जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाचा वाद अजून मिटलेला दिसत नाही..पुण्यात काल ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना शिवसेनेच्या काही लोकांनी जैतापूरच्या प्रकल्पावर बोलण्यास मज्जाव केला.. झालं असं की..काकोडकर हे पुण्यातल्या एका कार्यक्रमात अणु ऊर्जा प्रकल्पावर व्याख्यान देणार होते.. हे तिथल्या शिवसेनेच्या काही नेत्यांना कळलं आणि त्यांच्या लक्षात आलं की शिवसेनेचा जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे..तर मग हे काकोडकरसाहेब कसं काय त्याचं समर्थन करत आहेत..? आपल्या साहेबांचा विरोध असताना काकोडकर या विषयावर बोलतात म्हणजे काय..? झालं की मग दहा वीस टाळक्यांनी मिळून कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन काकोडकरांना अणु उर्जा प्रकल्पावर बोलू नका अशी तंबी दिली..! आयोजकांनीही राडा नको म्हणून जौतापूरचा विषय टाळला...शिवसनेच्या नेत्यांनी काम फत्ते झाल्याच्या आविर्भावात प्रसारमाध्यमांना सर्व माहिती दिली..पण अणु ऊर्जेसारख्या गंभीर विषयावर शिवसेनेच्या त्या संबंधित लोकांना तरी किती माहिती आहे याचा त्यांनीच विचार करायला हवा..! दुसरं असं की शिवसेनेचा जरी त्या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांनी राजकीय पातळीवर तो करावा.. त्यासाठी अनिल काकोडकर सारख्यांना बोलण्यास मज्जाव करून काय साध्य होणाराय..? का उठसुठ आम्हाला पटत नाही म्हणून, तुम्ही हे करु नका ते करु नका..नाहीतर आमच्या स्टाईलनं धडा शिकवू ही भाषा आता पुरे झाली..! राज्यात मागच्या पाच सहा वर्षापासून विजेचं भारनियन हे प्रचंड प्रमाणात होत आहे..सरकारी आकडेवारीनुसारच बारा बारा तास विजेचं भारनियमन केलं जातय..प्रत्यक्षात ते त्यापेक्षाही जास्त असतं.. शेतीला पाणी देण्याचा प्रश्न आहे.. शेतीसाठी तर रात्रीच पाणी द्यावं लागतय. मागच्या पंधरा वर्षात एकही वीज निर्मिती प्रकल्प राज्यात उभा राहिलेला नाही असं असताना जैतापूरमध्ये १० हजार मॅगावॅटचा जो अणु ऊर्जा प्रकल्प उभा राहत आहे त्याला विरोध कसला करताय..कारण काय तर अणु ऊर्जा प्रकल्प हे घातक असतात. त्यासाठी हे मागच्या वर्षी जपानमध्ये झालेल्या अणु ऊर्जा प्रकल्पातील अपघाताचं उदाहरण देत आहेत..आणि काकोडकर हे अणु ऊर्जा प्रकल्प धोकादायक नाहीत हे सांगत आहेत.. ! हेच त्या शिवसेनेला पटत नाही..पण आपण विरोध कोणाला करत आहोत याची थोडी या लोकांनी माहिती घ्यावी..प्रकल्प उभा करायचा की नाही ते केंद्र आणि राज्य सरकार ठरवेल ना.. आणि तुमच्यात जर धमक असेल तर सरकारला जाब विचारा ना..! त्यांच्याकडे जाऊन विरोध करा..!! काकोडकरांना बोलण्यास मज्जाव करून जैतापूरचा प्रश्न सुटणार आहे का..?
राज्यातला विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी विधायक करुन दाखवायचे सोडून फक्त विरोध करायचा हे योग्य नाही..ज्या शिवसेनेचा अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे त्यांनीच दाभोळच्या एनरॉन प्रकल्पालाही विरोध केला होता..पुढे काय झाले हे त्या विरोध करणा-यांनी थोडं पहावं आणि मग विरोधाची भाषा करावी..एकतर काही चांगलं करायचं नाही, जे करतात त्यांना करु द्यायचं नाही, हे धंदे आता राज्यात थांबले पाहिजेत...स्वतःला समाजाचे ठेकेदार म्हणवणारे हेच शिवसेनेचे लोक कालपर्यंत व्हॅलेंटाईन डे ला विरोध करत होते..राडेबाजी करुन ग्रिटिंगची दुकानं फोड. बागेत बसलेल्या जोडप्यांना चोप दे असले उद्योग करणारे हे महाभाग याच वर्षी झालेल्या व्हॅलेटाईन डे ला कुठे होते..? कारण सोप्पं आहे. यावेळी महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या तरुण मतदाराला त्यांना दुखवायचं नव्हतं म्हणून त्यांनी विरोध केला नाही..त्यातच त्यांचे युवा सेनापती अजून कॉलेजात जातात त्यांच्या भवितव्याचा विचार करुन व्हॅलेंटाईनच्या विरोधाची तलवार त्यांनी मान्य केली..आज व्हॅलेंटाईनचा विरोध माळवलाय..कारण त्यात त्यांना फायदा दिसू लागलाय..विरोध केला तर युवराजांचे भवितव्य धोक्यात येऊ शकतं म्हणून तरुण वर्गाला दुखावण्याचं त्यांनी टाळलं..उद्या जैतापूरप्रश्नी काही तोडपाणी झालं की त्याचाही विरोध मावळणार..पण ती वेळेयेईपर्यंत ही तालिबानी पद्धत का..? लोकांना त्याचा जो हकनाक त्रास होतोय तो थांबवायला नको का...? सेनेचं नवं नेतृत्व त्यातही लक्ष घालेल आणि उगाचच विरोधाला विरोध न करता योग्य त्या ठिकाणी आपली शक्ती वापरेल अशी अपेक्षा करुयात..
दुसरं असं की राज्यात आज विजेचा प्रचंड तुटवडा आहे..राज्य अंधारात असताना ऊर्जा प्रकल्पांना विरोध करणं आपल्या हिताचं नाही हे महाराष्ट्रानं एनरॉन प्रकल्पाला विरोध करुन अनुभवलंय. एका एनरॉनला विरोध केला त्यानंतर राज्यात पुन्हा कोणत्याच विज निर्मीती कंपनीनं गुंतवणुक केलेली नाही..त्याचे चटके राज्याला मागच्या दहा वर्षापासून बसत आहेत..त्याचा आपण बोध घ्यायला हवा..पण पुन्हा तोच कित्ता गिरवला तर हे राज्य अंधारात जाईलं आणि पुन्हा कोणीही महाराष्ट्रात विज प्रकल्पात तरी गुंतवणुक करण्यास धजावणार नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं.. त्यामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा राज्याच्या हिताचा आहे..त्याला विरोध न करता तो लवकरात लवकर कसा पुर्ण होईल आणि आणखी ऊर्जा प्रकल्प राज्यात कसे येतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी शिवसेनेनं सरकारवर दबाव टाकावा आणि राज्य विजेच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघेल याकडं लक्ष दिलं तर जनता त्यांनाही धन्यवाद देईलं...




