Friday, July 25, 2014

नारायण राणेंचं बंड- हार की प्रहार ?


"नारायण राणेंची जडणघडणच बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत झालेली...त्यामुळं आक्रमकपण त्यांच्या अंगात ठायीठायी भरलेला आहे..ते शिवसेनेत असो वा काँग्रेसमध्ये एक घाव दोन तुकडे असा त्यांचा स्वभाव. एकच अंगार बाकी सगळे भंगार म्हणजे राणे...पण आता राणेंमध्ये तो जोश राहलेला नाही का?...का कमी झाला राणेंचा आक्रमकपणा,? त्यांच्या बंडात आव्हानाऐवजी तडजोडीचाच प्रयत्न दिसतोय का?..राणेंच्या बंडाचा अर्थ लावणारा हा लेख....
  
 
नारायण राणे यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याचं हत्यार उपसलं असलं तरी काँग्रेसवर त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही. नारायण राणे यांनी बंड केलं खरं पण समर्थक आमदार त्यांच्याबरोबर नाहीत..याच नारायण राणेंनी याआधी केलेल्या बंडानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावताना त्यांनी 12 आमदारांची फौज बरोबर घेतली होती..उद्धव ठाकरेंचा उद्धार करत त्यांनी शिवसेनेतही खळबळ माजवून दिली होती..त्यानंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांनी बंड केले तेंव्हा थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली होती..पण यावेळी यातलं काहीच दिसत नाही...राणेंच्या बंडात त्यांना साथ देणारा एकही खंदा समर्थक दिसत नाही..आमदार विनायक निम्हण गेल्या काही महिन्यांपासून राणेंपासून दूर गेलेत. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेही राणेंकडे फिरकले नाहीत, कालिदास कोळमकर आहेत पण ते समोर येताना दिसत नाहीत..तर ठाण्याचे रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येऊन नारायण राणेंना 9 वर्ष झाली. या 9 वर्षांत राणेंना महत्वाची पदं मिळाली..काही समर्थकांना विधान परिषद, विधानसभेची उमेदवारीही मिळाली..पण मुख्यमंत्रीपदाची त्यांची इच्छा काही काँग्रेस हायकमांड पूर्ण करू शकलं नाही हि सल त्यांचा मनात आहे..पण आता विधानसभेला जेमतेम दोन महिने राहिले असताना औट घटकेचा मुख्यमंत्री काँग्रेस करणार नाही आणि राणेंनाही ते नको आहे मग राणेंचा हा थयथयाट कशासाठी आहे... 

लोकसभेच्या निवडणुकीत राणेंच्या मुलाचा शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी मोठ्या फरकानं पराभव केला. हा पराभव राणे यांच्या खूपच जिव्हारी लागलाय..कोकणातलं त्यांचं साम्राज्याही आता राहीलेलं नाही..दीपक केसरकर या राष्ट्रवादीच्या आमदारानं तर राणेंना थेट आव्हान देत दोन हात करण्याची भाषा केलीय.. याच केसरकरांनी लोकसभा निवडणुकीत राणेंच्या विरोधात काम केलं..राणेंचा मुलगा नितेश राणेही आक्रमक पण त्यांच्या गाडीवर सिंधुदुर्गात दगडफेक झाली. राणेंची फोस्टर्स फाडली यावरून राणेंचा कोकणातला दबदबा संपल्याचं दिसतय.. 

एकीकडं कोकणतल्या साम्राज्याला लागलेला सुरुंग आणि दुसरीकडे काँग्रेसची सत्ता पुन्हा येणार नाही याची राणेंना खात्री आहे..आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना भाजपची सत्ता आली तर उद्धव ठाकरे आपल्याविरोधात कारवाईचा ससेमिरा लावतील अशी भितीही त्यांनी सतावतेय..काँग्रेससोडून जावं तर पर्यायही कमी आहेत..शिवसेनेत त्यांना दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंचाच तीव्र विरोध आहे...राष्ट्रवादीत जाणं शक्य नाही..मनसेत जावं तर मनसेचीच अवस्था बिकट आहे..आणि भाजपमध्ये जायचं तर उद्धव ठाकरे यांनी त्याला कडाडून विरोध केलाय..त्यामुळं राणेंची मोठी पंचायत झालीय..सर्व बाजूंनी कोंडी झालेल्या राणेंनी राजीनाम्याचं हत्यार उपसून दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय..यासाठी राणे 10 जनपथकडे डोळे लावून बसलेत...यातून त्यांच्या पदरात काही पडतंय का हे पाहणं महत्वाचं आहे...

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment