Thursday, April 19, 2012

चमत्कारी बाबा लोकांची चलती..

निर्मल बाबा

बाबांची संख्या आणि त्यांचे कारनामे हा काही आपल्याला नवीन विषय नाही..तो बाबा कोणताही असो अगदी गंडेदोरे देऊन गंडवणारा बंगाली बाबा, गल्ली बोळातला बाबा किंवा सत्यसाई बाबा सारखे बाबा..बाबा कोणताही असो त्याच्या लिला हा मात्र चर्चेचा आणि संशोधनाचा विषय होऊन बसलाय. आपल्या देशात अशिक्षित लोकच या अशा बाबांच्या आश्रयाला जातात असं नाही तर फार मोठे लोकही त्यांच्या नादाला लागलेत हे सांगायलाच नको...आता बाबांचा हा विषय निघाला त्याचं कारण मागच्या आठ दहा दिवसात असेच एक बाबा सगळीकडे चर्चेत आलेत. मी ज्या बाबाबद्दल बोलतोय ते आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा नाही बरं का..हे अगोदरच स्पष्ट करतो...ज्या बाबाबद्दल आज मी लिहतोय तो बाबा म्हणजे निर्मल बाबा..आता हा नवीन कोण असा तुम्हाला प्रश्न पडला नसलेच. कारण मागच्या दहा दिवसात सर्वच वर्तमानपत्र आणि टीव्हीवर ह्या बाबांबदद्ल बरचं काही ऐकायला-वाचायला मिळत आहे.

हे निर्मल बाबा इतर बाबांप्रमाणे लोकांच्या समस्यांचं निराकरण करतात. त्यांचा भला मोठा भक्त परिवारही आहे आणि अर्थातच परदेशातसुद्धा या निर्मल बाबांच्या लिला पोचलेल्या आहेत. सध्या टीव्हीवर याच बाबांच्या जाहीरातींचा एक मोठा प्रोग्रामही दाखवला जातोय. त्यात काही भक्त बाबांना त्यांच्या समस्यांबद्दल विचारतात तसच त्यांच्या समस्यांचं कसं निराकरण झालं असं सांगणारे भक्तही दाखवले जातायत. साहजिकच त्यांच्या या भुलभलैयांला फसून लाखो लोक त्यांचे भक्त झालेत. पण त्यातून बाबांचं बिग फुटलं..हे बाबा त्यांच्या दरबारात दररोज कोटींची कमाई करतात हेही बाहेर आलंय. त्यांच्या बँक खात्यात दररोज कोटींची माया जमा होत होती. त्यातून बाबांनी जवळपास ३००- ४०० कोटींची माया जमा केल्याचंही समोर आलं. आता त्यांची चौकशी वगैरे करण्याचं घाटत आहे...तो भाग वेगळा..

निर्मलबाबा हे प्रस्थ काय आहे हेही प्रकाशात आलं. तर ते महाशय पूर्वी विटभट्टी चालवायचे. त्यात त्यांना फारसं काही करता आलं नाही. त्यानंतर त्यांनी कापड विक्रीचं दुकानही थाटलं पण त्यातही त्यांना काही जमलं नाही..त्यानंतर असेच काही उद्योग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना काही यश आलं नाही..त्यानंतर ते काही वर्षे गायबच होते. त्यानंतर अवतरले ते थेट निर्मलबाबा म्हणूनच...याच निर्मल बाबांनी भक्तांकडून जमा झालेल्या पैशातून स्वतासाठी मोठंमोठी घरं बांधून घेतली. मोठा दरबार बांधला एवढी मोठी माया त्यांनी गोळा केलीय..

निर्मलबाबा सारखे असे अनेक बाबा आपण पाहतो. त्यांच्या चमत्काराच्या कथाही ऐकतो..आणि त्यांनी लोकांनी कसं फसवलं हेही यथावकाश आपल्यासमोर आलेलं आहे. आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थीचे सत्यसाई बाबा हेही असंच मोठं प्रस्थ होतं. त्यांच्या भक्तांच्या यादीत तर राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेक व्हीआयपींचा भरणा होता. ते हयात होते तेव्हांही वादाच्या भोव-यात सापडले होतेच पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या महालात सापडलेल्या किंमती वस्तू, रोकड हे ऐकूनच थक्क झालो..एवढी माया बाबालोकांना त्यांचे भक्त कशी काय देतात हाच मुळ प्रश्न आहे. त्यातच स्वतःला शिक्षीत, समजदार म्हणवली जाणारी मंडळीही त्यांचे भक्त होतात हे कशाचं द्योतक आहे. ह्याचा विचार व्हायला हवा.. पण आजही या बांबाचं प्रस्थ समाजात दिसतं त्यावरुन आपण अजूनही काही शिकलेलो नाही असचं वाटतं..

No comments:

Post a Comment