Wednesday, February 1, 2012

गणित-आयुष्यभर न सुटलेलं..

गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवणा-यांचा मला हेवा वाटतो. यांना १०० मार्काचा पेपर असो किंवा १५० मार्कांचा पैकीच्या पैकी मार्क पाडतातच. अशा विद्यार्थांची संख्या कमी असली तरी त्यांना एवढे मार्क कसे काय पडतात याचं मला आश्चर्य वाटत राहिलय. बरं त्यातल्या एखाद्याला एक दोन मार्कजरी कमी पडली तरी त्यांच्या चेह-यावरचे भाव जणू काही आभाळ कोसळलय की काय असेच असतात. १०० पैकी ९९ किंवा १५० पैकी १४९ मार्क मिळाले याचा आनंद होण्यापेक्षा एक मार्क कसा काय कमी पडला याचचं त्यांना मोठं टेन्शन.. मला नाही बाबा कोणत्याच विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळाली..आपली पोच फक्त फर्स्ट क्लास पर्यंतचीच..गणित म्हणावं तर दहावीला कसंबसं पास झालो आणि इतर विषयांची मार्कस बरी असतानाही फक्त या गणितानं सगळा खेळ खाली आणला..बरं या गणिताचं कोडं कधी मला सुटलच नाही..ती आकडेमोड, लसावी-मसावी, द.सा.द.शे. पर्यंत ठीक होतं. पण ते कंस सोडवा वगैरे प्रकार काय, मला आयुष्यात जमला नाही..काय तर ते कंसात काही आकडे वजाबाकी, भागाकार, गुणिले करा, कंसाच्याबाहेर डोक्यावर एखादा अंक किंवा अक्षर आहेच ! मग ते सोडवा...मला कळत नाही कंस सोडवायचाच तर मग त्यांना कंसात टाकलच का ?..बरं त्या आकड्यांनी किंवा अक्षरांनी काय गुन्हा केलाय म्हणून त्यांना पोलीस कोठडीत टाकावं तसं कंसात बंद केलय ?..आणि त्याचा व्यवहारात तर काय उपयोग झाल्याचं मला आठवत नाही.गणिताबद्दलचं माझं मत हे पहिल्यापासूनचं म्हणजे जेव्हा गणितानं एकमागून एक वर्षात दगा दिला तेव्हापासूनचं..

दहावी झाली आणि या गणिताचा ताप संपला..सुटलो बुव्वा आता, असं म्हणत कला शाखेला गेलो..पण आजही मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ते हे की, हे विद्यार्थी एवढे तरबेज कसे ? बरं पेपर हा तीन तास आणि १०० किंवा १५० मार्काच्या मर्यादेत असतो म्हणून बरं. त्यांना अख्खं पुस्तक विचारलं तरी ते सांगणारच..असो मला आता गणित आठवण्याचं कारण असं की जगण्यासाठी धडपड करणा-या माझ्यासारख्या असंख्य मित्रांनी या गणिताचा तिरस्कार केलाय. त्याच्यापासून दहावीनंतर सुटका करुन घेतलीय पण कोणाच्याही आयुष्यातून गणित त्यांना सोडून गेलेलं नाही. आयुष्यातली ही गणितं सोडवताना जीव अनेकदा मेटाकुटीला येतो. पगाराचा आणि महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ घालताना आकडेमोड करावी लागते. तिथं गणितातलं कुठलचं सुत्र कामाला येत नाही. शाळेतल्या गणिताला कसं त्या विशिष्ट सुत्रात बांधलेलं असतं. ज्याची ती सुत्रं पक्की तो पायरी पायरीनं गणित सोडवतो. एखादी पायरी चुकली तर उत्तर चुकतं, एक दोन मार्क कमी होतात..पण आयुष्यातली गणितं सोडवताना कुठं असतात अशी सुत्रं. एखादी पायरी चुकली की सगळं मुसळ केरात...

जगण्यासाठी सुरु असलेल्या या धडपडीत कोणाची किती गणितं सुटली आणि किती राहिली हे वेगळचं. बरं समस्या थोड्याफार फरकानं सारख्याच असल्या तरी प्रत्येकाची गणित सोडवण्याची पद्धत वेगळी, सुत्र वेगळं आणि अर्थातच उत्तरही वेगळंच...मग ज्यांनी गणितात पैकीच्या पैकी उत्तरं मिळवली होती त्यांच्याही आयुष्यातल्या गणिताची बाकी कधी बेरजेत, शिल्लकी राहत असेल काय. का त्यांच्याही आयुष्यातली गणितं सोडवताना दमछाक होतेच ना.? कितीही आकडेमोड करा सर्वसाधारणपणे सर्वांचीच शिल्लक एकतर शून्य येते किंवा वजा येते, शिलकी गणित कधी बेरजेत राहतच नाही, जसं आपल्या राज्याचं अंदाजपत्रक नेहमी वजाबाकीचचं असतं आणि कर्जाचा डोंगर वाढलेला असतो. जगण्याच्या या धडपडण्यात गणित सोडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एक गणित सुटलं तर दोन तीन पुन्हा उभी राहतातच की..पगाराच्या दिवसाची आतुरतेनं वाट पहायची आणि पगार जमा होतात हिशोबाची वजाबाकी सुरु..पेपरवाला, टीव्हीवाला, दूधवाला. भांडीवाली, कपडेवाली, लाईटचं बिल, घराच्या कर्जाचा हप्ता, मुलांची शाळेची फी, एलआयसीचा हप्ता, महिन्याचा किराणा ह्या सर्व पायऱ्या सोडवता सोडवता शिल्लक काही रहातच नाही.. सगळं कसं जेमतेम, तेवढचं किंवा वजाबाकीतच जातं..मग आयुष्याच्या संध्याकाळचा विचार करुनच सगळं गणित बिघडतं..पगाराचा सर्व पैसा तर महिन्याची आकडेमोड करण्यातच गेला तर मग बाकी काय राहणार ?..आमचा कंस त्यामुळेच कधी सुटला नाही, तो शाळेतल्या गणिताचा असो किंवा आयुष्यातल्या गणिताचा ! आमचे आकडे आणि अक्षर कंसातच राहिली, वर कंसाच्या बाहेर असलेल्या आकड्याप्रमाणं भविष्याची चिंता मुलाची आणि आपलीही कायमच राहते ! नाही सुटत हे गणित. माझचं काय अनेकांचंही असचं होतच.. अगदी कंस न सोडवल्यासारखं...

बरं, आयुष्यातली ही बेरीज वजाबाकी करताना पगार हाच आम्हाला मिळणारा एकमेव आकडा..त्यामुळे वजाबाकीसारखं एक उसणा आकडा घेण्याचंही धाडस होत नाही..कारण घेतलेला तो आकडा पुन्हा परतच करायचाय ना !..त्या लोकांचं आपलं बरं असतं बुआ.. टेबलावरुन खालून आणि कुठुन कुठुन येतात त्यांच्याकडे हे मोठाले आकडे. ते आकडे एकले तरी आपल्या पोटात आकडा येतो..त्यांना नसेल का चिंता त्यांच्या आयुष्याची गणितं सोडवण्याची ? आपण म्हणतो कशी असेल ? सर्व बाजूंनी तर जमाचं होतेय त्यांच्या गणिताच्या या खेळात. त्यांना कुठली आलीय गणित सोडवण्याची समस्या ? पण त्यांच्याही आयुष्यात न सुटलेली गणितं असतातच !...आपली आकडेमोड, गणिताच्या पाय-या कमी असतली म्हणून, त्यांच्या पाय-याही मोठ्या असतील. म्हणूनच तर त्यांचे आकडेही मोठे आणि शिल्लकीचं गणितही मोठं ! ..मग कोणालाच सुटत नाही का या आयुष्याचं गणित ?..अनेकजण मोठ्या फुरशाकीनं सांगत असतात..आपलं बुवा काही गणित अडतच नाही कुणामुळं आणि कशामुळही !...खरचं त्यांची गणितं सुटलेली असतात का ? त्या १०० किंवा १५० पैकी तेवढेचं मार्क घेणा-या विद्यार्थांसारखी ! का एक दोन मार्क पडले म्हणून चिंता करणा-या त्या विद्यार्थासारखी आणि माझ्यासारख्या नेहमीच गणिताचा कंस न सोडवलेल्या माणसासारखी..

Sunday, January 29, 2012

आसावे आपुले घरटे छान

घराबद्दल प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मानल्या तरी सध्याच्या जगात निवाऱ्याचा प्रश्न फक्त चार भिंती आणि छत म्हणजे निवारा किंवा घर एवढ्या पुरताच तो मर्यादीत राहिलेला नाही. अर्थात इतर दोन गरजांची व्याख्याही बदलेली आहेच..मी ज्या घराबद्दल बोलतोय ते सामान्य माणसाच्या घराबद्दल बोलतोय. त्यातच घराबद्दल ज्यांच्या काही कल्पना असतात त्यांच्याबद्दल मी बोलतोय. तसच मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याच घराबद्दल बोलत नाही तर सर्वसमावेशकपणे घराच्या संपकल्पनेबबद्ल बोलतोय...त्यातच घर घेताना कोणती काळजी घ्यावी या आर्थिक किंवा वास्तूशास्त्राबद्दलही मला इथं फारसं काही बोलायचं नाही..

प्रत्येकजण आपल्या घराबदद्ल आपली एक कल्पना मनात बाळगून असतो..ते घर मग आपल्या आई-वडलांचं असो किंवा आपण नुकतचं खरेदी करणारं असो..घर ही प्रत्येकाची नितांत गरज आहे. त्याचं घरपण हे ते किती मोठं आहे, त्याच्या अंतर्गत सजावटीवर किती खर्च केलाय. यावर ठरत नाही..या भव्य सजावटीतून त्या घराची शोभा वाढेलही पण ज्या घरात घरपण नसतं तिथला हा सर्व डामडौलही भकास वाटतो..घरी येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तीला क्षणभर त्या वास्तूचा दिमाख भूरळ घालेल पण त्या घरात जर शांतता नांदत नसेल तर तो डामडौल, रुबाब कितीही मोठा असला तरी तो फिकाच वाटतो...आणि असं घरही तिथं राहणाऱ्या लोकांना खायला उठतं. मग घर म्हणजे काय ?..तर त्याची साधी व्याख्या मी तर अशी करेन की..ज्या घरात राहणाऱ्या सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आपलेपणाचा भाव असतो त्याला घर म्हणतात..किंवा घरातल्या लोकांच्या समाधानावरच त्याचं घरपण टिकलेलं असतं. अन्यथा ती फक्त चार भिंती आणि छत असलेली एक वास्तू राहते...

मी अनेकांना जवळून पाहिलय. ज्यांनी त्यांच्या घरासाठी मोठी मेहनत घेतलीय. त्यावर प्रचंड पैसा खर्च केलाय. पण घरी जायचं म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अनेक समस्या बोलून जातात..घराबद्दलची आसक्ती त्यांच्या नजरेत दिसत नाही. दिवसभर आपण नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर असतो तर काहींना दौरेही करावे लागतात. पण घऱी जायची ओढ लागणाऱ्यांची संख्या कमी दिसतेय. घरी परत तर जावचं लागतय. कारण तोच तर एक निवारा आहे. पण निवारा म्हणजे घर आहे का ?..ऑफीस सुटल्यानंतर कधी एकदाचा घर गाठतोय अशी भावना ज्यांच्या मनात असते त्या घरात समाधान नांदत असतं. घराकडे जायची ओढचं ही त्या घरातल्या माणसांच्या विश्वास, प्रेम आणि आपलेपणाची लक्षणं आहेत...

घरात आपली कोणीतरी वाट पाहत आहे ही कल्पनाच मनालाच सुखावून जाते. त्यातच घर आणि त्याचं घरपण आलं. पण ज्यांना घरी गेल्यानंतर घरात नाहीतर एखाद्या कोंडवाड्यात आल्यासारखं वाटतं, घरी असणं एक शिक्षा वाटते. असं का होतं ? तर त्यांच्यात काही समस्या असतात त्यामुळं त्यांची घराबदद्लची आसक्ती नाहीशी झालेली असते..घराबदद्लची ओढ राहिलेली नसते. या समस्या असाव्यात असं काही त्यांना वाटत नसतं. पण काही कारणानं अनेकांच्या घरात बेबनाव झालेला असतो. नवरा-बायको असो किंवा आई वडील आणि आपण असो किंवा मुलं असोत...त्यांच्यात सुसंवाद नसेल तर त्या घरात शांतता नांदत नाही..समस्या सर्वांनाच असतात पण त्यातून योग्य मार्ग निघाला नाही तर त्या समस्या उग्र स्वरुप धारण करतात. त्यातूनच घरात राहणाऱ्या लोकांमधे आपलेपणा राहत नाही. ही दरी जर वाढत गेली तर आपल्याच माणसाबद्दल आपल्या मनात अनेक शंका निर्माण होतात. त्यांच्याबदद्ल गैरसमज वाढतात. त्यातूनच नात्यातलं हे अंतर वाढत जातं आणि शेवटी रेल्वेच्या दोन रुळासारखे संबंध राहतात, जे दोन रुळ बरोबर तर असतात पण ते एकमेकांना कधीच मिळत नाहीत. त्यांच्यात ठरावीक अंतर राहतच..त्यामुळे समस्या सुटून सुसंवाद झाला तर त्यातून हे ऋणानुबंध घट्ट होतील, आपलेपणा वाढेल आणि घरालाही घरपण येईल.. म्हणूनच मी म्हणतो की घराचं मोठंपण त्यावर केलेल्या खर्चावर किंवा किंमती फर्निचरवर ठरत नाही.. तर घराचं घरपण हे तिथं राहणाऱ्या घरातल्या लोकांच्या प्रेमामुळे, समाधानामुळं त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्यानं दिसतं...असं प्रेम वासल्य, ममता आपलेपणा, समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटावं अशीच अपेक्षा आहे. आणि मग आपणही त्या छोट्याशा घरालाही आपला चॉकलेटचा बंगला काय, महाल काय, काहीही म्हणू शकतो. कारण घर आणि त्यांचं घरपण हीच आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जाते..हो अगदी यशाच्या चढत्या आलेखावर आरुढ होतानाही हे घरपण मोठी शक्ती देऊन जातं...एवढचं..

Friday, January 27, 2012

नाईट शिफ्ट- एक शापीत रात्र

नाईट शिफ्ट हा एक वाईट प्रकार आहे. खरं तर निसर्गाच्या विरोधात जाऊन जगण्याचा हा प्रकार आहे. म्हणजे सकाळी उठणं, दिवसभर आपली दिनचर्या करुन रात्री झोपणं हा निसर्गाचा नियम. लहानपणापासून आपल्या शरिरालाही याचीच सवय झालेली असते. पण काही नोकऱ्या अशा असतात की त्यांना नाईट शिफ्ट असते..आपल्याकडे पोलिस, रात्रीचा प्रवास करणाऱ्या सरकारी, खाजगी बसचे चालक यांनाही नाईट शिफ्टच असते. औद्योगिक वसाहतींमध्येही दिवसरात्र काम चालतं. त्यामुळे रात्रीचा दिवस करणाऱ्या या लोकांचं दुखही तेवढच आहे. खरतर मीसुद्धा त्याच नाईट शिफ्टला सरावलेला प्राणी..जवळपास पंधरा वर्षापासून मलाही या नाईट शिफ्टची सवय झालीय. नाईट शिफ्टला काम करणाऱ्या माणसांचं सर्व जगच बदलून जातं. सगळं जग झोपलेलं असतं तेंव्हा या लोकांचा दिवस सुरु होतो आणि इतरांचा दिवस सुरु झाला की यांची रात्र सुरु होते..खरं तर रात्रीपाळीत काम करायला कोणालाच आवडत नाही.. कोणीही आनंदानं हे काम करत नाही. पण पर्याय नसतो. त्यातही ज्यांना रात्रभर जागून काम करावं लागतं त्यांचे तर खूपच हाल..

तुम्ही म्हणाल त्यात काय, तुम्ही काही एकटेच आहात रात्रपाळीत काम करणारे ? पण तसं नाही, अनेकजण रात्रपाळीत काम करतात त्या सर्वांची दुखः सारखीच. सगळेच समदुखी. त्यांच्या दुखःला मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न कतरतोय एवढचं..! काय आहे की मुळातच रात्रपाळी लागली म्हटलं की पोटात गोळा येतो.. काहीजण तसं दाखवत नाहीत कारण त्यांना त्याची सवय झालेली असते. नवख्या लोकांना सुरवातीला त्याचा त्रास होता. हळूहळू त्याची सवय होत जाते. पण मी असेही काही महाभाग बघितलेत की नाईटशिफ्ट लागली म्हटलं की त्यांची तब्येत बिघडते.( खरी नव्हे रात्रपाळी टाळण्याचा तो एक बहाणा असतो ) आणि दुसरं म्हणजे नाईट शिफ्ट लागली की हमखास एक दोन दांड्या तर मारणारच.. मला या दांड्या मारणाऱ्यांचा ना हेवा वाटतो. बिनधास्त दांडी मारण्यालाही धाडस लागतं तो भाग वेगळा..पण मला नाही अशी दांडी मारायला मिळाली..

खरं तर रात्रीपाळीमुळे शारिरीक त्रास होतो. ऍसीडीटीचा त्रास सुरु होतो. तर काहीजणांना पोटाचे विकार, डोळ्यांचा त्रास. पाठ दुखण्याचा आजार. एक ना दोन अनेक व्याधीच मागे लागतात. आता त्याकाही फक्त रात्रापाळीमुळेच होतात असं नाही तर रात्रीपाळीमुळे त्या त्रासात वाढ होते हे मात्र नक्की. एकदा असंच पोट दुखणं आणि चक्कर येण्यासारख्या तक्रारीमुळे मी एका डॉक्टरकडे गेलो. त्यांनी औषधाबरोबर जी पथ्यं मला सांगितली त्यानंतर मी त्या डॉक्टरकडे पुन्हा गेलो नाही..सकाळी पाच सहा वाजता उठून व्यायाम करणे, सात वाजता कॉफी, नऊ वाजता ब्रेकफास्ट, दुपारी १ वाजता जेवण, चार वाजता कॉफी, सहा वाजता पुन्हा फलाहार आणि रात्री नऊ वाजता जेवून अकरा वाजण्याच्या सुमारास झोपणं ही पथ्यं त्या डॉक्टरांनी मला सांगितलं होती. त्यातच पाणी घरचंच पिणे. ऑफीसला जाताना सोबत पाण्याची बाटली आणि फळं घेऊन जाण्यासही सांगितलं. मी म्हटलं डॉक्टर माझा दिनक्रम जर एवढा शिस्तशिर असता तर मी तुमच्याकडं ह्या तक्रारी घेऊन आलो असतो का..? पण त्यांनी सांगितलेला दिनक्रर्म काही नाईट शिफ्टवाल्यांना मिळत नाही त्यामुळे दुसरा डॉक्टर शोधणं हाच त्यावरचा पर्याय होता..खरचं सुखी असतात ती माणसं ज्यांचा दिनक्रम असा आखीव असतो..

बरं ज्या-ज्या संस्थेत हे रात्रपाळीचं झेंगट असतं तिथला शिफ्ट लावणारा शिव्या खाल्ला नाही असं कधीच होणार नाही..त्यानं शिफ्ट लावताना कितीही शास्त्रीय पद्धतीचा वापर करो शिव्या त्याच्या पाचविला पुजलेल्याच म्हणून समजा..आम्हालाच नाईट शिफ्ट लागली का..? नेहमी आम्हीच दिसतो का त्यांना..? काहीजण तर रात्रीपाळी लागली की मागच्या रात्रपाळीचा हिशोबच काढतात..! हे झालं कर्मचाऱ्यांचं पण ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्या बायकोकडूनही शिफ्ट शेड्युल लावणारा शिव्या खातोच. बिच्चारा आता त्याचा त्यात काय दोष.? पण शिव्याशाप त्याला मिळणारच..! दुसरं असं की काही कार्यालयात नाईट शिफ्टचा एक हत्यार म्हणूनही वापर केला जातो..जो वरिष्ठांच्या डोक्यात गेला त्याला नाईट शिफ्ट लागलीच म्हणून समजा..ती किती दिवस ह्याचा मग हिशोब नाहीच..काही ठिकाणी रात्रीचं काम संपवून विश्रांती घेण्यास मुभा असते पण ती फारच कमी कार्यालयात असते. अनेक कार्यालयात तर झोपण्यास सक्त मनाई असते. रात्रपाळीत काम करणाऱ्यांवर लक्ष ठेण्यासाठी एखादं भरारी पथकंही असतं..आत्ता तर अनेक कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही दहशत आहे. त्यामुळे रात्री जागून काढण्याशिवाय पर्यायच नाही..

या रात्रपाळीत गमती जमतीही खूप होतात. अनेकांना झोप आवरत नाही..दिवसभर झोप काढली तरिही रात्रीची झोप ही रात्रीचीच झोप..पण काहींना नाही झेपत हे जागरण..त्यात जर रात्रीपाळीचा तुमचा प्रमुख जर खडूस असेल तर तुमची वाट लागलीच म्हणा..! एकतर रात्रीचं जागरण, वरुन त्याची बोलणी खायची म्हणजे नको नको होतं..आमच्याकडे काहीजण संगणकावर काम करत करतच झोपा काढतात..तर काहीजणांना काम करता करता डोळा केंव्हा लागला हेही कळत नाही..त्याचे किस्सेही मजेशिर असतात. ते किस्से काही या ठीकाणी सांगत नाही..पण अशाच रात्रपाळीचा अनेकांनी सदुपयोगही करुन घेतलाय बरं का.! अनेकांनी या रात्रपाळीतच आपली "जुळवाजुळव" करुन घेतलीय. रात्रीच्या ब्रेकमध्ये चहाचा एकच पेला रिचवताना उद्याच्या दिवसाचं "सेटींगही" काहींनी पक्कं करुन ठेवलेलं..तर काहीजण "नको त्या अवस्थेत" सापडल्याची उदाहरणंही आहेत. त्याच्या चर्चाही सर्वांच्या तोंडी असतात..त्यामुळे नाईट शिफ्ट ही एक शाप असली तरी काहींना मात्र ती वरदान ठरली..याच रात्रीतून त्यांच्या जीवनाची पहाट झालीय..हेही नसे थोडके..

Thursday, January 26, 2012

सिनेमा-हिंदी मराठी आणि दाक्षिणात्य..















हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवे प्रयोग होत आहेत. रजनीकांतच्या रोबोटनं धुमाकुळ घातल्यानंतर शाहरुखचाही सुपर हिरोछाप रा-वन आला. पण प्रेक्षकांना काही तो आवडला नाही. पण आज मला मुद्दामहून लिहायचय ते दाक्षिणात्य चित्रपटावर. हिंदीचा आवाका मोठा आहे. त्यांना मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. शिवाय ओव्हसिजचा धंदा आहेच. त्यामुळेच साठ सत्तर कोटीचं बजेट काही हिंदी चित्रपटांचं सध्या होत आहे. रा-वन चं शंभर कोटीपर्यंत गेलं होतं असं म्हणतात..पण हिंदीचा आवाका पाहता तेवढा पैसा वसूल होऊ शकतो. पण एवढा मोठा खर्च करुन चित्रपट बनवले जातात त्यांची संख्या फार जास्त नाही.. तर मग प्रादेशिक चित्रपटांची अवस्था काय असेल असा प्रश्न पडतो..या सर्वात एक समाधानाची बाब म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनं हिंदी चित्रपटांसमोर ठेवलंलं एक आव्हान..दाक्षिणात्य चित्रपट म्हटलं की तेलुगु आणि तमिळ ह्यांचा उल्लेख करावा लागतो..तमिळमध्ये रजनीकांत तर सर्वांचा बापच झालाय. त्यानं साठ वर्षाच्या वयातही हिंदीच काय हॉलिवूडलाही लाजवेल असा रोबोट केला आणि सर्वांना वेड लावलं..बरं त्यासाठी त्यानं मानधनही घेतलं तब्बल वीस कोटी रुपये..म्हणजे हिंदीतला शाहरुख, सलमान, आमिरपेक्षाही दुप्पट..आणि चित्रपटाचं बजेटही १०० कोटीच्यावर होतं असं म्हणतात. पण या चित्रपटानं निर्मात्याला त्याचा पैसा मिळवून दिला...हे रजनिकांतचं मोठं यश आहे. आजही त्याच्या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी उड्या पडतात..


हा झाला रजनिकांतचा करिश्मा, पण तेलुगु चित्रपटही काही कमी नाहीत. त्यांची लोकप्रियताही दांडगी आहे. सोलापूरसारख्या तेलुगु लोंकांचं वास्तव्य असणाऱ्या शहरात पूर्वीपासून तेलुगु सिनेमे लागतात. त्यांच्यासाठी सोलापूरात दोन स्वतंत्र थिएटर आहेत. तिथं फक्त तेलुगु चित्रपटच लागतात. पण मागच्या काही वर्षात हे प्रस्थं एवढं वाढलय की अहमदनगर, पुणे- मुंबईतही तेलुगु सिनेमांना मागणी वाढलीय. परवाच मी इंदापूरात तेलुगु चित्रपचटाची पोस्टर्स पाहिली...आणि गाणी म्हणाल तर आपल्याकडच्या काही रियालिटी शो मध्ये सुद्धा तेलुगु सिनेमातली अनेक गाणी ,त्यावरचे डान्स बसवले जातायत. हे त्या तेलुगु चित्रपटाचं यशच आहे. आ आंटे अमलापूरम या गाण्यानं महाराष्ट्रातही धुमाकुळ घातला होता. अशी गाणी महाराष्ट्रातही चालली. अनेकांच्या मोबाईलमध्येही तेलुगु गाण्यांचा भरणा असतो..ह्या प्रादेशिक सिनेमांना एवढं महत्व आलंय. तर मग आपला मराठी सिनेमा मागं का ?...मराठीतही बदल होत आहेत, महेश मांजरेकरसारखे दिग्ददर्शक आता पाच सात कोटींचा मराठी चित्रपट काढतात. पण त्यांची संख्या कमी आहे. एखादी कोंबडी किंवा वाजले की बारा हिट होतं. पण पुढे काय.?.तेलुगुत मात्र तसं नाही.. त्यांच्या सिनेमांची संख्या, त्यावर होणारा खर्चही मोठा आहे. हे सिनेमे निर्मात्याला त्यांचा पैसा वसूलही करुन देतात..


तेलुगु लोकांची एक मानसिकता आहे. खाओ, पिओ, मजा करो..म्हणूनच आजही मुंबई पुण्यात सिंगल स्क्रिनची जागा मल्टिप्लेक्स घेत असताना हैदराबादसारख्या शहरात सिंगल स्क्रिनही जोरात चालू आहेत. मी स्वतः मागच्या पाच सहा वर्षात कमीत कमी आठ ते दहा नवी सिंगल स्क्रिन थिएटर झाल्याची पाहिलीत. बरं आजही तेलुगु सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी इथं झुंबड उडते. पहाटेपासूनच तिकीटासाठी रांगा लावल्या जातात. इथल्या प्रेक्षकाला हवा असलेला सगळा मसला या चित्रपटांत असतो.. भरपूर मारधाड. दे दणादण, हॉट गाणी आणि अनाकलीय असा हिरो उभा केला जातो..व्हिलनही चांगलाच भाव खातो. असा सगळा मसला याच चित्रपटांत ठासून भरलेला असतो. मग काय पैसा वसूल..! त्यामुळेच तेलुगु सिनेमांचा आवाका आपल्यातल्या हिंदींच्या तोडीचा किंवा त्यांच्यापेक्षा वरचढ ठरतोय.. सध्याच्या टीव्हीच्या जमान्यातही हे तेलुगु सिनेमे भाव खातात. तेलुगुचे डब सिनेमेही अनेक वाहिन्यांवर दररोज गर्दीकरुन दिसतायत...तेलुगु किंवा तमिळ सिनेमा पाहताना भाषा सोडली तर कधीच तो प्रादेशिक वाटत नाही..ही उंची मराठी सिनेमा केंव्हा गाठणार ?.त्यातच आपल्या मराठीवर सध्या थोडा पैसा लावला जात असला तर आपले हिरो कोण ?.. हे चित्र बदलणार केंव्हा..? त्याचा विचार व्हायला हवा.. आजचा तरुण वर्ग डोळ्यापुढं ठेवून चित्रपटांची निर्मिती करावी लागतेय. त्यात मराठी खूपच मागं पडताना दिसतेय. थोडेफार प्रयोग होतायत म्हणून समाधान मानून घेण्यापेक्षा तेलुगु, तमिळ सिनेमासारखी निर्मीतीची उंची आपला मराठी सिनेमा केंव्हा गाठणार याचा विचार झाला पाहिजे.. हे चित्र बदललं पाहिजे आणि तेलुगु आणि तमिळ चित्रपटासारखी निर्मितीची, यशाची शिखरं मराठी सिनेमानंही गाठावी हीच एक मराठी म्हणून अपेक्षा..त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीला भरपूर शुभेच्छा..

Wednesday, January 25, 2012

राजकारणात घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ

महाराष्ट्रात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरुय. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी गावाकडचं वातावरण निवडणूकमय झालय. तर महानगरपालिकांच्या निवडणुकीमुळे मोठ्या शहरातही निवडणुकांचा माहौल तयार झालाय. राज्यात सगळीकडे निवडणूकीच्या चर्चा, कार्यकर्त्यांचा घोळका आणि गल्लीपासून मुंबईपर्यंतच्या पुढाऱ्यांची एकच लगबग सुरुय. जो तो आपल्या मुलाला-बायकोला-किंवा सुनेला तिकीट मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. लोकशाहीत घराणेशाहीनं शिरकाव केल्याचं हे चित्र आहे. आतापर्यंत लोकसभा किंवा विधानसभेसाठी आपल्याच घरात तिकीट आणण्याचा पुढाऱ्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना आमदार-खासदार नाहीतर झेडपी- पंचायत समिती किंवा महानगरपालिकेत तरी संधी मिळत होती पण अलिकडे ती संधीही मिळणं कठीण झालय. एकीकडं जातीचं आरक्षण त्यात महिला आरक्षणामुळे मतदारसंघ राखीव झालेत. त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांची गोची झालीय. तर दुसरीकडं महिला आरक्षणामुळे सामान्य घरातल्या महिलांना संधी मिळण्याची वाट मोकळी झाली होती. पण प्रस्थापीत पुढाऱ्यांनी त्या जागेवरही आपल्याच घरच्या महिलांची वर्णी कशी लागेल यासाठी सर्वशक्ती पणाला लावलीय.

झेडपीचा अध्यक्ष काय किंवा पंचायत समितीचं सभापतीपद काय, लाल दिवा आपल्याच घरात आला पाहिजे यासाठी पुढाऱ्यांनी मैदानात उडी घेतलीय. ज्या पुढाऱ्यांकडे आमदारकी किंवा पक्षात पद आहे. ते आपल्या बोराबाळांची वर्णी लावण्यासाठी धडपडत आहेत. शरद पवारांपासून सर्वच पक्षातले मोठे नेते नातेवाईकांना तिकीट मागू नका असं जाहीरपणे सांगत असले तरी प्रत्यक्षात ते शक्य नाही हे त्यांनाही माहित आहे. शरद पवार स्वतः केंद्रीय मंत्री, मुलगी सुप्रिया सुळे या खासदार तर पुतण्या अजित पवार उपमुख्यमंत्री आहे. तर भुजबळ स्वतः मंत्री पुतण्या खासदार तर मुलगा आमदार आहे. गणेश नाईकांचेही तेच आहे. काँग्रेसचे विलासराव देशमुख केंद्रीयमंत्री तर मुलगा आमदार. तेच चित्र सुशिलकुमार शिंदेच्या बाबतीत आहे. त्यांची मुलगीही आमदारही आहे. तर मुरली देवरा खासदार, मुलगा मिलिंद मंत्री आहे. इतर अनेक नेत्यांचे सपुत्र किंवा कन्या यांना मोठी पदं आहेत. तर भाजपच्या गोपीनाथ मुंडेंबरोबर त्यांची मुलगी पंकजा आमदार आहे. हे चित्र जवळपास सर्वच पक्षात आहे. त्यामुळे घराणेशाही राजकारणात रुजत आहे, त्याचा पाया भक्कम करत आहे हे यावरुन स्पष्ट दिसतय.

झेडपी आणि पंचायत समिती किंवा महानगरपालिकेच्या रिंगणातही आपल्या नातेवाईकांनाच तिकीट मिळावं यासाठी हे नेते फिल्डींग लावून बसलेत. मला नाहीतर माझा मुलगा, नाहीतर बायको किंवा सुन कोणालाही तिकीट द्या पण सत्ता मात्र आमच्याच घरात राहिली पाहिजे यावर या पुढाऱ्यांचा जोर आहे. तसं निवडणूक ही काय सोपी राहिली नाही. साधी पंचायत समिती म्हटलं तर पाच-सहा लाखांच्यावर चुराडा होतो असं म्हणतात. त्यातच सभापतीपदावर डोळा असेल तर हा आकडा त्याहून मोठा होतो. तर मग महानगरपालिका किंवा झेडपीच्या लालदिव्यासाठीचा आकडा सहजच २०-२५ लाखांवर जातोय. एवढी मोठी रक्कम सामान्य कार्यकर्त्या कोठून आणणार ? त्यातच निवडूण येण्याची क्षमता हाच एकमेव निकष सर्वच पक्षांत आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात राजकीय पद आहे. त्यांच्याचकडे पैसा आणि शक्ती दोन्ही एकवटलेलं आहे. त्यामुळे तिकीटही अशाच लोकांना दिलं जातय. त्यामुळे आरक्षण असो कि नसो सत्ता ही आपल्याच घराच्या ताब्यात ठेवण्यासाठी हे नेते धडपडत आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला आता झेडपी किंवा पंचायत समितीही मिळणं अवघड झालय.

लोकशाहीच्या नावाखाली नव्या रुपानं पुन्हा एकदा घराणेशाही अवतरत आहे. पूर्वी ती जातीवर आधारीत होती. आत्ता ती पैशाच्या ताकदीवर रुढ होऊ पहात आहे. त्यामुळे लोकशाही खरचं आपल्यात रुजलीय का ? याचा विचार करावा लागतोय. राजकीय पक्षही काही घरांमध्येच एकवटलेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, तेलुगु देसम, द्रमुक, अकाली दल काय किंवा काँग्रेस काय अशा पक्षावर सध्या एकाच घराची सत्ता राहिलीय. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता मात्र या नेत्यांच्यामागून "आगे बढो" एवढाच नारा देण्यापुरता शिल्लक राहिलाय...

Sunday, January 22, 2012

शिवसेना बाळासाहेबांची आणि आत्ताची...



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेला जन्माला घातले ती शिवसेना आज आहे का असा सवाल सध्या विचारला जातोय. त्यात तथ्यही आहे. कारण शिवसेनेची आजची अवस्था पाहता या संघटनेची वाताहत झाल्याचंच दिसतय. सेनेचे नेते जरी त्याचा काही फरक पडत नाही असं म्हणत असले तरी ते फारसं खरं नाही..मुळात बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली त्यावर त्यांचा एकहाती अंमल होता. एक दरारा होता. त्यांची संघटनेवर, शिवसैनिकांवर जबरदस्त पकड होती. तसच त्यांनी माणसं जोडली होती. त्यांचा सामान्य शिवसैनिकांशी थेट संवाद असायचा. तसच पक्षात फक्त आणि फक्त त्यांचाच शब्द असायचा आणि तो आदेश म्हणून पाळला जात होता. शिवसेना किंवा शिवसेनेबद्दल ब्र काढण्याचीही कोणाची हिम्मत नव्हती. संघटनेतच काय बाहेरचा माणूसही सेनेबद्दल बोलताना दहादा विचार करत असे. त्यांना अनेक स्तरातून विरोध होता पण थेट अंगावर घेण्यास सहसा कोणी पुढं येत नसे. बाळासाहेबांनी सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन एक मोठा संघर्ष केला. त्यातूनच त्यांच्या संघटनेचं पक्षात रुपांतर झालं आणि बघता बघता शिवसेना सत्तेत आली. सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवून त्यांनी मोठं यश संपादन केलं. त्यानंतर त्यांनी ठाण्यात मुसंडी मारली. पण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याच बालेकिल्यात सेना वाढली, मोठी झाली. मुंबई आणि मुंबई महानगरपालिका हेच शिवसेनेच्या आर्थिक ताकदीचा स्रोत होता आणि आजही राहिलाय. कारण मागच्या ४७-४८ वर्षात सेना फक्त एकदाच राज्याच्या सत्तेवर साडेचार वर्षे होती. त्यानंतर ती सतत विरोधातच राहिलीय. त्यामुळे कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिकांचा जो आर्थिक प्रश्न असतो तो मुंबईतच मिळत होता. त्यामुळेच सेनेला सर्व प्रकारचं पाठबळ मिळालं ते मुंबईतूनच..


मुंबईत शिवसेनेशिवाय कुणाचा आवाज हि कल्पनाही केली जात नव्हती. पण ती ताकदही आता सेनेत राहिली नाही. त्यांची अलिकडची आंदोलनही फुसकी ठरलीत. मुंबई बंद पाडण्याची धमक फक्त शिवसेनेत होती. ( बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत...उद्धव ठाकरेंच्या नाही..) तर सेनेतून बाहेर पडणे ही कल्पनाही कोणी करत नव्हतं. ठाण्यातलं खोपकर प्रकरण आठवून बघा.. त्यामुळेच सेनेतून बाहेर पडणं म्हणजे आपला खोपकरच होणार ही भिती होती. म्हणून छगन भुजबळ यांनी १९९१ ला सेना सोडली तेंव्हा तेसुद्धा जीव मुठीत घेऊन अनेक महिने परागंदा होते. भुजबळांसारखा जबरदस्त ताकदीचा माणूस...मुंबईच्याबाहेर मराठवाड्यात सेनेला पोचवण्यात भुजबळांचा सिंहाचा ( वाघाचा ) वाटा आहे. पण ते शरद पवारांच्या हाती लागले..१२ आमदारांना घेऊन भुजबळांनी शिवसेनेच्या अभेद्य गडाला तडा देण्याचं धाडस दाखवलं..पण त्यांनाही पळता भूई थोडी झाली होती..पण त्यानंतर किती गेले याचा पत्ता सेनेच्या आजच्या नेतृत्वालाही नाही.. शिवसेनेत तोंड वर करण्याची हिंमत होत नव्हती पण आज तो उठतो आणि सेनेच्या नेतृत्वावर टीका करतो..अर्थात त्यांचा थेटरोख उद्धव ठाकरेंवर असतो. अनेकजण सेना सोडताना थेट उद्धव ठाकरेंवर टीका करतात. त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतात. पण बाळासाहेबांवर विश्वास आणि श्रद्धा प्रकट करतच.. हे असं का व्हावं ? शिवसेनेची ही अवस्था का झाली ? याची उत्तरही सर्वांना माहित आहेत. मुळात बाळासाहेबांची शिवसेना एक आक्रमक संघटना होती. त्याचं नेतृत्व बाळासाहेबांच्या वज्रमुठीत होतं. त्यांचा शब्द आदेश होता. बाळासाहेबांच्या एका शब्दाखातर जीवाची बाजी लावणारी माणसं त्यांनी जोडली होती. म्हणूनच बाळासाहेबांना त्यांच्या शिवसेनेत मानाचं स्थान आहे. इतर पक्षातल्या लोकांमध्येही बाळासाहेबांबदद्ल आदर आहे. त्यांची मैत्रिही मोठीही दिलदार आहे. शरद पवार, अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध आजची चर्चिले जातात.. वाघाची संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जायचं. पण तो आब.. तो रुबाब आता राहिला नाही...

बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची धुरा सोपवली तेव्हापासूनच शिवसेनेच्या अधोगतीला सुरवात झाली. मुळात शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेला गरज आहे ती तेवढ्याच आक्रमक नेतृत्वाची आणि उद्धव यांच्य़ात ती नाही. उध्दव हे सौम्य स्वभावाचे आणि कलाकाराच्या मनाचे. त्यांना सेनेची धुरा तर दिली पण ती पेलवता आली नाही. त्यातच त्यांचं सल्लागार मंडळ हेच कुचकामी आहे. त्यांच्या अवतीभवतीच्या नेतेमंडळीची नावं घेतली तर ती शिवसेनेच्या स्वभावाला कुठचं मिळत नाहीत. त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंच्या जवळचे म्हणून त्यांचा शब्द चालतो आणि इतरांना डावललं जातं ही भावना शिवसेनेत झालेली आहे. शिवसेनेच्या खासदार आमदारांनाही जर सेनेचं नेतृत्व वेळ देत नाही असा आरोप होत असेल तर ती गंभीर बाब आहे. जी शिवसेना व्हॅलेंटाईन डे सारख्या प्रकारांना आपल्या तोडफोडवृतीनं विरोध करायची तीच सेना आता तरुण व्होट बँक आणि नातवाच्या नेतृत्वामुळे मवाळ भूमिका घेतं ही कुठली शिवसेना ? तर जे बाळासाहेब ठाकरे घराणेशाहीवर जबरदस्त प्रहार करत त्यांनीच सुरवातीला उद्धव यांच्याकडे संघटनेची-पक्षाची जबाबदारी सोपवली...त्याचा कहर म्हणून की काय पुतण्या राज ठाकरेंच्या मनसेला तोंड देण्यासाठी नातू आदित्यला मैदानात उतरवलं. याला घराणेशाही नाही तर काय म्हणायचं.. ?मुळात आदित्यला अजून मिसरुडही फुटलेलं नाही तर युवा सेना नावाची सुभेदारी बहाल केली...मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यालाही उद्धवबरोबर आदित्यला मान द्यावा लागतो हे कशाचं द्योतक आहे. सेनेच्या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नेत्यांना व्यासपीठावर जागा मिळत नाही मात्र आदित्यला मात्र पहिल्या रांगेत जागा. हे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न नाही तर काय..?

शिवसेनेच्या मागच्या ४७-४८ वर्षातल्या इतिहासावर बरचं काही लिहण्यासारखं आहे. पण बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यातलं अंतर आणि फरक पडताळण्याचा हा प्रयत्न आहे..बाळासाहेबांची शिवसेना ते आदित्य ठाकरेंची युवासेना व्हाया उद्दव ठाकरेंची सेना हा प्रवास शिवसैनिकांनी पाहिलाय..पण तो शिवसैनिकांनाच पचणी पडत नाही. शेवटी काय ? ज्या संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी आपलं सर्वस्व वाहिलं त्यांना काहीच किंमत नाही. शिवसेना वाढवण्यास, त्याला पाठबळ देण्यात वाघाचा वाटा ज्यांचा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि आदेश बांदेकरसारख्यांना थेट विधानसभेची उमेदवारी असा प्रकार शिवसैनिकांनाही आता सहन होण्याच्या पलीकडे गेलाय. त्यांच्याही मनात जय महाराष्ट्र..करा कष्ट आणि व्हा नष्ट अशीच भावना वाढीस लागलीय...म्हणूनच सेनेचा गड आता गड राहीला नाही तर तोसुद्धा मुंबईतल्या फ्लॅट संस्कृतीसारखा आकसलाय. तोसुद्धा वन बिएचके किंवा वन रुम किचनसारखा छोटा झालाय. त्यामुळं त्याला आता गड म्हणनंही आतिशयोक्ती वाटतंय. याच बदलत्या नेतृत्वामुळं सेनेतून नारायण राणे, राज ठाकरे, सुरेश प्रभुंसारखे असंख्य मोहरे त्यांना सोडून गेले...आणि उरलेत ते फक्त कारकून आणि बारभाई..त्यांच्या जीवावर सेनेचा हा गाडा ओढला जातोय..बाळासाहेबांच्या आजच्या वाढदिवशी त्यांना त्यांनीच उभी केलेली जीवापाड प्रिय असलेली शिवसेना फुटताना त्याला तडे जाताना पाहण्याचं दुखः पचवावं लागतय...याला काय म्हणावं ? पण हा शिवसेनेचा डोलारा पुन्हा उभा रहावा अशीच तमाम मराठी मनाची आणि असंख्य शिवसैनिकांची आजही इच्छा आहे. ती पुन्हा मानानं उभी रहावी आणि मुंबईतही आवाज कुणाचा ? असा आवाज घुमला पाहिजे एवढीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त अपेक्षा...

जय महाराष्ट्र..

Sunday, January 15, 2012

ऑस्ट्रेलियात भारताचे पानिपत



भारत पर्थमधली तिसरी कसोटीही हरला..आणि कांगारुंनी मालिका जिंकत आपणच श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करुन दाखवलं..क्रिकेटमध्ये हार जित होतच असते..पण ज्या पद्धतीनं टीम इंडिया हरली त्याला क्रिकेट म्हणायचे का असा प्रश्न लहान मुलंही विचारतील..सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि यशस्वी कर्णधार म्हणून ज्याकडे बघितलं जातं तो महेंद्रसिंग धोनी.. हे सर्वच महान फलंदाज आहेत. असं असतानाही पहिल्या तिनही कसोटीत या महारथींची कामगिरी काहीच झाली नाही. यापैकी एकाही महारथीची बॅट ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर तळपली नाही.. द्रविड आणि लक्ष्मण तर कसोटीतले भारताचे हुकमी एक्के पण त्यांचीही बॅट तळपली नाही याला काय म्हणावे..तेंडूलकरची कामगिरीही शून्यच झाली. ज्याकडे अख्खं जग क्रिकेटचा महाराजा म्हणून पाहतं, त्याच्या महाशतकाची चातकासारखी वाट पहातं तो सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर अपय़शी ठरला..या महत्वाच्या फलंदाजांनीच जर नांगी टाकली तर नवखे फलंदाज तरी काय दिवा लावणार.. पण नवख्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीनं थोडीफार कामगिरी केली. पण ती पराभव वाचवण्यासाठी कामी येण्यासारखी नव्हती..तसच गोलंदाजीत यादवनही चांगली कामगिरी केली...पण कसोटीत पराभव झाला तो फलंदाजांमुळे..

तीन कसोटीपैंकी दोन कसोटीत भारत डावानं मार खातो याला काय म्हणायचं. ज्या संघाच्या यादीवर एक नजर टाकली तर मोठ मोठं विक्रम असलेले हे महारथी. विश्वकप जिंकणारा संघ अशी ख्याती असलेले महान खेळाडू अचानक ढेपाळले कसे..तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं १८० धावांची खेळी केली..तर भारतानं पहिल्या डावात १६१ आणि दुसऱ्या डावात १७१ धावा काढल्या... म्हणजे एकट्या वार्नरच्या धावाही अख्खा भारतीय संघ काढू शकला नाही हे कशाचं द्योतकं आहे.. ज्या खेळपट्टीवर कांगारुंचे खेळाडू तीनशे धावा काढतात, शतकामागून शतकं ठोकतात त्याच खेळपट्टीवर भारताचे हे महारथी अपयशी ठरतात यावर कोणचाही विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे, हे पचवण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही..

कागदावर सर्वात बलवान असलेला आपला संघ असा एकदम नांगी का टाकतो याची उत्तरं शोधण्याची आवश्यकताय..जो पराभव झाला त्याला कर्णधार म्हणून आपण दोषी आहोत असं महेंद्रसिंग धोनी आता म्हणत आहे..अर्थात यश किंवा अपयश हे काही एकट्या कर्णधाराची जबाबदारी नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे त्याच्या यशाची काय आणि अपयशाची काय जबाबदारी ही सर्वांचीच असते. पण मागच्या काही दिवसांपासून ज्या बातम्या येत आहेत. त्यातून धोनीच्या कर्णधारपदावरुन संघात वाद तर नाही ना अशी शंका येत आहे. कारण धोनीच्या कर्णधारपदावर वरिष्ठ खेळाडू नाराज असल्याच्या बातम्या मागच्याच आठवड्यात झळकल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघात ऑल इज वेल आहे असं म्हणता येत नाही..भारताच्या सध्याच्या सुमार कामगिरीवरही सर्व स्तरातून टीका होऊ लागलीय. वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी पाहून आत्ता बस्स झालं त्यांना घरी बसवलं पाहिजे असं सुनिल गावस्कर यांनीही म्हटलय. त्यामुळे संघात सुधारणा होणं गरजेचं आहे..नुसतं कागदावर मजबूत संघ असून चालणार नाही तर त्याची कामगिरीही तेवढीच मजबूत असायला हवी..त्यामुळे ही मरगळ दूर करुन टीम इंडियानं पुन्हा एकदा यशाचा झेंडा फडकवला पाहिजे तरच आपण विश्वविजेते आहोत असं मिरवण्यात काही अर्थ आहे...