Thursday, June 13, 2013

अडवाणींसाठी ‘ जय श्रीराम’ म्हणण्याची योग्य वेळ !!!


भाजपच्या लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा देऊन तो परत घेण्याचा मुद्दा या आठवड्यात चांगलाच गाजला..पण मुळात अडवाणींनी हे राजीनामानाट्य केलंच का ? हा प्रश्न आता चर्चेचा बनलाय. लालकृष्ण अडवाणींवर ही वेळच का यावी हा पहिला प्रश्न..? दुसरं त्यांनी राजीनामा दिलाच होता तर परत का घेतला..? आणि यातून त्यांनी काय साध्य केलं.. ? यासारखे अनेक प्रश्न आहेत. ज्या अडवाणींनी भाजपच्या जन्मापासून त्या तो पक्ष सत्तेत आणण्यापर्यंत महत्वाची मजल मारली..ज्यांचा शब्द भाजपात प्रमाण मानला जातो त्यांच्यावर राजीनामे देण्याची वेळ आली हेच अडवाणीचा मोठा पराभव आहे..

 


भाजपमध्ये सध्या दुस-या फळीतील नेत्यांच्या महत्वकांक्षा फारच वाढलेल्या आहेत. राजनाथ, जेटली, सुषमा स्वराज, वेंकय्या नायडू, आणि इतर समवयीन नेते यांचा गट आता अडवाणी, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना फारसा जुमानत नाही..या सर्वांवर कडी केलीय ती नरेंद्र मोदींनी..मोदींना आता दिल्लीचं तख्त खुनावतय..गुजरातमध्ये भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप आता समिकरण झालय. गुजरात हा फक्त माझ्याच नावानं चालतो ही हुकुमशाहीवृत्ती त्यांच्यात बळावलीय..गुजरातचा विकास झाला वगैरे ठीक आहे पण ज्या पद्धतीनं त्यांनी गुजरातमध्ये भाजप पक्ष दावणीला बांधलाय..तोच कित्ता ते आता दिल्लीत गिरवु पाहता आहेत..

भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणूनच त्यांची वाटचाल सुरु झालीय..तसे फासे टाकण्यास मोदींच्या समर्थकांनी सुरुवात केलीय. त्याचाच पहिला अंक म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारप्रमुख पदाची धुरा मोदींनी आपल्या गळ्यात पाडून घेतीलय..अलिकडं मोदींचं पक्षातलं वाढलेलं प्रस्थ हे दिल्लीतल्या नेत्यांना पचणारं नाही.,आजपर्यंत मोदींना अभय देणा-या अडवाणींनाही ते पचनी पडत नाही कारण स्पष्ट आहे..सध्या मोदींची हवा जोरात आहे..आणि हीच अडवाणींना न पटणारी गोष्ट आहे..जोपर्यंत मोदींचा वावर गुजरातपुरता मर्यादीत होता तोपर्यंत त्यांना अडवाणीचं अभय होतं. पण त्याच मोदींचं नाव पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर घेतलं जाऊ लागलं इथचं माशी शिंकली....आणि अडवाणींचा मोदी विरोध वाढला...

नरेंद्र मोदींची निवड ही अडवाणींना नको होती तरीही त्यांचा विरोध डावलून राजनाथसिंहांनी मोदींची नियुक्ती केलीच हा अडवाणींना पहिला धक्का दुसरा धक्का पक्षातले निर्णय आता आपल्याला न विचारताच घेतले जात आहेत हा आहे. यातून त्यांनी राजीनामे दिले..पण त्यावरही ते ठाम राहीले नाहीत..24 तासातच त्यांनी ते मागेही घेतले..काही नेत्यांनी त्यांची मनधरणी केली असं म्हणतात..त्यातच संघानही अडवाणींना सुनावलं...नव्या पिढीला मार्गदर्शन करा असा संदेश नागपुरातून देण्यात आला..राजनाथसिंह यांनाही मोदींचा निर्णय मागे घेणार नाही असं स्पष्ट केलं..शेवटी मोदी आणि कंपू जिंकला आणि अडवाणी हरले...

अडवाणींची पंतप्रधानपदाची इच्छा काही लपून राहीलेली नाही..2009 मध्ये त्यांच्या नावावर भाजपनं फासे टाकून पाहिले पण तोंडघशी पडले..आता 2014 साठी मोदींचं नाव पुढं केलं जात आहे म्हणजे सत्ता स्थापन्याची वेळ आलीच तर आपला पत्ता लागेल का नाही याची चिंता अडवाणींना सतावतेय...ज्या पक्षात वाजपेयी सक्रीय होते तेव्हाही अडवणींचा शब्द प्रमाण मानला जायचा त्याच भाजपात अडवाणींच्या डोळ्यादेखत नवी पिढी त्यांना डावलतेय याचं शल्यही त्यांना डाचत असावं. त्यांची अवस्था आता महाभारतातल्या पितामह भिष्मासारखी झालीय..सर्व काही त्यांच्या डोळ्यासमोर घडतय आणि ते काहीच करु शकत नाहीत...

अडवाणींनी राजीनामे परत न घेता सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय कायम ठेवला असता तर त्यांची प्रतिमा आणखी उंचावली असती. पण त्यांनी तेही केलं नाही...राजीनामे परत घेतल्यानं त्यांची उरली सुरली पतही राहिली नाही.. ज्या पक्षात आपल्याला आता किंमत राहिलेली नाही म्हणून त्यांनी राजीनामे दिले ते त्यांनी परत घेतलेच का...? कारण ब्लॅकमेलिंग म्हणावं तर त्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही उलट मोदी आणि इतरांना जे हवं तेतर झालं. मग ही तीन दिवसांची पोटदुखी आणि 24 तासांचं राजीनामा नाट्य हा फार्स अडवाणींनी का केला..?.या सर्व प्रकरणानानंतर अडवाणींनी राजकारणाला जय श्रीराम केला असता तर त्यांची पत काहीतरी राहिली असती...

No comments:

Post a Comment