Showing posts with label सचिन. Show all posts
Showing posts with label सचिन. Show all posts

Friday, November 22, 2013

सचिनला भारतरत्न दिला म्हणून एवढी बोंब का ?


सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याचं जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली..सचिनला भारतरत्न का दिला..तो काही फुकट खेळला आहे का यापासून आधी ध्यानचंद नंतर सचिनला भारतरत्न द्यायला हवा होता असा सुर निघाला...भारतरत्न हा सचिनला द्यावा अशी मागणी मागच्या दोन वर्षांपासून होत होती पण भारतरत्न हा खेळाडूंना देण्याची परंपराही नव्हती आणि तशी त्यात तरतूदही नव्हती..पण त्यानंतर भारतरत्न देण्याच्या व्याखेत बदल करण्यात आला.. जनता दल संयुक्तचे नेते शिवानंद तिवारी यांनी तर अकलेचे तारे तोडत सचिन क्रिकेट फुटक खेळलेला नाही त्याला भाररत्न का दिला असा तर्क लावला..
 

भारतरत्न हा सरकारनं जाहीर केला तो सचिननं क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल..24 वर्ष त्यानं भारताच्या क्रिकेटमध्ये महत्वाचं योगदान दिलय..क्रिकेट हा मुळात सभ्य माणसाचा खेळ म्हटला जातो..पण याच क्रिकेटमध्ये आज बजबजपुरी माजलीय..तरीही सचिननं त्याचा तोल कधीही ढळू दिला नाही. तो यशाच्या शिखरावर आहे. त्यानं सर्व विक्रम मोडीत काढलेत. त्यानं पैसाही अमाप कमावला पण क्रिकेटच्या सभ्यतेला धक्का न पोचवता..मग त्यात त्याचं काय चुकलं..

सचिनला भारतरत्न दिला म्हणून ओरडणा-यांनी इतर पुरस्कारांकडे पहावं. पद्म पुरस्कारही तेवढेच मानाचे आहेत. पण ते आजकाल कोणाला दिले जातात तेही पहावं..दोन तीन वर्षापूर्वी सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला..आता या सैफचं काय योगदान आणि योग्यता आहे.. सिनेमात तरी त्यानं काय दिवे लावलेत. मग त्यालाही पुरस्कार दिलाच ना..सैफ सारखी अनेक नावं देता येतील त्यांना हा पुरस्कार का दिला असा सहज प्रश्न पडतो..

दुसरं असं की आजकाल कोणताही पुरस्कार दिला तरी त्यावर वाद हा होतोच..आता सचिनला भारतरत्न दिल्यानंतर वाजपेयीं का नाही दादासाहेब फाळकेंना का नाही अशी विचारणा केली जातेय..पुरस्कार एक आणि दावेदार अनेक अशी अवस्था झालीय..मग पुरस्कार कोणालाही जाहीर केला तरी वाद हा होतच राहणार..म्हणून काय असे सन्मान द्यायचेच नाहीत का..? त्यामुळं सचिनला भारतरत्न दिला म्हणून काय मोठं आभाळ कोसळलेलं नाही आणि दिला नसत तरी सचिनचं महत्व आणि त्यानं क्रिकेटला दिलेलं योगदान काही कमी झालंसतं. याहीपुढं जाऊन लता मंगेशकर यांनी जसं म्हटलं त्याप्रमाणे सचिन भारतरत्न नाही तर विश्वरत्नच्या लायकीचा आहे..

 

Sunday, January 8, 2012

सचिनच्या महाशतकाची प्रतिक्षा



सचिन तेंडुलकरच्या महाशतकाची सध्या जोरदार चर्चा सुरुय. या सामन्यात तो महाशतक ठोकणार त्या सामन्यात ठोकणार असं म्हणत जवळपास आठ ते दहा महिने झालं सचिनचं ते बहुचर्चित महाशतक काही पूर्ण होत नाहीए. प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला सचिन महाशतक झळकवणार अशा हेडलाईन्स मात्र प्रसारमाध्यमात झळकतात. त्याचे चाहतेही या महाशतकाची आतुरतेनं वाट पहात आहेत. पण काही केल्या हे शतक काही पूर्ण होत नाहीए..जणु काही सचिनच्या मागं सध्या साडेसातीचा फेराच लागलाय. काहीजण त्याला सल्ले देत आहेत तर काहीजण नेहमीप्रमाणे टीका करत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचाही परफार्मन्स खूपच ढासळलाय. पण सचिनकडून त्याच्या महाशतकाची अपेक्षा सर्वच क्रिकेटप्रेमी करत आहेत. पण तब्बल १३ वेळा त्याला या महाशतकानं हुलकावणी दिलीय. त्याचा खेळ फारसा खालावलाय असं म्हणता येणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवातीच्या दोन कसोटीत संघ ढेपाळला पण सचिनची कामगिरी चांगली झालीय. त्यातच सर्वात जास्त धावाही त्यानंच केल्यात. पण शतकाला मात्र अजून गवसणी घालता आली नाहीए..

सिडनीत झालेल्या दुसऱ्या कसोटीत सचिन हे महाशतक पूर्ण करेल अशी आशा होती. वातावरणही तसच होतं. कारण सिडनीच्या मैदानावर सचिननं आजपर्यंत चांगला खेळ केलेला आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाची सध्याची टीमही काही मजबूत नाहीए. सिडनीची खेळपट्टीही पाटा आहे. मायकल क्लार्कनं काढलेलं त्रिशतक, हसी आणि पॉटिंगनं केलेली शतकी खेळी पाहता या खेळपट्टीवर सचिनचं महाशतक पक्कं असाच सर्वांचा होरा होता. पण घात झालाच....ऑस्ट्रेलियाच्या नेहमीच्या गोलंदाजांना सचिन दाद देत नाही हे पाहून मायकल क्लार्कनं चेंडू हातात घेतला आणि सरावाचा नसलेल्या एका सोप्या चेंडूनं सचिनची विकेट पडली..सचिन ८० धावा काढून तंबूत परतला आणि सचिनसह त्याचे चाहते तमाम क्रीडा रसिक यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला...याच खेळपट्टीवर सचिनचं महाशतक होईलं असा आशावाद तिथल्या प्रसारमाध्यमांनीही व्यक्त केला होता. पण या कसोटीत त्याला नशिबानं पुन्हा हुलकावणी दिली..

सचिन हा महान खेळाडू आहे यात वादच नाही, त्याचा परफॉर्मन्स बिघडला की त्याच्यावर टीकेची झोड उठवली जाते. सिडनीत ज्या सोप्या चेंडूवर त्याची विकेट उडाली ते पाहून त्याचा पूर्वीचा साथीदार सौरव गांगुलीनंही त्याच्यावर टीका केलीय. असाच बचावात्मक खेळ करायचा असेल तर तु क्रिकेट सोडून दुसरा खेळ खेळ असा सल्ला मी त्याला देईनं असं गांगुलीनं म्हटलय...असो टीका करणाऱ्यांना टीका करुदेत त्यामुळे त्याचं महत्व आणि त्याचं क्रिकेटचं योगदान काही कमी होत नाहीए.

सचिनवर या महाशतकाचं मोठं दडपण आहे याची त्यालाही जाणीव आहे. पण क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. या खेळात शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही घडू शकतं..अशावेळी त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे..ऑस्ट्रेलियाविरुद्धच्य कसोटी मालिकेतल्या आणखी दोन कसोटी शिल्लक आहेत. त्यात तो ही उणिव भरुन काढेलच. पण जोपर्यंत हे महाशतक पूर्ण होत नाही तोपर्यंत महाशतकाची हुरहुर ही लागतच राहणार.. पुढच्या कसोटीत हे महाशतक पूर्ण व्हावं यासाठी सचिनला आपणही शुभेच्छा देऊयात..