Thursday, July 17, 2014

पृथ्वीराज चव्हाण सर्वांना पडले 'लय भारी'

 

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जून महिना गाजला..आज मुख्यमंत्री बदलणार, उद्या बदलणार, तीन दिवसात नवा मुख्यमंत्री येणार या चर्चांनी रकानेच्या रकाने भरले..नारायण राणे, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे एवढच काय नितीन राऊतांचं नावंही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊन गेलं..पण ही शर्यत झालीच नाही..मुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि सर्व वातावरण शांत झालं....मुख्यमंत्र्यांना हायकमांडनं अभय तर दिलच पण विधानसभा निवडणूकही पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वात लढण्याचा आदेशही दिला..त्यामुळे सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले..

पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना तर गप्प बसवलच पण राष्ट्रवादी काँग्रेसला ताळावर आणलं...अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणातून हटवल्यानंतर त्यांच्या जागी दिल्लीतून आलेल्या या पृथ्वीराज चव्हाण यांना सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या मुख्यमंत्री विरोधकांनी फारसं गांभिर्यानं घेतलं नाही..अजित पवार यांना तर आता काँग्रेसवर कुरघोडी करणं सहज सोपं जाईल असचं वाटलं होतं. पण सर्वांची गणितं चुकली आणि या बाबांनी सर्वांची जिरवली...तीन वर्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात काँग्रेसमधून कोणी ब्र शब्दही काढला नाही यावरून त्यांची दिल्लीतली पत किती मोठी आहे याचा अंदाज येतो....

पृथ्वीराज चव्हाण हे दरबारी राजकारणी...ते कराडमधले असले तरी त्यांचं राजकारण बहरलं ते दिल्लीतच..गांधी कुटुंबाशी त्यांची असलेली जवळीक सर्वांना माहित आहे..पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण काँग्रेसच्या नेहमीच्या राजकारणाप्रमणे केवळ गांधी घराण्याचे एकनिष्ठ म्हणून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बहाल करण्यात आली..ते मास लिडर प्रकारात मोडत नाहीत, त्यांचा राज्यात कोणता गटही नाही...पण हायकमांडनं त्यांना महाराष्ट्रात पाठवलं आणि राज्यातल्या राजकारणाला वेगळचं वळण लागलं..
पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची वर्णी लागली. त्यावेळी सर्वांनीच अजितदादा हे बाबांना खावून टाकणार असचं बोललं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अजित पवारही त्याच आविर्भावात होते...पण बाबांनी पहिला दणका दिला तो राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या शिखर बँकेला..त्यांनी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं...त्यानंतर अजितदादांच्या मर्जितल्या जलसंपदा विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणायला लावला...त्यातून अजित पवारांचा तिळपापड झाला..बाबांनी एक एक करून राष्ट्रवादीला जेरीस आणलं. बाबांनी अजितदादा आणि राष्ट्रवादीची अशी कोंडी केली की त्यातून अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला..पण बाबांनी माघार घेतली नाही, गप्प बसून त्यांनी राष्ट्रवादीला जागा दाखवून दिली...शरद पवार यांनाही मग मुख्यमंत्री कसे काम करत नाही अशी जाहीर टीका करावी लागली...मुख्यमंत्री फाईलींवर सहीच करत नाही यावरून किती वाद झाला...मुख्यमंत्र्यांच्या हाताला लखवा मारतो काय एवढ्या पर्यंत शरद पवारांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली पण बाबा बधले नाहीत..त्यांनी राष्ट्रवादीला पुरतं जेरीस आणलं...
राष्ट्रवादी काँग्रेसला जसं बाबांनी जागा दाखवली तशीच त्यांनी पक्षातल्या विरोधकांनाही जागा दाखवून दिली..एक तर उठसूठ मुख्यमंत्र्यांविरोधात दिल्लीत जाऊन तक्रारी करण्याचा प्रकार पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर बंद झाला..दिल्लीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासमोर जाण्याची कोणाची हिम्मतही झाली नाही..मुख्यमंत्री आपल्याच पक्षातल्या आमदारांची कामं करत नाहीत अशा तक्रारी येत होत्या पण करणार काय...नारायण राणे, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरेंसह अनेकांना मुख्यमंत्र्यांनी वावच दिला नाही...या सर्वांना लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवानंतर मात्र बळ आलं..काँग्रेसच्या पराभवाला मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धतच कारणीभूत असल्याचा आरोप करत विधानसभा जिंकायची असेल तर मुख्यंमत्री बदला म्हणून काँग्रेससह राष्ट्रवादीनंही तगादा लावला..काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री बदलाचं वातावरणही तयार केलं पण झालं काही नाही.. मुख्यमंत्र्यांनी सर्वांची कुंडलीच हायकमांडसमोर मांडली...मुख्यमंत्री बदला म्हणून आघाडीवर असलेल्या नारायण राणे हे तर मुलाच्या विजयासाठी मतदारसंघ सोडून प्रचाराला बाहेरही पडले नाहीत..आणि बाकीचे नेते स्वतःच्या मतदारसंघातही काँग्रेसला आघाडी देऊ शकले नाहीत ते राज्याचं नेतृत्व काय करणार असा प्रश्नही उपस्थित केला...त्यामुळं सर्वांची बोलती बंद झाली...
पृथ्वीराज चव्हाण यांना कोणताही गट सांभाळायचा नाही..फक्त हायकमांडचा आशिर्वाद पाहिजे आणि तो त्यांच्यावर आहेच...त्यामुळं राष्ट्रवादीसह काँग्रेसमधल्या विरोधकांना ते भारी पडले....आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरीही त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही....शेवटी एवढचं की राजकारणात स्वतःला फार मोठा नेता म्हणन मिरवणा-यांना बाबांनी चांगलच वठणीवर आणलय..स्वच्छ प्रतिमा तर त्यांनी जपलीच पण कोणतीही आगपाखड न करता शांतपणे त्यांनी सर्वांना गप्प केलं.... 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment