Showing posts with label शिवसेना. Show all posts
Showing posts with label शिवसेना. Show all posts

Friday, April 24, 2015

शिवसेनेवर घोंगावतंय 'हिरवं संकट' !


औरंगाबाद महापालिकेवर शिवसेना भाजपचा भगवा झेंडा कायम राहिला असला तरी यावेळी हा झेंडा एवढ्या ताठ मानेनं आणि दिमाखात फडकलेला नाही. ज्या औरंगाबादशी शिवसेनेचं एक भावनिक नातं आहे ही भावनिक नाळ तुटलेली दिसतेय. तर पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत उडी घेऊन प्रचंड यश मिळवलेल्या एमआयएमनं सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडलं. एमआयएमचा विजय हा शिवसेना, भाजपसह काँग्रेससाठीही धोक्याची घंटाच आहे.


हैदराबादच्या एमआयएम या पक्षानं नांदेड महापालिका निवडणुकीत 11 जागा जिंकून महाराष्ट्राच्या राजकारणात जो यशस्वी प्रवेश केला ती यशाची घोडदौड त्यांनी कायम ठेवलीय.नांदेडनंतर विधानसभेवर एमआयएमचे दोन आमदार निवडून आले.यातला एक आमदार हा औरंगाबादमधूनच निवडून आलाय. त्यामुळंमहापालिकेचा निकाल पाहता औरंगाबादमध्येएमआयएमचा विस्तार चांगला झाला असं म्हटलं तर वावगं वाटू नये. या महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमनं जोरदार मुसंडी मारलीय. 113जागांच्या या महापालिकेत एमआयएमनं 55जागांवर उमेदवार उभे केले आणि तब्बल 25जागांवर विजय मिळवला.शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जायचं त्या औरंगाबादमध्ये शिवसेनेला फक्त29 आणि भाजपला 23 जागांवर विजय मिळवता आला. हा विजयही युती करून मिळालेला आहे.त्यामानानं एमआयएमचं यश हे फार बोलकं आहे.विधानसभेच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना ‘औरंगजेबाच्या फौजांचं आक्रमण’ आलंय असा टोला मारला होता. या औरंगजेबाच्या फौजांचा त्यावेळी ‘बंदोबस्त’ त्यांना करता आला नाही तर आता औरंगाबादच्या निवडणुकीत हैदाराबदच्या ‘रझाकारी फौजांचं आक्रमण’ कधी आलं आणि शिवसेनेला कधी भारी पडलं हे त्यांनाही कळलं नाही. आता संभाजीनगरचे म्हणजे औरंगाबादचे सुभेदार त्याचा दोष भाजपच्या माथी फोडत आहेत. पण संभाजीनगरचा गड राखणा-यांना हे हैदराबादी संकट केवढं मोठं आहे याची काडीमात्र शंका आली नाही याला काय म्हणावं. आतातरी या सुभेदारांचा ‘बंदोबस्त’‘मातोश्री’ करणार आहे का, का गड एमआयएमनं जिंकल्यानंतर कडेलोट करण्यासाठी वाट पाहिली जातेय हे ‘मातोश्री’च जाणो..  एमआयएमला मिळालेलं हे घवघवीत यश शिवसेना आणि भाजपला विचार करायला लावणारं आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून औरंगाबादकडे पाहिलं जातं. ( शिवसेनेच्या भाषेत संभाजीनगर) या शहरानं बाळासाहेब ठाकरेंवर मनापासून प्रेम केलं. म्हणूनच संभाजीनगरच्या लोकांनी शिवसेनेला नेहमीच मोठी आणि भक्कम साथ दिली. पण त्याचा विसर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना पडल्याचं दिसतंय. 25-30 वर्षात शिवसेनेनं औरंगाबादला काय दिलं, याचं उत्तर शिवसेनेनं शोधून पाहावं.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वीजेचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न या मुलभूत सुविधाही ते देऊ शकले नाहीत. कदाचित यासाठी हे नेते राज्य सरकार आणि प्रशासनाला दोष देतील. मग तुम्ही सत्तेवर कशासाठी बसता ? बाळासाहेबांच्या भाषेतच सांगायचं तर, तुम्ही काय फक्त खुर्च्या उबवता काय? काय केलं 25 वर्षात या शिवसेनेनं औरंगाबादसाठी ?...निवडणुका आल्या की फक्त भावनिक मुद्दे पुढं करायचे, संभाजीनगर नामकरणाचं गाजर दाखवायचं, हिंदूंना मुस्लीमांची भिती दाखवायची हेच उद्योग केलेत ना शिवसेनेनं औरंगाबादमध्ये आजपर्यंत !. आताही ‘बाण हवा का खान’ हाच प्रचार केला ना शिवसेनेनं. !25 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे विकासासाठी.एक पिढी गेली आता नवी पिढी आलीय. भावनिक मुद्द्याचं राजकारण आता जास्त दिवस चालणार नाही. शिवसेनेनं याची वेळीच दखल घेतली पाहिजे. वाढत्या शहराचा विकास केला पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे जसं महत्वाचं आहे तसच औरंगाबादमध्ये शिवसेना पुन्हा भक्कम रुपानं उभी केली पाहिजे.कोणा एकाच्या दावणीला पक्ष संघटना बांधून चालणार नाही. बंडखोरीची लागण मुळापासून उपटून टाकली पाहिजे. तरुण पिढीला आता काय हवं याचं भान शिवसेनेच्या नेतृत्वाला आलं पाहिजे. शिवसेनेनं यापुढं फक्त भावनिक मुद्द्यांवर लक्ष दिलं तर एमएमआयमचं आव्हान आणखी गडद होईल.हा धोका शिवसेनेसाठी मोठा आहे. एकीकडे भाजपबरोबर युती करुन लाथाळ्यांचा खेळ सुरूय तर दुसरीकडे एमआयएमचं संकट घोंघावतंय. शिवनेसेच्याच भाषेत सांगायचं तर हिरवं संकट संभाजीनगरवर आलंय. या संकटाला वेळीच थोपवलं नाही तर संभाजीनगरवरचा हा भगवा खाली उतरायला वेळ लागणार नाही. काळाची पावलं ओळखून शिवसेनेनं शहाणपणाचं राजकारण करावं आणि भगव्याची शान राखावी यातच त्यांचही भलं आहे.तोपर्यंत जय महाराष्ट्र !    

Saturday, April 18, 2015

पडला तरी नडला 'नारायण' !

कुडाळ निवडणुकीतील पराभव हा नारायण राणेंसाठी मोठा धक्का होता. पण हा पराभव पचवून ते पुन्हा मुंबईतील वांद्रे पोटनिवडणुकीला उभे राहिले. नारायण राणेंना वांद्रेमधूनही पराभवाचा धक्का बसला. वांद्रे मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला पण बालेकिल्ल्यातच राणेंनी शिवसेनेला आव्हान दिले. पराभवाचा दुसरा धक्का बसला तरी राणेंनी उद्धव ठाकरेंसह सर्वांना घाम फोडला हे काही कमी नाही. नारायण राणे हे लढवय्ये नेते आहेत हेच त्यांनी दाखवून दिले.


वांद्रे पोटनिवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचा टप्पा ठरणारी ठरली. या निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला असला तरी हा राणेंचा हा पराभव बरचं काही सांगून जातो.कोकणातल्या पराभवाचा वचपा घेण्यासाठी थेट मातोश्रीच्या अंगणातच पोटनिवडणूक लढवण्याचं धाडस नारायण राणेंनी केलं. पण अस्तित्वाच्या ठरलेल्या या लढाईत राणेंना पराभवाचं तोंड पाहावं लागलं.शिवसेनेच्या तृप्ती सावंतांनी राणेंचा तब्बल 19 हजार मतांनी दारूण पराभव केला. पोटनिवडणुकीतला हा विजय अनेक अर्थांनी शिवसेनेसाठी महत्वाचा ठरलाय.सुनियोजित प्रचार यंत्रणेनं शिवसेनेच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.मुस्लीम वस्त्यांतील कमी मतदानाचाही शिवसेनेला फायदा झाला. मराठी मतांवर डोळा ठेवून शिवसेनेनं रणनीती आखली. बाळा सावंत यांचा असलेला जनसंपर्कही शिवसेनेच्या कामी आला. या निवडणुकीत पूर्ण ताकद पणाला लावली असली तरी काही गोष्टींचा फटका राणेंना बसलाच.

वांद्र्यात उभं राहून शिवसेनेला अंगावर घेणा-या राणेंना मतदारांनी नाकारलं. आक्रमक राजकारण करणा-या राणेंसाठी या पराभवानं अनेक प्रश्न उपस्थित केले. सहा महिन्यातच दोनवेळा झालेल्या या पराभवानं जनतेशी संपर्क असलेला नेता या राणेंच्या प्रतिमेलाही धक्का लागलाय.बंड करण्याच्या प्रवृत्तीला मुरड घालून आता भविष्यातील राजकीय वाटचालीचा गांभीर्यानं विचार करावा लागणाराय. कोकणातच नाही तर बंडखोरी करणा-या राणेंना वांद्र्यातच पराभूत केल्याचं मोठं समाधान उद्धव ठाकरेंबरोबरच कट्टर शिवसैनिकाला या निवडणुकीनं मिळवून दिलंय. पारंपरिक शत्रूंमधील ही निवडणूक राज्याच्या राजकारणात नेहमीच लक्षात राहिल. पण एक गोष्ट मात्र खरी बांद्र्याच्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंनी उडी घेतल्यामुळं रंगत आली होती.त्यांच्याऐवजी काँग्रेसचा कुठलाही उमेदवार असता तर या निवडणुकीला ग्लॅमरच आलं नसतं. नारायणराणेंनी सारी प्रतिष्ठा पणाला लावून निवडणूक लढवली. शरद पवारांसारखे नेते कधीच पोटनिवडणुकांना गेलेले नव्हते. पण राणेंच्या शब्दाखातर त्यांनी बांद्र्यात पाऊल ठेवलं.राणेंमुळंच शिवसेनेच्या गडावर खळबळ माजवली होती हे नक्की. एमआयएमच्या उमेदवारानं विजयाची शक्यता नसतानासुद्धा जोर लावल्यामुळं राणेंचा मार्ग खडतर बनला. एमआयएमनं उमेदवार दिला नसता तर शिवसेनेची ससेहोलपट झाली असती हे ओळखूनच उद्धव ठाकरेंनी राणेंपेक्षा ओवैसींवर टीकेची झोड उठवली.त्यामुळं मुस्लिम मतं विभागणार नाहीत याची काळजी घेतली आणि झालंही तसंच. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकेक पराभव स्विकारलेल्या राणेंनी खचून न जाता बांद्र्याची निवडणूक लढवय्या म्हणून लढवून दाखवली हे त्यांच्यातल्या लढवय्या नेत्यांचा गुणच आहे. पण नारायण राणे यांनी ज्या मातोश्रीतून राजकारणाचा श्रीगणेशा केला, राजकारणाची एक एक पायरी चढत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणापर्यंत मजल मारली हे शक्य झालं ते बाळासाहेब ठाकरेंच्या भक्कम पाठिंब्यामुळेच. बाळासाहेबांनी नारायण राणेंना घडवलं. बाळासाहेबांचया भाषेत सांगायचं तर ना-याचा त्यांनी नारायण केला पण ज्या मातोश्रीवरून राणेंनी राजकारणातले धडे गिरवले त्याच मातोश्रीच्या अंगणात राणेंचा असा पराभव व्हावा हे दुर्दैवच म्हणावं लागले..राणेंच्या बाततीत एक वर्तूळ पूर्ण झालंय. आता त्यांच्यापुढं काही राजकीय भवितव्य आहे असं आतातरी दिसत नाही....   

Wednesday, April 9, 2014

राज ठाकरेंचं चाललय तरी काय ?

 
 
 
लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढवणार का नाही याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली पण मोजक्याच जागांवर उमेदवार उभे करून त्यांना काय साध्य करायचंय हे स्पष्ट झालेलंच आहे. शिवसेना हाच आपला नंबर एकचा शत्रू आहे हे राज ठाकरे यांनी जाहीरच केलय. केवळ शिवसेनेचे उमेदवार पाडण्याच्या एकमेव उद्देशानं राज ठाकरे यांनी 10 उमेदवार दिलेत. त्यातला अपवाद फक्त पुणे आणि भिवंडी..या दोन ठिकाणी भाजपच्या उमेदवाराविरोधात मनसेचे उमेदवार आहेत. नरेंद्र मोदींबरोबरची मैत्री जाहीरपणे मान्य करायची, त्यांना पाठिंबा द्यायचा आणि त्याचवेळी महायुतीतल्याच शिवसेनाला कट्टर विरोध करायचा हेच धोरण राज ठाकरेंनी अवलंबलय.
राज विरुद्ध उद्धव ठाकरे
मनसेला महायुतीत घेण्याचा भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण त्याला शिवसेना आणि विशेषतः उद्धव ठाकरेंनी विरोध केला. टाळीसाठी उद्धव ठाकरेंनी हात पुढं केला होता पण तेही फारसे गंभीर नव्हते. त्याला राज यांनी प्रतिसाद दिला नाही तो भाग वेगळा. दोन ठाकरे बंधूमधल्या तीव्र विरोधामुळे अखेर मनसेला महायुतीत जागा काही मिळाली नाही. त्यातच उद्दव ठाकरे यांनाच मनसे महायुतीत नको आहे असं सांगून भाजप नेत्यांनी आगीत तेल ओतलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनाला विरोध करण्यासाठी 10 उमेदवार उतरून राजकारण केलय..
मनसेचा फायदा कोणाला ?
राज ठाकरे महायुतीत जाणार का याची चर्चा दोन वर्षापासून सुरु होती. त्यातच शिवसेना आणि मनसेच्या दुस-या फळीतल्या नेत्यांनीही महायुतीत मनसे असावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण ते शक्य झालं नाही..मुळात राज ठाकरे यांचा काँग्रेसला सॉफ्ट कॉर्नर आहे असं बोललं जात होतं. मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून तरी असचं दिसलं. मनसेमुळे मुंबई आणि आसपासच्या अनेक जागांवर भाजप शिवसेनेला फटका बसला आणि त्याचा थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. आता मात्र मनसेच्या राजकीय खेळीचा आघाडीबरोबरच भाजपलाही फायदा होणार आहे.
 
मनसेचं टार्गेट फक्त शिवसेना
लोकसभेच्या यावर्षीच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेला टार्गेट केलंय. पण मागच्या काही सभांमधून ते ज्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर सडकून टीका करत होते. तशी टीका त्यांनी केलेली नाही. अगदी काँग्रेसवरही फारच सौम्य टीका केलीय. अजित पवार आणि आर. आर. तर राज ठाकरेंचं खास गि-हाईकच, पण ते यावेळी होताना दिसत नाही. त्यातच शरद पवारांनी राज ठाकरेंची स्तुती केलीय. यातून महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्याआड वेगळीच जमवाजमव झाल्याचं दिसतय. राज ठाकरे यांचा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला सॉफ्ट कॉर्नर तर शिवसेनाला प्रखर विरोध..राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सभांतून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. तर भाजपचं आतून राज ठाकरे प्रेम हे सर्वश्रुत झालय. त्यामुळे महाराष्ट्रात तरी शिवसेनाला टार्गेट करण्यावर सर्व पक्षांनी भर दिलाय.
नवे राजकीय समिकरण!
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राज ठाकरे आणि भाजप यांच्यात काही राजकीय बेरीज झाली तर नवल वाटायला नको. तसंही राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी मित्र नसतो तसा शत्रूही नसतो...
  
 
 
 
 
 

Sunday, February 19, 2012

हा बाळासाहेबांचाच करिश्मा..









मुंबई, ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला..मुंबईत तर १६ वर्ष युतीची सत्ता आहे आणि पुन्हा एकदा पाच वर्षासाठी युतीला संधी मिळालीय..यावेळीही शिवसेनेला निवडणूक सोपी नव्हती..खरच सोपी नव्हती..मनसेच्या इंजिनाचा वाढलेला वेग आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आघाडी यामुळे शिवसेनेला निवडणुकीत दगाफटका होण्याची भाकितं वर्तवली जात होती..कदाचित जास्त जागा मिळाल्या तरी राज ठाकरेंकडे पाठिंब्यासाठी हात पसरावा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ही सगळी भाकितं खोटी ठरवत शिवसेना भाजप रिपाइं युतीचा झेंडा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर फडकलाच...

निवडणुकीपूर्वीचं वातावरण लक्षात घेवून शिवसेनेनं रामदास आठवलेंना हाक दिली आणि राजकीय अडगळीत पडलेल्या आठवलेंनाही दुसरं मोठं राजकीय व्यासपीठ मिळालं. या निवडणुकीच्या निकालात रिपाइंचे दोनच उमेदवार निवडून आले असले तरी दलित समाजाची जी मतं आठवलेंच्या पाठिशी आहेत त्या मताचं दान यावेळी युतीच्या पारड्यात पडल्यामुळे युतीचा अवघड विजय सोपा झाला.. त्यामुळेच मनसेचा उधळलेला वारु जरी जोरात असला तरी त्याचा दगाफटका युतीनं आठवलेंच्या मदतीनं थोपवला असं म्हणता येईलं, किंबहुना मनसेमुळे होणारा धोका थोपवण्यासाठी आठवलेंच्या मतांचा त्यांना फायदा झाला.. सेनेची आकडेवारी खाली आली असली तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना अडचण येणार नाही..तर दुसरीकडं दोन्ही काँग्रेसही युतीचा झेंडा खाली खेचण्यासाठी एकत्र मैदानात उतरले पण त्यांना ते जमलं नाही..उलट मागच्यावेळी स्वतंत्र लढून जेवढ्या जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या त्याही त्यांना राखता आल्या नाहीत...

मुंबई महापालिकेच्या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर त्याची अनेक कारणं देता येतील..मुंबईत नेहमीप्रमाणं यावेळीही मतदानानं ५० टक्क्यांचा आकडाही पार केला नाही..त्यामुळे ज्यांनी मतदान केलं ते अर्थातच युतीला फायद्याचं झालं..लोकांना बदल हवा असेल तर मतदानही तेवढ्याच जास्त प्रमाणात होणं अपेक्षीत होतं. त्यामुळेच की काय कमी मतदान हे युतीच्या पथ्यावरच पडलं..दुसरं असं की ऐन निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांना अवदसा आठवली आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व या निवडणुकीनंतर संपेल अशी भविष्यवाणी केली.राजकीयदृष्ट्या ही टीका शिवसेना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झोंबणं साहजित होतं..तोच धागा शिवसेनेनं पकडला आणि पुन्हा भावनिक मुद्दा पुढं आला..तर दुसरीकडं शिवसेनेवर ४० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला तोही विरोधकांवर बुमरॅग होऊन उलटला..तसच काँग्रेसला अंतर्गत वादही यश मिळवण्यात अडथळा ठरला..प्रचाराचं नियोजन नाही की सर्व नेत्यांना एकत्र करता आलं नाही. याचा परिणाम झालाच..कृपाशंकरसिंग यांनी तर मुंबईची सत्ता खेचून आणतोच आणि मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकतोच अशा आविर्भात सगळी सुत्रं हाती घेतली..कदाचित ती नारायण राणे, विलासराव, गुरुदास कामत यासारख्या काँग्रेस नेत्यांना आवडलं नसावं.

तर दुसरीकडं परप्रांतियांच्या आक्रमणाचा मुद्दा, भूमिपुत्रावरचा अन्याय या विषयावर स्थानिक मतं एकत्र होतात. तर काँग्रेससारखे सत्ताधारी पक्ष त्यांकडं दुर्लक्ष करतात..कृपाशंकरसिंग, संजय निरुपम, राजहंससिंह, यासारखे उत्तर भारतीय नेते मुजोर होत आहेत. त्याचा रागही स्थानिक लोकांच्या मनात राहतोच..उत्तर भारतातून पोट भरण्यासाठी आलेली ही मंडळी आता स्थानिकांना गुरकावतायत..!! तो संजय निरुपउद्योगी ( निरुपम ) मुंबई बंद करण्याची भाषा करतो..!! कुठून आला त्याला हा माज..? कोण तो उपटसुंभ.. ? कुणाच्या जोरावर मुंबई बंद करण्याची भाषा करतो तो..? तर दुसरीकडं म्हशीच्या गोठ्यात काम करणारा तो कृपाशंकर म्हशीवाला...!! कोकणात शंभर एकरापेक्षा जास्त जागा घेतो..उत्तर भारतीयांना एकत्र करुन स्थानिकांना डावलतो. हे मुंबईतल्या भूमिपुत्रांनी का सहन करायचं..? एकच उदाहरण देतो..मुंबई काँग्रेसचा अद्यक्ष असणा-या कृपाशंकरसिंगांची उमेदवार यादी पहा..१६९ जागा ज्या काँग्रेसच्या वाट्याला आल्या. त्यातल्या फक्त ८९ जागा मराठी लोकांना आणि बाकीच्या त्यांच्या लोकांना! हे कसं सहन करायचं..? याच काँग्रेसचा मुंबई महापालिकेतला गटनेता राजहंससिंह पालिकेतला कारभार हिंदीत चालवा म्हणून आग्रह धरतो..! हे सर्व मराठी माणूस सहन कसं करेल...? शिवसेना भाजपा युतीचा महापालिकेतला कारभार फार काय चांगला आहे असा त्याचा भाग नाही..आणि त्यांनी काही "करुन दाखवलं" म्हणून त्यांची सत्ता आली असंही म्हणता येत नाही..पण " त्या उप-यांच्या" हाती सत्ता देण्यापेक्षा आपली माणसं का नको हे गणितही त्यामागं आहे..

कारणं काहीही असो..! देशातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या या मुंबई महापालिकेवर सर्वच पक्ष सत्तेसाठी डोळा ठेवून असतात.२१ हजार कोटी रुपयांचं वार्षिक बजेट आहे या मुंबई माहनगरपालिकेचं..! केंद्रातूनही मोठी आर्थिक मदत मिळत असते मुंबईला..!त्यामुळे ही सोन्याची कोंबडी आपल्या पक्षाकडे असावी यासाठी सर्व पक्ष अगदी आसुसलेले असतात...

मुंबईत आवाज कुणाचा म्हणून विचारण्याचं धाडसही नव्हतं तेव्हाही मुंबई शिवसेनेकडेच होती आणि आता मुंबईतला सेनेचा आवाज कमी झाली असली तरीही मुंबई शिवसेनेचीच आहे..आणि बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंततरी ती शिवसेनेचीच राहिली हे सांगण्यासाठी आता कोणा ज्योतिष्याची गरज नाही...पण या निकालामुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा महापालिकेवर मानानं डौलत राहतोय ह्यातूनच ह्या फालतू नेत्यांनी काय तो धडा घ्यावा हेच या निकालाच्यानिमित्तानं सांगणं आहे...!!!!

जय महाराष्ट्र..!!


Sunday, January 22, 2012

शिवसेना बाळासाहेबांची आणि आत्ताची...



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेला जन्माला घातले ती शिवसेना आज आहे का असा सवाल सध्या विचारला जातोय. त्यात तथ्यही आहे. कारण शिवसेनेची आजची अवस्था पाहता या संघटनेची वाताहत झाल्याचंच दिसतय. सेनेचे नेते जरी त्याचा काही फरक पडत नाही असं म्हणत असले तरी ते फारसं खरं नाही..मुळात बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली त्यावर त्यांचा एकहाती अंमल होता. एक दरारा होता. त्यांची संघटनेवर, शिवसैनिकांवर जबरदस्त पकड होती. तसच त्यांनी माणसं जोडली होती. त्यांचा सामान्य शिवसैनिकांशी थेट संवाद असायचा. तसच पक्षात फक्त आणि फक्त त्यांचाच शब्द असायचा आणि तो आदेश म्हणून पाळला जात होता. शिवसेना किंवा शिवसेनेबद्दल ब्र काढण्याचीही कोणाची हिम्मत नव्हती. संघटनेतच काय बाहेरचा माणूसही सेनेबद्दल बोलताना दहादा विचार करत असे. त्यांना अनेक स्तरातून विरोध होता पण थेट अंगावर घेण्यास सहसा कोणी पुढं येत नसे. बाळासाहेबांनी सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन एक मोठा संघर्ष केला. त्यातूनच त्यांच्या संघटनेचं पक्षात रुपांतर झालं आणि बघता बघता शिवसेना सत्तेत आली. सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवून त्यांनी मोठं यश संपादन केलं. त्यानंतर त्यांनी ठाण्यात मुसंडी मारली. पण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याच बालेकिल्यात सेना वाढली, मोठी झाली. मुंबई आणि मुंबई महानगरपालिका हेच शिवसेनेच्या आर्थिक ताकदीचा स्रोत होता आणि आजही राहिलाय. कारण मागच्या ४७-४८ वर्षात सेना फक्त एकदाच राज्याच्या सत्तेवर साडेचार वर्षे होती. त्यानंतर ती सतत विरोधातच राहिलीय. त्यामुळे कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिकांचा जो आर्थिक प्रश्न असतो तो मुंबईतच मिळत होता. त्यामुळेच सेनेला सर्व प्रकारचं पाठबळ मिळालं ते मुंबईतूनच..


मुंबईत शिवसेनेशिवाय कुणाचा आवाज हि कल्पनाही केली जात नव्हती. पण ती ताकदही आता सेनेत राहिली नाही. त्यांची अलिकडची आंदोलनही फुसकी ठरलीत. मुंबई बंद पाडण्याची धमक फक्त शिवसेनेत होती. ( बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत...उद्धव ठाकरेंच्या नाही..) तर सेनेतून बाहेर पडणे ही कल्पनाही कोणी करत नव्हतं. ठाण्यातलं खोपकर प्रकरण आठवून बघा.. त्यामुळेच सेनेतून बाहेर पडणं म्हणजे आपला खोपकरच होणार ही भिती होती. म्हणून छगन भुजबळ यांनी १९९१ ला सेना सोडली तेंव्हा तेसुद्धा जीव मुठीत घेऊन अनेक महिने परागंदा होते. भुजबळांसारखा जबरदस्त ताकदीचा माणूस...मुंबईच्याबाहेर मराठवाड्यात सेनेला पोचवण्यात भुजबळांचा सिंहाचा ( वाघाचा ) वाटा आहे. पण ते शरद पवारांच्या हाती लागले..१२ आमदारांना घेऊन भुजबळांनी शिवसेनेच्या अभेद्य गडाला तडा देण्याचं धाडस दाखवलं..पण त्यांनाही पळता भूई थोडी झाली होती..पण त्यानंतर किती गेले याचा पत्ता सेनेच्या आजच्या नेतृत्वालाही नाही.. शिवसेनेत तोंड वर करण्याची हिंमत होत नव्हती पण आज तो उठतो आणि सेनेच्या नेतृत्वावर टीका करतो..अर्थात त्यांचा थेटरोख उद्धव ठाकरेंवर असतो. अनेकजण सेना सोडताना थेट उद्धव ठाकरेंवर टीका करतात. त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतात. पण बाळासाहेबांवर विश्वास आणि श्रद्धा प्रकट करतच.. हे असं का व्हावं ? शिवसेनेची ही अवस्था का झाली ? याची उत्तरही सर्वांना माहित आहेत. मुळात बाळासाहेबांची शिवसेना एक आक्रमक संघटना होती. त्याचं नेतृत्व बाळासाहेबांच्या वज्रमुठीत होतं. त्यांचा शब्द आदेश होता. बाळासाहेबांच्या एका शब्दाखातर जीवाची बाजी लावणारी माणसं त्यांनी जोडली होती. म्हणूनच बाळासाहेबांना त्यांच्या शिवसेनेत मानाचं स्थान आहे. इतर पक्षातल्या लोकांमध्येही बाळासाहेबांबदद्ल आदर आहे. त्यांची मैत्रिही मोठीही दिलदार आहे. शरद पवार, अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध आजची चर्चिले जातात.. वाघाची संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जायचं. पण तो आब.. तो रुबाब आता राहिला नाही...

बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची धुरा सोपवली तेव्हापासूनच शिवसेनेच्या अधोगतीला सुरवात झाली. मुळात शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेला गरज आहे ती तेवढ्याच आक्रमक नेतृत्वाची आणि उद्धव यांच्य़ात ती नाही. उध्दव हे सौम्य स्वभावाचे आणि कलाकाराच्या मनाचे. त्यांना सेनेची धुरा तर दिली पण ती पेलवता आली नाही. त्यातच त्यांचं सल्लागार मंडळ हेच कुचकामी आहे. त्यांच्या अवतीभवतीच्या नेतेमंडळीची नावं घेतली तर ती शिवसेनेच्या स्वभावाला कुठचं मिळत नाहीत. त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंच्या जवळचे म्हणून त्यांचा शब्द चालतो आणि इतरांना डावललं जातं ही भावना शिवसेनेत झालेली आहे. शिवसेनेच्या खासदार आमदारांनाही जर सेनेचं नेतृत्व वेळ देत नाही असा आरोप होत असेल तर ती गंभीर बाब आहे. जी शिवसेना व्हॅलेंटाईन डे सारख्या प्रकारांना आपल्या तोडफोडवृतीनं विरोध करायची तीच सेना आता तरुण व्होट बँक आणि नातवाच्या नेतृत्वामुळे मवाळ भूमिका घेतं ही कुठली शिवसेना ? तर जे बाळासाहेब ठाकरे घराणेशाहीवर जबरदस्त प्रहार करत त्यांनीच सुरवातीला उद्धव यांच्याकडे संघटनेची-पक्षाची जबाबदारी सोपवली...त्याचा कहर म्हणून की काय पुतण्या राज ठाकरेंच्या मनसेला तोंड देण्यासाठी नातू आदित्यला मैदानात उतरवलं. याला घराणेशाही नाही तर काय म्हणायचं.. ?मुळात आदित्यला अजून मिसरुडही फुटलेलं नाही तर युवा सेना नावाची सुभेदारी बहाल केली...मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यालाही उद्धवबरोबर आदित्यला मान द्यावा लागतो हे कशाचं द्योतक आहे. सेनेच्या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नेत्यांना व्यासपीठावर जागा मिळत नाही मात्र आदित्यला मात्र पहिल्या रांगेत जागा. हे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न नाही तर काय..?

शिवसेनेच्या मागच्या ४७-४८ वर्षातल्या इतिहासावर बरचं काही लिहण्यासारखं आहे. पण बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यातलं अंतर आणि फरक पडताळण्याचा हा प्रयत्न आहे..बाळासाहेबांची शिवसेना ते आदित्य ठाकरेंची युवासेना व्हाया उद्दव ठाकरेंची सेना हा प्रवास शिवसैनिकांनी पाहिलाय..पण तो शिवसैनिकांनाच पचणी पडत नाही. शेवटी काय ? ज्या संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी आपलं सर्वस्व वाहिलं त्यांना काहीच किंमत नाही. शिवसेना वाढवण्यास, त्याला पाठबळ देण्यात वाघाचा वाटा ज्यांचा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि आदेश बांदेकरसारख्यांना थेट विधानसभेची उमेदवारी असा प्रकार शिवसैनिकांनाही आता सहन होण्याच्या पलीकडे गेलाय. त्यांच्याही मनात जय महाराष्ट्र..करा कष्ट आणि व्हा नष्ट अशीच भावना वाढीस लागलीय...म्हणूनच सेनेचा गड आता गड राहीला नाही तर तोसुद्धा मुंबईतल्या फ्लॅट संस्कृतीसारखा आकसलाय. तोसुद्धा वन बिएचके किंवा वन रुम किचनसारखा छोटा झालाय. त्यामुळं त्याला आता गड म्हणनंही आतिशयोक्ती वाटतंय. याच बदलत्या नेतृत्वामुळं सेनेतून नारायण राणे, राज ठाकरे, सुरेश प्रभुंसारखे असंख्य मोहरे त्यांना सोडून गेले...आणि उरलेत ते फक्त कारकून आणि बारभाई..त्यांच्या जीवावर सेनेचा हा गाडा ओढला जातोय..बाळासाहेबांच्या आजच्या वाढदिवशी त्यांना त्यांनीच उभी केलेली जीवापाड प्रिय असलेली शिवसेना फुटताना त्याला तडे जाताना पाहण्याचं दुखः पचवावं लागतय...याला काय म्हणावं ? पण हा शिवसेनेचा डोलारा पुन्हा उभा रहावा अशीच तमाम मराठी मनाची आणि असंख्य शिवसैनिकांची आजही इच्छा आहे. ती पुन्हा मानानं उभी रहावी आणि मुंबईतही आवाज कुणाचा ? असा आवाज घुमला पाहिजे एवढीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त अपेक्षा...

जय महाराष्ट्र..