साडेचारशे टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. ही परिस्थीती मार्चमधली आहे. अजून एप्रिल मे आणि जून पार पडायचाय. तेंव्हा पुढची परिस्थीती काय असेल ह्याचं चित्र डोळ्यासमोर आलं तर भीती वाटते..मग आपण पाण्यावर जो कोट्यवधी रुपये खर्च केलाय तो गेला कुठं..महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून गणलं जातं. या राज्यात आजही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पाठवावे लागतात हे लाजिरवाणं नाही का..म्हणजे पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला तरी पाणी मात्र काही मिळत नाही असंच म्हणावं लागतय..  

पाणी हे मानवनिर्मित नाही, ते नैसर्गिक आहे, पावसावरच पाण्याचं गणित आहे हे वास्तव आहे..पण आपण त्याचं योग्य निजोयन करत नाही त्याचा दोष आपण पावसाला देऊन चालणार नाही ह्याकडेही लक्ष दिलं पाहिजे...बाकी सिगारेट, तंबाखू महाग झाली म्हणून पाणी महागलं तर बिघडलं कुठं अशी मुक्ताफळं उधळण्यानं हा प्रश्न सुटणार नाही..बाकी पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून मीही बसलोय..त्यामुळे वरुन राजा प्रसन्न व्हावा आणि किमान पाण्याचा तर प्रश्न सुटावा हीच आजच्या रामनवमीनिमित्त प्रभूला मागणं आहे...त्यात उपरवाल्यानच लक्ष द्यावं म्हणजे असली मुक्ताफळं तरी ऐकावी लागणार नाहीत..

No comments:

Post a Comment