Showing posts with label राज ठाकरे. Show all posts
Showing posts with label राज ठाकरे. Show all posts

Saturday, May 31, 2014

राज ठाकरेंचा करिश्मा संपलाय का ?

 
 
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची वाट लावायला निघालेल्या राज ठाकरेंना लोकांनी मोठा दणका देत त्यांची औकात दाखवून दिलीय....नरेंद्र मोदींच्या नावाचाही त्यांनी वापर केला पण त्याचाही काही परिणाम झाला नाही...गेल्या निवडणुकीत लाखालाखांची मतं घेऊन मुंबईतले महायुतीचे सर्व उमेदवार मनसेनं पाडले होते. पण यावेळी कल्याणच्या राजू पाटलांचा अपवाद वगळता मनसेच्या एकाही उमेदवाराला लाखाच्यावर मतं मिळालेली नाहीत. पण ते 1 लाख 22 हजार मतं घेऊनही तिस-याच क्रमांकावर राहिले. तर मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधून डॉ. प्रदीप पवारांचं डिपॉझिही जप्त झालं. गंमत म्हणजे मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी राज ठाकरेंनी निवडणूकीपूर्वीच पाठिंबाही देऊन टाकला होता...पण लोकांनी थेट महायुतीच्या उमेदवारांन मतं देणं पसंत केलं...लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या २३ तर शिवसेनेच्या तब्बल 18 जागा निवडून आल्या....त्यामुळे शिवसेनेची वाट लावण्याच्या नादात राज ठाकरे स्वतःच तोंडावर पडले...
मनसेनं दहाच उमेदवार उभे केले पण त्यांना यावेळी लोकांना साफ नाकारलं..मतांचा विचार केला तर या निवडणुकीत मनसेला अवघी दीड टक्का मतं मिळालीत....राज ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी आपवर टीका करताना महाराष्ट्रात मनसेच बाप असल्याची वल्गना केली होती...पण मतदानाच्या टक्केवारीतही आपनच मनसेला मागे टाकलंय...केजरीवालांच्या आपला महाराष्ट्रात 2.3 टक्के मतं मिळालीत. मनसेला सत्ता द्या, महाराष्ट्राताला सुतासारखा सरळ करून दाखवतो असं म्हणणा-या राज ठाकरेंनाच मतदाराजांनी त्यांची जागा दाखवून दिलीय.
राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेला त्यातही तरुणवर्गाला एक मोठं स्वप्न दाखवलं होतं..राज्यात एक नवा पर्याय त्यांनी उभा केला होता..राज ठाकरेंवर विश्वास दाखवत लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं.. मीडियानंही राज ठाकरेंना भरपूर फुटेज दिलं..लाखा-लाखांच्या सभा झाल्या...यातूनच नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली...कल्याण डोंबिवलीत मनसेनं मोठी मुसंडी मारली...तर पुण्यातही २९ नगरसेवक निवडून दिले....पण त्यानंतर मनसेचा आलेख खाली आला..राज ठाकरे फक्त भाषणबाजीच करतात.. प्रत्यक्षात काहीही करत नाहीत असा लोकांना प्रत्यय आला..त्यातच मोदींची लाट आली आणि या लाटेत मनसेही साफ धुवून गेली..आता विधानसभा निवडणुकीत लोकांनी जर राज ठाकरेंना नाकारलं तर मात्र त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात जाईल...   

Wednesday, April 9, 2014

राज ठाकरेंचं चाललय तरी काय ?

 
 
 
लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढवणार का नाही याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली पण मोजक्याच जागांवर उमेदवार उभे करून त्यांना काय साध्य करायचंय हे स्पष्ट झालेलंच आहे. शिवसेना हाच आपला नंबर एकचा शत्रू आहे हे राज ठाकरे यांनी जाहीरच केलय. केवळ शिवसेनेचे उमेदवार पाडण्याच्या एकमेव उद्देशानं राज ठाकरे यांनी 10 उमेदवार दिलेत. त्यातला अपवाद फक्त पुणे आणि भिवंडी..या दोन ठिकाणी भाजपच्या उमेदवाराविरोधात मनसेचे उमेदवार आहेत. नरेंद्र मोदींबरोबरची मैत्री जाहीरपणे मान्य करायची, त्यांना पाठिंबा द्यायचा आणि त्याचवेळी महायुतीतल्याच शिवसेनाला कट्टर विरोध करायचा हेच धोरण राज ठाकरेंनी अवलंबलय.
राज विरुद्ध उद्धव ठाकरे
मनसेला महायुतीत घेण्याचा भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण त्याला शिवसेना आणि विशेषतः उद्धव ठाकरेंनी विरोध केला. टाळीसाठी उद्धव ठाकरेंनी हात पुढं केला होता पण तेही फारसे गंभीर नव्हते. त्याला राज यांनी प्रतिसाद दिला नाही तो भाग वेगळा. दोन ठाकरे बंधूमधल्या तीव्र विरोधामुळे अखेर मनसेला महायुतीत जागा काही मिळाली नाही. त्यातच उद्दव ठाकरे यांनाच मनसे महायुतीत नको आहे असं सांगून भाजप नेत्यांनी आगीत तेल ओतलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनाला विरोध करण्यासाठी 10 उमेदवार उतरून राजकारण केलय..
मनसेचा फायदा कोणाला ?
राज ठाकरे महायुतीत जाणार का याची चर्चा दोन वर्षापासून सुरु होती. त्यातच शिवसेना आणि मनसेच्या दुस-या फळीतल्या नेत्यांनीही महायुतीत मनसे असावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण ते शक्य झालं नाही..मुळात राज ठाकरे यांचा काँग्रेसला सॉफ्ट कॉर्नर आहे असं बोललं जात होतं. मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून तरी असचं दिसलं. मनसेमुळे मुंबई आणि आसपासच्या अनेक जागांवर भाजप शिवसेनेला फटका बसला आणि त्याचा थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. आता मात्र मनसेच्या राजकीय खेळीचा आघाडीबरोबरच भाजपलाही फायदा होणार आहे.
 
मनसेचं टार्गेट फक्त शिवसेना
लोकसभेच्या यावर्षीच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेला टार्गेट केलंय. पण मागच्या काही सभांमधून ते ज्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर सडकून टीका करत होते. तशी टीका त्यांनी केलेली नाही. अगदी काँग्रेसवरही फारच सौम्य टीका केलीय. अजित पवार आणि आर. आर. तर राज ठाकरेंचं खास गि-हाईकच, पण ते यावेळी होताना दिसत नाही. त्यातच शरद पवारांनी राज ठाकरेंची स्तुती केलीय. यातून महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्याआड वेगळीच जमवाजमव झाल्याचं दिसतय. राज ठाकरे यांचा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला सॉफ्ट कॉर्नर तर शिवसेनाला प्रखर विरोध..राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सभांतून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. तर भाजपचं आतून राज ठाकरे प्रेम हे सर्वश्रुत झालय. त्यामुळे महाराष्ट्रात तरी शिवसेनाला टार्गेट करण्यावर सर्व पक्षांनी भर दिलाय.
नवे राजकीय समिकरण!
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राज ठाकरे आणि भाजप यांच्यात काही राजकीय बेरीज झाली तर नवल वाटायला नको. तसंही राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी मित्र नसतो तसा शत्रूही नसतो...
  
 
 
 
 
 

Tuesday, January 21, 2014

मनसेची वाट बिकट




महाराष्ट्रात आम्ही आहोत बाप कशाला पाहिजे आप...असं राज ठाकरेंनी नाशिकमध्ये ठणकावलं.. पण राज ठाकरेंना महाराष्ट्रानं अजून तरी बाप म्हणून स्विकारालेलं नाही..मागच्या विधानसभा निवडणुकीत जरी 13 आमदार, नाशिक, पुणे, कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी ते कोणत्याचं अर्थानं बाप ठरलेले नाहीत..मनसेनं महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते दिवे लावले म्हणून त्यांना लोकांनी बाप म्हणून स्विकारावं याचं उत्तरही राज ठाकरे देऊ शकणार नाहीत. 2009 च्या निवडणुकीत ज्या आशेनं तरुणवर्ग राज ठाकरे यांच्यामागे गेला. त्यांचा आता भ्रमनिरास झाल्याचं दिसतय. पण दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या उदयानंतर देशातलं राजकारण बदलय. त्याचा विचार मनसेला करावा लागणाराय..

 

ब्ल्यू प्रिंट कुठे आहे?

मनसेची स्थापना करताना राज ठाकरे यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करुन वाटचाल करण्याची गर्जना शिवाजी पार्कवर केली होती. माझ्या हाती सत्ता द्या, मग बघा सर्वांना कसं सरळ करतो. असं ते नेहमी म्हणतात. 13 आमदार आल्यानंतर विरोधी पक्ष काय असतो ते आम्ही दाखवून देऊ असं ते म्हणत...पण नाशिक महापालिकेची सत्ता ,पुणे, कल्याण डोंबिवली महापालिका असो वा विधानसभा, मनसेनं लक्षात राहिलं असं काही केल्याचं दिसत नाही...

ना आंदोलन, ना कार्यकर्त्यांना कार्यक्रम

राज ठाकरे यांच्या पक्षानं गेल्या पाच वर्षात लोकांच्या प्रश्नांसाठी कोणतं आंदोलन केले वा कोणता प्रश्न तडीस लावला हे त्यांनाही आठवत नसेल. फक्त उत्तर भारतीयांच्या नावावर कुठेतरी धिंगाणा घालणं यापलीकडे त्यांनी फारसं काही केलेलं नाही...त्यातच ज्या अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली होती त्याच बचच्न यांना मनसे चित्रपट सेनेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आणि झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला..तर टोल नाक्याच्या प्रश्नावर केलेलं आंदोलनही दोन दिवसातच मागं पडलं. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर वातावरण तापल्यानंतर एका मोर्चात दस्तुखुद्द राज ठाकरे अवतरले पण काही अंतर चालत जाऊन ते पुन्हा परत गेले. खरं तर टोलविरोधी आंदोलन जर त्यांनी तडीस नेलं असतं तर मनसेची लोकप्रियता आणखी वाढली असती. पण माशी कुठं शिंकली माहित नाही. पुन्हा त्यावर मनसेचा आवाज निघालाच नाही.

मुंबईत काय केले ?

मुंबईत रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न नेहमीच गाजतो पण एखाद्या कॉँट्रॅक्टरच्या थोबाडीत मारण्यापलिकडे  त्यांनी काही केलं नाही. फक्त खळ्ळ खट्ट्याक एवढेच आवाज काढण्याचं काम करायचं आणि तो विषय तिथंच सोडून द्यायचा हाच उद्योग मनसेनं केला. ज्या मुंबई, नाशिक, पुणे पट्ट्यात मनसेला चांगलं यश मिळालं तिथं तरी त्यांची कामगिरी काय..लक्षात राहिलं असं त्यांनी काय केलं याचं उत्तर त्यांनाही देता येणार नाही. पुणे महापालिकेत मनसेचे चांगले 26-27 नगरसेवक आहेत. नाशिकमध्ये मनसेचा महापौर आहे. खेड नगरपालिकेत मनसेची सत्ता आहे असं असनूही त्यांचे नगरसवेक कामात छाप पाडू शकले नाहीत. कल्याण डोंबिवलीतही मनसेला चांगल्या जागा आहेत. पण तिथंही प्रभावी विरोधीपक्ष म्हणून त्यांनी छाप पाडलेली नाही...

मनसेचा विस्तार कुठे झाला ?

महाराष्ट्राच्या इतर भागात मनसेची स्थिती फारसी चागंली नाही. मनसेचं संघटनही ग्रामिण भागात पोहचलेलं नाही. शेतक-यांच्या प्रश्नावर त्यांनी कधी आवाज उठवला नाही..विदर्भातल्या शेतक-यांच्या आत्महत्यांचा विषय कधी लावून धरला नाही. दुष्काळावरही फारसं काही केलं नाही. अशा स्थितीत कधीतरी टीव्हीवर येऊन काही भूमिका मांडणं आणि जाहीर सभा घेऊन पक्ष कसा वाढणार..त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तयार केली पाहिजे. त्यांना काहीतरी कार्यक्रम दिला पाहिजे. तो देण्यात मनसे कमी पडली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता देण्याची भाषा करण्याअगोदर राज ठाकरे यांनी स्वतःची कार्यपद्धती बदलली पाहिजे तरच त्यांना चांगलं यश येईलं अन्यथा एक होता मनसे असचं म्हणावं लागेल....

 

Saturday, August 25, 2012

राज ठाकरेंचा झंझावात


महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मंगळवारी 21 तारखेला जो मोर्चा काढला त्यानंतर राज्यातील राजकीय चित्र ढवळून निघालाय. 11 ऑक्टोबरला आझाद मैदानावर ज्या काही मुस्लीम संघटनांनी नंगानाच केला. पोलिसांवर हल्ला केला, महिला पोलिसांचा विनयभंग केला, गाड्या जाळल्या, प्रसार माध्यमांच्या ओबी व्हॅन जाळल्या. एवढ्यावरच्या हे आंदोलक थांबले नाहीत तर तिथं असणाऱ्या अमर जवान ज्योतीला लाथेनं उडवून लावलं.. हा सगळा धुडगुस घातला तेव्हा मुंबई पोलीस तो उघड्या डोळ्यांनी पहात होते. खरं तर हा मोर्चा ज्या रझा अकादमीनं आयोजित केला होता त्यांची पार्श्वभूमी सरकारला माहित होती. हिंसक कारवाया करण्यात त्यांचा सहभाग आहे हे पोलिसांना माहित होतं. त्यांच्या मोर्चाला मुळातच परवानगी द्यावयास नको होती, पण ती दिली. त्यावरही कहर म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा अहवाल होता की आंदोलक मंडळी हिंसक कारवाया करणार आहे, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. त्यावरुन राज्यात असंतोष माजला. लोकांच्या मनात चिड निर्माण झाली. कारण एवढा सगळा नंगानाच घातल्यानंतरही कारवाईच्या बाबतीत मात्र सरकार शांत राहिलं. बघु करु अशी भूमिका घेतली गेली, त्यावरुन लोकांच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला. राजकीय पक्षांनीही कारवाईची मागणी केली..पण सरकार आणि गृहमंत्री आर आर पाटील मात्र कारवाईच्या बाबतीत थंडच राहिले..या सर्व प्रकारावर आर आर पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांची भूमिका संशयास्पद राहिलीय..

रझा अकादमीनं घातलेला हिंसक गोंधळ, त्यात पोलिसांवर हल्ला, अमर जवान ज्योतीचा अपमान हे अवढं सगळं होऊनही आर आर पाटील कारवाई करण्याएवजी विरोधकांनाच दोष देत राहिले.. राज ठाकरे यांनी हाच मुद्दा घेऊन आर आर पाटील आणि पटनायक यांच्यावर थेट हल्लाबोल केला..राजीनामा द्या ह्या मागणीसाठी त्यांनी 21 तारखेला मोर्चा काढला...ह्या मोर्चाला मात्र पोलिसांनी कायद्याचा किस पाडत परवानगी नाकारली. पुन्हा अल्पसंख्याक समाजाची बाजू घेतल्याचं स्पष्ट झालं.फक्त आझाद मैदानावर सभा घेण्यास परवानगी दिली. त्यासाठी जवळपास 15 हजार पोलिस बंदोबस्ताला ठेवले..म्हणजे 11 तारखेला जी खबरदारी घ्यावयास हवी होती ती घेतली नाही मात्र मनसेच्या मोर्चात अडथळे आणण्यासाठी एकही संधी सोडली नाही. यावरुनही लोकांच्या रागाचा पारा चढला होता. पोलीसांच्या परवानगीची वाट न पाहता राज ठाकरेंनी मोर्चा काढला. त्यांनी सरकारला शिंगावरच घेतलं..तो मोर्चा आणि सभेची गर्दी पाहून राजकीय पक्ष अचंबितच झाले. एक लाख लोकांचा मोर्चा आणि सभा घेऊन राज ठाकरेंनी मोर्चा कसा काढावा हेच दाखवून दिलं. या सभेतून आणि मोर्चातून राज ठाकरेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. आझाद मैदानावरच्या सभेत अवघ्या 15 मिनीटाच्या भाषणात त्यांनी आर आर पाटील, अरुप पटनायक ह्यांच्यावर हल्ला तर चढवलाच पण त्यांचं लाडकं पेटंट अबु आझमीलाही त्यांनी शिव्या घातल्या. रामदास आठवलेंसह सर्वच दलित नेत्यांनाही त्यांनी झोडपून काढलं..तर दुसरीकडं पोलिसांची बाजू पूर्णपणे उचलून धरली, प्रसारमाध्यमांची बाजू घेतली, सर्व विरोधी पक्षांवर कडी केली आणि सरकारला जो विरोध केला पाहिजे तो कसा करावा हे दाखवून दिलं..मुस्लीम समाजकंटांवर हल्ला चढवत आपला मोर्चाही हळूहळ हिंदुत्ववादी नेता अशी करुन दिली..आपला धर्म हा महाराष्ट्र धर्म म्हणत त्यांनी जरी हिंदुत्वाची वाट धरल्याचं सरळ सरळ मान्य नाही केलं तरीही त्यांनी ज्या पद्धतीनं हा सगळा पट मांडला तो हिंदुत्ववाद्यांना तर नक्कीच भावलाय..

राज ठाकरेंनी ह्या मोर्चातून अरुप पटनायक आणि आर आर पाटील यांनाच टार्गेट केलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अरुप पटनायक यांची बदली करण्यात आली..त्यांना महासंचालकपदी बढती दिली असली तरी मुंबईचं आयुक्तपद गेलंच..आता लक्ष्य फक्त आर आर पाटील..कदाचित येत्या काही दिवसात हे प्रकरण थोडं शांत झाल्यानंतर आर आर पाटलांचाही राजीनामा किंवा खातेबदल झाल्यास नवल वाटायला नको..एक मात्र खरं राज ठाकरेंनी आपली ताकद दाखवून दिली..मीच सरकारला अंगावर घेऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. लाखाचा मोर्चा काढून इतर विरोधी पक्षांना म्हणजे शिवसेना, भाजपलाही त्यांनी त्यांची ताकद किती आहे हे दाखवून दिलं.. 2014 च्या निवडणुकींची ही सुरुवात आहे. आपला रस्ता काय आहे हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलय. पोलीसांमध्ये सहानुभूती निर्माण करुन, प्रसार माध्यमांनाही त्यांनी आपण तुमचे तारणहार आहोत हे जसं त्यांनी दाखवून दिलं. तसच अबु आझामी, दलित नेत्यांना टार्गेट करत अल्पसंख्याक समाजाला आपल्याकडे या अन्यथा तुमची गरज नाही हेही दाखवून दिलं. मुस्लीम आणि अबु आझमींना दणका देत हिंदुत्ववाद्यांनाही त्यांनी चुचकारलंय अर्थात त्यामुळे संघ आणि हिंदुत्ववाद्यांच्या मनात राज ठाकरेंनी घर केलंय. ह्या सर्वांचा परिणाम आगामी निवडणुकीत मनसेला होणार हे नक्की..फक्त हा राजकीय सारीपाट राज ठाकरे पुढच्या काही महिन्यात कसा रंगवतात त्यावर त्यांची राजकीय भिस्त असणाराय. पण त्यांनी आता टाकलेले फासे जर असेच पडले तर मनसे आणि राज ठाकरेंना मोठा राजकीय फायदा होणार हे मात्र आत्ताच पक्कं झालय.