Friday, February 15, 2013

बाळासाहेबांची शिवसेना- एक झंझावात..


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचा झंझावात 17 नोव्हेंबर 2012 ला संपला.. ज्या नावानं अख्या महाराष्ट्राला राजकारणाची नवी दिशा दिली, नवी ओळख दिली, राजकारण तळागाळात पोचवलं, एका वेगळ्या धाटणीचं राजकारण ज्यांनी केलं, ते बाळासाहेब गेले.. बाळासाहेबांच्या जाण्यानं शिवसेनेचं काय होणार याची चर्चा सुरु आहे. खरं तर बाळासाहेब, शिवसेना आणि शिवसैनिक हे वेगळं नातं या महाराष्ट्रानं पाहिलं. 40 वर्ष या माणसानं महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीनं वेड लावलं. वादग्रस्त व्यक्तिमत्व ही बाळासाहेबांची ओळख होती..त्यांनी घेतलेल्या भूमिका ह्या नेहमीच वादात सापडल्याय..मुस्लिम व्देषाचं राजकारण असो की राडा संस्कृती..मी लोकशाही मानत नाही म्हणणारा आणि तरीही निवडणुकीत लढवणारा हा माणूस एक अजब व्यक्तिमत्व होतं. ( बाळासाहेबांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही..)कोणाला पटो वा ना पटो पण या माणसानं मराठीला वेगळी ओळख दिली.. एक दरारा निर्माण केला..दिल्लीपासून गल्लीपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही चर्चा नेहमीच व्हायची..

मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही..मला त्याच्याशी काही देणघेणंही नाही..पण कॉलेजमध्ये असताना 1990 च्या वेळी बाळासाहेबांबद्दल वर्तमानपत्रात बरच छापून यायचं.. त्यावेळी टिव्ही खूपच मर्यादीत होता..डीडी सोडलं तर फारसं काही नव्हतं.. त्यातच 24 तासाचं दळण दळणा-या वाहिन्या तर नव्हत्याच...जे काही समजलं जायचं ते वर्तमान पत्रातूनच...आणि असचं एकदा बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा मला सोलापूरच्या होम मैदानावर ऐकायला मिळाली..आम्ही कॉलेजचे अनेकजण या सभेला होतो..ते भाषण मी जेव्ही ऐकलं तेव्हाच बाळासाहेबांबचा चाहता झालो.. तसं राजकारण हे गावात चालतच..आजपर्यंत आम्ही फक्त काँग्रेसवाल्यांची त्याच त्या धाडणीतली रटाळ भाषणं ऐकायचो. पण बाळासाहेब हे त्यापेक्षाही काहीतरी वेगळे आहेत हे त्या एका भाषणातूनच जाणवलं.. माझ्याबरोबर अनेक सहकारी जे काँग्रेसच्या राजकारणाशी जवळ होते. त्यांनाही बाळासाहेब आवडायचे..(त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हता..) एक उदाहरण देतो..माझे काही मित्र अकलूज भागातले होते. त्यांचा विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या राजकारणाशी काही ना काही कारणानं संबंध यायचा..घरातले काही लोकही सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, डीसीसीबँक, सोसायटीचे सदस्य..अकलूज परिसरात तर मोहिते पाटील सोडून दुसरं नावही कोणी घ्यायचं धाडस करत नव्हतं..त्या भागातली जी मुलं माझ्याबरोबर कॉलेजमध्ये होती तीसुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे चाहते झाले होते..एक तर कॉलेजची मुलं त्यात तरुणाईतला बंडखोरपणा..आणि त्याला साद घालणारे बाळासाहेब ठाकरे हे नातं घट्ट झालं होतं..तेव्हापासून आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आवडत्या व्यक्तिमत्वापैकी एक आहेत...आणि ते राहतील..

 

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची गुंडगिरी किंवा ठोकशाहीवर टीका करण्या-यांना हे माहित असेलच की राजकारणातले अनेक नेते आणि गुंडगिरी यांचा जवळचा संबंध असतो..हे आम्ही तरी गावापासूनच पहात आलोय मग तो छोठा मोठा नेता कोणत्याही पक्षाचा असो.. म्हणजे राजकारणातलं स्वच्छ व्यक्तिमत्व शंभरात एक दोनही सापडले तर खूपच होईलं. त्यामुळं शिवसेनेचा राडा वैगेरे टीका होत असली तरी ते राजकारणातल्या जवळपास सर्वांनाच लागू पडतं..पण तरुण रक्तात जी बंडखोरवृत्ती असते त्याला मात्र बाळासाहेबांनी वाट करुन दिली होती..म्हणूनच माझासारखी असंख्य मुलं बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वानं भारुन केली होती..एवढाच माझा आणि त्या शिवसेनेचा संबंध..पण नंतर जेव्हा मी प्रसारमाध्यमात आलो तेव्हा माझ्या ज्ञानात वेगवेगळ्या मार्गानं शिवसेना, बाळासाहेब आणि त्यांचं राजकारण यांची भर पडली.. त्यामुळं बाळासाहेबांनी घेतलेले अनेक निर्णय , त्यांच्या भूमिका मला आवडल्या नाहीत किंवा त्याची बाजू घ्यावी असं कधीच मला वाटलं नाही..पण एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावरचं प्रेम हे तसभूरही कमी झालं नाही.. 40 लाख झोपडपट्टीवासींना मोफत घरं आणि 27 लाख नोक-या देण्याचं आश्वासन..नाही वचन देत बाळासाहेबांनी महाराष्ट्रात युतीचं सरकार आणलं ..खरं तर जो काही या 27 लाखांच्या बेरोजगारीचा आकडा होता त्यातलाच मी एक...मलाही नोकरीची आशा होतीच..पण युतीच सरकार आलं तेव्हा मी नुकताच एमए करुन बेकार झालो होतो. कॉलेज नावाच्या फॅक्टरीतून बाहेर पडलो होतो..पण त्यानंतर नोकरी काही मिळाली नाही..म्हणजे बाळासाहेबांनी दिलेलं आश्वासन पाळलचं नाही.. ना घर ना नोकरी..ते आणि त्यांची शिवसेना सुद्धा काँग्रेससारखीच झाली...पण अशी दिलेली आश्वासनं पाळली जात नसतात किंवा ते फक्त प्रचारातलं एक भाषण म्हणून पहायचं असतं हे तोपर्यंत मला समजलं होतं..

 

बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात एक नवा वर्ग आणला..ज्या लोकांच्या सात पिढ्यांचा राजकारणाशी फक्त मतदान करण्यापलिकडे संबंध आला नाही अशी माणसं नगरसेवक, सरपंच, नेते, आमदार, खासदार मंत्री झाले..हे बाळासाहेब ठाकरेंमुळचं झालं हे मान्य करावचं लागेल..मला माहित आहे माझ्या भागातली  अनेक टुकार माणसंही मोठ्या पदावर जाऊन बसली. एका विशिष्ठ वर्गापुरतं मर्यादीत असलं नेतृत्व शिवसेनेच्या माध्यमातून उदयाला आलं..नंतर त्यांचं काय झालं..तेही काँग्रेसच्या वाटेनं कसे गेले हा चर्चेचा वेगळा विषय आहे..पण महाराष्ट्रात राजकारण हे तळागाळापर्यंत पोचवण्यात बाळासाहेब ठाकरेंचा सिंघाचा नव्हे तर वाघाचा वाटा आहे..

शिवसेनेचा जन्म मुंबईतला..आणि मुंबईत आवाज फक्त शिवसेनेचाच चालतो हे आम्ही तेव्हा पहात एकत होतो..त्यामुळं मुंबईच्या आकर्षणात शिवसेना या नावामुळं भर पडली.. त्यानंतर मी नोकरीनिमित्त अनेक वर्ष हैदराबादमध्ये होतो..वगवेगळ्या भाषेतली चॅनेल्स असलेल्या ईटीव्हीमध्ये असल्यामुळे तिथं भारताच्या वेगवेगळ्या भागातले सहकारी होते. त्यांची भाषा, संस्कृती, राजकारण यांच्यावर मोठ्या गप्पा व्हायच्या..माझे तर अनेक मित्र बिहार, उत्तर प्रदेश या भागातलेही होते..त्यांनाही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबदद्ल प्रचंड आकर्षण असायचं..त्यातले अनेकजण माझ्याकडून बाळासाहेब आणि शिवसेनेबदद्ल विचारत असत..त्यातल्या अनेकजणांमध्येही या दोन्हींबद्दल मोठे गैरसमज होते..पण संधी मिळेल तेव्हा ते गैरसमज दूर करण्याचा मी प्रयत्न केला..त्यातला अनेकांचा त्यामुळे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंबदद्लचा गैरसमज दूर झाल्याचं मला जाणवलं..एक ओरिसाचा सहकारी होता..त्या पठठ्याला तर बाळासाहेबांबद्दल प्रचंड आदर होता..अनेकवेळा बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिका मला पटल्या नाहीत पण हा पठठ्या मात्र बाळासाहेबांच्या कोणत्याच भूमिकेला विरोध करत नव्हता..त्याला सर्वकाही योग्यच वाटतं होते.. एवढा तो बाळासाहेब ठाकरेंचा चाहता होता..
 

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबदद्ल हे सर्व सांगण्याचं कारण हेच की ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी शिवसेना नावाची एक संघटना स्थापन करुन एक वेगळं व्यासपीठ, एक वेगळी दिशा घालून दिली ती आता मागे पडत चाललीय. शिवसेनेतेही अनेक बदल झालेत..नेतृत्वाची नवी फळी निर्माण करण्यात आलीय.. खरं तर शिवसेनेत नेतृत्व घडवली जात होती आता ती निर्माण केली जातात.. आवाज कुणाचा असं म्हणण्याची आज गरज नाही कारण शिवसेनेचा तो खरा आवाज केंव्हाच बंद झालाय.. आंदोलन म्हणाल तर त्यातही काही दम दिसत नाही.. फक्त टीव्हीवर आक्रमक बाईट देण्यानं किंवा भाषण ठोकण्यानं शिवसेनेचा आवाज बुलंद राहत नाही.. आतातर बंडखोरी ही तर काँग्रेसला लाजवेल त्यापेक्षा जास्त झालीय..एक काळ होता बंडखोरी म्हटलं की त्या नेत्यांची पाचावर धारण बसायची... पण नेतृत्वच दमदार राहिलं नाही तर कार्यकर्ते तर कुठून दमदार राहणार.. सगळ्यांना आता पद, पैसा याची लालसा निर्माण झालीय..त्यामुळंच मुंबईतल्या संपर्कनेत्यांच्या समोर आवाज मोठा करण्याची हिंमत आता कोणीही करतो. मुंबईतून नेतृत्व लादण्याची परंपरा आता इतर भागातल्या नेत्यांनाही रुचत नाही..घाम गाळून, पोलीसांच्या लाठ्या खाऊन, तडीपारी, केसेस झेलून ज्या तळागाळातल्या शिवसैनिकांनी ही शिवसेना वाढवली ती काँग्रेसच्या वाटेनं जाताना अनेकांना पाहवत  नाही..पण बाळासाहेबांनी उभी केलेली ही संघटना फक्त सत्तेच्या आणि पदाच्या आलसेनं संपत असेल तर ते वाईटच आहे..सत्तेच्या राजकारणाची चटक लागलेल्या शिवसेनेला आता सत्तेची भूक भागवायची आहे..त्यासाठी शिवसेनाही आता इतर राजकीय पक्षांसारखीच झालीय..शिवसेना पक्ष म्हणून संपेल असं मला तरी वाटत नाही पण पूर्वीची शिवसेना आता होणे नाही हेही सत्य आहे..शिवसेना पक्ष म्हणून वाढेल, पुढे जाईल किंवा नाही हे वेगळा भाग...पण बाळासाहेंबाची शिवसेना पुन्हा होणे नाही म्हणजे नाही..म्हणून बाळासाहेबांची शिवसेना आजही माझ्यासह अनेकांच्या मनात घर करुन आहे आणि ती राहिल..
 

No comments:

Post a Comment